अर्श डाला कोण आहे? त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार का प्रयत्न करत आहे?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने गेल्या वर्षी कॅनडा सरकारला डालाच्या अटकेसाठी आवाहन केले होते.

फोटो स्रोत, Punjab Police

फोटो कॅप्शन, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने गेल्या वर्षी कॅनडा सरकारला डालाच्या अटकेसाठी आवाहन केले होते.
    • Author, सुरिंदर सिंह मान
    • Role, बीबीसीसाठी

अनेक प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार भारत सरकारने कट्टरवादी घोषित केलेल्या अर्शदीप सिंह उर्फ अर्श डाला याला कॅनडा पोलिसांनी ओंटारियो भागातून अटक केली आहे.

गेल्या महिन्यात कॅनडाच्या मिल्टन टाऊनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या एका घटनेनंतर पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे.

त्यातील एकाची ओळख कथितरित्या अर्श डाला, म्हणून केली गेली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तपाससंस्थांनी गेल्या महिन्यात जुलै महिन्यात कॅनडा सरकारकडे, डालाच्या अटकेची मागणी केली होती. मात्र या मागणीला नकार दिला गेला होता.

आता भारत सरकारने एक निवेदन जारी केलं असून प्रत्यार्पणाचं अपिल करणार असल्याचं सांगितलं आहे.

27 वर्षीय अर्श डाला पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील डाला गावाचा मूळ निवासी आहे.

2018 मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तान समर्थकांची जी सूची सोपवली होती, त्यात त्याचंही नाव होतं. त्यावेळी अर्श डालाचं नाव चर्चेत आलं होतं.

जुलै 2023 मध्ये भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने अर्श डालाला कथितरित्या खलिस्तान समर्थकांशी संबंध असल्याच्या कारणावरुन कट्टरवादी घोषित केले होतं.

2022 मध्ये जारी केली होती रेड कॉर्नर नोटीस

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं, “भारतात चालवल्या जाणाऱ्या खटल्यासाठी त्याचं प्रत्यार्पण केलं जाईल अशी भारताला आशा आहे.”

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी एक निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “आम्ही कॅनडात घोषित केलेला गुन्हेगार अर्श सिंह गिल उर्फ अर्श डालाच्या अटकेशी निगडीत बातम्या पाहिल्या आहेत. तो खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आहे. आमच्या माहितीनुसार ओंटारियो कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी आलं आहे.”

हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, कट्टरतावादी कारवायांना अर्थसहाय्य यांच्यासह 50 पेक्षा अधिक प्रकरणात त्याचं नाव आहे. मे 2022 मध्ये त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “डालाला भारताने 2023 मध्येच दहशतवादी घोषित केलं होतं. जुलै 2023 मध्ये सरकारने कॅनडा सरकारकडे त्याच्या अटकेची मागणी केली होती. मात्र कॅनडा सरकारने हे निवेदन फेटाळलं होतं. या प्रकरणात अतिरिक्त माहिती देण्यात आली होती.”

परराष्ट्र मंत्रालयाने आणखी एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार म्युच्युअल लीगल असिस्टंस ट्रीटी (एसएएलटी) अंतर्गत कॅनडाला एक निवेदन पाठवलं होतं. त्यात अर्श डालाचा संदिग्ध पत्ता, भारतात त्यांची आर्थिक देवाणघेवाण, स्थावर-जंगम मालमत्ता, मोबाइल क्रमांक अशा अनेक गोष्टींची पडताळणी करायला सांगितलं होतं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डालाच्या प्रत्यार्पणाबाबत आशा व्यक्त केली आहे.
फोटो कॅप्शन, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डालाच्या प्रत्यार्पणाबाबत आशा व्यक्त केली आहे.

या निवेदनानुसार ही सगळी माहिती कॅनडाला जानेवारी 2023 मध्येच देण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये कॅनडाच्या न्याय मंत्रालयाने या खटल्यात अतिरिक्त माहिती मागितली होती. त्याचं उत्तर यावर्षी मार्चमध्ये पाठवण्यात आलं होतं.

या अटकेनंतर आता प्रत्यार्पणाची तयारी करणार असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

भारतातील अर्श डालाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, कॅनडामधील गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याचं प्रत्यार्पण होईल अशी आशा आहे.

अर्श डाला कोण आहे?

साधारण पाच महिन्यांआधी मोहालीच्या सीबीआय/एनआयए कोर्टाच्या आदेशानंतर एनआयए टीमने अर्श डालाच्या घराच्या बाहेर विविध प्रकरणांमध्ये फरार असल्याबद्दल एक नोटीस लावली होती.

सध्या अर्श डालाच्या मूळ गावात असलेल्या घराला कुलूप लावलेलं आहे.

गावकऱ्यांच्या मते, अर्श डालाची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य आहे. लोकांनी सांगितलं की, त्याच्या घरी गेल्या सहा-सात वर्षांपासून कोणीही आलेलं नाही.

अर्श डालाचे पंजाबमधील वडिलोपार्जित निवासस्थान कुलूपबंद आहे.

फोटो स्रोत, Surinder Singh Mann

फोटो कॅप्शन, अर्श डालाचे पंजाबमधील वडिलोपार्जित निवासस्थान कुलूपबंद आहे.

गावातल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस त्याच्या घराचा तपास करायला येतात किंवा त्या घरावर एनआयएची छापेमारी होते.

अर्श डालाविरुद्ध पहिला खटला 2016 मध्ये दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या नोंदीनुसार अर्श डालाने बँकेच्या सुरक्षारक्षकाडून शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचवेळी पंजाब पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार अर्श डाला 2018 पासून कॅनडात राहत आहे आणि कथितरित्या खलिस्तानच्या लोकांबरोबर भारताविरोधी कारवाया करण्यात त्याचा सहभाग आहे.

हरदीप सिंह निज्जरशी संबंध

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, अर्श डाला 2018 मध्ये कॅनडाला गेला होता. तिथे त्याची भेट टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जरशी झाली. त्यानंतर ते दोघं एकत्र काम करू लागले.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, अर्श डालाचा संबंध कॅनडामध्ये असलेल्या खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरशी होता. एनआयएने त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

या संस्थेच्या मते, अर्श डाला निज्जरशी हातमिळवणी करून पंजाबमध्ये ‘टार्गेटेड किलिंग्स’ करायचे.

जून 2023 मध्ये कॅनडातील सरेमध्ये गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये काही अज्ञात लोकांनी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या घालून हत्या केली होती.

हरदीपसिंग निज्जरची जून 2023 मध्ये कॅनडात हत्या झाली होती.

फोटो स्रोत, FB/Virsa Singh

फोटो कॅप्शन, हरदीपसिंग निज्जरची जून 2023 मध्ये कॅनडात हत्या झाली होती.

भारताने हरदीप सिंह निज्जरलाही खलिस्तानचं उदात्तीकरण करणारा दहशतवादी घोषित केलं होतं.

कॅनडाने या हत्येसाठी भारत सरकारचे अधिकारी आणि गुप्तहेरांवर आरोप केले होते. त्यानंतर दोन देशांचे संबंध बिघडलेले बघायला मिळत आहेत.

अर्श डालाला दहशतवादी घोषित करण्याबरोबरच भारतीय गृहमंत्रालयाने दावा केला होता की, हरदीप सिंह निज्जरच्या आदेशावर अर्श डाला आपल्या सहकाऱ्यांना भारतातील प्रमुख व्यापारी आणि नेत्यांना ठार मारण्याचे आदेश द्यायचा.

डालाच्या कथित भारत विरोधी कारयावांचा हवाला देत गृहमंत्रालयाने अर्श डालाच्या प्रत्यार्पणाची मागणी कॅनडा सरकारडे केली होती.

अर्श डालाच्या विरोधात गुन्हे

अर्श डालाविरुद्ध पंजाब पोलिसांनी खंडणी आणि हत्येचे एकूण 67 गुन्हे दाखल केले आहेत.

एनआयएने एका संप्रदायाच्या काही प्रमुख लोकांच्या हत्येच्या आरोपात अर्श डालाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

डालाच्या साथीदारांवर जानेवारी 2023 मध्ये लुधियानामध्ये एका इलेक्ट्रिशियनची हत्या, मानसामध्ये एका पेट्रोल पंपावर ग्रेनेड हल्ला आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा नेता गुरप्रीत सिंह हरिनौच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

एनआयएने अर्श डालाविरुद्ध एका पंथातील काही प्रमुख लोकांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फोटो स्रोत, Surinder Singh

फोटो कॅप्शन, एनआयएने अर्श डालाविरुद्ध एका पंथातील काही प्रमुख लोकांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणांमध्ये अनेक आरोपींना पंजाब पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजन्स विभागाने अटक केली होती. अर्श डालाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे, असा दावा पोलिसांनी केला होता.

पोलिसांच्या मते, अर्श डालाच्या विरोधात मोगा, फरीदकोट, मानसा, संगरूर, मुक्तसर, बर्नाला, तरणतारण, भटिंडा, मोहालीमध्ये खंडणी मागितल्याचे आणि हत्येचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्या मूळ गावी ज्येष्ठ काँग्रेस नेते बलजिंदर सिंह बल्ली यांची सशस्त्र लोकांनी त्यांच्या घरातच गोळ्या घालून हत्या केली होती. त्यावेळीही अर्श डालाचं नाव चर्चेत आलं होतं.

बलजिंदर सिंह बल्ली हे बल्ली गाव डालाचे प्रमुख होते.

त्या हत्येनंतर अर्श डाला यांनी सोशल मीडियावर एक कथित पोस्ट शेअर करून या हत्येची जबाबदारी घेतली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)