तेलगी : बेळगाव ते बंगळुरू व्हाया नाशिक रोड

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, नाशिकहून बीबीसी मराठीसाठी

32 हजार कोटी रुपयांच्या बनावट स्टँप घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा बंगळुरूमधल्या व्हिक्टोरिया रुग्णालयात दीर्घ आजारानंतर मृत्यू झाला. खोटे स्टँप छापून त्यांची विक्री केल्याप्रकरणी तो बंगळुरूच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता.

तेलगीचा प्रवास कर्नाटकातून सुरू झाला आणि कर्नाटकातच संपला. पण त्याची कर्मभूमी होती नाशिक. तिथल्या सरकारी प्रेसला सुरूंग लावून त्याने अख्ख्या देशात खळबळ उडवून दिली होती.

या घोटाळ्यामुळे व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड लोकांसमोर आली आणि अनेक राजकारणी उघडे पडले. हे सारं घडवून आणणाऱ्या तेलगीचा प्रवास थक्क करणारा आहे.

बेळगाव स्टेशनवर फळं विकायचा

अब्दुल हा बेळगाव जिल्ह्यातल्या खानपूर स्टेशन रोडवर राहणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा. वडिलांच्या निधनानंतर त्याच्यावर रेल्वे स्टेशनवर फळं विकण्याची वेळ आली.

बेळगावमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सौदी अरेबियात गेला. तिथून परत आल्यावर त्याने मुंबई गाठली. 90च्या दशकाच्या सुरुवातीला त्याच्या लक्षात आलं की देशात स्टँप पेपर म्हणजेच मुद्रांकाचा मोठा तुटवडा होता.

मुद्रांकांचं महत्त्व ओळखून त्याने नाशिक रोड इथल्या सरकारी छापखान्यापासून देशभरातल्या मुद्रांक वितरण प्रणालीचा अभ्यास केला. सिक्युरिटी प्रेसमधले काही कर्मचारी आणि काही रेल्वे पोलिसांशी संधान बांधून त्याने आधी खरे स्टँप पेपर चोरी करून ते विकायला सुरुवात केली.

स्टँप पेपरच्या चोरीपासून सुरुवात

चोरलेले मुद्रांक विकून मिळालेल्या पैशातून त्याने मदत करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या. त्याचे संबंध एवढे घनिष्ठ झाले की त्याला घरबसल्या नाशिकहून वितरित होणाऱ्या मुद्रांकांची खडान् खडा माहिती मिळू लागली. तसंच बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणेतल्या उणिवाही त्याला कळू लागल्या.

हळूहळू फळं विकणारा तेलगी कोट्यधीश झाला. मग त्याने सिक्युरिटी प्रेसमधल्या आणि पोलिसांतल्या मोठ्या अधिकाऱ्यांशी जवळीक वाढवली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्टँप पेपर चोरून विकण्यापेक्षाही स्टँप पेपर छापण्यात जास्त पैसा आहे.

तो स्टँप पेपर छापू लागला!

स्टँप पेपर चोरून विकल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. रेल्वे पोलिसांकडे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान व इतर राज्यांतून स्टँप पेपर गहाळ झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या.

हे गुन्हे नाशिक शहर पोलिसांकडे वर्ग होऊ लागले. पण या तपासांतून तेलगी सहीसलामत सुटला. यानंतर एकाएकी स्टँप पेपर गहाळ होण्याच्या तक्रारी कमी झाल्या.

त्यानंतर तेलगीने थेट सिक्युरिटी प्रेसच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने भंगारात काढलेले मुद्रांक छपाई मशीन विकत घेतले आणि स्वतःच मुद्रांक छपाई सुरू केली.

गडगंज तेलगी

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात तेलगी गडगंज श्रीमंत झाला. त्याच्याकडे शंभर कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता असेल, असा तपास संस्थांचा अंदाज होता. त्याने एका रात्री 93 लाख रुपये उडवल्याची त्या काळी चर्चा होती.

त्याने नाशिकमधल्या तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांशी संबंध जुळवले. त्यांना निवडणुकांमध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात तो प्रेसमधल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू लागला.

1998 नंतर मुद्रांक चोरीचं प्रकरण CBIकडे देण्यात आलं. प्रेसमधील कर्मचाऱ्यांपासून ते प्रेस महाप्रबंधकांपर्यंत सर्वांची चौकशी करण्यात आली.

नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये वारंवार नोंद होणाऱ्या या गुन्ह्यांची नोंद स्थानिक पत्रकारांना समजली. ही बातमी देणाऱ्या सकाळच्या विनोद बेदरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दावा केला की केली की मुद्रांक चोरी प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांवर राजकीय दबाव होता.

अटक आणि परिणाम

2001 साली तेलगीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. पण 2003 साली जेव्हा विशेष तपासणी पथकाने त्याच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या घरी धाड टाकली, तेव्हा तो पोलिसांसोबत पार्टी करताना आढळला होता.

2007 साली त्याने गुन्हा कबूल केला. त्याला 30 वर्षांची शिक्षा आणि 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

हा घोटाळा उघड झाल्यानंतर नाशिक सिक्युरिटी प्रेसची प्रचंड पीछेहाट झाली. नाशिकमध्ये प्रस्तावित असलेला कागद कारखाना रद्द करण्यात आला. २००९ पर्यंत महत्त्वाचे सरकारी मुद्रण नाशिक प्रेसमध्ये बंद होते.

प्रेसमध्ये सुरक्षेच्या अंगाने अनेक सुधारणा झाल्या. सुरक्षा व्यवस्था तत्कालीन DSO यंत्रणेकडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात आली.

मुद्रांक वॉटरमार्क सिक्युरिटी फीचरमध्ये बदल झाले. मुद्रांकांवर चलनी नोटांप्रमाणे क्रमांक येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मुद्रांक कधी छापले, कुठे व कसे वितरित झाले हे कळणं सोपं झालं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)