'तुर्कीमध्ये पुतिन यांची वाट पाहीन', झेलेन्स्की समोरासमोर चर्चेसाठी तयार

फोटो स्रोत, Reuters
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी 'प्रत्यक्ष' चर्चा करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
गुरूवारी (15 मे) तुर्कीच्या इस्तंबूल शहरात पुतिन यांची वाट पाहीन, जेणेकरून युद्ध थांबविण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने तुर्कीत रशियासोबत थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव स्वीकारावा, असं म्हटलं होतं. त्यानंतर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून 'चर्चेसाठी तायर असल्याचं' स्पष्ट केलं आहे.
झेलेन्स्की यांनी 'एक्स' वर लिहिले, "आता अधिक जीव गमावण्यात काही अर्थ नाही. मी स्वतः गुरुवारी पुतिन यांची तुर्कीत वाट पाहीन."
झेलेन्स्की यांनी या आधीच स्पष्ट केले आहे की, युक्रेन रशियाशी चर्चा करण्यास तयार आहे, पण आधी शस्त्रसंधी लागू केली जावी, अशी त्यांची अट आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पुतिनसोबत थेट चर्चेचा प्रस्ताव ट्रम्प यांच्या विधानानंतर समोर आला.
ट्रम्प यांनी रविवारी (11 मे) सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की, युक्रेनने हा प्रस्ताव त्वरित स्वीकारावा, जेणेकरून शांतता प्रस्तावाची काही शक्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी लिहिले होते, "कमीत कमी काही तोडगा निघू शकतो का नाही हे तरी कळेल. जर नसेल, तर अमेरिका आणि युरोपियन देशांना समजेल की पुढे काय करायला हवे. आत्ताच चर्चा करा."
शनिवारी (10 मे) रात्री रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी युक्रेनला 'गांभीर्याने चर्चा' करण्याचे आमंत्रण दिले होते.
रशिया-युक्रेनमधील युद्ध 2022 मध्ये सुरू झाले होते, जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











