मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर कसाबविरोधात साक्ष दिली साक्ष, 9 वर्षांच्या देविकाचं असं बदललं आयुष्य

फोटो स्रोत, Getty Images & Shardul Kadam
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"सुरुवातीला मला सांगण्यात आलं की, तुम्हाला घर दिलं जाईल. शिक्षणासाठी मदत केली जाईल. काहीही लागलं तर आम्ही उपलब्ध राहू. मात्र, कोणीही नव्हतं. आता अखेर अंधेरीत घर मिळालं आहे. 300 स्क्वेअर फूटचं. पण यासाठीही कोर्टात जावं लागलं."
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदार आणि पायाला गोळी लागल्यानंतर या हल्ल्यातून बचावलेली देविका रोटावन हीने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीएसएमटी रेल्वे स्थानकात देविकाच्या पायाला गोळी लागली होती. या ठिकाणच्या घटनेत 52 व्यक्तींचा मृत्यू, तर 108 जण जखमी झाले होते.
त्यावेळी देविकानं अटक झालेला दहशतवादी अजमल कसाबविरोधात न्यायालयात साक्ष दिली होती. देविका ही या घटनेतील सर्वात लहान वयाची साक्षीदार होती. त्यावेळी देविकाचं वय फक्त 9 वर्षं 11 महिने होतं.
2020 मध्ये देविका रोटावन हीने मुंबई उच्च न्यायालयात तिला आर्थिक दुर्बल कोट्यातून घर मिळावं, अशी मागणी करत याचिका दाखल केली.
यानंतर आता 5 वर्षांनंतर देविकाला अखेर सरकारकडून घर मिळाल्याचं ती सांगते. मात्र, अजमल कसाब विरोधात कोर्टात साक्ष ते घर मिळण्यापर्यंतचा देविकाचा संघर्ष सोपा नव्हता. गेल्या जवळपास 15 वर्षांत नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.
घरासाठीची मागणी कशी सुरू झाली?
26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात देविकाच्या उजव्या पायाला गोळी लागली होती. तिच्यावर यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या पायावर आजही गोळी लागल्याची खूण आहे.
9 वर्षांच्या देविकाने त्यावेळी विशेष न्यायालयात अटक झालेल्या अजमल कसाबला ओळखलं आणि त्यासाठीची साक्षही दिली होती. तिने हे धैर्य आणि धाडस दाखवल्यानं अनेक स्तरातून तिचं कौतुक झालं. तिचा सत्कारही करण्यात आला.
25 वर्षीय देविकाने आता कला शाखेत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती वडील आणि भावासह वांद्रे या ठिकाणी भाड्याने राहत आहे.
परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि हक्काचं घर नसल्याने देविकाने 2020 मध्ये सरकारकडून घर मिळावं यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आता अखेर देविकाला घर मिळालं.

फोटो स्रोत, BBC/ Shardul Kadam
मुंबईतील त्या हल्ल्यानंतर आणि या प्रकरणी साक्ष दिल्यानंतर अनेकांकडून मदतीसाठी आश्वासनं देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात मदत मागितल्यानंतर कोणीही पुढे आलं नाही,.शेवटी कोर्टाची मदत घ्यावी लागली, असं देविका सांगते.
बीबीसी मराठीशी बोलताना देविकाने सांगितलं, "घरासाठीची लढाई बराच काळ चालली. वर्ष 2010-2011 च्या आसपास जिल्हाधिकारी कार्यालयातून काही लोक आमच्या घरी आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, तुमच्या नावावर घर अलॉट झालं आहे. काही कागदपत्रही त्यांच्याकडे होती."
"आमची नावं आणि माहिती त्यांनी एका अर्जावर लिहून घेतली. त्यावर माझी आणि माझ्या वडिलांची स्वाक्षरी घेण्यात आली. त्यांच्याकडे आम्ही कागदपत्र मागितली, पण त्यांनी त्यावेळी दिली नाही. यासाठी पुढे पाठपुरावा केला. त्यांनी दिलेल्या एका नंबरवर कॉल केल्यावर तो 'राँग नंबर' असल्याचं लक्षात आलं."
यानंतर वकिलांच्या मदतीनं 2020 मध्ये कोर्टात याचिका दाखल केल्याचं देविकानं सांगितलं. वकिल आणि न्यायाधीशांमुळेच घर मिळू शकलं, असं ती नमूद करते.
न्यायालयानं सांगितल्यानंतर सरकारकडून यापूर्वीच देविकाला एक घर मिळालं होतं. मात्र, मिळालेल्या घराच्या जागेबाबत काही अडचणी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आपण पुन्हा मदत मागितली आणि आता अखेर घर मिळाल्याचं देविकानं सांगितलं.

फोटो स्रोत, Devika Rotawan
दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळी अनेकांनी अनेक वेगवेगळ्या मदतीची आश्वासनं दिली होती. यासाठी पाठपुरावाही केला, पण घरासाठी कोर्टातच जावं लागलं, असं तिनं सांगितलं.
"अनेकांनी आश्वासनं दिली, पण दुसऱ्या दिवशी ते विसरून जात होते. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या गेल्या. यात राजकीय नेतेही होते, ज्यांच्याकडे क्षमता होती, ते करू शकले असते. केवळ माझ्यासाठी नाही, तर 26/11 तील जे लोक होते त्यांच्यासाठीही. मात्र, केवळ बोललं गेलं."
"कोणी चॅनेलसमोर बोलत होतं, तर कोणी अनौपचारीकपणे बोलायचं. प्रत्यक्षात संपर्क केल्यानंतर कोण देविका तुम्हाला ओळखलं नाही, अशी प्रतिक्रिया असायची. ही एक मोठी प्रक्रिया होती," असंही देविकानं सांगितलं.
जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या लोकांबद्दल नंतर फारशी माहिती मिळू शकली नाही, असं देविकाचं म्हणणं आहे.
"ते अधिकारी कोण होते, काय होते ते कळू शकलं नाही. ते सरकारकडून आले होते की कोणत्या राजकीय पक्षाकडून काही कल्पना नाही. मात्र, 2020 पूर्वी 10 वर्षं जवळपास राजकीय नेते आणि इतरही लोकांना भेटण्यात वेळ गेला. केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर मी जवळपास सर्वच पक्षाच्या लोकांना भेटले."
'आर्थिक मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली'
देविकाच्या पायाला गोळी लागल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून पुन्हा त्या पायावर उभं रहायला येईपर्यंत आणि पूर्ण बरी होईपर्यंत यात तिचं शिक्षणही उशिरा सुरू झाल्याचं तिचं म्हणणं आहे.
शालेय शिक्षण सातवीपासून सुरू झाल्याचं देविका सांगते. आता ती 25 वर्षांची असून 2024 मध्ये तिने कला शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती आता नोकरीच्या शोधात आहे.
आर्थिक मदतीसाठीही देविकाने तत्कालीन सरकारकडे अर्ज केला होता. यानंतर देविकाला जवळपास 10 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून करण्यात आल्याचं तिनं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
देविकाने सांगितलं, "मला त्यावेळी सरकारकडून खूप अपेक्षा होती की ते माझी मदत करतील, पण खूप उशीर झाला. मी दीड वर्ष मंत्रालयात खेटा मारत होतो. त्यानंतर कुठे मदत मिळाली. आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप अस्थिर होतो."
26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 174 जणांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्याच्या वेळी देविका, तिचे वडील आणि भाऊ हे सीएसएमटी रेल्वे स्थानकात होते.
"ती घटना मला आजही लक्षात आहे. मी तो दिवस अर्थात कधीही विसरू शकणार नाही. माझ्यावर आजही निशाण आहे. माझ्यासमोर इतक्या लोकांना मारण्यात आलं. मी सीएसटी रेल्वे स्टेशनवर होते."
"माझे वडील आणि भाऊ सोबत होते. आम्ही पुण्याला चाललो होतो. तेव्हा तिथं अचानक बॉम्बस्फोट झाला. यानंतर गोळीबार सुरू झाला. मी ज्याला पाहिलं तो अंधाधूंद गोळ्या झाडत होता. तो चेहरा मला कायम लक्षात राहील," असंही देविका सांगते.
'तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढावंच लागतं'
दहशतवादी हल्ला ज्याने संपूर्ण जग हादरलं होतं. त्या रात्री 10 हल्लेखोर समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दोन पंचतारांकित हॉटेल, एक गजबजलेलं कॅफे, छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) आणि नरिमन हाऊस या ज्यू सेंटरवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर 60 तास चाललेल्या चकमकीत 174 जणांना प्राण गमवावे लागले होते.
अजमल कसाब विरोधात साक्ष दिल्यानं लहानग्या देविकाचं सर्व स्तरातून त्यावेळी कौतुक करण्यात आलं. देविकाला आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले. मात्र, या घटनेने तिचं संपूर्ण आयुष्य बदललं.
हल्ल्यानंतर गेल्या जवळपास 15 वर्षांत देविकाला अनेक चांगले वाईट अनुभव आले. कसाब विरोधात साक्ष देण्यापासून ते घर मिळण्यापर्यंतचा प्रवास देविकाला खूप काही शिकवणारा होता. तिच्यासमोर अनेक आव्हानं देखील आली.

फोटो स्रोत, BBC / Shardul Kadam
याबाबत बोलताना देविका सांगते, "माझं शिक्षण उशिरा सुरू झालं. मी आता पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. अनेक जण चिडवायचे की कसाब जात आहे, कसाब नाव ठेवलं गेलं. लहान मुलांचं तर ते बालीश असतात, पण मोठे लोक सुद्धा बोलायचे."
"दोन-तीन वेळा तर मी भांडले अशा लोकांसोबत. मला वाटतं की, कितीही चढ-उतार आले, तरी आपल्याला आयुष्यात फक्त लढायचं आहे. बसल्या बसल्या काही मिळत नाही. आपल्या हक्कासाठी तुम्हाला लढावंच लागतं, पुढे येऊन बोलावं लागतं."
या दरम्यान अनेकदा हाती निराशा आल्याचंही ती सांगते. "मी अनेकाचं रुप पाहिलं. कॅमेऱ्यासमोर काय बोललं गेलं आणि नंतर काय बोललं जातं हे बघितलं. काही लोकांनी सहकार्य केलं. सगळेच नक्कीच तसे नाहीत. मी इतकंच सांगेन की लगेच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेऊ नये," असं तिनं सांगितलं.
देविकाला आता मुंबईतील अंधेरी परिसरात घर मिळालं आहे. सध्या ती आपल्या कुटुंबियांसोबत वांद्रे इथल्या एका एसआरए इमारतीत भाड्यानं राहते. लवकरच ती आपल्या नवीन घरात राहण्यासाठी जाणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे?
यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालयाने बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 'देविका आणि तिचे वडील नटवरलाल रोटावन यांनी न्यायालयातील आपल्या साक्षीत आपण जिल्हा, पाली, राजस्थान येथे सुमारे 3 वर्षांपासून (सन 2009 पूर्वी) रहात असल्याचे सांगितले."
"तसंच तात्पुरत्या स्वरुपात मुंबई, वांद्रे येथे रहात असल्याचे सांगितलेले. सीएसएमटी रेल्वे स्थानक इथल्या घटनेत एकूण 52 जणांचा मृत्यू झाला, तर108 जण जखमी झाले होते. या घटनेबाबत एकूण 380 साक्षीदार होते. यापैकी 177 साक्षीदार हे प्रत्यक्ष घटना पाहणारे होते."
"त्यातील काही साक्षीदारांची साक्ष ही प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून घेण्यात आली. काही साक्षीदारांची साक्ष ही शपथपत्राद्वारे नोंदविण्यात आली. फक्त देविका यांच्या साक्षीमुळे कसाबला फाशी झाली हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. वास्तविक सरकारी पक्षाने एकूण 654 साक्षीदार न्यायालयात तपासले होते."
"सदरच्या साक्षीदारांनी दिलेली साक्ष, सरकारी पक्षाने सादर केलेला टेक्निकल पुरावा, सी. सी. टी. व्ही. फुटेजेस, 2 पत्रकारांनी प्रत्यक्ष कसाब आणि अबू इस्माईल यांचे काढलेले फोटो, न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी केलेले परीक्षण, कसाब याने न्यायालयात दिलेला कबुली जबाब, सुनावणी न्यायालयात दिलेली कबुली इत्यादींमुळे फाशीची शिक्षा झाली."

फोटो स्रोत, BBC / Shardul Kadam
'देविका यांना शासनातर्फे अतिरेकी हल्ल्यात जखमी झाल्याने शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय आणि आर्थिक मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळालेली आहे. ही बाब त्यांनी घर मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सांगितली आहे, असे त्या याचिकेच्या निकालात दिसून येते.
देविकाने आपण अतिरेकी हल्ल्यातील साक्षीदार असून आपणास शासनाकडून घर मिळावे याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने शासनानं देविकाला सदनिका देण्याचं निश्चित केलेलं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयास कळविण्यात आलं.
त्यानुसार न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलं की, सरकारी वकिलांनी 12 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या अपर सचिवांकडून प्राप्त झालेल्या पत्राचा दाखला दिला आहे. त्यामध्ये त्यांना कळविण्यात आले आहे की, माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणी अंतर्गत विशेष बाब म्हणून याचिकाकर्त्याला एका सदनिकेचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे.
ही सदनिका म्हाडा किंवा एसआरएकडे उपलब्ध असलेल्या सदनिकेतून मंजूर केली जाईल. माननीय मंत्र्यांनी याचिकाकर्त्याला एक सदनिका वाटप करण्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून कौतुक करतो. यामुळे आमच्या मते, याचिकाकर्त्याला खरा न्याय मिळेल.
देविकाला शासनाकडून 13 लाख 26 हजार एवढी रक्कम भरपाईपोटी मिळालेली असल्याचे रिट पिटीशनच्या एका आदेशात नमूद करण्यात आल्याचं,' मुंबई पोलीस आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











