प्रेस रिव्ह्यू : समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यासोबत प्रकल्पच्या विरोधात कार्यक्रम केले ते 'मंचस्नेही' या प्रकल्पात दलाल झाले असून शेतकऱ्यांच्या जमिनी कमी भावात घेऊन सरकारला 5 पट भावानं विकत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लोकसत्तानं याबाबतच वृत्त दिलं आहे.

नागपूर इथं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केलीआहे.

समृद्धी प्रकल्पात शेतकऱ्यांच्या नावावर चांगभलं करून घेणारी टोळीच कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

...तर हिंदी सिनेमा दाखवू देणार नाही : राज ठाकरे

सलमान खानच्या आगामी 'टायगर जिंदा है' या सिनेमामुळे जर 'देवा' या मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळणार नसेल तर महाराष्ट्रात एकही हिंदी सिनेमा दाखवू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ठाकरे यांनी चित्रपटगृहांच्या मालकांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

'देवा' हा मराठी तर सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हे दोन्ही सिनेमा 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहेत.

नागपूरमध्ये टोळीयुद्धातून 2 खून

नागपूरमध्ये मंगळवारी रात्री टोळीयुद्धातून 2 खून झाले आहेत. नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. असे असतानाही ही घटना घडली आहे. 'लोकसत्ताने' ही बातमी दिली आहे. मृतांची नावे भुऱ्या उर्फ संजय कदई बानोदे आणि बादल संजय शंभरकर अशी आहेत. तर जखमीचे नाव राजेश हनुमंत यादव असे आहे. 2 दिवसांतील नागपूरमधील खुनाची ही चौथी घटना असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

स्वामीनाथन शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी नाही

स्वामीनाथन समितीच्या शिफारसींनुसार पिकांना हमीभाव द्यावा, अशी मागणी एकाही राज्य सरकारनं केली नसल्याची बातमी एबीपी माझानं दिली आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे खासदार एम. बी. राजेश आणि काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारकडून 22 पिकांसाठी हमीभाव ठरवण्यात आला आहे. पण स्वामीनाथन समितीच्या शिफारशींनुसार हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्यानं होत आहे.

आगे हत्याप्रकरणात सरकार उच्च न्यायालयात

अहमदनगर जिल्ह्यातल्या नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या हत्याप्रकरणात 26पैकी 13 साक्षीदार फितूर झाले होते. या प्रकरणात 9 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. राजू आगे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

मुंबईत 7 महिन्यांत महिला अत्याचारांचे 2705 गुन्हे

मुंबईत जानेवारी ते जुलै 2017 या कालावधीमध्ये महिलांवर अत्याचारांचे एकूण 2705 गुन्हे नोंद झाले आहेत. या संदर्भातील बातमी दैनिक सामनानं दिली आहे.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. या गुन्ह्यांत विनयभंग (1257), अपहरण (785), बलात्कार (407) आणि छेडछाड (256) यांचा समावेश असल्याचं यात म्हटलं आहे.

'विराट-अनुष्का देशद्रोही'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी परदेशात जाऊन लग्न केल्यानं ते देशद्रोही आहेत, अशी टीका भाजपचे मध्यप्रदेशातील आमदार पन्नालाल शाक्य यांनी केली आहे.

ही बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. त्यांनी पैसा आणि प्रसिद्धी भारतात मिळवली. पण जिथं राम विवाहबद्ध झाले त्या भारतात त्यांना लग्न करण्यास जागा मिळाली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)