महाराष्ट्रातून सारस पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर?

सारस पक्षी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौरभ कटकुरवार
    • Role, बीबीसी मराठीसाठी

जगातील हवेत उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या सारस पक्ष्याचा महाराष्ट्रातील अधिवास हा धोक्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्व टोकास असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तीस तर भंडारा जिल्ह्यात दोन सारस पक्षी उरलेले आहेत.

व्याघ्र संवर्धन व वनउपज उत्पनावर लक्ष केंद्रित असलेल्या वनविभागाचे सारस पक्षाकडे दुर्लक्ष होण्याची ओरड नेहमीच होते. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने suo moto दखल घेत सरकारला जाब विचारला. यानंतर विविध सरकारी यंत्रणा कामाला लागल्या.

आता सारस पक्षी आणि त्यांचा अधिवास वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झालेले आहेत. पण सारस पक्षी वाचविण्यात प्रमुख भूमिका राहिली आहे ती येथील गावकऱ्यांची जे काही वर्षांपासून कुठल्याही शासकीय मदतीशिवाय सारस पक्षी संवर्धनासाठी काम करत आलेले आहेत.

वेळेत योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाही तर सारस महाराष्ट्रातून नामशेष होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

स्थलांतरण न करणारे (non-migratory) सारस पक्षी भारतीय उपखंड, दक्षिण पुर्व आशिया तसेच ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. त्यांचे वास्तव्य पाणथळ जागा, दलदलीचा प्रदेश, कालवे, शेतं, उथळ पाणी असलेल्या नद्या व तलाव येथे असतं.

त्यांची सरासरी उंची 152-156 सेंटिमीटर व पंखांचा विस्तार हा 240 सेंटिमीटरपर्यंत असतो. त्यामुळे ते घनदाट जंगलात राहत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. विपुल खाद्य उपलब्ध असल्याने उत्तर प्रदेश भागांमध्ये एका सारस पक्ष्याची वा जोडप्याची territory ही अर्ध्या हेक्टर पेक्षा कमी असते.

राजस्थानसारख्या भागात ती 2-3 हेक्टर्स असते. जवळपास 50-60 टक्के सारस हे जोडीने राहतात व पिलांना एकत्र वाढवतात. एकटे असणारे सारस मात्र घोळक्याने राहतात.

अधिवास का धोक्यात येतोय?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सारस पक्षी आढळायचे. पण हळूहळू तेथून ते नाहीसे झाले. पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या नवेगांव बांध येथे शेवटचा सारस पक्षी हा 2012मध्ये बघितला गेल्याची माहिती आहे. पाणथळ जागांना झालेले नुकसान, रासायनिक खते व कीटकनाशक यांचा अमर्यादित वापर आणि भातशेती लागवडीमध्ये झालेली घट ही सारस पक्षी कमी होण्याची प्रमुख कारणं असल्याचे पक्षीतज्ज्ञ के ऐस गोपी सुंदर सांगतात.

गोपी सुंदर यांनी सारस पक्ष्यांवर जागतिक पातळीवर अभ्यास केलेला आहे आणी ते IUCN Stork, Ibis and Spoonbill Specialist Group चे co-chair आहेत.

“सारस पक्षी हा जंगल आणि गावं यांच्या सीमेवर राहतो. भातशेती, दलदलीचा प्रदेश, आणि उथळ पाण्यातील खेकडे, बेडकं हे त्याचं खाद्य आहे. पण सध्या खूप शेतकरी भातशेतींकडून सोयाबीनसारख्या दुसऱ्या पीकांकडे वळले आहेत. या कारणामुळे सारस पक्ष्यांची संख्या कमी होत आहे,” असं ते म्हणाले.

“गोंदिया भागात खूप तलाव असल्याने सारस पक्षी बऱ्यापैकी आढळतात. पण peripheral (सीमावर्ती) पक्षी असल्याने व त्यांच्या अधिवासात झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांना भयंकर धोका आहे.”

सारस पक्षी

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रातील गोंदिया व शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सारस पक्षांचा अधिवास आहे. हा भाग 'सारस लँडस्केप' म्हणून ओळखला जातो.

गोंदिया मध्ये जवळपास 30 तर बालाघाटमध्ये 45 सारस पक्षी उरलेले आहेत. गोंदियात 2004-05 मध्ये सारस पक्षांची संख्या 4-5 या चिंताजनक पातळीस पोहचली होती.

गोंदियातील Sustaining Environment and Wildlife Assemblage (सेवा) या निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने सारस पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी पुढे सरसावली आणि त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले.

सेवा संस्थेचे सावन बाहेकर सांगतात की, वन विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील वेगवेगळया गावांमध्ये सारस संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच अधिवास व सारस पक्षांची घरटी वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या चमू तयार करण्यात आले.

“सारस पक्षांची शिकार तशी सहसा होत नाही. पण त्यांची अंडी चोरीला जायच्या घटना होतात. त्यामुळे आमच्यासाठी महत्वाचं होतं की सारस पक्षांची घरटी सुरक्षित राहिली पाहिजे. महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील गावकऱ्यांच्या मदतीमुळे हे शक्य झालं. ही लोकं सारस अधिवास, त्यांची घरटी व चोरट्यांकडे लक्ष ठेवून असतात,” बाहेकर सांगतात.

घरट्यांची जागा ही फार संवेदनशील असते. तिथे थोडासा गोंधळ जाणवला तर सारस पक्षी प्रजनन करत नाही. “सारस सुरवातीपासून वन्यजीव प्रेमी व छायाचित्रकार यांचेसाठी आवडीचा विषय राहिला आहे. पण न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सारस संवर्धन चर्चेत आला. त्यामुळे हौशी, सरकारी अधिकारी व त्यांचे नातेवाईक यांची सारस बघण्यासाठी गर्दी वाढत आहे. जे सारस पक्ष्यांना विचलित करू शकतात,” बाहेकर म्हणाले.

2020 मध्ये गोंदिया जिल्ह्यात सारस गणनेमध्ये 7 घरटी आढळली होती. ज्यांची संख्या 2021 मध्ये 6, तर 2022 मध्ये फक्त 3 झाली. हे चांगले संकेत नाही.

गावकरी- सारस संबंध

गोंदिया शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेले घाटटेमनी गाव सारस संवर्धनासाठी फार महत्वाचे ठरलेले आहेत. या गावातील लोक पिढ्यानपिढ्या सारस पक्षी त्यांच्या शेतात, गावाजवळील पाणथळ जागांमध्ये बघत आलेले आहे.

जेव्हा त्यांना सारस पक्षी त्यांच्या भागातुन विलुप्त होण्याच्या संकटाबाबत कळले तेव्हा त्यांनी सारस पक्षांना वाचविण्याचा विडा उचलला.

येथील नागरिक डॉ कैलास हेमने सांगतात की, 2004 मध्ये शाळेत शिकत असतांना गावातील लोकांनी शिकाऱ्याकडून सारस पक्ष्यांची दोन पिलं विकत घेऊन त्यांचे संगोपन केले होते.

“दोघेही अशक्त होते. दुर्दैवाने त्यातले एक पिल्लू लगेच दगावले. पण दुसरे पिल्लू व्यवस्थित वाढले व अनेक वर्षे जगले. त्याच्यासाठी आम्ही शेतात पिंजरा बांधला होता. त्याला गावातले लोक मासे टाकायचे. यामुळे गावातील लोक आपसूकच सारस संवर्धनामध्ये सामील झाले.”

सारस

फोटो स्रोत, Saurabh Karkutwar/BBC

44 वर्षीय किशोर देशमुख ह्यांच्या शेतात सध्या एका सारस पक्ष्याच्या जोडप्याचे दिवसा वास्तव्य असते.

“गावातील लोक सारसचा संबंध रामायणाशी जोडतात. पूर्वीही सारस शेतात असायचे व निर्भयपणे वावरायचे. पण आता आम्हीच थोडी काळजी घेतो. त्यांच्याजवळ जात नाही,”

देशमुख म्हणाले, “सारस वाचले पाहिजे आणि आमच्या गावात राहिले पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळे गावातील लोकांनी सेवा संस्थेने व वन विभागाने सांगितलेले सर्व उपाय केले.”

येथील लोक लग्न पत्रिकेत सारस पक्ष्यांचे फोटो छापतात व तसेच दरवर्षी ‘सारस व्हॉलीबॉल टूर्नामेंट’ घाटटेमनीमध्ये भरवली जाते, ज्यामध्ये सभोवतातील महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील टीम्स भाग घेतात, असे गावातील बबलू चुटे म्हणाले.

“मागील वर्षी सारस जोडप्यातील एकाचा विद्युत स्पर्शाने मृत्यू झालं. आमचं पूर्ण गाव हळहळलं. शोकसभा घेऊन विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व गोष्टी स्पष्ट करतात की सरकारी यंत्रणा सोबत असो व नसो आम्ही आमच्या भागातील सारस पक्ष्यांचे संवर्धन करत राहू,” चुटे सांगतात.

शासकीय यंत्रणेंकडून होणार्‍या उपाययोजना

शेतातील सारस पक्ष्यांच्या जोडीचं निरीक्षण करणारे ग्रामस्थ

फोटो स्रोत, Saurabh Karkutwar/BBC

फोटो कॅप्शन, शेतातील सारस पक्ष्यांच्या जोडीचं निरीक्षण करणारे ग्रामस्थ

गोंदिया वन विभागाचे उपसंरक्षक कुलराज सिंह म्हणाले सारस पक्षाच्या अधिवासास असणारे धोके कमी करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे.

“वन विभागाने अधिवास जपण्याचा तसेच त्यामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये विशेष जोर अधिवासास असणारे धोके टाळण्यावर दिला गेला. ज्यांच्या शेतात सारस पक्षी येतात त्यानं आर्थिक अनुदान देण्यात आलं. आम्ही सारस संवर्धन प्लान बनवलेला आहे ज्यात विविध उपाय योजना आखलेल्या आहेत,” ते म्हणाले.

'न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन सारस पक्ष्यांचा अधिवास वाचविण्यासाठी होणार्‍या कामांसाठी निधी पुरवित आहे. कृषी विभागसुद्धा शेतकऱ्यांना रासायनिक खते व कीटकनाशके न वापरण्याबाबत जनजागृती करत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सगळी यंत्रणा कामाला लागली,' बाहेकर सांगतात.

गावकरी, ग्रामपंचायत आणि उत्साह

परसवाडा हे असेच एक गाव आहे जेथे लोकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जुना मालगुजारी तलावाचे पक्षी संवर्धनासाठी रक्षण केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी लोकभागीदारीतून तलावाची डागडुजी करणे, उपद्रवी तृण काढणे अशी कामं केली.

स्थानिक रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल भावे सांगतात, की गावाने सारस पक्षी वाचविण्यासाठी Biodiversity Management Committee स्थापन केलेली आहे.

“या कमिटीमध्ये गावातील लोकं आहेत. ज्यामध्ये नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत. आम्ही सेवा संस्था, वन विभाग यांच्या मदतीने आक्रमक प्रजातींचे गवत व झुडपे हटवली. तलावामधोमध दोन बेटं निर्माण केली. सारस आणी अनेक पक्षींचा इथे आता अधिवास आहे,” भावे सांगतात.

परसवाडा ग्रामपंचायतीतले ग्रामस्थ

फोटो स्रोत, Saurabh Karkutwar/BBC

फोटो कॅप्शन, परसवाडा ग्रामपंचायतीतले ग्रामस्थ

कसे वाचवले सारस पक्षी?

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शासकीय यंत्रणा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे म्हणून उपाय योजना करत आहेत.

“गंमत म्हणजे या तलावाशेजारी आधीच एक लोखंडाचा वॉच टॉवर आहे. पण वन विभागाने त्याच्या शेजारी अजून काँक्रिटचा एक टॉवर बांधत आहे. कशाला तर न्यायालयाला सांगायला की आम्ही उपाय योजना करतोय.

या काँक्रिटच्या टॉवरने फायदा काय माहीत नाही पण त्याच्या बांधकामाने तलावाला आणि पक्ष्यांच्या अधिवासाला आधीच नुकसान पोहचवले आहे,” स्थानिक रहिवासी रतीराम क्षीरसागर सांगतात.

व्यवसायाने विमा एजेंट असलेले क्षीरसागर म्हणतात वन विभागाने उपाय योजना करताना स्थानिक लोकांना आणि तज्ज्ञांना विश्वासात घ्यावे.

महाराष्ट्र- मध्य प्रदेश इथे संयुक्त प्रयत्न

मध्य भारतातील सारस पक्ष्यांचा हा अधिवास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने गोंदिया आणि बालाघाट येथील सारस पक्षी आढळणाऱ्या भागांमध्ये संयुक्त संवर्धन योजना बनविण्याचे आदेश दिलेले आहेत.

भारत देशाच्या दक्षिणेस सारस पक्ष्यांचा उरलेला हा शेवटचा अधिवास आहे. येथील वैनगंगा आणि बाघ नद्या सारस संवर्धनासाठी फार महत्त्वाची आहेत.

बालाघाट जिल्ह्यातील खारा गावातील बसंत बोपचे यांच्या शेतात सदैव एक सारस पक्ष्याची जोडी वास्तव्यास असते.

“आम्ही शेतात सारस असणे शुभ मानतो. तसेही हे पक्षी पिकांचा नुकसान करत नाही. आधी सारस पक्ष्यांची अंडी चोरीला जायची. आता आम्ही नजर ठेवून असतो आणि घरट्यांचं रक्षण करतो,” बोपचे सांगतात.

“जर सारस पक्ष्याला मारलं, तर तुमचं जोडपं पण मरतं अशी लोकांची समजूत असल्याने सारस पक्ष्यांची शिकार झालेली आठवत नाही.”

नदीपात्रात उभारलेला काँक्रिटचा टॉवर

फोटो स्रोत, Saurabh Karkutwar/BBC

फोटो कॅप्शन, नदीपात्रात उभारलेला काँक्रिटचा टॉवर

पक्षिमित्र कन्हैय्या उदापुरे यांनी सांगितलं की, वैनगंगा आणि बाघ नदींच्या पात्रातून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे सारस अधिवास धोक्यात येतोय.

“रात्री बेरात्री कित्येक ट्रॅक्टर्सद्वारा येथून वाळु नेल्या जात आहे. यामुळे येथील सारस पक्षी त्रासलेले आहेत. येत्या काळात हे सारस अधिवास नष्ट होण्याचे मोठे कारण ठरु शकतं. सरकारी अधिकारी या वाळु तस्करांवर कुठलीही कारवाई करत नाही आहे,” उदापुरे म्हणाले.

गोपीसुंदर म्हणाले पाणथळ जागा, तलाव यांचे सरकारकडून सौंदर्यीकरण थांबविले पाहिजे. “महसूल मिळविणे हा सरकारी यंत्रणांचा दृष्टिकोन असतो. ज्यातून तलावांचे खोलीकरण करुन, पान वनस्पती काढून टाकून बोटींग सुरू करणे वा फॅन्सी हॉटेल्स बांधणे असे प्रकार होतात. पण याने सारस व इतर पक्ष्यांचे खाद्य व अधिवास संपुष्टात येत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे.”

गोंदिया जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सेवा संस्थेद्वारे ‘सारस संमेलन’चे आयोजन केले जात आहे.

“आता वन विभागपण यामध्ये उत्साह घेत आहे. आम्ही ‘सारस मित्र’ संकल्पना पुढे आणली आहे. ज्यामध्ये सारस पक्षी वाचविण्यात गावातील लोकांचा सहभाग वाढविला जाईल,” बाहेकर म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)