गुजरात दलित मारहाण : सोशल मीडियावर मिशीवाला फोटो ठेवून मारहाणीचा निषेध

फोटो स्रोत, Unknown
- Author, ख्रिस बेल
- Role, बीबीसी - यूजीसी आणि सोशल न्यूज
गुजरातमध्ये दोन दलित व्यक्तींना मिशी ठेवल्याने मारहाण करण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर लोकांनी आपला डीपी बदलण्यास सुरुवात केली आहे.
मागच्या आठवड्यात गुजरातमध्ये एका तरुणाने फक्त मिशी ठेवली म्हणून त्याला मारहाण करण्यात आली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. मंगळवारी रात्री त्या तरुणाच्या भावावर त्याच उच्च जातीच्या व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याचंही सांगितलं.
हल्ला झालेल्या दोन्ही व्यक्ती दलित आहेत. त्यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती राजपूत असल्याचं सांगण्यात येत आहे. राजपूत लोकांना भारतीय जातिव्यवस्थेत उच्च जातीचं मानलं जातं.

फोटो स्रोत, Twitter
त्या राजपूत व्यक्तीने मिशा ठेवण्यास आक्षेप घेतल्याचं सांगण्यात येतं.
कुणाल महेरियाने एनडीटीव्हीला सांगितलं, "मी माझ्या मित्राकडे जात असताना त्या व्यक्तीनं मला अडवलं आणि शिवीगाळ केली"
"हल्लेखोरांपैकी एकानं सांगितलं की, फक्त मिशी ठेवल्याने कोणी राजपूत होऊ शकत नाही. जेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यानं मला मारहाण केली", असं कुणालनं सांगितलं.
या घटनेचा निषेध म्हणून देशभरातील अनेक दलित तरुणांनी व्हॉटसअॅपवर आपला डीपी बदलायला सुरुवात केली. ट्विटर वर देखील काही लोकांनी आपला मिशीतला फोटो #MrDalit आणि #DalitwithMoustache हा हॅशटॅग वापरून शेअर करण्यास सुरूवात केली.

फोटो स्रोत, Twitter
"जर दलितांनी मिशी ठेवल्याने मनुवादी आणि जातीयवादी लोक दुखावले असतील तर प्रत्येक दलिताने मिशा ठेवायला हव्यात" असं एका सोशल मीडिय़ा युजर ने ट्विट केले आहे.

फोटो स्रोत, Twitter
कोडिनार येथील खासगी शाळेत शिक्षक असणाऱ्या मयूर वाढेर यांनी बीबीसीला सांगितलं की, या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅपचा डीपी बदलला.
"भारताच्या बदलत्या परिस्थितीनुसार दलितांनासुद्धा आता चांगलं शिक्षण मिळतं आहे. पण जे लोक अजुनही जातीव्यवस्थेवर विश्वास ठेवतात ते लोक आपली नापसंती दर्शवण्यासाठी दलितांवर हल्ले करतात ही बाब पचनी पडत नाही." असंही वाढेर म्हणाले.
भारतातील दलितांची समस्या कायमच माध्यमांच्या चर्चेत असते. दसऱ्याच्या दिवशी नृत्याचा कार्यक्रम पाहिला म्हणून एका दलिताची हत्या करण्यात आली.
सहारणपूरच्या जातीय दंगलीविरोधात दलितांनी दिल्लीत निदर्शनं केली होती.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








