सिनेमात यश पण आयुष्यात एकाकीपण, 39 व्या वर्षी जग सोडणाऱ्या गुरू दत्त यांची शोकांतिका

    • Author, यासीर उस्मान
    • Role, चित्रपट लेखक

आयुष्य अगम्य असतं. काहीजण यशाचं शिखर गाठतात, एखाद्या क्षेत्राला दिशा देतात, मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य दिशाहिनच राहतं. ख्यातनाम दिग्दर्शक आणि अभिनेते गुरु दत्त हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

अतिशय नितांत सुंदर, अप्रतिम आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या आशयसंपन्न चित्रपटांनी गुरु दत्त यांनी प्रेक्षकांना, चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्षात मात्र शोकांतिकाच आली.

या प्रतिभासंपन्न कलाकाराचं 1964 मध्ये निधन झालं, त्यावेळेस ते फक्त 39 वर्षांचे होते. मात्र एवढ्या अल्पशा आयुष्यातही त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनातून, अभिनयातून जो वारसा चित्रपटसृष्टीत मागे सोडला आहे, तो अनेक दशकांनंतरही कायम आहे.

गुरु दत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 ला कर्नाटकात झाला होता. याच आठवड्यात या महान कलाकाराची जन्मशताब्दी आहे. त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले, लोकप्रिय झाले.

मात्र कॅमेऱ्यामागचे गुरु दुत्त, एक माणूस, त्यांच्या आयुष्यातील भावनिक उलथापालथ आणि मानसिक आरोग्यासंदर्भातील संघर्ष याबद्दल बराचसा तपशील अजूनही लोकांसमोर यायचा आहे.

(सूचना: या लेखातील माहिती वाचकांना अस्वस्थ करू शकते.)

गुरु दत्त यांनी 'प्यासा' आणि 'कागज के फूल' यासारखे अप्रतिम, अजरामर हिंदी चित्रपट दिले. चित्रपटाचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये आजही या कालातीत कलाकृतींचा संदर्भ देत शिकवलं जातं.

या महान फिल्ममेकरनं स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपट निर्मितीची एक खोलवर वैयक्तिक,अंतर्मुख करणारी शैली निर्माण केली. ती त्या काळासाठी नवीन होती.

गुरु दत्त यांच्या चित्रपपटांमधील गुंतागुंतीच्या पात्रांमध्ये अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचं प्रतिबिंब उमटत होतं. त्यांच्या चित्रपटांच्या कथानकांनी समाजातील विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीच्या लोकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुद्द्यांना स्पर्श केला.

दु:खाची छटा असणाऱ्या किंवा शोकांतिका असणाऱ्या चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांना अस्वस्थ करणारं वास्तव सादर केलं.

गरीबीतील बालपण आणि बंगालचा आयुष्यावरील प्रभाव

गुरु दत्त यांचं बालपण साधारण परिस्थितीच गेलं. त्यांचं बालपण आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक अशांततेनं भरलेलं होतं. कामासाठी त्यांचं कुटुंब बंगालमध्ये स्थायिक झालं. तिथे गेल्यावर गुरु दत्त बंगालच्या संस्कृतीनं प्रेरित झाले.

तिथल्या वातावरणाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांच्या पुढील आयुष्यात चित्रपटांविषयीचा त्यांचा जो दृष्टीकोन निर्माण झाला, त्याची जडणघडण बंगालमध्येच झाली होती.

गुरु दत्त यांचं आडनाव पदुकोण होतं. मात्र 1940 च्या दशकात मुंबईतील (तेव्हाचं बॉम्बे) चित्रपट उद्योगात प्रवेश केल्यानंतर त्यांनी हे आडनाव सोडलं.

चित्रपटसृष्टीतील सुरुवात त्यांनी दिग्दर्शक म्हणून नाही, तर नृत्यदिग्दर्शक म्हणून केली होती. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणूनही काम केलं होतं.

1940 च्या दशकात भारताचा स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. त्यामुळे देशातील अशांतता आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणात वाढली होती. साहजिकच त्याचा परिणाम चित्रपट दिग्दर्शक होण्याची आकांक्षा असणाऱ्या गुरु दत्त यांच्या भविष्यावर झाला.

याच काळात त्यांनी 'कश्मकश' ही कथा लिहिली. हे कथानक कलात्मक निराशा आणि सामजिक भ्रमनिरासावर आधारलेलं होतं. याच कल्पनांनी नंतरच्या काळात गुरु दत्त यांच्या 'प्यासा' या अजरामर आणि मास्टरपीस म्हणून नावाजलेल्या चित्रपटाला आकार दिला.

देव आनंद यांच्या मैत्रीतून मिळाली पहिली संधी

गुरु दत्त यांची देव आनंद यांच्याशी चांगली मैत्री होती. देव आनंद देखील तेव्हा चित्रपटसृष्टीत करियर करण्यासाठी धडपड करत होते. लवकर अभिनेता म्हणून देव आनंद प्रसिद्ध झाले.

देव आनंद यांच्याबरोबरच्या मैत्रीमुळेच 1951 मध्ये गुरु दत्त यांना चित्रपटात दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली. तो चित्रपट होता 'बाजी'. या क्राईम ड्रामा असलेल्या चित्रपटानं गुरु दत्त यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं.

लवकरच गुरु दत्त प्रसिद्ध गायिका गीता रॉय यांच्या प्रेमात पडले. अनेकांच्या मते, करियरच्या सुरुवातीच्या काळातील ही काही वर्षे गुरु दत्त यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस होते.

पुढे गुरु दत्त यांनी स्वत:ची चित्रपट कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांनी 'आर-पार' आणि 'मिस्टर अँड मिसेस 55' हे लागोपाठ दोन हिट चित्रपट दिले. त्यात रोमॅंटिक कॉमेडी होती. दोन्ही चित्रपटातील मुख्य भूमिका त्यांनीच साकारली होती.

मात्र गुरु दत्त एवढ्यानं समाधानी होणारे नव्हते. तसंच त्यांना फक्त हिट चित्रपट देण्यात रस नव्हता. त्यांना खोलवर कलात्मक मांडणी करण्याची तळमळ होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मास्टरपीस' - प्यासा

यातून त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली. तो चित्रपट होता 'प्यासा'. या चित्रपटानं गुरु दत्त यांना एक नवी उंची आणि ओळख दिली.

प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या, वास्तवाची मांडणी करणाऱ्या या चित्रपटानं भौतिक जगातील कलाकाराचा संघर्ष दाखवला. मनाला चटका लावून जाणाऱ्या या कथेनं, चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं.

काही दशकांनी, जगप्रसिद्ध टाइम मासिकानं 20 व्या शतकातील 100 महान चित्रपटांची यादी प्रकाशित केली. त्या यादीत स्थान मिळवणारा 'प्यासा' हा एकमेव हिंदी चित्रपट ठरला.

मी जेव्हा गुरु दत्त यांचं चरित्र लिहिलं, तेव्हा त्यांची दिवंगत धाकटी बहीण ललिता लाजमी यांनी त्यावर माझ्यासोबत काम केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, प्यासा हा त्यांच्या भावाचा 'ड्रीम प्रोजेक्ट' होता. "तो चित्रपट परिपूर्ण असावा", त्यात कोणतीही कसूर राहू नये अशी गुरु दत्त यांची इच्छा होती.

दिग्दर्शक म्हणून गुरु दत्त यांची काम करण्याची वेगळीच शैली होती. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच ते चित्रपटाला आकार देत असत. ते चित्रीकरणाच्या काळातच पटकथेत आणि संवादांमध्ये अनेक बदल करत असत.

तसंच ते कॅमेराच्या तंत्रातदेखील अनेक प्रयोग करत असत. एकदा चित्रीकरण झालेल्या दृश्याचं पुन्हा चित्रीकरण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना जणू परिपूर्णतेचा ध्यास होता. मात्र प्यासा चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस त्यांची ही सवय चिंताजनक पातळीवर पोहोचली होती.

उदाहरणार्थ, आज अतिशय प्रसिद्ध असलेल्या चित्रपटातील क्लायमॅक्स किंवा शेवटच्या दृश्याचं चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी तब्बल 104 रीटेक घेतले होते.

चित्रिकरणाच्या वेळेस गोष्टी जेव्हा व्यवस्थित होत नसत, त्यांच्या मनासारख्या होत नसतं, तेव्हा ते ओरडायचे आणि रागवायचे.

आत्महत्येचा प्रयत्न

ललिता लाजमी म्हणाल्या, "त्यांना झोप लागत नसे. ते खूप दारू पिऊ लागले होते. परिस्थिती जेव्हा खूपच वाईट झाली, तेव्हा तर ते व्हिस्कीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून त्याचं सेवन करू लागले. प्यासा चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुरु दत्त यांनी त्यांची झोप, त्यांची स्वप्नं आणि त्यांच्या आठवणी - सर्वकाही पणाला लावलं होतं."

1956 मध्ये त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होत आला, तेव्हा गुरु दत्त यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस त्यांचं वय फक्त 31 वर्षांचं होतं.

"जेव्हा ती बातमी कळाली, तेव्हा आम्ही पाली हिलला (गुरु दत्त तिथे राहत होते) धाव घेतली. मला माहित होतं की ते भावनिक संघर्षात आहेत. ते अनेकदा फोन करून मला म्हणायचे की आपल्याला यावर बोलायचं आहे. मात्र तिथे पोहोचल्यावर ते यावर एक शब्दही बोलत नसत," असं त्या पुढे म्हणाल्या.

हॉस्पिटलमधून गुरु दत्त यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र त्यांच्या कुटुंबानं याबाबतीत कोणताही मानसोपचार किंवा मदत, मार्गदर्शन घेतलं नाही.

कारण त्याकाळी मानसिक आरोग्याच्या समस्यांना समाजात वाईट नजरेनं पाहिलं जायचं. तो एक 'सामाजिक कलंक' मानला जायचा. प्यासा चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुरु दत्त यांनी मोठ्या प्रमाणात पैसा ओतला होता.

लाजमी म्हणाल्या की गुरु दत्त यांच्या या मानसिक संघर्षामागची कारणं जाणून न घेता किंवा त्याला तोंड न देता, त्यांच्या कुटुंबानं तसंच पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

1957 साली 'प्यासा' प्रदर्शित झाला. प्यासाचं समीक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. तसंच व्यावसायिकदृष्ट्यादेखील चित्रपटानं मोठं यश मिळवलं. प्यासाच्या यशानं गुरु दत्त यांना मोठं स्टारडम, प्रचंड ख्याती मिळवून दिली.

यश कमावून देखील एकाकी असलेले गुरु दत्त

मात्र इतकं मोठं यश मिळून देखील, गुरु दत्त यांनी अनेकदा मानसिक रिक्तपणाची, एकाकीपणा जाणवत असल्याची भावना व्यक्त केली.

प्यासाचे मुख्य छायाचित्रकार होते, व्ही के मूर्ती. ते गुरु दत्त यांच्याबद्दल म्हणाले, "गुरुदत्त म्हणाले होते, मला दिग्दर्शक, अभिनेता व्हायचं होतं. उत्तम चित्रपट बनवायचे होते. मी ते सर्व साध्य केलं आहे. माझ्याकडे पैसा आहे, सर्वकाही आहे. मात्र तरीदेखील माझ्याकडे काहीच नाही."

गुरु दत्त यांच्या चित्रपटांमध्ये आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक विचित्र असा विरोधाभास देखील होता.

लाजमी सांगतात की, त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा, भक्कम, कणखर, स्वंतत्र महिला दाखवल्या जात. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांची अपेक्षा होती की त्यांच्या पत्नीनं पारंपारिक पत्नीच्या भूमिकेत जगावं. त्यांची इच्छा होती की त्यांच्या पत्नीनं फक्त त्यांच्या कंपनीनं निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्येच गाणी गावीत.

आपली चित्रपट कंपनी भरभराटीला आणण्यासाठी गुरु दत्त यांचा एक साधा नियम होता. तो म्हणजे प्रत्येक कलात्मक जुगारानंतर एक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेला चित्रपट आला पाहिजे.

'कागज के फूल'च्या अपयशाचा धक्का

मात्र प्यासाच्या यशानं उत्साहित होऊन, त्यांनी स्वत:च्याच याच नियमाकडं दुर्लक्ष केलं. प्यासासारख्या चित्रपटानंतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याऐवजी, गुरु दत्त यांनी त्यांचा सर्वाधिक महागडा, काही प्रमाणात स्वत:च्याच आयुष्यावर बेतलेला चित्रपट बनवण्यास घेतला. हा चित्रपट होता, 'कागज के फूल'.

या चित्रपटात एका चित्रपट निर्मात्याच्या दु:खी वैवाहिक जीवनाची आणि त्याला कलात्मक प्रेरणा देणाऱ्या महिलेबरोबरच्या गोंधळलेल्या नात्याची कहाणी आहे.

या चित्रपट निर्मात्याचा एकाकीपणा प्रचंड वाढतो आणि तो नातेसंबंधांशी जुळवून घेण्यात अपयशी ठरतो. त्यानंतर या चित्रपट निर्मात्याच्या मृत्यूनं चित्रपटाचा चटका लावणारा विचित्र शेवट होतो.

आज 'कागज के फूल' चित्रपटाची गणना क्लासिक किंवा महान चित्रपटांमध्ये केली जाते. मात्र त्यावेळेस हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला होता. चित्रपटाच्या अपयशानं गुरु दत्त यांना प्रचंड धक्का बसला आणि त्यातून ते कधीही सावरू शकले नाहीत.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गुरु दत्त यांच्या सह कलाकार वहिदा रहमान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "आयुष्यात दोनच तर गोष्टी असतात- यश आणि अपयश. त्याच्यामध्ये काहीही नसतं."

'कागज के फूल' हा गुरु दत्त यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही.

'चौदहवीं का चांद'मुळे जोरदार कमबॅक

मात्र कालांतरानं, या अपयशातून त्यांची चित्रपट कंपनी सावरली. एक चित्रपट निर्माता म्हणून गुरु दत्त यांनी जोरदार कमबॅक केलं. 'चौदहवीं का चांद' या त्यांच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. इतकं की तो त्यांच्या करियरमधील व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला.

मग त्यांचा 'साहिब बिबी और गुलाम' हा चित्रपट आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरु दत्त याचे विश्वासू पटकथा लेखक अबरार अलवी यांनी केलं होतं.

लाजमी म्हणतात की तोपर्यंत गुरु दत्त यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड उलथापालथ सुरू होती. त्यांचा मूड सतत बदलायचा.

'साहिब बीबी और गुलाम' हा गुरु दत्त यांचा आणखी एक अप्रतिम चित्रपट.

'साहिब बीबी और गुलाम' या चित्रपटात, एक श्रीमंत आणि सरंजामशाहीतील जुलमी जमीनदार, जो बदफैली असतो अशा माणसाशी लग्न झालेल्या, कोणतंही प्रेम नसलेल्या विवाह बंधनात अडकलेल्या एका एकाकी महिलेची कथा होती.

लेखक बिमल मित्रा यांना आठवतं की गुरु दत्त यांनी त्यांना त्यांच्या निद्रानाशाबद्दल आणि झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहण्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं होतं. तोपर्यंत त्यांचं वैवाहिक जीवन पूर्णपणे ढासळलं होतं आणि त्यांचं मानसिक आरोग्य अत्यंत बिघडलं होतं.

बिमल मित्रा सांगतात की गुरु दत्त यांच्या बरोबरच्या अनेक संभाषणांमध्ये ते सतत म्हणायचे की "मला वाटतं की मी वेडा होईन."

पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न...बहिणीची खंत

एका रात्री, गुरु दत्त यांनी पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते तीन दिवस बेशुद्ध होते.

लाजम म्हणतात की या घटनेनंतर, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, त्यांच्या कुटुंबियांनी गुरु दत्त यांच्यावर उपचार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांना बोलावलं. मात्र त्यांनी याचा कधीही पाठपुरावा केला नाही.

त्या खेदानं पुढे म्हणाल्या, "आम्ही पुन्हा मानसोपचारतज्ज्ञांना कधीही बोलावलं नाही."

अनेक वर्षे, लाजमी यांना वाटत होतं की त्यांचा भाऊ बोलत नाही मात्र त्याला यासाठी मदत हवी आहे. किंबहुना त्याला अशा एखाद्या अंधाऱ्या जगात अडकल्यासारखं वाटत असावं की जिथे त्याचं दु:ख, वेदना कोणालाही दिसत नव्हती. तो अंधार इतका तीव्र होता की त्याला स्वत:लाही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, काही दिवसांनी 'साहिब बीबी और गुलाम' या चित्रपटाचं चित्रीकरण अशाप्रकारे सुरू झालं की जणूकाही घडलंच नव्हतं.

मित्रा यांनी गुरु दत्त यांना या घटनेबद्दल विचारल्यावर गुरु दत्त म्हणाले होते, "अलीकडे, मला अनेकदा प्रश्न पडतो की ती कोणत्या प्रकारची अस्वस्थता होती. ती अशी कोणती अस्वस्थता होती की मला आत्महत्या करावीशी वाटली?"

"मी जेव्हा याबद्दल विचार करतो, तेव्हा मला भीती वाटते. मात्र त्यादिवशी, त्या झोपेच्या गोळ्या गिळताना माझ्या मनात कोणताही गोंधळ नव्हता."

'साहिब बीबी और गुलाम' हा चित्रपट हिट झाला. तो 1963 च्या बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी अधिकृतरित्या पाठवण्यात आलेल भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला.

आयुष्याची शोकांतिका...दुर्दैवी अखेर

एकीकडे व्यावसायिक यश, नावलौकिक मिळत असताना गुरु दत्त यांचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष मात्र वाढतच गेला. ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे झाले.

चित्रपटांमधून ते अभिनय करत राहिले, मात्र त्यांना प्रचंड एकाकीपणाला तोंड द्यावं लागलं. त्यातून सुटका करून घेण्यासाठी ते खूप मद्यपान करायचे आणि झोपेच्या गोळ्यांचा वापर करायचे.

10 ऑक्टोबर 1964 ला गुरु दत्त त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. त्यावेळेस त्यांचं वय 39 वर्षे होतं.

"मला माहित आहे की त्यांना नेहमीच मृत्यूची इच्छा होती, त्यांना तो हवा होता...आणि शेवटी तो त्यांना मिळाला," असं गुरु दत्त यांच्या सहकलाकार वहिदा रहमान यांनी 1967 च्या जर्नल ऑफ फिल्म इंडस्ट्रीमध्ये लिहिलं आहे.

'प्यासा' या चित्रपटातील नायकाप्रमाणे, गुरु दत्त यांना खरा नावलौकिक त्यांच्या मृत्यूनंतरच मिळाला.

चित्रपट रसिकांना, चाहत्यांना अनेकदा प्रश्न पडतो की जर गुरु दत्त यांना अधिक आयुष्य मिळालं असतं तर काय झालं असतं. कदाचित ते त्यांच्या दूरदर्शी, कलात्मक कामानं भारतीय चित्रपट क्षेत्राला आकार देत राहिले असते.

यासर उस्मान हे गुरु दत्त यांच्या 'गुरु दत्त: ॲन अनफिनिश्ड स्टोरी' या चरित्राचे लेखक आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)