मुंबई चेंगराचेंगरी : एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्टेशन का आहेत मृत्यूचे सापळे?

railway
फोटो कॅप्शन, एलफिन्स्टन रोड
    • Author, जान्हवी मुळे/ रवींद्र मांजरेकर
    • Role, बीबीसी मराठी

गेल्या दहा-बारा वर्षांत एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बड्या कंपन्यांची कार्यालयं सुरू झाली.

त्यामुळे दादर स्टेशनकडून प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे एल्फिन्स्टन रोड आणि परळ या स्टेशनकडे येऊ लागले.

त्या प्रमाणात या स्टेशनच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

रोजच्या गर्दीत घुसमटणाऱ्या प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही आश्वासनांच्या पलिकडे काहीच मिळालं नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करत आहेत.

रोजची कसरत

एल्फिन्स्टन रोड आणि परळ या दोन्ही स्टेशनांमधून बाहेर पडण्यासाठी असलेले मार्ग चिंचोळे आहेत.

गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट हाऊसेसचा मोर्चा दक्षिण मुंबईकडून दक्षिण-मध्य मुंबईकडे वळला.

या भागातील गिरण्यांच्या जागांवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. गिरण्यांची जागा बिझनेस हबनं घेतली.

MUMBAI

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बिझनेस हब

अर्थात, ज्या प्रमाणात इथे कार्यालयं वाढली, तेवढीच येणाऱ्या नोकरदारांची संख्या वाढली. हा सगळा ताण एलफिन्स्टन रोड आणि परळ या दोन स्टेशनांवर आला.

परळला एका फुटओव्हर ब्रीजची भर पडली. त्या पलिकडे या दोन्ही स्टेशनांमध्ये काहीच बदल झाला नाही. एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी वाढतच गेले.

गर्दीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी एकमेव फुटओव्हर ब्रिजवर चढणं आणि दोन्ही मार्ग पार करणं म्हणजे रोज मृत्यूच्या सापळ्यातून सही सलामत बाहेर पडण्याची कसरत करणं.

काल रात्रीही तेच बोलणं झालं

या स्टेशनवर रोज प्रवास करणारे प्रवासी समीर कर्वे यांनी हीच खंत व्यक्त केली. काल रात्रीही तेच बोलणं झालं होतं , असं ते म्हणाले.

"इकडची सगळी परिस्थिती ही अपघाताला आमंत्रण देणारीच आहे. परळला गाड्या आल्या की, गोंधळ वाढतो. एका बाजूला कार्यालयं आणि दुसरीकडे हॉस्पिटलं यामुळे इथं नेहमीच गर्दी असते." असं ते सांगतात.

त्या गर्दीचं नियोजन करण्याचा काही विचारच दिसत नाही, असं समीर कर्वे म्हणतात.

टर्मिनसची योजना

रेल्वेच्या या अपघातामुळे प्लॅटफॉर्म आणि फूटओव्हर ब्रीजचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

railway
फोटो कॅप्शन, एलफिन्स्टन रोड

परळ स्टेशनला होम प्लॅटफॉर्म करून पुढं तेथे टर्मिनस करण्याची रेल्वेची योजना आहे. प्लॅटफॉर्मचं कामही सुरू झालं होतं. पण ते धीम्या गतीनं सुरू आहे.

नावात बदल

एलफिन्स्टन रोड स्टेशन 1867च्या सुमारास सुरू झालं. 1853 ते1860 या काळात मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांचं नाव या स्टेशनला देण्यात आलं.

डिसेंबर-2016 मध्ये राज्य सरकारनं ठराव करून या स्टेशनला प्रभादेवी असं नाव देण्याची रेल्वेकडे मागणी केली. ती मान्य करण्यात आली. नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

MUMBAI
फोटो कॅप्शन, छोट्या स्टेशनाकडे दुर्लक्ष

रेल्वे यात्री संघाच्या सुभाष गुप्ता सांगतात की, एल्फिन्स्टन रोड हे छोटंसं स्टेशन आहे, पण ते अतिशय महत्त्वाचं आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारी दोनच ठिकाणं आहेत.

एक दादर, जिथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. दुसरं मध्य रेल्वेवरचं परळ आणि पश्चिम रेल्वेवरचं एलफिन्स्टन रोड. हे स्टेशन छोटे असल्यानं त्याच्यावर फारसं लक्ष देण्यात आलं नाही, असं ते सांगतात.

"गेल्या 15 वर्षांपासून इथले प्रवासी वाढले आहेत. आम्ही वेगवेगळ्या रेल्वे प्रवासी संघटनांनी मिळून इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याची मागणी अनेकदा केली आहे", असं सुभाष गुप्ता म्हणाले.

"इथले फूटओव्हर ब्रीज आणि जिने छोटे आहेत, तिथे चढता उतरताना चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी निवेदनंही दिलेली आहेत. पण रेल्वे प्रशासनानं लक्ष घातलेलं नाही. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणांची कामंही अगदी धीम्या गतीनं सुरू आहेत."

"पुढील दहा वर्षांत तरी हे चित्र बदलेल असं वाटत नाही. लोकांच्या जीवाशी खेळ होतो आहे", असंही रेल्वे यात्री संघाचे सदस्य सुभाष गुप्ता म्हणतात.

railway
फोटो कॅप्शन, एलफिन्स्टन रोड

"नवे रेल्वे मंत्री पीयूष गोयल हेही मुंबईचेच आहेत. ते तरी ही गोष्ट गांभीर्यानं घेतील अशी अपेक्षा आहे. याला जबाबदार लोकांवर कारवाई व्हायला हवी, रेल्वे यात्री परिषद कोर्टात जाण्याच्याही तयारीत आहे, आम्ही तसं निवेदन रेल्वे मंत्र्यांना करणार आहोत", अशी माहितीही सुभाष गुप्ता यांनी दिली.

पुलांचा प्रश्न

दोन्ही स्टेशन्सच्या फूटओव्हर ब्रिजची रूंदी वाढवणे आणि प्रवाशांना सुखद प्रवास कसा करता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. प्रत्येक स्टेशनला तीन फुटओव्हर ब्रिज असायला हवेत.

लोकांना कमीत कमी वेळात सुरक्षितपणे स्टेशनबाहेर कसं जाता येईल याचा विचार व्हायला हवा. जोगेश्वरी सारख्या बऱ्याचशा स्टेशन्सचे फूटओव्हर ब्रिज लहान आहेत.

अनेक ठिकाणी दोन ब्रिज आहेत, पण बहुतेक लोक एकाच बाजूच्या, मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ब्रिजचा वापर करतात.

'वास्तव लक्षात घ्या'

20 वर्षांपूर्वी परळ-एलफिन्स्टन रोडचा परिसर प्रामुख्यानं रहिवासी क्षेत्र होतं. आता इथं प्रामुख्यानं मोठी ऑफिसेस आहेत. केईएम आणि टाटा सारखी हॉस्पिटल्सही इथेच आहेत. त्यामुळं इथली रहदारी वाढली आहे.

"मुंबईच्या प्रत्येक स्टेशनची वस्तुस्थिती बघून तिथे ब्रिज, जिने किंवा एस्कलेटर्स बांधायला हवेत. केवळ दाखवण्यापुरते दोन-तीन ब्रिज, एस्कलेटर्स कामाचे नाहीत, हे वास्तवही लक्षात घ्यायला हवं", असं गुप्ता याचं म्हणणं आहे.

MUMBAI

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बिझनेस हब

परळचं महत्त्व का वाढलं?

चाळी पाडून या भागात बिझनेस हब करण्यात आलं. आता नरिमन पॉईंट रिकामं झालं आहे. सीएसटी किंवा चर्चगेटमधून बाहेर पडण्यासाठी जशी जागा आहे, तशी परळला नाही.

"इन्फ्रास्ट्रक्चरचा कोणताही विचार न करता, किती एफएसआय, किती बांधकामं हे न पाहता परवानगी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे", नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केलं.

मुळातच परळ स्थानक अडचणीच्या ठिकाणी आहे. एका चौरस फुटाला एक जण असं प्रमाण असलं तरी इथं ते प्रमाण १८ पट झालेलं आहे.

"या सगळ्याचा अभ्यास करायला हवा होता. तो झाला नाहीच, शिवाय तज्ज्ञांनी घ्यायचे निर्णय राजकीय झाले की अवस्था बिकट होणारच", असं निरीक्षणही सुलक्षणा महाजन यांनी नोंदवलं.

'मुंबई आयसीयूमध्ये'

"मुंबईला आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्यासारखी स्थिती आहे. आपत्कालीन परिस्थिती जाहीर करून नगरतज्ज्ञांच्या हाती सूत्र देण्याची गरज आहे", असं मत सुलक्षणा महाजन व्यक्त करतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)