You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सत्तेची हवा डोक्यात गेली' : गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका
मद्य उत्पादनांना महिलांची नावं दिली तर त्यांची विक्री नक्कीच वाढेल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रविवारी म्हणाले. या त्यांच्या विधानावरून सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला.
त्यांच्या या वक्तव्यानंतर महिलांसह अनेकांनी महाजन यांना टीकेचं लक्ष्य केलं.
याच पार्श्वभूमीवर आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना तुम्हाला या वक्तव्याबाबत काय वाटतं, असा प्रश्न विचारला होता. त्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
नयन खिडबिडे यांनी, 'सत्तेची हवा डोक्यात गेली की, अशी विधानं तोंडातून बाहेर पडतात', असं म्हटलं आहे.
दादाराव पंजाबराव यांनी आपल्या प्रतिक्रियेत 'मतदारांनी पुढच्या वेळी आपला नेता निवडून देण्याआधी विचार करा', असं म्हटलं आहे.
संजय रणपिसे यांनी तर मुख्यमंत्र्यांनीच महाजन यांना असं बोलायला सांगितलं असल्याचं म्हटलं आहे.
दारूबंदीची मोहीम महिलाच हाती घेतात आणि हे मंत्रीमहोदय महिलांची नावं दारूला द्यायचा सल्ला देतात. हा या महाजनांचा बेजबाबदारपणा असून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी वैभव पाटील यांनी केली आहे.
उज्वला बिंद्रा यांनी, "यात आश्चर्यकारक काहीच नाही." असं म्हणत थेट राजकारण्यांच्या मेंदूच्या आकारावरच शंका घेतली आहे.
तसंच, विजया पाटील यांनी म्हटलं आहे की, "माणूस जसा विचार करत असतो तेच त्याच्या तोंडी नकळतपणे येत असतं. महाजनांचं तसंच झालं आहे." बूंद से गयी वो.... या म्हणीची त्या आठवण करून देतात.
तेजस्वी कलधोंडे घाटे यांनी "दारू उत्पादन बंद करा असा आग्रह का नाही या साहेबांचा?" असा सवाल केला आहे. तसंच जर महिलांची नावे द्यावीशी वाटतंच असेल तर मग त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण नावासह स्वतःच्या घरातील महिलांची नावं द्यावी असा टोलाही लगावला आहे.
अभिजीत वानखेडे यांनी एकीकडे 'बेटी बचाओ बेटी पढाओ'च्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे मंत्र्यांची अशी बेताल वक्तव्यं करून संपूर्ण महिलावर्गाचा अपमान करायचा', असं म्हणत महाजनांवर टीकास्त्र सोडलं आहे.
प्रथमेश पाटील यांनीही, "एकीकडे प्रधानसेवक दारूबंदीचं समर्थन करतात आणि इकडे हे महाशय खप वाढवण्याच्या गोष्टी करतात", असं म्हणत टीकेची झोड उठवली आहे.
महाजनांच्या या विधानावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली आहे. पण त्यावरही लोकांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
"आता माफी मागून काय उपयोग", असं म्हणतं प्रियांका सुतार यांनी महाजन यांना मंत्र्यांनी शब्द जपून वापरावे, असा सल्ला दिला आहे.
तर सचिन चव्हाण यांनी माफी वगैरे ठीक आहे, पण सर्व जबाबदार नेत्यांनी या पुढे भाषण करताना आधी थोडा होमवर्क करावा असा सल्ला दिला आहे.
निलेश शेटे यांनी मात्र यात एवढा बाऊ करण्यासारखं काहीच नसल्याचं आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
त्याशिवाय, छाया काकडे, संदीप पवार, हेमंत बोरकर, सचिन दगडे, अतुल खामकर यांनी गिरीश महाजन यांना सत्तेचा माज आला असून दारूला महिलांची नावं देण्याची सुरुवात तुमच्या घरापासूनच करा, असं म्हटलं आहे.
काहींनी त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)