जयंत पाटील- '... तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं हाच पर्याय असेल'

- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी सभांना सुरुवात झाली आहे. संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सभेनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं नेतृत्व करणार असल्याचं चित्र आहे.
दुस-या बाजूला ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटातील एका गरोदर महिला पदाधिका-याला मारहाण केल्यावरून राजकारण तापलं आहे. या आणि इतर राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारमध्ये काही स्थान नाही कारण तसं असेल तर ठाण्याचे पोलीस अधिकारी ते बदलू शकतील, अशी थेट टीका जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केली.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन आहे का?
जयंत पाटील- देवेंद्र फडणवीस यांचं गृहखात्यावर नियंत्रण आहे की नाही, ठाणे जिल्हा आणि ठाणे शहरात त्यांचं कोणी ऐकतं का?
त्यांनी 24 तासात ठाण्यातले पोलीस अधिकारी बदलून दाखवावेत. मग आम्ही म्हणू की त्यांना सरकारमध्ये काही म्हणणं आहे.
ठाण्याची एकही नेमणूक देवेंद्र फडणवीस यांना सांगून झालेली नाही. एकनाथ शिंदे कोणाचंही ठाण्यात ऐकत नाही. त्यामुळे पोलीस मनमानी करत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी दबाव वापरला जातोय. सकाळी 10 वाजता बोलावलेला कर्मचारी रात्री 11-12 वाजता सोडणं असा छळ सुरू आहे. एक पोलीस कर्मचारी वैभव कदम त्याने तर आत्महत्या केली. त्याची मानसिकता काय झाली होती. जितेंद्र आव्हाड असो वा रोशनी शिंदे असो या घटना राजकीय आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यात लोकांना धमकावणे, दहशत करणे सुरू आहे. यामुळे ठाण्यातलं वातावरण म्हणावं तसं नाहीय.
ठाणे जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांचं काही चालत नाही. सगळे अधिकारी त्यांनी बदलून दाखवावेत त्यांनी मग आम्ही म्हणू की त्यांना काही से आहे. त्यांना काही से नाही. तिथले अधिकारी फक्त मुख्यमंत्र्यांचं ऐकतात
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत का?

फोटो स्रोत, GANESH WASALWAR
जयंत पाटील - उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्या पद्धतीने पाडण्यात आलं. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. किती जाहिरात करणारं सरकार असलं तरी मराठी मनावर जी जखम झालीय ती लोक विसरू शकणार नाही.
मविआमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. आमच्या सभांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. सत्तारुढ पक्षाच्या मनात धडकी भरली आहे यात काही शंका नाही.
विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार. जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याचा निर्माण स्थानिक पातळीवर घेणार.
काही ठिकाणी मागे पुढे होईल. कार्यकर्ते क्लॅश होण्याची शक्यता आहे.
अडीच वर्ष आम्ही सरकार चालवलं. नाराजी कुठेही नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र येतोय.
जागावाटपाचं गणित ठरवलेलं नाही. मुख्यमंत्री कसा ठरवायचा हा आजचा प्रश्न नाहीय. उद्धव ठाकरे यांना तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री मान्यच केलं होतं. त्यांनाच घेऊन आम्ही आता लोकांच्या समोर जातोय. उद्धव ठाकरे यांनी आमचं नेतृत्त्व केलंय.
आमच्या वाट्याला येणा-या मतदार संघ बांधणं हे कुठल्याही पक्षाला हवं असतं. उद्धव ठाकरेंचं समर्थन वाढत आहे.
आघाडीतला आम्ही एक भाग आहोत. भाजपला विरोध करणा-यांना संघटित करण्याचं काम करत आहोत. आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत नाही.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का?
जयंत पाटील - सर्वोच्च न्यायालयात जजमेंट येण्याची शक्यता आहे. सहा सात केसेस आहेत. पहिले 16 आमदार अपात्र ठरवण्याबाबत केस सुरू आहे. यात एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. हे आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल.
सरकार गडगडलं तर निवडणुका घेणं आणि तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणं हा पर्याय असू शकतं.

पहाटेच्या शपथविधीची कल्पना तुम्हाला होती का?
जयंत पाटील - मला याची कल्पना नव्हती. शरद पवार यांनाही याची कल्पना नव्हती. जे झालं त्यानंतर आता बराच काळ उलटून गेलाय. ही जुनी गोष्ट झाली.
राज्यात मोर्चे का निघतायत?
जयंत पाटील - देशात आणि राज्यात भाजपचं सरकार असूनही हिंदूंना मोर्चे काढावे लागत आहेत. सरकारमध्ये असलेले लोकच प्रवृत्त करत असतील तर ही चिंतेची बाब आहे. हिंदू संकटात आहे असं हे बोलत असतील तर मग सत्तेत बसून हे काय करतात? आमचं सरकार असताना हे कधी झालं नाही.
निवडणुकीवर डोळा ठेऊन हे केलं जातंय का? याची सगळ्यांना कल्पना आहे.
संभाजी नगरमध्ये दंगल कोणी घडवली?

जयंत पाटील - आमची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हीच मागणी आहे. त्यांनी कोणी केलं, सीसीटीव्ही कॅमे-यातील मुलं कोण दंगा करत होती, वेगवेगळ्या मोहल्ल्यात कोण गेलं, प्रार्थनास्थळी कोण गेलं सगळं सीसीटीव्हीत आहे.
एवढा गोंधळ होऊन पोलीस काही तास आले नाहीत. याचा अर्थ काय? पळत येणारे पोलीस या घटनेत आले नाहीत.
देवेंद्र फडणवीस यांनी यात दखल घ्यावी, कोणत्याही पक्षाची व्यक्ती असली तरी कारवाई करावी. मला खात्री आहे की असं करताना त्यांचाच पक्ष कदाचित अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पोलीस ज्यांच्या हातात आहेत त्यांनी आरोप करण्यापेक्षा आरोपींना पकडावं.
राज्यातली परिस्थिती का बिघडत चालली आहे?
जयंत पाटील - आमचं सरकार खाली खेचल्यानंतर भाजपची प्रतिमा खालावली आहे. ते ज्यांच्यासोबत गेले त्यामुळे त्या सगळ्यांची प्रतिमा भाजपच्या प्रतिमेला तडा देणारी ठरली. त्यामुळे आज निवडणुका घेतल्या तर भाजप 60-65 आमदारांच्या पुढे जाऊ शकणार नाही अशी माझी माहिती आहे. यामुळे सरकार पुन्हा आणण्यासाठी शक्ती कार्यरत आहेत.
ही परिस्थिती चिघळत जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ सुरू आहे का? कारण सुप्रिया सुळे, अजित पवार आणि तुमचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले होते.
जयंत पाटील - पहाटे 3-4 वाजता ही पोस्टर्स लावली. आम्ही तिघांनीही चर्चा केली की काही लोक आमच्यात वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
यासंदर्भात ब-यापैकी अंदाज आहे की हे कोणी केलं. या पोस्टरबाजीमुळे आमच्यात भांडणं होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली आहे. आमच्यात समज-गैरसमज होणार नाहीत. आमचा पक्ष फोडण्याचे सर्व प्रयत्न चालू आहेत.
महत्त्वाकांक्षेवर न बोललेलं बरं असतं. कारण यावरच मग आठ दिवस चर्चा होत राहणार. मी या प्रश्नाला उत्तर देणं योग्य समजत नाही. मी उत्तर देत नाही.
सध्या आम्हाला कोणालाही नवीन वाद करायचे नाहीत. संख्येला महत्त्व असतं. संख्येसाठी आम्ही सगळ्यांनी काम करत आहोत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








