मुंबई : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे, तर किमान 30 जणांवर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन आणि परळ रेल्वे स्टेशऩ यांना जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर सकाळी 10.30च्या जवळपास चेंगराचेंगरी झाल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला.

सकाळपासून होत असलेल्या पावसानं पुलावर गर्दी होऊन अचानक चेंगराचेंगरी झाली. सकाळी 11.45 वाजता 15 मृतदेह केईएम रुग्णालयात आल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी आधी कळविली होती.

पुढे हाच आकडा 22 वर गेला. यात 18 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

"पावसामुळं फूट ओव्हर ब्रिजवर गर्दी जमा झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यातच 22 जण मृत घोषित करण्यात आले," असं पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांनीही सांगितलं.

जखमींची संख्या डझनांवर असून केईएम रुग्णालयातच त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेचे वैद्यकीय अधिकारीही उपचारांमध्ये मदत करत असल्याचं या रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकारी गजानन महापुतकर यांनी कळविलं.

केईएम रुग्णालयात रक्ताची गरज

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, केईएम रुग्णालयात रक्ताची गरज असल्याचं मुंबई पोलिसांनी ट्वीट केलं आहे.

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि ताफा घटनास्थळावर मदतीसाठी पोहचल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं ट्वीट करून कळविली.

घटनेनंतर काही तासांतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल शुक्रवारी अंधेरी-गोरेगाव एक्स्टेंशनच्या लोकार्पणासाठी मुंबईत आले आहेत. पण या दुर्घटनेमुळं तो कार्यक्रम रद्द करण्यात आला.

Twitter

फोटो स्रोत, Twitter

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Twitter

फोटो स्रोत, Twitter

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)