सोशल : ममता बॅनर्जींशी भेट : 'खरोखरच ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का?'

मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट झाली.

सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही भाजप आणि सेनेविरोधात आवाज उठवत आहे. त्यात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

याच पार्श्वभूमीवर 'उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर ते तिसऱ्या आघाडीत जातील असं तुम्हाला वाटतं का?' असा प्रश्न आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारला होता.

त्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यातल्या या काही निवडक प्रतिक्रिया.

प्रणिल वसंतराव यांनी आपल्या प्रतिक्रियेतून शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणतात, 'स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणवून घेणारे पक्षप्रमुख त्याच ममता बॅनर्जींची भेट घेणार ज्यांनी प. बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींसाठी पायघड्या घातल्या आणि अवैध घुसखोरीला उघडपणे समर्थन दिलं.'

खरोखरीच ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का? असा प्रश्न ते शेवटी विचारतात.

दीपक गांगल यांनीही रोहिंग्यांच्या मुद्द्यावरूनच शिवसेनेवर टीका केली आहे. रोहिंग्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्यांना भेटता हेच लाजिरवाणं असल्याचं ते म्हणतात.

आशिष पाध्यार यांनी शिवसेनेचं समर्थन केलं आहे तर नंदन कांबळी यांनी ममता- उद्धव भेटीची खिल्ली उडवली आहे.

नंदन कांबळी म्हणतात, "पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार ममताबेगम असणार आणि त्यांना सेनेचा पाठिंबा असणार. या नोटाबंदीमुळे सर्व असंतुष्ट एकत्र आले आहेत. काहीही करून मोदी आणि भाजप हरले पाहिजेत."

विनोद आहिरे म्हणतात, शिवसेनेचं हिंदुत्व बाळासाहेबांसोबत कधीच निघून गेलं आहे. आता फक्त सत्ता आणि पैसा कमवण्यासाठी हे शिवसेनेचे धोरण असल्याचं त्यांचं मत त्यांनी नोंदवलं आहे.

गणेश लटके म्हणतात, सेनेची तिसरी आघाडी वगैरे काही नाही तर भाजपवर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आपलं म्हणणं त्यांनी दोन मुख्य मुद्द्यांमध्ये मांडलं आहे.

तिसरी आघाडी करतील, असं वाटत नाही, असंही ते लिहितात. आपण दोघे भाऊ भाऊ मिळून मेवा खाऊ, अशी म्हणही त्यांनी शेवटी लिहिली आहे.

सुनील कंझारकर म्हणतात, ते कुठेही जाणार नाहीत. सेनेचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत.

मनोज सपकाळ यांनी सर्वसामान्यांची बाजू मांडत, सर्व सामान्यांच्या जीवनात याचा काहीच परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे.

अमित पाताडे म्हणतात, 'मोदींना विरोध करता करता शिवसेना हिंदूंच्या विरोधात कशी गेली हेच कळलं नाही राव.' हे सांगताना त्यांनी पुन्हा एकदा रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

तर उल्हासराव कदम यांनीसुद्धा शिवसेनेची फिरकी घेतली आहे. नारायण राणेंचा शिवसेनेने इतका धसका कशाला घेतला आहे. एवढंच वाटत होतं तर राज ठाकरेंशी बोलणी करा, असं ते सुचवतात.

तिसऱ्या आघाडीकडे म्हणावं तसं सक्षम नेतृत्व नाही. तिसऱ्या आघाडीत जाऊन जर नेतृत्व मिळणार असेल तर काय हरकत आहे. आणि तसंही सेनेला विरोधात बसण्याचा अनुभव आहे, असं प्रथमेश पाटील लिहितात.

सत्तेत राहूनही विरोधात राहण्याची करामत जमली आहे. त्यामुळे तिसरी आघाडी पर्याय म्हणून चांगला आहे. उद्धव ठाकरेंना शक्तीची जाण आहे, असंही मत प्रथमेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

शशिकांत दाबाडे यांनीही सेना तिसऱ्या आघाडीत जाईल असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे. 'जसं फडणवीस किंवा मोदी शरद पवारांना भेटल्यावर काही लोकांना आणि काही मीडियावाल्यांना असं वाटतं की ते एनडीएत येतील. पण असं काही नसतं भाजपावाले सेनेला दबावात ठेवण्यासाठी पवारांसोबत 'मधुर'संबंध ठेवतात. तसंच भाजपवर दबाव टाकण्यायासाठी सेना अशी कामं करते.'

'भाजपाचा अजेंडा काय आहे, ते कुणीही सांगू शकेल पण शिवसेनेचा अजेंडा कुणीही सांगू शकत नाही. तिसऱ्या आघाडीचं अस्तित्वच नाही तर सेना कशी जाईल?' असा सवालही ते उपस्थित करतात.

अभिजीत भोई, सज्जद हजवाणी, धनंजय जोशी, शशांक पाटकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)