19 वर्षांपूर्वी झाली होती जुळ्या बहिणींची ताटातूट, टिकटॉकमुळे पुन्हा भेटल्या

    • Author, फाय नर्स आणि वूडी मॉरिस
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

70 च्या दशकात प्रदर्शित झालेला 'सीता और गीता' हा जुळ्या बहिणींचा चित्रपट त्याकाळी तुफान चालला होता. आजही हा बऱ्याच जणांचा आवडता चित्रपट आहे. खऱ्या आयुष्यातही असं काही घडू शकतं असा विचार तुम्ही कधीच केला नसेल ना? पण जॉर्जियात अशीच एक घटना घडलीय.

ॲमी आणि ॲनो दिसायला अगदी सेम टू सेम. पण जन्मानंतर लगेचच ताटातूट झाली. पण तब्बल 19 वर्षांनंतर एका व्हायरल व्हिडीओमुळे त्या पुन्हा एकमेकींना भेटल्या.

2005 पूर्वी जॉर्जियातील रुग्णालयातून नवजात मुलांचं अपहरण केलं जायचं. अशी हजारो मुलं अपहरण करून वेगवेगळ्या कुटुंबांना विकली जायची. या दोघीही त्यांच्यापैकीच एक होत्या. पण आज त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.

जर्मनीतील लाइपझिग येथील एका हॉटेलमध्ये बसलेली ॲमी खूप घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली, "मला या आठवड्यात अजिबात झोप आलेली नाही. आमच्यासोबत नक्की काय घडलं होतं हे कळण्याची ही शेवटची संधी आहे."

तिचीच जुळी बहीण ॲनो बाजूला बसून तिच्या फोनवर टिक टॉक व्हिडिओ पाहत होती. आपल्या डोळ्यांनी इशारा करत ती म्हणाली "याच बाईने आपल्याला विकलं असावं."

हा त्यांच्या प्रवासाचा अंतिम टप्पा होता. आपलं सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी जॉर्जिया ते जर्मनी असा प्रवास केला होता. यावेळी त्या दोघीही त्यांच्या जन्मदात्या आईला भेटणार होत्या.

आपल्या सोबत नेमकं काय घडलं होतं याचा शोध त्या मागील दोन वर्षापासून घेत होत्या. जेव्हा सत्य समोर येऊ लागलं तेव्हा त्यांना अशा हजारो मुलांची माहिती मिळाली ज्यांचं जॉर्जियातून अपहरण करण्यात आलं होतं.

या मुलांचं नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी बराच तपास करण्यात आला असला तरी यात कोणीही जबाबदार आढळून आलेलं नाही.

जुळ्या बहिणी

ॲमी आणि ॲनो यांची पुन्हा भेट कशी झाली? तर ॲमी 12 वर्षांची असताना तिने तिच्या बहिणीला 'जॉर्जियाज गॉट टॅलेंट' या टेलिव्हिजन शो मध्ये पाहिलं होतं.

स्टेजवर दिसलेली मुलगी हुबेहूब ॲमीसारखी दिसत होती. पण ती केवळ रंग रूपाने ॲमीसारखी होती असं नाही तर तिच्या चेहऱ्यावरील इंचन इंच ॲमीसारखा होता.

त्यावेळी ॲमीच्या बऱ्याच नातेवाईकांनी तिच्या आईला फोन करून विचारलं की, "ॲमीने नाव बदलून शो मध्ये सहभाग घेतलाय का?"

पण ही एखादी हुबेहूब दिसणारी मुलगी असेल असं म्हणत तिने विषय सोडून दिला.

त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये म्हणजेच बरोबर सात वर्षानंतर ॲमीने टिक टॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

ॲमीच्या घरापासून 320 किमी दूर असलेल्या तिबिलिसीमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय ॲनोने हा व्हिडिओ पाहिला. खरं तर हा व्हिडिओ तिला तिच्या मित्राने पाठवला होता. कारण त्या व्हिडिओत दिसणारी मुलगी हुबेहूब ॲनोसारखी दिसत होती.

त्यानंतर ॲनोने या मुलीची माहिती गोळा करायला सुरुवात केली. तिने इंटरनेटवर खूप शोधलं पण तिला काहीच माहिती मिळाली नाही.

त्यानंतर तिने कोणीतरी मदत करावी या उद्देशाने तिच्या युनिव्हर्सिटी व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर केला.

तिकडे ॲमीच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला आणि तिला घडलेला प्रकार सांगितला.

यावर ॲमीलाही काही वर्षांपूर्वी 'जॉर्जियाज गॉट टॅलेंट' या टेलिव्हिजन शो मध्ये पाहिलेली मुलगी आठवली. नंतर दोघींनीही एकमेकींना मॅसेज केला.

आणि कोडं सुटलं

त्यानंतर त्या दोघींनाही जाणवलं की त्यांच्यात बरंच साम्य आहे. पण काही गोष्टींचा उलगडा होत नव्हता.

पश्चिम जॉर्जियातील कटस्की रुग्णालयात या दोघींचा जन्म झाला होता. आज हे रुग्णालय बंद पडलंय. त्यांच्या जन्माचा दाखला पाहिला तर त्यावरील जन्म तारखांमध्ये बऱ्याच आठवड्यांचं अंतर दिसून आलं.

या कागदपत्रांनुसार त्या बहिणी किंवा जुळ्या बहिणी असण्याची शक्यताच मावळली. पण त्यांच्यात साम्य होतं हे मात्र नक्की.

दोघींची आवडही अगदीच सारखी होती. केसांची ठेवण, गाणं, नृत्य यात साम्य होतच पण त्या दोघींनाही एकच आनुवंशिक आजार होता, तो म्हणजे डिसप्लेसिया.

हे कोडं उलगडण्यासाठी त्या आता अनेक गोष्टींचा शोध घेऊ लागल्या.

ॲनो सांगते, "जेव्हा आम्ही एकमेकींना भेटलो तेव्हा तोच चेहरा, तोच आवाज ऐकून मी थक्क झाले. मला मिठी मारायला आवडत नाही, पण मी ॲमीला मिठी मारली."

आता दोघींनीही आपापल्या कुटुंबियांशी या प्रकरणाबाबत मोकळेपणाने बोलायचं ठरवलं. यावेळी मात्र त्यांना त्यांचं रहस्य समजलं. 2002 मध्ये वेगवेगळ्या आठवड्यात त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं.

हे ऐकून ॲमीच्या शरीरातील त्राणच नाहीसं झाला. ती सांगते, "ही गोष्ट थोडी विचित्र वाटत असली तरी खरी आहे."

स्वतःबद्दलच सत्य ऐकून ॲनो तिच्या कुबीयांवर नाराज झाली. ती म्हणाली, "या कठीण संभाषणांचा शेवट व्हावा अशी माझी इच्छा आहे."

त्यांनी आता खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केली. यावेळी त्यांना त्यांच्या अधिकृत जन्म दाखल्यावर नमूद केलेली तारीख खोटी असल्याचं समजलं.

ॲमीच्या आईला (सांभाळणारी आई) मुलं होत नव्हतं. त्यावेळी जवळच्याच एका रुग्णालयात अनाथ मूल असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने तिला दिली.

त्यांनी डॉक्टरांना पैसे देऊन ते मूल दत्तक घेतलं. ॲनोच्या बाबतीतही तेच घडलं होतं.

पण आपण दत्तक घेतलेल्या मुलीला दुसरी एक जुळी बहीण आहे याविषयी ही दोन्ही कुटुंब अनभिज्ञ होती. या मुलींना दत्तक घेण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम मोजावी लागली होती.

आपल्या पालकांनी आपल्याला पैशासाठी विकलं हे ऐकून दोन्ही बहिणींना मोठा धक्का बसला.

आणि हेच खरं कारण होतं का? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या जन्मदात्या आईचा शोध घ्यायचा असं ठरवलं. पण ॲनोला त्याबद्दल खात्री नव्हती.

तिने ॲमीला विचारलं की, "ज्या व्यक्तीने आपल्याला फसवलं त्या व्यक्तीला तुला का भेटायचं आहे?"

ॲमीने जॉर्जिया मधील एका फेसबुक ग्रुपवर त्या दोघींच्या जन्माची कहाणी शेअर केली. आणि अपहरण झाल्याचा संशय असलेल्या आणि बेकायदेशीरपणे विकल्या गेलेल्या मुलांना त्यांच्या कुबीयांना भेटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अशातच एका जर्मन तरुणीने ॲमीशी संपर्क साधला आणि तिला सांगितलं की, तिच्या आईने 2002 मध्ये कॅटस्की मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला होता. पण त्या बाळांचा मृत्यू झाल्याचं तिला सांगण्यात आलं.

या मुलीची अनुवांशिक चाचणी केली असता त्यांना खात्री पटली की, ही आपली धाकटी बहीण आहे. ही तरुणी तिच्या आईसोबत जर्मनी मध्ये राहत होती. ॲमी आपल्या आईला भेटण्यासाठी उत्सुक होत्या.

पण ॲनोने ॲमीला सल्ला देताना म्हटलं की, "जर तिनेच आपल्याला विकलं असेल तर ती आपल्याला याबाबत खरं सांगणार नाही."

ॲमीशी सहमती नसताना देखील ॲनो तिच्यासोबत जर्मनीला गेली.

वर्षानुवर्ष सुरू असलेली मुलांची तस्करी

या फेसबुक ग्रुप मध्ये 23,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. शिवाय त्यांच्या डीएनए डेटासाठी वेबसाइट्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

2021 मध्ये पत्रकार तमुना मुसेराइड्सने हा ग्रुप सुरू केला होता. ती स्वतः दत्तक मूल असून स्वत:चं कुटुंब शोधण्यासाठी तिने हा ग्रुप सुरू केला. आणि यातूनच जॉर्जियामध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लहान मुलांच्या तस्करी करणाऱ्या लोकांचा पर्दाफाश झाला.

ती सांगते, "या गुन्ह्याचे प्रमाण कल्पनेपलीकडे आहे. आत्तापर्यंत 10,000 हून अधिक मुलांची तस्करी झाली आहे. शिवाय यातली काही मुलं अमेरिका, कॅनडा, सायप्रस, रशिया आणि युक्रेनमधील कुटुंबांना विकण्यात आली आहेत."

2005 मध्ये, जॉर्जियाने त्यांच्या दत्तक कायद्यात सुधारणा केली. 2006 मध्ये तस्करीविरोधी कायदेही कडक करण्यात आले. त्यामुळे मुलांना दत्तक घेणं आणखीन कठीण झालं.

मुलांच्या शवपेटीत झाडाच्या फांद्या

इरिना ओटाराश्विली या आपल्या जुळ्या मुलांचा शोध घेत आहेत. 1978 मध्ये, त्यांनी काकेशस पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या क्वारेली येथील प्रसूती रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म दिला होता.

तिथल्या डॉक्टरांनी त्यांची मुलं निरोगी असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांच्या जन्मानंतर तीन दिवसांनी त्यांचा अचानक मृत्यू झाला.

या मुलांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी इरिना यांना सांगितलं.

इरिना आणि त्यांच्या पतीला हे प्रकरण बनावटी असल्याचं समजलं होतं. पण त्याकाळात विशेषत: सोव्हिएत काळात कोणताही व्यक्ती अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकत नव्हता. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं भाग होतं.

ज्यावेळी मुलांच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं, त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या पतीला मुलांना पाहण्यास मनाई करण्यात आली. कारण ती मुलं अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं.

इरिनाने डॉक्टरांच्या होकारात होकार मिळवला. मात्र 44 वर्षांनंतर इरिनाची मुलगी निनो यांनी तमुनाचा फेसबुक ग्रुप पाहिला आणि तिला शंका आली. त्यामुळे त्यांनी बागेत पुरलेली शवपेटी काढण्याचा निर्णय घेतला.

इरिना सांगत होत्या, "माझं हृदय वेगाने धडधडत होतं. पेटी उघडली मात्र त्यात मुलांच्या अस्थी किंवा मानवी सांगाडा नव्हता. त्यात झाडाच्या फांद्या ठेवल्या होत्या. हा प्रकार पाहून मला हसावं की रडावं हेच समजत नव्हतं."

जन्मदात्या आईची भेट

ॲमी आणि ॲनो त्यांच्या आईची वाट बघत लाइपझिगमधील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या.

त्यांची आई त्यांना भेटायला आली. मुलींनी संकोचून खोलीचा दरवाजा उघडला. त्यांच्या आईने, आसाने त्यांना पाहिलं आणि दोघींना घट्ट मिठी मारली.

वातावरणात थोडा वेळ शांतता पसरली होती. तिघींमध्येही संमिश्र भावना दाटून आल्या होत्या.

ॲमीच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. पण ॲनो मात्र चिडली होती, त्रासली होती.

तिघींनीही बोलायला सुरुवात केली. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की बाळंतपणानंतर तिची तब्येत बिघडली आणि ती कोमात गेली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तेथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळ जन्मताच मरण पावल्याची माहिती दिली.

त्यांची आई आसा सांगते की, मुलींना भेटून त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त झाला आहे.

जॉर्जियन सरकारने 2022 मध्ये मुलांच्या तस्करीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

परंतु अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांनी 40 हून अधिक लोकांशी संपर्क केला. ही प्रकरणं फार जुनी असल्याने त्याबद्दलची माहिती मिळवणं अशक्य आहे.

पत्रकार तमुना म्युसेराइड्स म्हणतात की, त्यांनी त्यांच्या जवळ असलेली माहिती सरकार दरबारी जमा केली आहे. पण सरकार ही माहिती कधी प्रसिद्ध करेल याबाबत सांगता येत नाही. या प्रकरणात पुढे काय झालं हे जाणून घेण्याचा त्यांनी चार वेळा प्रयत्न केला.

त्यात 2003 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय बालक तस्करीचा तपास होता ज्यामुळे अनेकांना अटक झाली. पण ही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

2015 मध्ये रुस्तावी मॅटर्निटी हॉस्पिटलचे संचालक अलेक्झांड्रे परावकोवी यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं. पण ते निर्दोष सुटल्याच्या बातम्या जॉर्जियन माध्यमांनी दिल्या होत्या.

अशा प्रकरणांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसीने जॉर्जियन गृह मंत्रालयाशी संपर्क साधला. परंतु माहिती संरक्षण कायद्यानुसार विशिष्ट तपशील प्रसिद्ध करता येणार नाहीत असं उत्तर त्यांनी दिलं.

तमुना सध्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील लिया मुगाशवरिया यांच्यासोबत पीडितांचे खटले उभे करण्यात व्यस्त आहेत. त्यांना त्यांच्या जन्माच्या दाखल्यांवर बदल करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्या लढत आहेत. मात्र जॉर्जियन सरकार यासाठी परवानगी देत नाही.

ॲनो सांगते, "मला नेहमी असं वाटायचं की मी कोणाला तरी गमावलं आहे. कोणीतरी चौकशी करण्यासाठी माझ्या मागे येत आहे. पण ॲमी भेटल्यानंतर माझ्या मनातील ती भावना नाहीशी झालीय."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)