प्रेस रिव्ह्यू : अमित ठाकरे यांचा आज साखरपुडा

फोटो स्रोत, Mitali Borude / Facebook
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा आज साखरपुडा होणार आहे. मिताली बोरुडे यांच्याशी त्यांचा साखरपुडा होणार आहे.
मिताली आणि अमित दोघेही जुने मित्र असल्याचं सांगितलं जातं. मिताली या फॅशन डिझायनर आहेत.
निवडक नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुड्याचा कार्यक्रम होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.
मोदी हे राष्ट्रीय कमी आणि क्षेत्रीय जास्त
गुजरात विधानसभा निवडणुकांचा प्रचार विकासाच्या मुद्यावर होणं गरजेचे होतं, पण पंतप्रधानांच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब झाला आहे. पंतप्रधानही प्रचार सभांतून स्वतःच्या राज्यात हमरीतुमरीवर आले आहेत, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Sean Gallup/Getty Images
गुजरात निवडणुकीत मोदी हे राष्ट्रीय कमी आणि क्षेत्रीय जास्त झाले आहेत, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. राज्यकर्त्यांनी भावनांचा बांध फोडतानाही संयम बाळगला तर बरं होईल, असं सुद्धा त्यात म्हटलं आहे.
'गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप'
गुजरातच्या पालनपूरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप मोदी केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.
पाकिस्तान लष्कराचे माजी महासंचालक अर्शद रफीक यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री करा, असं आवाहन केले होते, असा दावा पंतप्रधानांनी केला असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, GEOFF ROBINS/AFP/Getty Images
तर याच वृत्तपत्रात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कलोल इथल्या सभेचं वार्तांकन करण्यात आलं आहे. या सभेत गांधी यांनी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापर नाही, असं म्हटलं आहे.
झायराच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक
दंगल या चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीम हिच्या विनयभंग प्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संशयिताचे नाव विकास सचदेव आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

फोटो स्रोत, PTI
झायराने दिल्ली-मुंबई विमान प्रवासादरम्यान तिचा विनयभंग झाल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असा खुलासा एअर विस्तारा या कंपनीने यापूर्वीच केला आहे.
डोकलाममध्ये चीनचे सैनिक
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये चीनच्या 1600 ते 1800 सैनिकांनी डोकलाममध्ये कायमचा मुक्काम केला असल्याचं म्हटलं आहे. सिक्कीम-भुतान-तिबेट यांच्या सीमेवर असलेल्या डोकलाममध्ये चीन लष्करानं हेलिपॅड, सुधारीत रस्ते आणि निवारा उभा केल्याचं म्हटलं आहे.
विधीमंडळ अधिवेशन आजपासून
लोकसत्तामध्ये सोमवारपासून नागपूरमध्ये विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होणार असल्याचे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/AFP/Getty Images
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे झालेलं नुकसान, कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू असे मुद्दे या अधिवेशनात महत्त्वाचे ठरणार असल्याचं यात म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द
पांगरा इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.
या पार्श्वभूमीवर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे वृत्त दिव्य मराठीनं दिले आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कारखान्याला काल भेट दिली. यावेळी त्यांना 10 मिनिटं गेटवर रोखण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








