दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडीबाबत संदेश, चीनचा तीव्र आक्षेप; अशी आहे पुनर्जन्म अन् निवडीची परंपरा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राघवेंद्र राव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मॅक्लॉडगंज, धर्मशाला येथून
तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा आणि चीन हे उत्तराधिकारी निवडीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
'दलाई लामा ही परंपरा पुढेही सुरू राहील,' असं तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी बुधवारी सांगितलं.
याचा थेट अर्थ असा की, सध्याच्या दलाई लामांच्या मृत्यूनंतरही त्यांचे उत्तराधिकारी असतील.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथं मॅक्लॉडगंजमध्ये तिबेटी बौद्ध धर्मातील ज्येष्ठ लामांची एक धार्मिक बैठक झाली. या बैठकीत दलाई लामा यांनी एका रेकॉर्डेड व्हीडिओ संदेशाद्वारे ही माहिती दिली.
दलाई लामा हे त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांच्या उत्तराधिकारीबाबत मोठी घोषणा करू शकतात, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासूनव्यक्त केली जात होती.
आता त्यांच्या संदेशामुळे दलाई लामांची परंपरा भविष्यातही असेल की नाही, याबाबतच्या अंदाजांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे.
पण अजूनही हा प्रश्न कायम आहे की, सध्याचे दलाई लामा जिवंत असतानाच त्यांच्या पुनर्जन्माबाबत काही संकेत देतील का?
या प्रश्नाच्या उत्तरात दलाई लामांच्या कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या गादेन फोडरंग ट्रस्टचे उपाध्यक्ष समधोंग रिनपोचे म्हणाले, "दलाई लामांची परंपरा सुरुच राहणार आहे. 14 व्या दलाई लामांनंतर 15वे दलाई लामा येतील, मग 16 वे ही येतील.
यावर सर्वांची सहमती झाली आहे. ते कधी येतील, त्यांना कशी मान्यता दिली जाईल, हे वेगळे प्रश्न आहेत. वेळ आल्यावर दलाई लामा स्वतः याबाबत मार्गदर्शन करतील," असं त्यांनी सांगितलं.
दलाई लामांचा संदेश
2011 साली दलाई लामा म्हणाले होते की, भविष्यात दलाई लामांचा पुनर्जन्म सुरू ठेवायचा की नाही, हे तिबेटी लोकांनीच ठरवायला हवं. या विधानानंतर तिबेटी बौद्ध धर्माचे अनुयायी चिंतेत होते.
संदेशात दलाई लामा म्हणाले की, "मी या विषयावर सार्वजनिकरित्या कोणतीही चर्चा केलेली नाही. तरी गेल्या 14 वर्षांमध्ये तिबेटच्या आध्यात्मिक परंपरेतील नेते, निर्वासित तिबेटी संसद सदस्य, विशेष सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले लोक, केंद्रीय तिबेटी प्रशासनाचे सदस्य, स्वयंसेवी संस्था, हिमालय परिसरातील, मंगोलिया, रशियन संघातील बौद्ध प्रजासत्ताक आणि चीनसह आशियामधील अनेक बौद्ध अनुयायांनी मला पत्र लिहून विनंती केली आहे की, दलाई लामा ही परंपरा पुढे सुरू ठेवावी. त्यांनी त्यामागची कारणंही पत्रात सांगितली आहेत."
दलाई लामा यांनी हेही सांगितलं की, तिबेटमध्ये राहणाऱ्या तिबेटी लोकांकडून त्यांना वेगवेगळ्या माध्यमांतून संदेश मिळाले आहेत. त्यामध्येही दलाई लामांची परंपरा पुढे सुरू राहावी, हीच विनंती केली गेली आहे.
दलाई लामा म्हणाले, "या सर्व विनंतीनुसार मी दलाई लामा ही परंपरा पुढेही सुरू राहील, याची पुष्टी करतो."
दलाई लामा यांनी हेही सांगितले की, पुढील दलाई लामाला मान्यता देण्याची जबाबदारी गादेन फोडरंग ट्रस्टची असेल. हे ट्रस्ट त्यांच्याच कार्यालयाचा एक भाग आहे.

संदेशात दलाई लामा म्हणाले की, " त्यांनी (गादेन फोडरंग ट्रस्टच्या सदस्यांनी) तिबेटी बौद्ध परंपरेतील महत्त्वाचे धर्मगुरू आणि दलाई लामांच्या परंपरेशी जोडलेल्या विश्वासू धर्मरक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांनी जुन्या परंपरेनुसार पुढच्या दलाई लामांचा शोध घ्यावा आणि त्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी."
दलाई लामा यांनी ठामपणे सांगितलं की, पुढील दलाई लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा एकमेव अधिकार फक्त गादेन फोडरंग ट्रस्टकडेच आहे. या विषयात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
असं मानलं जातं आहे की, या विधानातून दलाई लामा अप्रत्यक्षपणे चीनकडे इशारा करत आहेत. कारण पुढील दलाई लामा चिनी कायद्यानुसारच निवडला जाईल, असा चीनचा दावा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
निर्वासित तिबेटी सरकार, म्हणजेच सेंट्रल तिबेट अॅडमिनिस्ट्रेशनचे (सीटीए) अध्यक्ष पेनपा सेरिंग यांनीही चीनला थेट संदेश दिला आहे.
सेरिंग म्हणाले, "परमपूज्य दलाई लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याची मूळ प्रक्रिया ही एकमेव आणि खास तिबेटी बौद्ध परंपरेनुसारच असते.
त्यामुळे आम्ही केवळ चीन सरकारने (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) आपल्या राजकीय फायद्यासाठी पुनर्जन्माच्या विषयाचा वापर केल्याचा तीव्र निषेध करतोच, पण अशा गोष्टी आम्ही कधीही स्वीकारणार नाही."
चीनची प्रतिक्रिया
दलाई लामा यांचा संदेश नाकारताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, त्यांच्या पुनर्जन्मासाठी चिनी सरकारची परवानगी आवश्यक आहे.
त्याचबरोबर दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीच्या प्रक्रियेत चीनच्या कायद्यांबरोबरच 'धार्मिक विधी आणि ऐतिहासिक परंपरांचाही' सन्मान केला जावा.
दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची ओळख फक्त लॉटरी पद्धतीनेच ठरवली जाऊ शकते. त्यात एका सोन्याच्या कलशातून नाव काढले जाते, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं
ही परंपरा 1792 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि याचा वापर मागील दलाई लामांची निवड करण्यासाठी केला होता. पण टीकाकारांचं म्हणणं आहे की, चीनमधील अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत गैरव्यवहार केला आहे.
चीनने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्याचं म्हणणं आहे की, ही परंपरा तिबेटी बौद्ध धर्माचं एक 'अद्वितीय रूप' आहे आणि ती चीन सरकारच्या 'धर्मस्वातंत्र्याच्या धोरणा'नुसारच आहे.
तिबेटी वंशाचे लोक काय म्हणत आहेत?
दलाई लामा यांनी त्यांच्या उत्तराधिकारीबाबत भाष्य केल्यानंतर मॅक्लॉडगंजमध्ये उपस्थित असलेल्या शेकडो तिबेटी वंशाच्या लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली.
तिबेटी बौद्ध धर्माच्या अनुयायी तेनजिन छेमे म्हणाल्या, "आज मी खूप आनंदी आहे. परमपूज्य दलाई लामांचा जो संदेश आला आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की, दलाई लामांची परंपरा पुढेही सुरू राहणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
या निर्णयासाठी आम्ही सगळे तिबेटी आणि बौद्ध लोक प्रार्थना करत होतो आणि ती पूर्ण झाली आहे. पुढच्या दलाई लामांचा शोध कधी, कुठे, कसा होईल याची घाई नाही. या संदेशातून हेही लक्षात येतं की परमपूज्य दलाई लामा अजून अनेक वर्षे आमच्यासोबत राहणार आहेत."
सेंट्रल तिबेट अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रवक्ते तेनजिन लेकशेय म्हणाले,"सध्या आमच्याकडे वेळ आहे, कारण परमपूज्य दलाई लामा जिवंत आहेत. सर्वांना विश्वास आहे की, त्यांच्या पुनर्जन्माचा निर्णय घेण्याचा हक्क फक्त त्यांच्याकडेच आहे.
सर्वांची इच्छा आहे की, त्यांच्या संस्थेची परंपरा सुरू राहावी आणि परमपूज्य दलाई लामांनी आश्वासन दिलं आहे की, ती परंपरा सुरूच राहील. यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते?"
तिबेटी बौद्ध भिक्खू लोबसांग वांगडू म्हणाले, "खूप छान वाटलं, आनंद झाला. दलाई लामांचा पुनर्जन्म होईल की नाही, याची आम्हाला काळजी होती. पण आज दलाई लामांनी घोषणा केली, म्हणून सगळे लोक खूप आनंदी झाले आहेत."
पुढील दलाई लामा कोण असतील?
पुढचे दलाई लामा कोण असतील, हे ठरवण्यासाठी एक दीर्घ आणि सखोल प्रक्रिया पार पाडावी लागते.
तिबेटी बौद्ध धर्मामध्ये दलाई लामांची निवड केली जात नाही, तर त्यांचा शोध घेतला जातो. असं मानलं जातं की, मृत्यूनंतर दलाई लामा नव्या शरीरात जन्म घेतात.
त्यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ भिक्खू एका विशेष बालकाचा शोध घेतात, जो दलाई लामांचा पुढचा अवतार असू शकतो. पण हा शोध सहजपणे घेतला जात नाही.
सर्वप्रथम बौद्ध भिक्खू काही आध्यात्मिक संकेतांचे सखोल निरीक्षण आणि अभ्यास करतात. यामध्ये ज्येष्ठ भिक्खूंना पडलेलं स्वप्न, त्यातील दृश्ये आणि चिन्हांचं विश्लेषण केलं जातं.
मृत्यूच्या वेळी दलाई लामांचं शरीर कोणत्या दिशेला होतं किंवा त्यांची मुद्रा कशी होती, हे पाहिलं जातं. तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी धुराची दिशा देखील एक महत्त्वाचा संकेत मानला जातो.
दलाई लामांचा पुढचा जन्म कोणत्या दिशेला किंवा कोणत्या प्रदेशात झाला असेल, हे जाणून घेता यावं, हा या सर्वाचा उद्देश असतो.
एक विशेष तलाव आहे, ल्हामो ल्हात्सो, जी तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे 150 किलोमीटर दूर आहे. भिक्खू तिथे ध्यान करतात आणि असं मानतात की, या तलावाच्या पाण्यातही भविष्यातील दलाई लामांचे संकेत दिसू शकतात.
या सर्व संकेतांच्या आधारावर भिक्खू आणि अधिकारी यांचा एक गट तिबेट आणि हिमालयातील भागांत प्रवास करतो.
ते अशा मुलांचा शोध घेतात ज्यांचा जन्म दलाई लामांच्या मृत्यूच्या सुमारास झाला असेल, ज्यांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता आणि असामान्य गुण असतील, किंवा जे काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्टपणे आठवू शकत असतील.
जेव्हा काही मुलांची ओळख पटते, तेव्हा त्यांची चाचणी सुरू होते. या मुलांना काही विशेष वस्तू दिल्या जातात.

या वस्तूंमध्ये काही पूर्वीच्या दलाई लामांच्या आवडत्या गोष्टी असतात आणि काही इतर सामान्य वस्तू असतात. जो मुलगा योग्य वस्तू ओळखतो, त्याला दलाई लामांचा संभाव्य पुनर्जन्म मानले जाते.
जर तो मूलगा पूर्वीच्या दलाई लामांच्या कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीला, ठिकाणाला किंवा वस्तूला ओळखला, तर त्याला आणखी मजबूत संकेत मानले जाते.
या चाचण्यांनंतर ज्योतिषशास्त्रावर आधारित गणना आणि सखोल आध्यात्मिक चर्चा केली जाते. जेव्हा सर्व गोष्टी एकमेकांशी जुळतात, त्यावेळी त्या मुलाला अधिकृतपणे नवीन दलाई लामा म्हणून घोषित केलं जातं.
त्यानंतर त्या मुलाला एका मठात नेलं जातं, जिथे त्याला बौद्ध शिक्षण आणि आध्यात्मिक प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वर्षांच्या साधनेनंतर तो मुलगा दलाई लामा म्हणून आपली भूमिका पार पाडायला लागतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सध्याचे दलाई लामा अजूनही जिवंत आहेत, तेव्हा त्यांच्या पुनर्जन्माच्या शोधाची गोष्ट का सुरू झाली?
सध्याच्या दलाई लामांनी आधीच सांगितलं आहे की, ते स्वतःच्या हयातीतच आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा करू शकतात.
त्यामुळे असं मानलं जात होतं की, त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या आसपास ते काही संकेत किंवा दिशानिर्देश देतील, ज्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड सोपी होईल आणि ही परंपरा अधिक सुलभ होईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











