You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजकमल स्टुडिओ : व्ही. शांताराम यांनी जेव्हा राज कपूर, देव आनंदच्याही आधी बनवलेला सर्वांत महागडा सिनेमा
- Author, यासिर उस्मान
- Role, चित्रपट इतिहासकार
हिंदी सिनेमाच्या सुरूवातीच्या काळात स्टुडिओवर पश्चिमेकडची छाप दिसत असे.
त्याकाळी बॉम्बे टॉकिजवर जर्मन चित्रपटांचा मोठा प्रभाव होता. आर. के. स्टुडिओमध्ये चार्ली चॅपलिनची झलक दिसायची आणि गुरू दत्त, देव आनंद यांच्या सुरूवातीच्या चित्रपटांतून हॉलिवुडच्या थ्रिलर्सचं वेड झळकायचं.
पण या सगळ्यात भारतीय संस्कृती, साहित्य आणि संगीताच्या पायावर उभारलेला एकच स्टुडिओ होता... व्ही. शांताराम यांचा राजकमल कलामंदिर.
राजकमल स्टुडिओतले चित्रपट, त्यातली पात्र आणि 'आधा है चंद्रमा रात आधी', 'पंख होते तो उड आती' आणि 'ऐ मालिक तेरे बंदे हम' अशी गाणी... शास्त्रीय संगीताशी आणि भारतीयपणाशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली होती.
आई-वडिलांच्या नावावरून ठेवलं स्टुडिओचं नाव
भारतीय साहित्यातील पौराणिक कथा, इतिहास आणि समाजावर बनलेल्या चित्रपटांची प्रेरणा व्ही. शांताराम यांना भारताच्या पहिल्या संघटित स्टुडिओमधून, प्रभात फिल्म कंपनी मधूनच मिळाली होती.
तिथे ते स्टुडिओचे सर्जनशील प्रमुख (क्रिएटिव्ह हेड) आणि दिग्दर्शक म्हणून काम करत होते.
1942 मध्ये व्ही. शांताराम यांनी पुण्यातील प्रभात स्टुडिओ सोडला आणि ते मुंबईला आले. परळ भागातलं वाडिया मुव्ही टाऊन त्यांनी विकत घेतलं. त्यालाच राजकमल कलामंदिर असं नाव दिलं.
त्यांच्या वडिलांचं नाव राजाराम आणि आईचं कमला. या दोघांच्या नावावरून तयार झाला 'राजकमल स्टुडिओ'.
राजकमल कलामंदिरातल्या चित्रपटांचं वेगळेपण काय?
शांताराम यांच्या चित्रपटांचं एक वैशिष्ट्य असं की त्यावर मराठी वातावरण, संस्कृती आणि नाटकांची छाप असायची.
तेव्हाच्या मुंबईत चित्रपटांवर पारसी नाटकांचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. पण शांताराम यांनी तो उचलला नाही. त्यांच्या चित्रपटांमध्ये मराठी रंगभूमीचा एक अगदी वेगळा बाज दिसत असे.
मनोरंजन हे चित्रपटाचं एकमेव उद्दिष्ट असत नाही. तर समाजातल्या संघर्षाकडेही चित्रपटानं लक्ष्य केंद्रीत करायला हवं, असं शांताराम यांना वाटायचं.
याच भावनेतून राजकमल कलामंदिरातले चित्रपट बनवले जात. प्रभात स्टुडिओची पार्श्वभूमी त्यांच्यासोबत होती. त्याच धर्तीवर राजकमलमध्येही गंभीर, मध्यमवर्गीय संस्कृतीला जपणारे आणि शिस्तीचे नियम प्रस्थापित करण्यात आले होते.
दुसऱ्या स्टुडिओंपेक्षा वेगळा असलेला राजकमल संपूर्णपणे आत्मनिर्भर होता. शुटिंगच्या उपकरणांसोबतच स्टुडिओकडे स्वतःची ब्लँक अँड व्हाईट लॅबोरेटरी, स्टिल्स डिपार्टमेंट आणि पोस्टर डिपार्टमेंटही होतं.
शिवाय, दादरमध्ये त्यांचं स्वतःचं प्लाझा सिनेमा हे सिनेमागृह आणि सिल्व्हर स्क्रीन एक्सचेंज नावाची वितरण कंपनीही होती.
त्यावेळी राज कपूर यांच्यासह अनेक चित्रपट निर्मात्यांनी स्टुडिओतून बाहेर जाऊन आऊटडोर शुटिंगचा ट्रेंड सुरू केला होता. तो आजही सुरू आहे.
पण राजकमल स्टुडिओचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं चित्रीकरण स्टुडिओच्या आतच होत असे.
सुरूवातीच्या चित्रपटांना मिळालं यश
त्याकाळच्या मराठी नाटकांत लोकप्रिय होणारे विषय आणि कथा शांताराम हे प्रभात कंपनीत असल्यापासूनच निवडत होते.
राजकमल स्टुडिओचा पहिला चित्रपट महाकवी कालिदासाच्या 'शांकुतल' नाटकावर आधारित होता. तो चित्रपट हीटही झाला.
1943 साली प्रदर्शित झालेला 'शकुंतला' चित्रपट स्वस्तिक थिएटरमध्ये दोन आठवड्यांपेक्षाही जास्त दिवस चालला. या यशामुळे व्ही. शांताराम यांना नवीन भारतीय कहाण्या जगासमोर आणण्याची हिंमत मिळाली.
पुढचा सिनेमा 'पर्बत पे अपना डेरा' हाही सिल्वर ज्युबिली झाला. त्यानंतर शांताराम यांनी एका सत्य कथेवर एक मोठा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या महायुद्धावेळी भारतातले डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांना चीनवर जपानने केलेल्या आक्रमणाविरोधात लढणाऱ्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी पाठवलं गेलं होतं.
त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिलं होतं. त्या कथेवर राजकमल स्टुडिओचा पुढचा चित्रपट बनला - 'डॉ. कोटनीस की अमर कहानी'.
चित्रपटातली प्रमुख भुमिका शांताराम यांनी स्वतः केली होती. 1946 ला देशातल्या स्वातंत्र्य आंदोलनाने जोर धरल्यामुळे या चित्रपटाला फार यश मिळालं. या सिनेमामुळेच राजकमल स्टुडिओ खऱ्या अर्थाने प्रस्थापित झाला.
हा सिनेमा 'द जर्नी ऑफ डॉ. कोटनीस' या नावानं अमेरिकेतही प्रदर्शित झाला. व्हेनिस फिल्म फेस्टिवलपर्यंत त्याचा डंका वाजवला गेला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढची आठ वर्ष राजकमल स्टुडिओनं सामाजिक चित्रपट बनवले.
'जीवन यात्रा' हा 1947 चा चित्रपट म्हणजे राष्ट्रीय एकतेची कथा होती. तर 1949 च्या 'अपना देश' या चित्रपटाने भ्रष्टाचार आणि काळाबाजार या मुद्द्यांना हात घातला. पुढच्या वर्षी म्हणजे 1950 ला आलेला 'दहेज' हा सिनेमा हुंडा प्रथेविरोधातली कथा होती.
सिनेमातून शांताराम तेव्हाच्या भारतीय समाजाची गोष्ट सांगत होते. विधवा विवाहापासून ते जातीअंताच्या मुद्द्यापर्यंत अनेक प्रश्न त्यांनी हाताळले.
राजकमलचा संगीतमय कमबॅक
1950 नंतर मनोरंजक आणि हिट गाणी, संगीत असणाऱ्या नव्या जमान्यातल्या व्यावसायिक सिनेमांसमोर व्ही. शांताराम यांचे सिनेमे मागे पडू लागले. 'परछाई', 'सुरंग', 'सुबह का तारा' आणि 'तीन बत्ती चार रास्ता' असे सामाजिक सिनेमे फ्लॉप झाले.
प्रेक्षकांना आता राज कपूर, महबूब खान यांचे भव्य व्यावसायिक चित्रपट आणि दिलीप कुमार, देव आनंद यांच्यासारखे स्टाइलिश अभिनेत्यांचे चित्रपट भावत होते.
या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी व्ही. शांताराम यांनी सामाजिक विषयांपासून फारकत घेऊन एक हटके संगीत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.
दोन डान्सर्सची ही कथा भारतीय शास्त्रीय संगीताच्या आणि नृत्यकलेच्या पार्श्वभूमीवर रचली होती. चित्रपटाचं नाव होतं 'झनक झनक पायल बाजे'.
टेक्निकलरमध्ये बनवलेला हा चित्रपट राजकमल स्टुडिओचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिमेमा होता.
1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं यशाचं नवं शिखर गाठलं. राज कपूरच्या 'श्री 420' आणि दिलीप कुमारच्या 'आजाद' नंतरचा हा त्या वर्षातला तिसरा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही त्याला मिळाला.
आता राजकमल स्टुडिओ आणि व्ही शांताराम यांचा पुढचा सिनेमाही 'झनक झनक पायल बाजे' सारखा रंगीबेरंगी, रोमँटिक संगीत चित्रपट असेल असं संपूर्ण चित्रपट क्षेत्रातला वाटत होतं.
पण पुढच्या सिनेमानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
राजकमल स्टुडियोचा कालजयी सिनेमा
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्याजवळच्या एका जेलमध्ये एक वेगळा प्रयोग सुरू झ्लयाची माहिती व्ही शांताराम यांना मिळाली. कैद्यांना सुधारण्यासाठी एका मोठ्या, मोकळ्या जेलमध्ये ठेवायचं असं त्याचं स्वरूप होतं.
अपराध्यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांची मानसिकता बदलायची आणि समाजात सामिल करून घ्यायचं ही कल्पना शांताराम यांना आवडली.
पण यावर रंगीत नाही तर ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा चित्रपट होता 'दो आखें बारह हाथ'.
एका जेलरची ती गोष्ट होती. जेलरचं कामही व्ही. शांताराम यांनीच केलं होतं. सहा धोकादायक गुन्हेगारांना हा जेलर पेरोलवर बाहेर काढतो.
त्यानंतर त्यांना एका ओसाड ठिकाणी आणलं जातं. पुढे मेहनतीनं ते गुन्हेगार त्या नापीक जमिनीतून पीक घेतात.
1957 हे भारतीय चित्रपट क्षेत्रातलं सर्वात महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. या वर्षीच 'दो आखें बारह हाथ'सोबत 'मदर इंडिया' आणि 'प्यासा' हे सिनेमे प्रदर्शित झाले होते.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. शिवाय त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला
चित्रपटाला बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये सिल्वर मेडलही मिळालं. भरत व्यास यांनी लिहिलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे अजरामर गाणं अनेक शाळांत प्रार्थना गीत म्हणून म्हटलं जाऊ लागलं.
बदलाचे रंग ओळखणारा स्टुडिओ
1950 च्या दशकाच्या शेवटाला सामाजिक चित्रपटांची आवड कमी झाली. आणि चित्रपट निर्माते सुंदर, रोमँटिक आणि रंगीत सिनेमांकडे वळू लागले. राजकमल हा बदल ओळखणारा पहिला स्टुडिओ होता.
गुरूदत्त यांचा व्यावसायिक रोमँटिक चित्रपट 'चौदहवीं का चांद' 1962 मध्ये आला.
राज कपूर यांचा बिग बजेट चित्रपट 'संगम' 1964 मध्ये आणि देव आनंद यांचा महत्त्वकांक्षी 'गाइड' 1965 मध्ये आला. पण यात सगळ्यात पहिले व्ही शांताराम यांनी त्यांचा सगळ्यात महागडा रंगीत चित्रपट 1959 मध्येच बनवला होता.
'नवरंग' हा सिनेमा मराठी कवी प्रभाकर यांच्या जीवनावर आधारीत होता. त्यात एक कवी त्याच्या जमुना या पत्नीची एक गायिका आणि नर्तकी या स्वरूपात कल्पना करत असतो.
तो आपल्या कल्पनेत मोहिनीला पाहत असे. ती त्याची प्रेरणा बनत असते. या गैरसमजामुळे जमुना तिच्या नवऱ्याला सोडते पण शेवटी दोघांमध्ये पुन्हा समेट होते.
या चित्रपटात शास्त्रीय संगीतावर आधारीत 12 गाणी होती. त्यात 'आधा है चंद्रमा रात आधी' आणि 'जा रे हट नटखट' या अजरामर गाण्यांचाही समावेश होता.
गाण्यांच्या चित्रीकरणाबाबत अनेक नवीन प्रयोगही केले गेले. पण चित्रपट मराठी वातावरणाभोवतीच फिरत होता.
'नवरंग' हा राजकमल स्टुडिओचा सगळ्यात ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. पण तसं यश स्टुडिओला दुसऱ्या कोणत्याही सिनेमाला मिळवून देता आलं नाही.
स्टुडिओची पडझड
सिनेमा उद्योगात बदलाचे वारे जोरदार वाहू लागले. नवे चेहरे आणि निर्माते उद्योगात आले. शांताराम यांचं स्त्री, गीत गाया पत्थरों ने आणि बूंद जो बन गयी मोती हे चित्रपट पहिल्यासारखी जादू दाखवू शकले नाहीत.
1970 च्या दशकात राजकमल स्टुडिओने फक्त दोनच सिनेमे बनवले. पहिली 1971 ला बनवलेला 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली.' त्यातली गाणी 'झनक झनक पायल बाजे' या चित्रपटाची आठवण करून देणारी होती.
दुसराही 1971 लाच आलेला मराठी चित्रपट पिंजरा. त्याची खूप चर्चा झाली. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
पण नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की चित्रपट कंपनी म्हणून राजकमल स्टुडिओचा सोनेरी काळ सरला आहे.
1972 ते 1986 पर्यंत राजकमल स्टुडिओने कोणत्याची चित्रपटाची निर्मिती केली नाही. त्यानंतर स्टुडिओ दुसऱ्या निर्मात्यांना शुटिंगसाठी भाड्याने दिला जाऊ लागला.
सत्यजीत रे, ऋषिकेश मुखर्जी आणि मनमोहन देसाई अशा दिग्दर्शकांचा मुंबईमधला हा आवडता स्टुडिओ बनला होता.
यश चोपडा यांनीही दीवार, मशाल, डर आणि दिल तो पागल अशा अनेक सिनेमांचं शुटिंग या स्टुडिओत केलं होतं.
1986 मध्ये 85 वर्षांचे व्ही शांताराम त्यांच्या नातवाला, सुशांतला लॉन्च करण्यासाठी पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीत आले. सिनेमाचं नाव होतं झांझर.
पण नव्या जमान्यातली चित्रपट निर्मिती आणि तंत्रज्ञान जुन्या अंदाजाच्या या सिनेमापासून फार पुढे नेघून गेली होती.
झांझर अतिशय वाईट पद्धतीनं फ्लॉप झाला. व्ही शांताराम यांची 70 वर्षांची कारकिर्द या चित्रपटासोबत संपली.
अण्णासाहेबांचं योगदान
स्वतंत्र भारतात व्ही. शांताराम सिनेमा क्षेत्राचे मजबूत स्तंभ म्हणून ओळखले जाऊ लागले.
ते अण्णा साहेब या नावानं प्रसिद्ध होते. त्यांची ख्याती फक्त हिंदी चित्रपटांपुर्तीच नाही तर देशातल्या वेगवेगळ्या चित्रपट क्षेत्रांत होती.
अनेकदा मुंबई चित्रपट उद्योग क्षेत्रात मतभेद झाल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी वडीलधाऱ्यांना बोलावतात तसं त्यांना बोलावलं जाईल.
ते चित्रपट उद्योगातल्या वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष होते. 1960 ते 1970 या काळात ते सेन्सर बोर्डाचेही सदस्य होते.
1985 मध्ये त्यांना चित्रपटातला सर्वोच्च सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
30 ऑक्टोबर 1990 ला व्ही शांताराम यांचं निधन झालं. राजकमल स्टुडिओ मुंबईच्या परळ भागात आजही आहे. पण आता तिथं चित्रपटांची रेलचेल नाही.
स्टुडिओच्या प्रवेशद्वारातून अंदर गेल्यानंतर व्ही. शांताराम यांचा एक मोठा फोटो दिसतो. त्यांचं अद्वितीय योगदान आणि स्टुडिओमध्ये जन्मलेल्या शेकडो सिनेमांची साक्ष तो फोटो देत राहतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)