गुजरात दलित मारहाण प्रकरण : मिशी ठेवली म्हणून मारहाण झाल्याचा युवकाने केला बनाव?

मिशीवाला युवक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मिशी ठेवली म्हणून मारहाण झाल्याची युवकाने खोटी तक्रार दाखल केली होती.

मिशी ठेवली म्हणून आपणास मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मागील आठवड्यात गुजरातमधील एका दलित युवकाने दाखल केली होती. या मारहाणी घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मिशीसह सेल्फी ठेवण्याचा ट्रेण्ड आला होता.

ही घटना त्या युवकानेच रचलेला बनाव असल्याचं पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केलं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी युवकानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

"घटनेच्या तपासामध्ये पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे. त्या युवकाला प्रसिद्धी हवी होती म्हणून त्याने स्वतःच हा बनाव रचला अशी माहिती आम्हाला साक्षीदारांकडून मिळाली," असं गांधीनगरचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र यादव यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं.

मिशी

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, प्रसि्दधिसााठी युवकाने हा बनाव केला होता.

"आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने त्या युवकाने ब्लेड विकत घेतली आणि स्वतःच्या पाठीवर हल्ला करून घेतला," असं यादव यांनी सांगितलं. याबाबत 27 सप्टेंबर रोजी लिंबोदरा इथे तक्रार दाखल करण्यात आली होती.

"फोरेन्सिक चाचण्यांमध्ये असं लक्षात आलं की, त्याच्या पाठीवर असलेल्या जखमेच्या खुणा या हल्ल्यात झालेल्या नसून हाताने काळजीपूर्वक केल्या आहेत", पोलिसांनी सांगितलं.

"हल्ल्यादरम्यान झालेल्या खुणा या ओबडधोबड असतात पण या खुणा तशा नाहीत असं फोरेन्सिक चाचणीत लक्षात आलं," असंही पोलीस अधीक्षक यादव म्हणाले.

युवक

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मिशी ठेवण्याचा ट्रेंड सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

आपल्यावर पाठीमागून हल्ला झाला. जमिनीवर पडल्यामुळे आपणास हल्ला कोणी केला हे कळलं नाही, असं त्या युवकानं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं.

जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या शर्टाला माती लागायला हवी होती किंवा त्याला जखमा व्हायला हव्या होत्या. पण तसं काही नव्हतं, हेदेखील पोलीस तपासात पुढे आलं आहे, असं यादव यांनी सांगितलं.

या केसचा पुढील तपास बंद करण्यात येणार असल्याचं यादव यांनी सांगितलं. सर्वजण अल्पवयीन असल्यामुळं आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचं यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

युवक

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, 'दलितांकडं मिशा देखील आहेत आणि हॅट देखील आहे.' अशा अर्थाच्या पोस्टचा सोशल मीडियावर पाऊस पडला.

ही घटना झाल्याचं समजताच गुजरातमध्ये मिशीसोबतचा फोटो ठेवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक दलित युवक आपला मिशी असलेला किंवा मिशीला पीळ देतानाचा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेऊ लागले होते.

त्या युवकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावरच बीबीसी मराठीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं.

त्या मुलाची आई चंद्रिका महेरिया यांनी बीबीसी गुजरातीला फोनवरुन माहिती दिली. "त्याची कुणीतरी दिशाभूल केली असावी. त्यामुळं त्याने हा बनाव रचला असावा," असं त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

"या घटनेनंतर तो खूप शांत झाला असून आम्हीही त्याला या विषयावर आणखी काही विचारणं टाळत आहोत," असं त्यांनी म्हटलं. या घटनेनंतर त्याला मदत करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांशी महेरिया कुटुंबानं संपर्क केलेला नाही. कौशिक परमार हे त्या भागातील कार्यकर्ते या प्रकरणात त्याला मदत करत होते, पण आता महेरिया कुटुंबीय संपर्क टाळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)