संजय गांधी जेव्हा अमेठीतून पहिली निवडणूक हरले होते

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1976 सालची गोष्ट. देशातच नव्हे तर दुनियाभरात भारत चर्चेला आला होता. याला कारणीभूत ठरली होती, ती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेली आणीबाणी.

पण, याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात अमेठीजवळ असलेलं खेरौना गाव दुसऱ्याच कारणाने जगभर चर्चेत आलं होतं.

अमेठीजवळच्या या गावात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहचले आणि तिथं त्यांनी रस्ते निर्मितीच्या कामाला सुरुवात केली.

श्रमदान करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे लोक तिथं पोहचले होते. त्यासाठी आवश्यक असलेलं कुदळ, फावडे, टोपले असं सर्व सामान इथं पाठवण्यात आलं होतं.

महिन्यापेक्षा जास्त काळ श्रमदान

हे श्रमदान महिन्यापेक्षा जास्त काळ चाललं होतं. तसंच श्रमदानासाठी बाहेरुन आलेले लोक गावातच मुक्कामाला राहत होते.

त्यांच्यासाठी जेवण श्रमदानाच्या ठिकाणी बनत होतं. त्यांना राहण्यासाठी गावातील लोकांनी स्वत:च्या घरात जागा दिली होती. तसंच रोज रात्री मनोरंजनसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं असे.

जवळपास दीड महिन्यासाठी इथलं वातावरण उत्साहपूर्ण होतं.

रामनरेश शुक्ल त्यावेळी खेरौनाचे प्रमुख होते. सध्या त्यांनी वयाची शंभरी पार केली आहे. आता त्यांचं ऐकणं-बोलणं पूर्णपणे बंद झालं आहे.

त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे मोठे पुत्र सांगतात, "श्रमदानापासूनच संजय गांधींच्या राजकारणाला सुरुवात झाली. तीन रस्त्यांच्या कामासाठी श्रमदान झालं होतं. समोर चालून तिन्ही रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं.

दीड महिन्यांसाठी गावाला जत्रेचं स्वरुप आलं होतं. वेगवेगळ्या राज्यांतून लोक इथं येत होते आणि श्रमदानात सहभागी होत होते. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक आणि इतर मोठ्या पदांवरच्या अधिकाऱ्यांनीही इथं बस्तान ठेवलं होतं.

संजय गांधींची राजकीय जमीन - अमेठी

खरंतर संजय गांधी राजकीय परिदृश्यात आणीबाणीच्या पूर्वीच आले होते. पण, राजकारणाला खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली नव्हती. या श्रमदानातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करण्यासाठी जमीन तयार करण्यात येत होती आणि त्यासाठी अमेठी या लोकसभा मतदारसंघाची निवड करण्यात आली होती.

त्यावेळी अमेठी लोकसभा मतदारसंघ बनून नुकतीच 10 वर्षं झाली होती. शिवाय अमेठीचं महत्त्व इतर लोकसभा मतदारसंघांप्रमाणे सर्वसाधारण असंच होतं. याचा अर्थ, अमेठीला आज राजकीयदृष्ट्या ज्या व्हीआयपी नजरेतून पाहिलं जातं, त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती.

उमाकांत द्विवेदी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांनी श्रमदानात सक्रिय भूमिका निभावली होती.

ते सांगतात की, "1971 पर्यंत इथं विद्याधर वाजपेयी हे काँग्रेस पक्षाचे खासदार होते. ते उन्नाय या गावचे असले तरी अमेठीतून निवडणूक लढवत असत. शिवाय ते गांधी परिवाराच्या खूप जवळचे होते.

संजय यांनी राजकारणात यावं ही बाब जेव्हा चर्चेला आली, तेव्हा त्यांनी संजय यांना एका दृष्टीनं दत्तकच घेतलं होतं. तसंच त्यांनी संजय यांच्यासाठी अमेठीची आपली सीट सोडण्याचंही सार्वजनिकरित्या घोषित केलं होतं.

निवडणुकीपूर्वी केलं विकास कार्य

द्विवेदी सांगतात की, "1971 सालच्या निवडणुकीदरम्यान खेरौनामध्ये एक सभा झाली होती. त्यामध्ये इंदिरा गांधीही होत्या आणि प्रचंड गर्दी जमली होती.

अमेठीमधून निवडणूक लढवण्यापूर्वी संजय यांनी तिथे विकासकामांना सुरुवात केली होती आणि श्रमदान हा त्याचाच एक भाग होता."

काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय सिंह अमेठीच्या राजघराण्याशी संबंधित आहेत.

ते सांगतात की, "जवळजवळ एक हजार युवक काँग्रेसचे लोक त्यावेळी आले होते. रात्रंदिवस लोकांची गर्दी दिसत असे. मी तर खेळाडू होतो. पण, संजय गांधींनी मला तिथंच राहायचं सांगितलं होतं. मग काय?

आम्ही सर्व खेळाडू खेळायचं सोडून रस्ता बनवण्याच्या कामाला लागलो आणि आजही ते तीन रस्ते कायम आहेत."

असं आहे खेरौना गाव

संजय सिंह सांगतात की, "श्रमदानासाठी या गावाची निवड केली गेली कारण, हे गाव अमेठीच्या जवळ होतं. बाकी दुसरं कोणतंही खास कारण नव्हतं."

या श्रमदानामुळे खेरौनामध्ये तीन रस्ते बनले. ते आजही सुस्थितीत आहेत.

संपर्कासाठी गावात आणखी काही मार्ग आहेत, शाळा आणि बाजारही आहे. पण, लोकांचं म्हणणं आहे की, "त्या दीड महिन्याच्या काळात गावात जे जोशपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरण होतं त्यांनतर तसं वातावरण गावानं कधी पाहिलं नाही."

इतकं काम होऊनही श्रमदानाशी संबंधित एकही निशाणी गावात आज शिल्लक राहिलेली नाही.

काही अपवाद वगळल्यास, जास्तीत जास्त वेळी गांधी परिवारातले सदस्यच इथून लोकसभेत निवडून गेले आहेत. असं असलं तरी, आज गावातल्या काही लहान मुलांना संजय गांधींचं नावही आठवत नाही.

रामसागर आज 70 वर्षांचे आहेत. त्या काळातील आठवणी सांगताना मात्र ते तरुण आहेत असंच वाटतं.

क्षणाचाही विलंब न करता ते सांगतात, "बऱ्याच ठिकाणांवरुन लोक आले होते. शिक्षित मुलीसुद्धा श्रमदानात सहभागी झाल्या होत्या."

"रात्री चांगल्या प्रकारचं जेवण मिळेल तसंच गाणं वगैरे ऐकायला मिळेल म्हणून आम्ही दिवसभर मेहनत करत होतो."

गावातील महिला अमरावतीदेवी सांगतात, "तो काळ असा होता की, महिला घराच्या बाहेर निघत नसत. पण, बाहेरच्या गावातील महिला येऊन आमच्या गावात रस्ता बनवण्याचे काम करत आहेत, हे बघून आम्ही सर्व जणी घरातून बाहेर पडलो. एकमेकांचं बघून आम्ही सर्व जण काम करत होतो."

अमेठीतून पहिली निवडणूक हरले संजय गांधी

1977 साली देशात लोकसभा निवडणुका झाल्या. संजय गांधी अमेठीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवत होते. पण, त्यांना यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

जनता पक्षाच्या रवींद्र प्रताप सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. त्यात मात्र संजय गांधी प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले.

याबद्दल उमाकांत द्विवेदी सांगतात, "आणीबाणी आणि नसबंदीच्या कार्यक्रमामुळे लोकांमध्ये काँग्रेसविषयी नाराजी निर्माण झाली होती. संजय गांधींनी नुसतंच श्रमदान केलं नव्हतं, तर यामुळे जगदीशपूरला औद्यागिक क्षेत्र बनवण्यासाठी सुरुवात झाली होती.

तसंच त्यांच्या निवडणूक लढण्यापूर्वीच काही कामांना सुरुवात देखील झाली होती. पण, लोकांचा राग इतका होता की, या कामांचा काहीही परिणाम झाला नाही."

गावातली घरं सुस्थितीत आहेत, गावात रस्तेही आहेत आणि अमेठीला लागूनच असल्याने गावात शाळा आणि दवाखान्याची व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे.

असं असल तरी, आजच्या तरूण पिढीला संजय गांधींनी केलेल्या श्रमदानाबद्दल जास्त काही माहिती नाही. तसंच या श्रमदानानंतर गावातल्या स्थितीत विशेष काही बदलही झालेला नाही. जेणेकरून गावातल्या युवकांना त्यांचं गाव इतर गावांपेक्षा वेगळं आहे असं वाटेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)