मॉडेलिंग ते मोटिव्हेशनल स्पीकर; कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील रुबी ढल्ला कोण आहेत?

फोटो स्रोत, X/@DhallaRuby
- Author, जेसिका मर्फी आणि नादीन युसूफ
- Role, बीबीसी न्यूज, टोरंटो
जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदाच्या शर्यतीत अनेकजण आहेत. विशेष म्हणजे त्यात भारतीय वंशाच्या लोकांचा देखील समावेश आहे.
कॅनडातील राजकीय परिस्थिती, तिथे असलेले भारतीय वंशाचे लोक आणि त्यांचा प्रभाव, कॅनडा-भारत संबंध या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्या व्यक्तीनं कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असण्याला एक वेगळंच महत्त्व आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आता भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला यांचादेखील समावेश झाला आहे.
रुबी ढल्ला टोरंटोमधील लिबरल पक्षाच्या माजी खासदार आहेत. तसंच त्या एक प्रेरणादायी वक्त्यादेखील आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळात रुबी ढल्ला मॉडेल देखील होत्या.
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर लिबरल पक्षाच्या नव्या नेत्याचा शोध घेतला जातो आहे.
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यादेखील लिबरल पक्षाचा नेता बनवण्याच्या शर्यतीत होत्या. मात्र त्यांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे.
रुबी ढल्ला यांच्याबद्दल जाणून घेऊया.
माजी खासदार रुबी ढल्ला
रुबी ढल्ला लिबरल पक्षाच्या टोरंटो मतदारसंघातील माजी खासदार आहेत. रुबी आता कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. मात्र, त्यांचं नावदेखील चर्चेचा विषय झाला आहे.
2004 ते 2011 या काळात रुबी ढल्ला खासदार होत्या. कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्ससाठी निवडून गेलेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या कॅनेडियन महिला होत्या.
त्यांच्यासोबत नीना ग्रेवालसुद्धा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.
रुबी ढल्ला यांनी अलीकडेच सीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की आतापर्यंत तीन वेळा त्या खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत आणि प्रदीर्घ काळापासून राजकारणापासून दूर होत्या.
त्यांचा हॉटेलचा व्यवसायदेखील आहे.

फोटो स्रोत, @DhallaRuby
रुबी ढल्ला यांनी करिअरच्या सुरूवातीच्या काळात मॉडेल म्हणून देखील काम केलं आहे.
रुबी ढल्ला यांनी सीपी 24 या वृत्तवाहिनीला सांगितलं की त्यांच्या मते, ज्या व्यक्तीला उद्योजकतेचा (आंत्रप्रेन्योरशिप) अनुभव असेल अशा व्यक्तीनं पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणं आवश्यक आहे.
त्या असंही म्हणाल्या की पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्या उतरल्यामुळे यात वैविध्य आलं आहे.
रुबी ढल्ला यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "मी कागदपत्रं दाखल केले आहेत आणि डिपॉझिट देखील भरलं आहे. मी जिंकण्यासाठी, लिबरल पार्टीचा पुढील नेता होण्यासाठी आणि कॅनडाचा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत उतरले आहे."
त्यांच्या कुटुंबानं घरातील कामासाठी नियुक्त केलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोपदेखील आधी त्यांच्यावर झाला आहे.
या आरोपामुळेच त्यांनी 2009 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.
मात्र, काहीही चुकीचं केल्याचा आरोप रुबी ढल्ला यांनी वारंवार फेटाळला आहे.
रुबी ढल्लाव्यतिरिक्त इतर अनेक नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.


माजी उप पंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड
टोरंटोच्या खासदार क्रिस्टिया फ्रीलँड या ट्रुडो यांच्या टीममधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी एक आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या प्रमुख दावेदार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आहे.
त्यांच्याकडे प्रदीर्घ काळापासून जस्टिन ट्रुडो यांच्या अतिशय जवळच्या आणि विश्वासू वरिष्ठ अधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. मात्र पंतप्रधान कार्यालयाबरोबर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी डिसेंबरमध्ये अचानक पदाचा राजीनामा दिला होता.
त्यांचा राजीनामा लोकांसमोर आला होता. त्यात त्यांनी ट्रुडो यांच्यावर टीका केली होती. ट्रुडो यांनी पंतप्रधानपद सोडण्यामागे या गोष्टीचा दबाव हे कारण देखील मानलं जातं.
56 वर्षांच्या क्रिस्टिया फ्रीलँड यांचा जन्म पश्चिमेकडील अल्बर्टा प्रांतात झाला होता. त्यांच्या आई युक्रेनच्या आहेत. राजकारणात येण्याआधी त्या पत्रकार होत्या.

फोटो स्रोत, Reuters
2013 मध्ये त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आल्या होत्या. दोन वर्षांनी सत्तेत आल्यानंतर फ्रीलँड यांचा समावेश जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात झाला होता.
परराष्ट्र खात्याच्या मंत्री म्हणून काम करताना फ्रीलँड यांनी मुक्त व्यापार करारावर कॅनडाची अमेरिका आणि मेक्सिकोबरोबर चर्चा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नंतर त्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री झाल्या होत्या. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिला महिला ठरल्या होत्या. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी कॅनडाच्या अर्थखात्याचं कामकाज सांभाळलं.
गेल्या महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस त्यांनी, डोनाल्ड ट्रम्प कॅनडावर जे आयात शुल्क लागू करत आहेत, त्याला हाताळण्यात अपयश आल्याबद्दल ट्रुडो यांच्यावर टीका केली होती.
ग्लोब अँड मेल मध्ये 2019 च्या एका प्रोफाईलमध्ये म्हटलं होतं की, फ्रीलँड लिबरल पार्टीच्या एकमेव आशा होत्या.
युक्रेनला पाठिंबा देऊन फ्रीलँड यांनी अनेक घटकांमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली होती. मात्र, हॉर्वर्डमधून शिकलेल्या खासदाराला देखील या मुद्द्यावरून टीकेला तोंड द्यावं लागतं आहे.
इतकंच नव्हे तर ट्रम्प यांनी त्यांना 'विषारी व्यक्ती' म्हटलं होतं.
माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी
जस्टिन ट्रुडो यांनी स्वत: मान्य केलं आहे की मार्क कार्नी यांना अर्थमंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेण्याची मागणी ते प्रदीर्घ काळापासून करत होते.
जुलै 2024 मध्ये नाटो परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं, "कॅनडातील लोकांना वाटतं आहे की राजकारणात पुढे जाण्यासाठी चांगल्या लोकांची आवश्यकता आहे. अशा वेळी त्यांचं योगदान सर्वात महत्त्वाचं ठरेल."
मार्क कार्नी 59 वर्षांचे आहेत. अलीकडेच काही महिने त्यांनी ट्रुडो यांचे विशेष सल्लागार म्हणून काम केलं होतं. प्रदीर्घ काळापासून त्यांना पंतप्रधानपदासाठी दावेदार मानलं जातं आहे.
कार्नी यांनी हॉर्वर्डमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी कधीही सार्वजनिक पदाची जबाबदारी सांभाळलेली नाही. मात्र आर्थिक विषयांबाबतची त्यांची पार्श्वभूमी भक्कम आहे. त्यांनी बॅंक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंड या दोन्ही बँकांच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कॅनडातील रूढीवादी किंवा परंपरावादी घटकांमध्ये लोकप्रिय नसलेल्या किंवा नावडत्या असलेल्या काही खुल्या धोरणांचे कार्नी समर्थक राहिले आहेत.
यात केंद्रीय कार्बन टॅक्स धोरण, पक्षाचं हवामान बदल आणि पर्यावरणासंदर्भातील धोरण इत्यादींचा समावेश आहे. या धोरणांवर टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे की या धोरणांमुळे कॅनडातील लोकांवरील आर्थिक बोझा वाढेल.
कॅनडातील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोइलेवर यांच्यावर आधीच टीका करताना त्यांनी म्हटलं आहे की देशाच्या भविष्याचा विचार करता त्यांच्याकडे "कोणत्याही योजना नाहीत" आणि ते "फक्त घोषणाबाजी" करतात.
कार्नी म्हणाले, "चर्चेत मी प्रत्यक्षात व्यवसायात असलेली आणि निर्णय घेणारी व्यक्ती देखील आहे."
लिबरल हाऊसच्या नेत्या - करीना गोल्ड
करीना गोल्ड एक माजी व्यवसाय आणि गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. त्या आता कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सहभागी झाल्या आहेत. करीना गोल्ड यांनी घोषणा केली आहे की जर त्या निवडून आल्या तर "नवी पिढी"चं प्रतिनिधत्व करतील.
2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. कॅनडाच्या मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला देखील आहेत.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images
करीना गोल्ड 37 वर्षांच्या असून सभागृहातील नेता म्हणून सध्याची भूमिका पार पाडण्याआधी त्यांनी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी जाहीर करताना त्या म्हणाल्या, "कॅनडातील जनतेचा आमच्या पक्षावरील विश्वास उडाला आहे."
खासदार - चंद्रा आर्या
संसदेतील बॅकबेंचचे सदस्य चंद्रा आर्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अधिकृतपणे सर्वात आधी उतरणाऱ्या लोकांपैकी एक आहेत.
आर्या यांनी एका वक्तव्यात म्हटलं की, ते "आपल्या देशाची पुनर्उभारणी आणि भावी पिढ्यांसाठी समृद्धी आणण्यासाठी अधिक कार्यक्षम सरकारचं नेतृत्व करण्याच्या शर्यतीत सहभागी होत आहेत."
चंद्रा आर्या एक इंजिनीअर आणि माजी व्यावसायिक आहेत. 2015 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते.
20 वर्षांपूर्वी चंद्रा आर्या भारतातून कॅनडात आले होते.

फोटो स्रोत, @AryaCanada
आर्या यांनी सांगितलं आहे की कॅनडाचा राजेशाहीशी संबंध तोडण्याच्या भूमिकेचं ते समर्थन करतात.
कॅनडात, ब्रिटनचा सम्राट हा राज्याचा प्रमुख असतो. अर्थात ही बाब बऱ्याच अंशी प्रतिकात्मक स्वरुपाची आहे.
त्यांना फ्रेंच न बोलता येण्याच्या आव्हानाला तोंड द्यावं लागू शकतं. अधिकृतपणे द्वैभाषिक देशात उच्च पदावर काम करू पाहणाऱ्या राजकारण्यांसाठी सर्वसाधारणपणे ही आवश्यक बाब असते.
व्यावसायिक - फ्रँक बेलिस
फ्रँक बेलिस लिबरल पक्षाचे माजी खासदार आहेत. पक्षाचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करणारे ते पहिले व्यक्ती आहेत.
ते म्हणाले की त्यांच्याकडे व्यवसाय करण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचा उपयोग करून ते कॅनडातील लोकांसमोर असलेल्या रोजगार आणि राहणीमानाच्या खर्चासंदर्भातील आव्हानांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.
फ्रँक बेलिस 2015 ते 2019 दरम्यान खासदार होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











