इंग्लंडच्या 'व्हर्जिन क्वीन'ने लग्न का केलं नाही? राजकीय चालींनुसार घेतलेला निर्णय, की दुसरे काही?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, सतत कामावर नजर ठेवणारा पुरुष सोबत नसेल तर एखादी स्त्री किती चांगल्या पद्धतीनं सत्ता चालवू शकते, हे एलिझाबेथ राणीला चांगलं माहीत होतं.
    • Author, नील आर्मस्ट्राँग
    • Role, बीबीसी कल्चर

पहिली एलिझाबेथ ही राजा आठवा हेन्री याची मुलगी. लग्न न करणारी ती एकमेव ब्रिटिश राणी होती. ट्यूडर घराण्यातल्या या राणीनं 450 वर्षांपूर्वी केनिलवर्थ किल्ल्याला शेवटची भेट दिली.

या किल्ल्यात अलीकडेच उभारण्यात आलेल्या एका कलाकृतीतून एलिझाबेथ राणीनं कधीही लग्न का केलं नाही, याचे संकेत मिळतात.

विश्वासघात, शिरच्छेदांचं सत्र आणि प्रेमाची अतिशय भावनिक कबुली यांचं चित्रण या कलाकृतीतूनतून दिसतं.

1575 साली जुलै महिन्यातल्या एका संध्याकाळी 41 वर्षांची एलिझाबेथ राणी युनायडेट किंग्डममधल्या वॉरविक्शायरमधल्या केनिलवर्थ किल्ल्यात पोहोचली. या किल्ल्याला दिलेली ही तिची शेवटची भेट होती.

1563 मध्येच तिनं हा किल्ला रॉबर्ट ड्युडली यांच्या नावावर केला होता. त्याच्या पुढल्या वर्षी राणीनं त्यांना 'अर्ल ऑफ लेस्टर' हे पदही बहाल केलं.

ड्युडली राणीच्या जवळचा होता. तो तिचा बालमित्र असावा. त्यांच्यातल्या जवळीकीच्या नात्याबद्दल अनेकांची कुजबूज चाले.

या अविवाहित राणीच्या आगमनाआधीच ड्युडलीनं भव्य किल्ल्याचं नुतनीकरण केलं होतं. नव्या इमारती बांधल्या, नवीन बाग उभारण्यात आलेली आणि संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आला.

राणीच्या स्वागतासाठी कोणतीही कसूर सोडण्यात आली नव्हती. उत्तमोत्तम संगीत, नृत्य, कुशल कसरती, नेत्रदीपक आतिषबाजी आणि रंगभूषा केलेल्या कलाकारांचे नाट्यप्रयोग अशी करमणुकीची सगळी योजना करून ठेवली होती.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

किल्ल्याभोवती एक तलाव होता. त्यात 'लेडी ऑफ द लेक' या दंतकथेतील पात्राचा पुतळा असलेलं एक छोटं बेट तरंगत होतं.

सोबतच, 24 फुटांचं डॉल्फिनरुपी शिल्प होतं. त्यात वादक बसले होते आणि 18 फूट लांब जलपरीचं शिल्पही होतं.

कुठल्याही गोष्टीसाठी खर्च कमी केला नव्हता. हे सगळं करण्यासाठी त्यावेळी ड्युडलीला 1,000 पाऊंड्स एवढा खर्च आला. म्हणजे आजच्या जमान्यातले कोट्यावधी.

हा संपूर्ण उत्सव फक्त मनोरंजनासाठी नव्हता. तर राणीसमोर ठेवलेला भव्य, महागडा आणि जाहीर प्रेम प्रस्ताव होता.

16 व्या शतकातील सत्ताधारी वर्गातल्या एकानं ठेवलेला हा प्रस्ताव आजच्या काळात उडणाऱ्या विमानामागं "माझ्याशी लग्न करशील का?" असा बॅनर लावला तर जसं वाटेल, तितकाच तो खास होता.

"1575 चा हा उत्सव एलिझाबेथ राणीचं मन जिंकण्यासाठीचा प्रयत्न होता. त्यातल्या कार्यक्रमांत लग्न हाच विषय केंद्रस्थानी होता," इंग्लिश हेरिटेजमधील प्रमुख संग्रहालयाध्यक्ष जेरेमी अ‍ॅश्बी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"हा त्याचा शेवटचा डाव असल्याचं लॉर्ड लेस्टर (रॉबर्ट ड्युडली) यांच्यावर सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. एलिझाबेथ गोल्डरिंग यांनी म्हटलं आहे."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, पहिली एलिझाबेथ आणि रॉबर्ट ड्युडली यांच्यात जवळीकीचे संबंध होते.

ड्युडलीचा हा धाडसी डाव अगदी सुरळीत चालला होता. पण अचानक सारं बदललं. या सोहळ्याचा केंद्रबिंदू होता 'द मास्क' हा नाट्यप्रयोग. त्यावेळी बुधवार 20 जुलैला तो होणार होता. पण झाला नाही.

अधिकृत दस्ताऐवजानुसार हवामान खराब असल्यानं तो झाला नाही, असं म्हटलं आहे.

पण ते खरं आहे का? की राणीला त्या नाट्यप्रयोगाच्या कथाविषयाचा सुगावा लागला आणि त्यामुळे ती संतापली?

या नाट्यप्रयोगात डायना या संयम आणि ब्रह्मचर्याच्या देवीचं प्रमुख पात्र होतं. ती एका पवित्र अप्सरेचा शोध घेत होती. त्या अप्सरेचं नाव होतं झाबेटा. ते एलिझाबेथ या नावाचंच एक रूप होतं.

जुनो या विवाहाच्या देवतेचा एक दूत राणी एलिझाबेथला थेट संबोधित करतो आणि डायनाचा मार्ग सोडून विवाहाचा मार्ग स्वीकार अशी विनंती तिला करतो, असा नाटकाचा शेवट असणार होता.

ड्युडलीला राणीच्या दरबारात बरीच मोकळीक होती. पण कदाचित यावेळी त्यानं सीमा ओलांडल्या होत्या. कारण काहीही असो, तो नाट्यप्रयोग कधीच सादर झाला नाही. सारा जल्लोष थांबला.

27 जुलैपर्यंत राणी तिच्या महालातच राहिली आणि नंतर निघून गेली.

बुद्धिबळाच्या खेळाचं समर्पक रुपक

राणीच्या भेटीच्या 450 व्या वर्धापन दिनानिमित्त लिंडसे मेंडिक या कलाकारानं 'विकेड गेम्स' या नावाची एक भव्य कलाकृती केनिलवर्थ किल्ल्यात उभारली आहे.

'विकेड गेम्स' ही कलाकृती प्राचीन मिथककथांमधून तसेच राणी एलिझाबेथच्या केनिलवर्थ भेटीत घडलेल्या घटनांमधून प्रेरणा घेते.

तसंच, तिच्या 45 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत राणी एलिझाबेथ हिनं तिच्या अविवाहित स्थितीचा वापर किती चतुरपणे राजकीय डावपेचांसाठी केला हेही त्यातून समोर येतं.

या कलाकृतीत 13 देखावे उभारण्यात आलेत. काही देखाव्यांमध्ये गूढ आणि भयावहतेची छाया आहे. तर काहींमध्ये अंधारलेला, खोचदार विनोद डोकावतो.

या मातीच्या शिल्पांमध्ये राणी एलिझाबेथ आणि तिच्या सभोवतालच्या लोकांना प्राण्यांच्या रूपात दाखवण्यात आलं आहे. मध्यवर्ती शिल्पात, एलिझाबेथ ही सिंहिण आहे आणि ड्युडली एक अस्वल.

हे देखावे एका फाटलेल्या, विस्कळीत झालेल्या भव्य बुद्धिबळाच्या पटावर मांडलेत.

"एलिझाबेथनं ज्या पद्धतीनं सत्ता सांभाळली आणि स्वतःचं अस्तित्व टिकवलं, त्यासाठी बुद्धिबळाचा खेळ हे अत्यंत समर्पक रूपक आहे," असं मेंडिक बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

"माझ्या मते, एलिझाबेथ हे अतिशय रोचक व्यक्तिमत्त्व आहे. आपण आजच्या काळात स्त्रियांकडे कसे पाहतो, याचा आरसा तिच्या कथेत सापडतो."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, 1998 च्या एलिझाबेथ या चित्रपटात या जोडप्यामधलं नातं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.

ड्युडलीनं रचलेला केनिलवर्थमधला हा सोहळा राणी एलिझाबेथसाठी एक भव्य, ऐश्वर्यपूर्ण उत्सव असावा असा उद्देश होता.

"पण त्याच वेळी, या सोहळ्यामध्ये आणखी काही खोलवर दडलेलं होतं. एलिझाबेथसारख्या प्रभावशाली स्त्रियांसाठी, लग्न न करणं किंवा मूलं न होऊ देणं हे आत्मसंरक्षणाचा आणि स्वातंत्र्यासाठीचं क्रांतीकारक पाऊल होतं."

पहिली एलिझाबेथ ही राजा आठवा हेनरी याची मुलगी. लग्न न करणारी ती एकमेव ब्रिटिश राणी होती. 1558 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी ती सत्तेवर आली.

सहावा एडवर्ड (1537-1553) आणि पहिली मेरी (1516-1558) ही दोन तिची सावत्र भावंड. यांच्यासह आधीच्या दोन पिढ्यांनी ढिगभर वारश्यात धार्मिक, राजकीय आणि आर्थिक समस्या तिच्या पुढ्यात ठेवल्या होत्या.

संसदेचे सदस्य आणि सल्लागार लग्न करण्यासाठी तिच्या सतत मागे लागले होते. इंग्लंडच्या सुरक्षेसाठी ते महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. एखाद्या महिलेनं एकट्यानं राज्य चालवायचं म्हणजे अविश्वसनीयच होतं.

एका राणीनं लग्न केलंच पाहिजे हीच समजूत होती. पुढे गादीवर बसवण्यासाठी एखादा मुलगा जन्माला घालणं एवढाच त्यामागचा उद्देश नव्हता. तर राजकीय आणि लष्करी व्यवहार राणीचा नवरा सांभाळू शकेल, असं मानलं जायचं.

त्यामुळे लग्नासाठी राणीची मनोधारणा करण्याचे प्रयत्न कधी थांबले नाहीत.

अनेक स्थळं तिला सुचवली गेली किंवा अनेकांनी स्वतःहून मागणी घातली. पण एलिझाबेथ राणीनं ते नेहमीच टाळलं, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि अनेकदा स्पष्ट नकारही दिली. पण का?

'मालक नको'

नवरा म्हणून आयुष्यात आलेल्या पुरुषाच्या आधीन रहावं लागेल, ही कल्पनाच राणीला असह्य वाटत होती, म्हणून ती नकार देत असेल, असं सहज म्हणता येईल.

शेवटी ती उच्चशिक्षित होती. फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, लॅटिन आणि फ्लेमिश अशा पाच भाषा तिला येत होत्या. ती इतिहास शिकली होती आणि वक्तृत्वकलाही तिनं अवगत केली होती. ती अतिशय हुशार, स्वाभिमानी आणि तापट होती.

सतत कामावर नजर ठेवणारा पुरुष सोबत नसेल तर एखादी स्त्री किती चांगल्या पद्धतीनं सत्ता चालवू शकते हे एलिझाबेथ राणीला चांगलं माहीत होतं.

1544 च्या उन्हाळ्यात हॅम्पटन कोर्टमध्ये आपल्या वडिलांची सहावी पत्नी, कॅथरीन पार हिला एलिझाबेथनं पाहिलं होतं. राजा फ्रान्सच्या मोहिमेवर असताना ती किती प्रभावीपणे राज्य चालवते हे एलिझाबेथच्या मनावर बिंबवलं गेलं.

कॅथरीन एक अत्यंत सक्षम राज्यप्रतिनिधी होती. आपल्या या सावत्र आईला अधिकारसत्ता वापरताना आणि बलाढ्य पुरुष मंत्र्यांकडून व दरबाऱ्यांकडून आदर स्वीकारताना एलिझाबेथ पहात होती. त्याचा खूप खोलवर प्रभाव तिच्या मनावर पडला असणार.

तसंच, एलिझाबेथनं स्वतःच्या कुटुंबातही लग्नाचा कोणताही आदर्श नमुना पाहिला नव्हता. विवाहबाह्य संंबंध ठेवल्याच्या आणि राजाविरोधात कट केल्याच्या आरोपाखाली तिच्या वडिलांनी तिच्या सख्ख्या आईला ऍन बोलिनला अटक केली होती.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Lindsey Mendick/ Courtesy English Heritage/ Jim Holden

फोटो कॅप्शन, एलिझाबेथ राणीनं केनिलवर्थ किल्ल्याला दिलेल्या भेटीच्या 450 व्या वर्धापन दिनानिमित्त लिंडसे मेंडिक या कलाकारानं 'विकेड गेम्स' या नावाची एक भव्य कलाकृती केनिलवर्थ किल्ल्यात उभारली आहे.

एलिझाबेथ फक्त 3 वर्षांची असताना तिच्या आईचा शिरच्छेद करण्यात आला होता.

केनिलवर्थ किल्ल्यात आत्ता उभारलेल्या मेंडिकच्या शिल्पांपैकी एका शिल्पात या शिरच्छेदाच्या घटनेचंही कल्पात्मक रुपांतरण येतं.

त्यात ऍन बोलिनला एका गुडघ्यावर बसलेल्या, प्रार्थना करणाऱ्या एका कोल्ह्याच्या स्वरूपात दाखवली आहे. तर तिचा शिरच्छेद करणारा एक क्रूर कुत्रा आहे.

एलिझाबेथ राणीला लैंगिक संबंधाची भीती वाटत असावी, असंही काही अभ्यासक म्हणतात.

उदाहरणार्थ, ॲलिसन वीअर यांनी त्यांच्या 'एलिझाबेथ द क्वीन' या पुस्तकात म्हटलंय की 'लैंगिक संबंध म्हणजे शेवटी मृत्यूशी जोडलेलं काहीतरी असं समीकरण राणीनं मनात तयार केलं असावं.'

टेलिग्राफ या वृत्तसंस्थेनं म्हटलंय की बीबीसीच्या 2005 च्या 'द व्हर्जिन क्वीन' या मालिकेत, 'लैंगिक संबंधांची भीती वाटणारी राणी' असं एलिझाबेथचं वर्णन केलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, 'एलिझाबेथ: द गोल्डन एज' (2007) या चित्रपटात केट ब्लॅन्चेट यांनी साकारलेली एलिझाबेथ. राज्यासाठी पूर्णपणे समर्पित असलेली राणी म्हणून तिने स्वतःला सादर केलं होतं.

या मालिकेचं लेखन करणाऱ्या पाउला मिल्न यांनी त्या वेळी टेलिग्राफला सांगितलं होतं, "वडिलांच्या हातून आईचा मृत्यू झाल्याचं पाहिलेल्या एका समकालीन स्त्रीवर लिहायला सांगितलं गेलं असेल तर त्या घटनेचे मानसिक परिणाम तिच्यावर काय झाले असतील हे उलगडून दाखवण्याची अपेक्षाच माझ्याकडून ठेवली गेली असणार."

पण खरं म्हणजे एलिझाबेथला देखण्या पुरूषांसोबत रहायला आवडत असे. अनेकदा ती त्यांच्यासोबत थोडी खोडकरपणेही वागत. पण गरोदरपणाची आणि बाळंतपणाची भीती वाटावी अशी अनेक कारणं तिच्याकडे होती.

त्या काळात मूल जन्माला घालणं अतिशय जोखमीचं होतं. हेनरीची तिसरी पत्नी जेन सेम्युर बाळंतपणातच वारली.

कॅथरीन पार हिचाही बाळंतपणानंतर काही दिवसांनी आजारी पडून मृत्यू झाला. जिला योर्कची एलिझाबेथ म्हणून ओळखलं जातं ती एलिझाबेथची आजी हिचाही मृत्यू अशाच पद्धतीनं झाला होता.

एलिझाबेथचं वर्णन कसं केलं आहे?

लग्न न करण्यामागे वैयक्तिक कारणांसोबतच राजकीय गोष्टीही होत्या. परकीय प्रभावापासून देश सुरक्षित ठेवणं ही देखील एलिझाबेथच्या निर्णयामागची एक महत्त्वाची बाब असू शकते.

तसंच, एलिझाबेथच्या विवाहाची शक्यता कायम ठेवणं हे राजकीय डावपेचाचं एक प्रभावी हत्यार होतं.

फ्रान्स, स्पेन आणि इतर राष्ट्रांशी बोलणी करताना, 'राणी अजून अविवाहित आहे' ही गोष्ट तिला वाटाघाटीत वापरता येत होती.

दरम्यान, जर एलिझाबेथनं एखाद्या ब्रिटिश सरदाराशीच लग्न केलं असतं तर इतर अनेक सरदारांच्या अभिमानाला ठेच बसली असती. राजकीय असंतोष आणि स्पर्धा निर्माण झाली असती. त्यामुळे तिनं सगळ्यांना नेहमी वाट बघायला लावली.

आज ज्याला आपण जनसंपर्क (पीआर) म्हणतो त्याचं ज्ञान राणीला उपजतच होतं. कामात गढून गेलेली म्हणून स्वतःला कसं सादर करायचं हे तिला माहीत होतं.

ती अधिकारपदावर येताच तिनं स्वतःची प्रतिमा 'एक व्हर्जिन क्वीन (कुमारिका राणी) अशी सादर केली.

एका लग्नाच्या प्रस्तावाला उत्तर देताना 1559 मध्ये तिनं जाहीर केलं, "इतकी वर्ष सत्ता चालवणारी एक राणी कोणाशीही लग्न न करता वारली असं भविष्यात संगमरवरी दगडावर कोरलं जाईल."

शेखर कपूर यांच्या एलिझाबेथ राणीवर 1998 मध्ये काढलेल्या चित्रपटाला भरपूर पसंती मिळाली. त्यात एलिझाबेथ राणीची भूमिका केट ब्लॅन्चेट हिनं साकारली होती.

2007 मध्ये या चित्रपटाचा पुढचा भाग "एलिझाबेथ: द गोल्डन एज" आला. त्यातंही ब्लॅन्चेट यांनी पुन्हा एलिझाबेथची भूमिका साकारली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, सत्तेच्या सुरुवातीपासूनच एलिझाबेथ ने 'व्हर्जिन क्वीन' म्हणून स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केली.

या चित्रपटात दाखवल्याप्रमाणं एलिझाबेथ मुद्दाम स्वतःची प्रतिमा 'व्हर्जिन क्वीन' म्हणून सादर करते.

संपूर्ण पांढऱ्या पोशाखात, तेजस्वी स्वरूपात, ती आपल्या भल्या मोठ्या दरबारासमोर उभी राहते आणि जाहीर करते, "मी विवाह केला आहे… इंग्लंडशी."

कपूर यांच्या चित्रपटात अनेक ऐतिहासिक संदर्भ गाळले आहेत. पण हा डायलॉग मात्र राणीनं खरोखरच म्हटला होता.

1559 मध्ये बोलताना इंग्लंड देशाला तिनं नवरा मानलं असल्याचं आणि त्यामुळे आता पुन्हा लग्न करू शकणार नसल्याचं एलिझाबेथ राणी म्हणाली होती.

तिच्या बहिणीला ब्लडी मेरी म्हणूनही ओळखलं जातं. तिनंही सुरूवातीला असेच दावे केले होते. पण नंतर स्पेनचा राजा दुसरा फिलिप्स याच्याशी तिनं लग्न केलं.

एलिझाबेथनं लग्न न करण्याचा घेतलेला निर्णय हा तिच्या लोकप्रिय सांस्कृतिक चित्रणांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला आहे.

लैंगिक संबंध आणि मृत्यू यांच्यातील संबंध तर बीबीसीच्या 1971 साली प्रदर्शित झालेल्या, एलिझाबेथ आर या अनेक एमी पुरस्कार विजेत्या मालिकेत लावण्यात आला होता.

ग्लेंडा जॅक्सन यांनी साकारलेली एलिझाबेथ, मालिकेच्या अगदी पहिल्याच भागात म्हणते,

"मी आठ वर्षांची होते तेव्हा एकदा राणी कॅथरीन हॉवर्ड, (आठव्या हेनरीची राजाची पाचवी पत्नी) महालाच्या दालनांमधून ओरडत, रडत धावत राजाची क्षमा मागत होती. त्या दिवसापासून मी कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकलेली नाही."

"तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक पुरुषानं तिला फसवलं. अशा नात्यात पहिल्यांदा येतो विश्वास, मग येतं आसक्तीचं वेड आणि शेवटी येतो मृत्यू."

'ब्लॅकॅडर' या गाजलेल्या विनोदी मालिकेच्या दुसऱ्या पर्वात मिरांडा रिचर्डसन यांनी साकारलेली एलिझाबेथ ही गमतीशीर रूपात दाखवली आहे.

पहिल्याच भागात ती उपरोधानं म्हणते, "सगळ्यांचं लग्न होतंय, फक्त माझंच होत नाही!"

पण पुढे मालिकेत ती लग्नाचं वचन देऊन ब्लॅकॅडरकडून तिला हवं ते करून घेते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, (इ.स. 1588 चं) 'द आर्माडा पोर्ट्रेट. सत्तेच्या शिखरावर असलेली ट्यूडर घराण्यातील शेवटची राणी म्हणून एलिझाबेथचं वर्णन या चित्रात येतं.

खऱ्या एलिझाबेथनही ड्युडलीला त्यांच्यात काही होऊ शकतं अशी आशा दिली होती का? केलिनवर्थ किल्ल्यातली त्यांच्या त्या भेटीचं त्यांच्या नात्यात नेमकं काय महत्त्व होतं?

"तिच्या नकारानं त्याला अपमानास्पद वाटलं असेल असं मला वाटत नाही," ॲश्बी म्हणतात.

"या भव्य सोहळ्याचं अधिकृत वर्णन लवकरच प्रसिद्ध व्हावं, अशी त्याची इच्छा होती. त्यातच त्याला आनंद वाटत होता. पुढे केनिलवर्थ किल्ला 1575 मध्ये होता तसाच ठेवावा असं त्यानं आपल्या मृत्युपत्रात त्यानं स्पष्ट लिहून ठेवलं होतं." ते पुढे सांगतात.

पण 1575 नंतरही तो एकटा राहिला नाही.

पुढे 1578 मध्ये ड्युडलीचा विवाह लेटिस केनॉल्स हिच्याशी झाला तेव्हा एलिझाबेथ फार रागवली होती. पण नंतर तिनं त्याला माफ केलं.

1588 मध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा एलिझाबेथ राणीनं स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं.

ती इतके दिवस खोलीत बंद राहिली की शेवटी प्रमुख सल्लागाराला दारं जबरदस्तीनं उघडण्याची आज्ञा द्यावी लागली.

1603 मध्ये एलिझाबेथचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या पलंगाच्या शेजारी असलेल्या एका कपाटात ड्युडलीनं लिहिलेलं एक पत्र सापडलं. त्यावर राणीनं लिहिलं होतं, "त्याचं शेवटचं पत्र."

लिंडसे मेंडिक यांचं "विकेड गेम्स" हे शिल्पप्रदर्शन युकेमधल्या वॉरविकशायरमध्ये केनिलवर्थ किल्ल्याच्या भव्य दरबारमहालात 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाहायला मिळेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.