तरुण 'लिटिल चँप्स'च्या हृदयनाथांना खास शुभेच्छा

फोटो स्रोत, Courtesy: Arya Ambekar
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आज 81 वा वाढदिवस. मंगेशकर कुटुंबातल्या सगळ्याच भावंडांनी गेली अनेक दशकं संगीत क्षेत्रात आपापला ठसा उमटवला आहे. या भावंडांपैकी ते सगळ्यांत धाकटे.
'भावगंधर्व' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृदयनाथांनी वयाच्या सतराव्या वर्षी 'चांदणे शिंपीत जाशी..' हे पहिलं गाणं संगीतबद्ध केलं. हृदयनाथांचं वय वाढलं असलं तरी हे गाणं आजही तितकंच तरुण आहे.
म्हणूनच आजच्या तरुणांचंही हृदयनाथांशी घट्ट नातं आहे. आजच्या तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही लिटिल चँप्सशी संवाद साधला.
मुग्धा वैशंपायन : 'हृदयनाथ आणि म्हातारीची गोष्ट'
"माझा नुकताच एक दात पडला होता, त्यामुळे पं. हृदयनाथ मला म्हातारी म्हणायचे," अशी आठवण 'लिटिल चँप्स'मधली 'लिटिल मॉनिटर' म्हणून ओळखली जाणारी मुग्धा वैशंपायन सांगते.

फोटो स्रोत, Courtesy: Mugdha Vaishampayan
"मी ८ वर्षांची असताना पहिल्यांदा पं. हृदयनाथांना भेटले. ते एक आठवडा आम्हाला गाणं शिकवत होते. त्यांनी तेव्हा जे शिकवलं ते आयुष्यभर उपयोगी पडणारं होतं," असंही मुग्धा सांगते.
लहान वयात हृदयनाथांकडून शिकण्याचा अनुभव कसा होता याबद्दल बोलताना मुग्धा म्हणते, "हे आमचं भाग्य होतं. आम्ही इतके लहान होतो, पण त्यांनी आमच्यासारखं लहान होऊन आम्हाला शिकवलं. आम्हाला समजेल अश्या प्रकारे त्यांनी आम्हाला गाण्यातल्या कठिणातल्या कठीण गोष्टी सांगितल्या, त्यामुळे त्या कळायला सोप्या गेल्या."
हृदयनाथांना त्यांच्या सहस्रचंद्रानिमित्त शुभेच्छा देताना मुग्धा म्हणते, "तुमच्या म्हातारीकडून तुम्हाला खूप शुभेच्छा, अशीच अजरामर गाणी अजून हजारो-लाखो वर्षं होत राहू दे."
प्रथमेश लघाटे : 'त्यांचं रागावणंही शिक्षणाचाच भाग'
"कवितेचा अर्थ समजला की मग ती गाताना त्यात भाव वेगळे ओतावे लागत नाहीत, हे पंडितजींनी आम्हाला शिकवलं." अभंग संगीतात हातखंडा असणारा प्रथमेश लघाटे आपल्या आठवणी सांगताना म्हणाला.
"पंडितजी खूप कडक शिस्तीचे आहेत. आठवडाभर त्यांच्याबरोबर शिकत असताना आम्ही हे अनुभवलं. एकदा ते हार्मोनियम घेऊन बसले की, गाणं व्यवस्थित झाल्याशिवाय उठायचे नाहीत, मग कितीही वेळ लागो."

फोटो स्रोत, Courtesy: Prathamesh Laghate
या शिस्तीचंच एक उदाहरण देताना प्रथमेश सांगतो, "आधी मूळ चाल हुबेहूब गायची आणि मग त्यात आपल्या हरकती घ्यायच्या, हे त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याचं महत्त्व मला आजही कळतं."
"पंडितजींना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळोत आणि अभ्यासायला मिळो," या शब्दांत प्रथमेशने आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्तिकी गायकवाड : 'आजोबांकडून शिकण्याचा अनुभव'
"मी प्रत्यक्ष भेटले नव्हते, तेव्हाही हृदयनाथांची ओळख त्यांच्या गाण्यांमधून होतीच," असं आळंदीची कार्तिकी गायकवाड सांगते.
"आम्ही लहान असताना त्यांना भेटलो हे चांगलंच झालं. आम्हाला आमच्या आजोबांकडेच शिकत होतो असंच वाटायचं. तेव्हा त्यांनी आमच्यासाठी इतका वेळ काढला, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती," असंही ती सांगते.

फोटो स्रोत, Kartiki Gaikwad
या आजोबांकडून शिकण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना कार्तिकी म्हणते की, अवघड वाटणारे शब्द गोड करून कसे गायचे हे त्यांनी शिकवलं.
"त्यांना सगळंच मिळालं आहे आणि त्यांनी लोकांना भरभरून दिलं आहे. मी इतक्याच शुभेच्छा देते की, त्यांना भरपूर आयुष्य लाभो."
रोहित राऊत : 'सूरांचे मोती आणि रेशमाचा धागा'
"मी ज्या वयात त्यांना भेटलो तेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणजे कोण हे मला माहीतही नव्हतं, पण मंगेशकर नावातच काहीतरी खास आहे," संगीतकार होण्याची इच्छा असणारा रोहित राऊत सांगतो.

फोटो स्रोत, Rohit Raut
"पंडितजी मला देवस्थानी आहेत, त्यांच्या कामाकडे मी एक प्रेरणास्थान म्हणून पाहतो. त्यांच्या कामाची पद्धत मला इन्स्पायर करते," असंही रोहित म्हणतो.
"हृदयनाथांची प्रत्येक रचना म्हणजे सूरांचा एक एक मोती रेशमाच्या धाग्यात ओवल्याप्रमाणे आहे." तरुणाईचा प्रतिनिधी असणारा रोहित म्हणतो की, पंडितजींचं संगीत अजरामर आहे. त्याला वयाचं किंवा काळाचं बंधन नाही. त्यामुळे तरुण पिढीला ते आवडणार नाही असं नाही.
त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच सरस्वतीचरणी प्रार्थना, अशा रोहितने शुभेच्छा व्यक्त केल्या.
आर्या आंबेकर : 'त्यांची शिकवण प्रत्यक्षात आणणं याच शुभेच्छा'

फोटो स्रोत, Courtesy: Arya Ambekar
"डिसिप्लिन आणि डेडिकेशन या दोन सगळ्यांत महत्त्वाच्या गोष्टी आम्ही हृदयनाथांकडून पहिल्याच भेटीत शिकलो," आर्या आंबेकर 9 वर्षांपूर्वी हृदयनाथांबरोबर झालेल्या भेटीची आठवण सांगते.
"शास्त्रीय आणि सुगम दोन्हीचा अभ्यास नीट करायला हवा आणि सूर आणि भाव यांचा समतोल साधणं आवश्यक आहे, हे त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं. आता गाताना त्याचं महत्त्व कळतं."

फोटो स्रोत, Getty Images
'सा रे ग म प' च्या एका एपिसोडला पंडितजींनी मंगेशकर भावंडांनी स्वतः वाजवून रेकॉर्ड केलेला तानपुरा माझ्यासाठी आणला होता. "त्याने मी खूपच हरखून गेले होते," आर्या आठवणींमध्ये रमते.
संगीताची प्रदीर्घ साधना केलेल्या पंडितजींना शब्दांत शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांनी गाण्याचे दिलेले धडे आपल्या गाण्यात आणूनच आम्ही शुभेच्छा दिलेल्या अधिक योग्य ठरतील, असंही आर्या म्हणाली.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








