दृष्टिकोन : मोदींनी रातोरात असा बदलला गुजराती मतदारांचा मूड

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter

    • Author, संजय कुमार
    • Role, संचालक, CSDS

गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताना काँग्रेस आणि भाजपमध्ये खूप हातघाईची लढाई सुरू असल्याचं चित्र सकाळच्या वेळेस निर्माण झालं होतं. मात्र, अखेर भाजपनं बाजी मारत विजय मिळवला.

काँग्रेस पक्ष या निवडणुकीत खूप ताकदीनं भाजपच्या विरोधात उभा ठाकला होता. त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढसुद्धा झाली. मात्र, तरीही काँग्रेसला मोदी आणि अमित शहांचा गड असलेल्या भागात त्यांना पराभूत करणं शक्य झालं नाही.

भाजपनं हिमाचल प्रदेशात खूप सोपा विजय मिळवला आणि हिमाचल प्रदेशच्या विजयाबरोबर भाजपनं आपल्या सत्ता असलेल्या राज्यांच्या यादीत आणखी एका राज्याची भर पडली. त्यामुळे काँग्रेसशासित राज्य जिंकून घेण्याचा भाजपचा सपाटा या निवडणुकीतही कायम राहिला.

तसंच हिमाचल प्रदेशातील विजयामुळे 'काँग्रेस मुक्त भारत' या मिशनकडे भाजपनं सुरू केलेली घौडदौड सुरू राहिली. भाजपनं या दोन्ही राज्यात विजय मिळवला असला तरी हा पक्षापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे.

जेव्हा जेव्हा काँग्रेस भाजपला टक्कर देतो तेव्हा पंतप्रधान मोदी मोर्चा सांभाळतात आणि विजय मिळवून देतात हे तथ्यावरून दिसतं.

गुजरातमुळे हैराण?

मोदींविरुद्ध मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या नेत्यांनी केलेली वक्तव्यं काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला दिशाहीन करत असल्याचं यावेळी दिसून आलं.

हिमाचल प्रदेशात भाजपचा विजय होईल यात कोणती शंका नव्हती. हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलतं, हा तिथला आजवरचा इतिहास आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजपच्या विजयानं बहुतेक जण हैराण झाल्याचं दिसतं.

अमित शाह

फोटो स्रोत, Twitter

गुजरातमध्ये भाजपविरोधात अनेक गोष्टी होत्या. 22 वर्षांच्या सत्तेविरोधात एक लाट राज्यात दिसून येत होती. हार्दिक पटेलांच्या नेतृत्वाखाली पाटीदार समाजाचं आंदोलन सुरू होतं, तर जिग्नेश मेवाणींच्या नेतृत्वाखाली दलितांनी आंदोलन छेडलं होतं. ओबीसी समाजाच्या नाराजीचं नेतृत्व अल्पेश ठाकोर करत होते.

गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचं नसणं हे देखील भाजपच्या विरोधात असल्यासारखंच वाटत होतं. मात्र या सगळ्यांच अडचणींवर मात करून भाजपनं गुजरातवर विजय मिळवला. मात्र, 2012मध्ये भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या आता तर केवळ 99 जागाच त्यांना मिळाल्या आहेत.

तरीही भाजपच्या मतांच्या एकूण टक्केवारीत वाढच झाली आहे. 2012मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 48.30 टक्के होती. आता ही टक्केवारी वाढून 49.1 टक्के झाली आहे.

भाजपला विजय मिळाला कसा?

मग असं काय होतं ज्यामुळे भाजपला विजय मिळाला? मोदींनी शेवटच्या दोन आठवड्यांत गुजरातमध्ये आक्रमक प्रचार केला. याचा प्रभाव मतदारांवर झाल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं. तसंच CSDS च्या सर्वेक्षणातही मोदींच्या शेवटच्या टप्प्यातील प्रयत्नांमुळे मतदारांनी भाजपला मतदान केल्याचं आढळून आलं.

ज्या मतदारांनी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं मन बनवलं होतं त्या मतदारांनीही शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येनं भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला. मतदारांच्या या निर्णयाला मोदींनी केलेला प्रचार कारणीभूत ठरला.

सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे गुजरातमध्ये जवळपास 35 टक्के मतदारांनी मतदानाच्या काही दिवस आधीच कोणाला मतदान करायचं हा निर्णय घेतला होता. कारण सुरुवातीच्या आठवड्यात काँग्रेसने खूप आक्रमक प्रचार केला होता.

अमित शाह

फोटो स्रोत, Twitter

काँग्रेसच्या या प्रचारावेळी भाजप एक पाऊल मागे गेल्याचं दिसून येत होतं. मात्र, जेव्हा नरेंद्र मोदींनी आक्रमक प्रचाराला सुरूवात केली तेव्हा काँग्रेसला हा प्रचार जड होऊ लागला होता. विशेषतः मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर मोदींच्या निवडणूक प्रचार मोहीमेला गती मिळाली.

अय्यर यांनी 'नीच' शब्दाचा वापर केल्यानंतर भाजपची आक्रमकता वाढली होती. मोदींनी अय्यर यांच्या या वक्तव्याचा संबंध गुजराती ओळख आणि गुजराती अस्मिता यांच्याशी जोडला. यानंतर प्रचारात आघाडी घेतलेला काँग्रेस पक्ष मागे गेला आणि त्यांनी भाजपविरोधी जो माहोल बनवला होता त्याला धक्का लागला.

line

पाहा - CSDS चे संचालक संजय कुमार यांच्या बरोबर फेसबुक LIVE

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

line

काँग्रेसनं हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि छोटू वसावा यांसारख्या अन्य समुदायाच्या नेत्यांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसला सर्वाधिक मतं मिळाली.

पाटीदारांची सर्वाधिक मतं भाजपला

काँग्रेसबाबत झालेले हे बदल काँग्रेसला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत. पाटीदारांची मतं काँग्रेसला मिळतील अशी आशा काँग्रेसला होती. मात्र, सर्वेक्षणात असं दिसलं की, काँग्रेसला पाटीदारांची 40 टक्क्यांहून कमी मतं मिळाली. तर भाजपला पाटीदारांची 60 टक्के मतं मिळाली.

जिग्नेश मेवाणींबरोबर झालेली युतीसुद्धा काँग्रेसच्या कामास आली नाही. दलितांची 47 टक्के मतं काँग्रेसला मिळाली. त्याचवेळी भाजपला दलितांची 45 टक्के मतं मिळाली. तसंच भाजपला 60 टक्के मतं पाटीदारांची मिळाली.

काँग्रेस आणि भाजपमध्ये ओबीसींची मतं अशाच प्रकारे विभागली गेली. पाटीदारांच्या मताची भरपाई भाजपनं आदिवासींच्या मतांनी केली. 52 टक्के मतं भाजपला गेली. 40 टक्के मतं मात्र काँग्रेसला मिळाली.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter

मागच्या निवडणुकीत आदिवासींनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतं दिली, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. काँग्रेसनं छोटू वसावाबबरोबर युती केली नसती तर भाजपला आणखी आदिवासींची मतं मिळाली असती.

खरंतर गुजरातमध्ये अजून एकदा निवडणूक जिंकली म्हणून आणि काँग्रेसकडून हिमाचल प्रदेश हिरावून घेतल्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये सगळं आलबेल होतं असा होत नाही.

सरकारच्या विकास कार्याचं रेकॉर्ड समाधानकारक आहे. पण अजूनही असंतोष आणि निराशा स्पष्टपणे दिसते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात अनेक मतदार नोटाबंदी आणि जीसटीसारख्या धोरणामुळे नाखुष आहेत.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Twitter

शेतकरी सरकारवर नाराज आहेत, कारण त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. असं असूनसुद्धा एका मोठ्या पट्ट्यानं काँग्रेसला मत दिलं नाहीत. यावरून काँग्रेस रक्ष लोकांच्या भाजपप्रती असलेल्या नाराजीला मतांमध्ये परावर्तित करू शकला नाही असं म्हणता येईल. गुजरातमध्ये भाजप सरकार हटविण्यासाठी मतदारांची नाराजी पुरेशी नव्हती.

भाजपाला हटविण्यासाठी असंतोषाची गरज

भाजपला हरविण्यासाठी एका असंतोषाची गरज होती. पण लोकांमध्ये इतकी नाराजी पण नव्हती जिचं रुपांतर असंतोषात होईल. हार्दिक पटेलच्या रॅलीत जमलेली गर्दी बघून लोकांच्या नाराजीचा अंदाज आला होता. पण पंतप्रधान मोदी आपल्या सगळ्या रॅलीत अस्मितेचा डाव टाकण्यात यशस्वी झाले. त्यांनी गुजराती अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला ज्यामुळे लोकांची नाराजी कमी झाली.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter

भाजप 49 टक्के मतांनी जिंकला आहे पण त्याचवेळी काँग्रेस 42 टक्के मत घेऊनसुद्धा हारला आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा पराभव झाला पण 42 टक्के मतं मिळवण्यात त्यांना यश आलं. पंतप्रधान मोदी भाजपची हवा निर्माण करण्यात यशस्वी झाले खरे, पण तरी भाजपच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

2014च्या लोकसभा निवडणुकांनंतर वाढत्या बेरोजगारीमुळे गुजराती युवक भाजपपासून दूर गेले आहेत. भाजपचा कणा मानला जाणारा व्यापारी आणि उद्योजक वर्गात नाराजी आहे. आपल्या निष्ठावान समर्थकांना अशा प्रकारे गमावणं हा भाजपासाठी चिंतेचा विषय असायला हवा.

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : वैदर्भीय खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू - रोडगे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)