अजित पवार बंड : काँग्रेस की राष्ट्रवादी, विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन, काल (2 जुलै 2023) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

2022 साली शिंदे-फडणवीस सरकार येण्यापूर्वी ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील पक्ष विरोधीपक्षात बसले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले होते.

आता त्यांनी स्वतःच सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यावर एक नवा पेच निर्माण झाला आहे. आधीच अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहे याबाबत स्पष्ट कल्पना नाही. मात्र त्यांच्यासह काल 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यात त्यांच्या पक्षाचे छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ नेते आहेत.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे खासदारही आहेत. त्यामुळे अजित पवारांबरोबर अनेक आमदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काल शपथ घेताना अजित पवार यांच्याबरोबर 35 आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता त्यांची संख्या वाढेल अशी माहिती प्रसिद्ध होत आहे.

काल मंत्रिपदाची शपथ घेणारे अनिल पाटील यांनी 45-47 आमदार त्यांच्याबरोबर आहेत असं सांगितलं.

“राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी हे पाऊल आम्ही उचललं आहे. आमच्यासोबत आज 35 आमदार होते. बाकी आमदार फोनवर संपर्कात आहेत. 45-47 आमदार सोबत असतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे,” असं बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

राष्ट्रवादीचा दावा आणि जितेंद्र आव्हाड

असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात फूट पडल्याचा शब्दोच्चार केलेला नाही. किंबहुना या कालच्या घटनेला कोणतंही लेबल लावलेलं नाही.

“मला खात्री आहे की, ज्या सदस्यांना आज शपथविधीसाठी बोलावलं, त्यांच्या कशावर सह्या घेतल्या हे आम्हाला माहीत नाही. जे चेहरे आज दिसत होते, त्यांतील बहुतांश जणांनी आमचा गोंधळ झाल्याचं शरद पवार यांना सांगितलं. मला काही जणांचे फोन आले. शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर हा गोंधळ दूर झाला आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

5 जुलैला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

यानंतर जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या विधानसभेतील प्रतोदपदी आणि विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आलं.

जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशीरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात आपली निवड झाल्याचं सांगणारं पत्र देऊन त्याची खात्री करवून घेतली.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी आपली विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात दिलं असलं, तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

आज 3 जुलै रोजी त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारले असता त्यांनी “असे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यात काय आहे हे वाचून अभ्यासांती निर्णय घेऊ. विरोधीपक्षनेत्याच्या नेमणुकीला मान्यता देणं हे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षेत येतं” असं उत्तर दिलं.

काँग्रेसची हालचाल सुरू

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा मोठा परिणाम महाविकास आघाडीवर होणार हे निश्चितच. कालपासूनच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये विरोधीपक्षनेत्याबाबतीत चलबिचल सुरू झाली होती.

आज त्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीच स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीमधला सर्वात मोठा पक्ष हा कॉंग्रेस आहे त्यामुळे विरोधीपक्ष नेता कॉंग्रेसचाच होणार.’

थोरात यांनी इतक्या स्पष्टपणे मत व्यक्त केल्यामुळे काँग्रेस याबाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं दिसून येतं.

विजय वडेट्टीवार यांनीही जर काँग्रेसचे संख्याबळ जास्त असेल तर काँग्रेसला विरोधीपक्षेनेते पद आणि राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त असेल तर त्यांना ते पद मिळेल असं सांगितलं.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तर कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यामुळे काँग्रेसच्या जागा 1 ने वाढून ती आता 45 झाली आहे.

महाविकास आघाडीत घटकदल असलेल्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या मात्र त्यातले 40 आमदार भाजपाबरोबर स्थापन झालेल्या सरकारमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचे विधानसभेत फक्त 16 सदस्य उरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. त्यातील 1 पंढरपूरची जागा भाजपाने पोटनिवडणुकीत जिंकल्यामुळे त्यांच्याकडे 53 आमदार उरले होते. त्यातील अजित पवारांचे समर्थक जसा दावा करतात त्याप्रमाणे 30 ते 47 आमदार सरकारमध्ये निघून गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस अगदीच कमी संख्येचा पक्ष राहिल.

विरोधीपक्षनेतेपदासाठी किती संख्येची गरज?

विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी संबंधित पक्षाला सभागृहातील सध्याच्या संख्येच्या 10 टक्के सदस्य निवडून येणे गरज आहे. ही अट पूर्ण करणारे अनेक पक्ष असतील तर त्यातील सर्वात जास्त संख्येच्या पक्षाला ही संधी मिळते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतके सदस्य सरकारमध्ये गेले तर काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष उरतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण फक्त मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 जणांबद्दल पत्र विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेते पदाबाबत काँग्रेसशी कोणताही तंटा होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभा अध्यक्षांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती केल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

पण जयंत पाटील म्हणतात त्याप्रमाणे 53 आमदारांतील 9 आमदार वजा केले तर 44 आमदार उरतात ही संख्याही काँग्रेसच्या 45 संख्येपेक्षा 1 ने कमी आहे. त्यामुळे ही चालून आलेली आयती संधी काँग्रेसचे नेते सोडतील असं वाटत नाही.

2019 साली चौथ्या क्रमाकांवर असलेला पक्ष या घडामोडीमुळे विधानसभेत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे तसेच 2.5 वर्षे मंत्रिमंडळात सहभाग मिळाल्यावर या पक्षाला आता एका वर्षाच्या अंतराने विरोधी पक्षनेतेपदही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)