सोशल : 'राहूल गांधी स्टार प्रचारक, पण मोदींना टक्कर द्यायला घराणेशाही बंद करावी लागेल'

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची चर्चा होत आहे. मात्र, आता राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची आज एक महत्त्वाची बैठक घेतली. याच बैठकीत राहुल यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव मंजूर झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या बैठकीतच अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला. त्यानुसार, 1 डिसेंबरला निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर असेल.

16 डिसेंबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान होणार असून 19 डिसेंबर रोजी अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे.

यावरच बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना आपलं मत विचारलं होतं.

बीबीसीच्या रंगलेल्या चर्चेचा हा आढावा. यामध्ये काहींनी राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी हा एक मोठा विनोद असल्याचं म्हटलं आहे.

विवेक दिवे म्हणतात, "संपूर्ण देश मोदींच्या हिटलरशाही राजवटीला कंटाळा आहे. याचा फायदा हा विरोधी पक्षाला होणार यात शंकाच नाही." तर विवेक यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देत सोमनाथ माने यांनी मोदींचं गुणगान गायलं आहे.

ते म्हणतात, "मोदी एक उत्तम राजकारणी आहेत. ते देशाचा विकास करत आहेत, पण भाजपचे बाकी नेते काहीच करत नाहीत."

"राहुल गांधी आपल्या टीममध्ये कोणाला स्थान देतात त्यावर ते मोदींना आव्हान देऊ शकतील की नाही हे अवलंबून आहे," असं मत प्रथमेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

सिद्धार्थ ढगे यांनी राहुल गांधी यांच्या बाजूने आपलं मत नोंदवत, काँग्रेसला एक सल्लाही दिला आहे.

ते म्हणतात, "मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता नाराज आहे. काँग्रेसने आपला अहंकार सोडून, सर्वधर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत."

रवींद्र धात्रक यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीवर खरमरीत टीका केली आहे. "मोदींना टक्कर देण्यासाठी गांधी घराण्याला आधी आपली घराणेशाही बंद करावी लागले आणि एक चांगलं नेतृत्व पुढे आणावं लागले", असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

तर रवींद्र यांच्या म्हणण्याला दुजोरा देत, काँग्रेसला गांधी घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची नितांत गरज असल्याचं, श्री वाघमोडे यांनी म्हटलं आहे.

या दोघांच्या प्रतिक्रियांवर राजरत्न अंभोरे यांनी, "काँग्रेसकडे प्रियंका गांधींशिवाय कोणताही चांगला पर्याय नाही", असं म्हटलं आहे.

"गुजरातमध्ये सध्या तरी काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी असून त्यांनी मोदींना त्यांच्या होम ग्राउंडवर चांगलीच टक्कर दिली आहे. ते स्वतःची प्रतिमा सुधारण्यात यशस्वी झाले आहेत", असं डॉ. विश्वास पाटील म्हणतात.

"लोकांचा मोदींवरचा विश्वास आता कमी होत आहे. त्यामुळे राहुल मोदींना नक्कीच टक्कर देतील", असंही डॉ. पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

"राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष होणं म्हणजे १२५ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसमध्ये एकही नेता सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची पात्रता नसल्याचं दर्शवतं", असं मत मकरंद डोईजड यांनी नोंदवलं आहे.

"गांधी घराण्याने देशावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी दुसरं नेतृत्व तयारच होऊ दिलं नाही. हीच काँग्रेसची फार मोठी शोकांतिका आहे", असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

"उसन्या हुशारीवर किती काळ चालेल?" असा सवाल करत अभिराम साठे यांनी म्हटलं की, राहुल गांधींचं अज्ञान उघडं पडेलच. "मोदी सरकार व्यक्तिकेंद्रित आहे", असं तेजस पाटील यांचं म्हणणं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)