You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अक्षयच्या विनोदासाठी पत्नी ट्विंकलची ट्वीटखेळी
- Author, दिव्या आर्य
- Role, प्रतिनिधी, दिल्ली
स्वातंत्र्याची आणि स्त्रीवादाची कडवी पुरस्कर्ती असणाऱ्या अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने पती अक्षय कुमारची एका प्रकरणात बाजू घेतली आहे. अक्षयच्या द्व्यर्थी बोलण्याचं ट्विंकलने केलेलं समर्थन योग्य आहे?
पती रामासह चौदा वर्षं वनवासात जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पतिव्रता सीतेचं या लेखाला निमित्त नाही.
नवरा हेच प्राधान्य मानून लग्नानंतर नवऱ्याच्या शहरात स्थलांतरित होणाऱ्या किंवा लग्नानंतर संसारासाठी नोकरी सोडून घरी राहणाऱ्या महिलांबद्दल हे लिखाण नाही.
हे साफ चुकीचं किंवा अगदी बरोबर असं टोकाचं काहीच नाही. काळं किंवा पांढरं नाही. हे संमिश्र पातळीवरचं आहे.
स्वत:चा नवरा एका महिलेला उद्देशून जाहीर कार्यक्रमात काही आक्षेपार्ह बोलत असेल तर एखाद्या महिलेनं काय करावं?
ज्या महिलेला उद्देशून हे बोललं गेलं, तिने हे प्रकरण खोडकर शाब्दिक कोट्या म्हणून सोडून दिलेलं नाही. उलट असं वागणं जगणं अस्वस्थ करतं आणि म्हणूनच त्याचा तिरस्कार करते अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्या महिलेचे वडील त्या माणसाचा उल्लेख 'मूर्ख' असा करतात.
अशा पुरुषाच्या पत्नीला लाजिरवाणं, ओशाळल्यासारखं वाटेल का? आपल्या पतीला त्या महिलेची माफी मागण्याचा सल्ला ती देऊ शकली असती का? की नवऱ्याची बाजू उचलून धरत ती त्या महिलेची थट्टा उडवेल?
हा पुरुष कोण- त्याची पत्नी कोण आणि ही चर्चेतली महिला कोण हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल.
नसेल तर तो पुरुष म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आहे. त्याची पत्नी ट्विंकल खन्ना अभिनेत्री आणि लेखिका आहे. तर चर्चेत असलेली महिला विनोदी कलाकार मल्लिका दुवा.
टीव्हीवरच्या एका रिअॅलिटी शोदरम्यान हा प्रसंग घडला. मल्लिका दुवा त्या कार्यक्रमात परीक्षक आहेत. अभिनेता अक्षय कुमार कार्यक्रमात पाहुणा परीक्षक म्हणून सहभागी झाला होता. कार्यक्रमाच्या प्रथेनुसार एखाद्या कलाकाराचा परफॉर्मन्स परीक्षकांना प्रचंड आवडल्यास ते सेटवर ठेवण्यात आलेली घंटा जोराने वाजवतात.
एका स्पर्धकाचा परफॉर्मन्स आवडल्याने दुआ त्या घंटेजवळ पोहोचल्या. त्यावेळी अक्षय म्हणाला, 'मल्लिकाजी तुम्ही घंटा वाजवा. मी तुमची वाजवतो.
द्वयर्थक अशा या उद्गारांवर मल्लिका, तिचे वडील आणि तमाम जनतेने आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली. पण अक्षय कुमारने याप्रकरणी मौन बाळगलं.
अक्षयऐवजी त्याची पत्नी ट्विंकलने याबाबत मौन सोडलं. अक्षयचे उद्गार निखळ विनोद होता आणि त्या उद्गारांमधली कोटी लक्षात घ्या असं ट्विंकलनं म्हटलं.
हे सगळं वाचताना तुम्ही हसत असाल! हसताय ना? कारण अक्षयला काय म्हणायचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेलच.
बोली भाषेतल्या द्वयर्थक शाब्दिक कोट्यांचा अर्थ आपल्याला प्रत्येकाला ठाऊक आहे. बोलणाऱ्याचा रोख आणि परिस्थितीच्या संदर्भानुसार कोट्यांचा अर्थ बदलतो.
मग ट्विंकल खन्नाला अक्षयच्या शब्दांतली मेख जाणवली नाही? तिने त्याकडे दुर्लक्ष करायचं करायचं का ठरवलं?
स्त्रीत्वावरून केले जाणारे विनोद, कोट्या, शेलक्या शब्दांतली शेरेबाजी याकडे दुर्लक्ष करा असं महिलांना सांगितलं जातं. असं करणं म्हणजे अशा आंबटशौकीन बोलण्याला खतपाणी घालण्यासारखं नाही का?
अक्षयचे आणि पर्यायाने महिलांना उद्देशून शेरेबाजी जगात कुठेही गंमतीशीर ठरू शकत नाही. कामाच्या ठिकाणी तर नाहीच नाही.
मोठ्या पदावर कार्यरत पुरुष माणूस आपल्या महिला सहकाऱ्याला उद्देशून द्वयर्थक उद्गार, कोट्या, शेरेबाजी करतो आणि बाकी पुरुष सहकाऱ्यांना मजा म्हणून त्याची री ओढायला सांगतो तेव्हाचं काय?
साचेबद्ध विचारांना फाटा देत मुक्तपणे विचार मांडणाऱ्या महिलांमध्ये ट्विंकल खन्नाचा समावेश होतो. पण मग नवऱ्याच्या असल्या बोलण्याची पाठराखण करण्याचं काय कारण? आणि तेही जेव्हा नवरा चुकलाय हे ठाऊक असताना?
ट्विंकल अक्षयला पाठिंबा देऊन थांबली नाही तर अक्षयच्या उद्गारातला विनोद समजावूनही सांगितला. (https://twitter.com/mrsfunnybones/status/924503377454813185) मग स्वत:चे काही किस्सेही उलगडून सांगितले.
त्या ट्वीटमध्ये दोन विनोद होते. अक्षयची आवडती गाडी कोणती? बैलगाडी. अक्षय कुमार मशिदीत का जातो? 'दुआ' ऐकण्यासाठी.
ट्विंकलनं ट्वीटमध्ये म्हटलं होतं- हे विनोद पोस्ट करण्यावाचून मला राहवलं नाही. आता माझी विनोदाची हौस फिटली. # lame jokes
गांभिर्याच्या नावाखाली लांब चेहरा करून बसणाऱ्या समाजाची मी प्रतिनिधी नाही. दर्जेदार विनोदाची मी चाहती आहे. पण ट्विंकलचं विनोदपुराण संपलं याचा मला आनंद आहे. कारण हा विनोद अगदीच पानचट आणि उथळ स्वरुपाचा आहे.
भिन्नलिंगी व्यक्तीला उद्देशून शेरेबाजी करणाऱ्याला पाठीशी घालणं इतकंच नाही तर त्या महिलेची खिल्ली उडवणं समर्थनीय आहे?
ट्विंकलच्या विनोदी ट्वीटला मिळालेला प्रतिसाद पाहणं महत्त्वाचं आहे. आधीच अपमानित झालेल्या माणसाला विनोदाचं लक्ष्य करणं शोभतं का?
करवाचौथ आणि तत्सम पारंपरिक रूढीपरंपरांबद्दल बोलल्यानंतरही तुम्हाला त्या किती चुकीच्या आहेत समजलेलं नाही, पुढच्या वेळी तुमच्यावर कोणी विनोद केला तर गळा काढू नका.
समानतेच्या, परंपरांना छेद देण्याच्या बाता मारू नका असे अनेकविध रिप्लाय ट्विंकलच्या ट्वीटला आले आहेत.
स्वत:चा संसार वाचवण्यासाठीचं हे पाऊल म्हणावं का? समाजातली चांगली प्रतिमा कायम राखण्याचा हा प्रकार आहे का? स्वत:च्या मनःशांतीसाठी नवऱ्याच्या चुकीचं प्रायश्चित घेण्याचा पायंडा आहे का हा?
यापैकी ट्विंकलचं कारण माहिती नाही पण तिचा रोख ज्यांच्यावर आहे.
त्या मल्लिका दुआंनी हे प्रकरण हसण्यावारी सोडून दिलं.
'त्या म्हणाल्या, प्रत्येक महिलेने आपल्याविरोधात होणाऱ्या शोषणाविरोधात निषेध म्हणून काम सोडायचं ठरवलं तर घराबाहेर पडून कामच करायला नको.'
आणि हाच खरा मुद्दा आहे. पुरुष मंडळींकडून होणाऱ्या र्लैंगिक शोषणाविरोधात महिलांनी आवाज उठवला नाही आणि अन्य महिलांनी पुरुषांच्या या वागण्याचं समर्थन केलं तर छळवणुकीचे प्रसंग घडतच राहतील.
वाईटकडे झुकलेलं संमिश्र वागणं संपूर्ण वाईटाकडे जाऊ शकतं. वाईटाचं प्रमाण हाताबाहेर जाऊन त्याच्या विचारदुर्गंधाचा दर्प तीव्र होईल. आणि मग त्यानंतर गप्प बसून काम करणं अत्यंत अवघड होईल.
मी हे लिहिणार नाही. तुम्ही ते वाचणार नाही. तसं होऊ नये याची जबाबदारी आपल्यावर आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)