सशस्त्र गुंडांकडून तुरुंगाचा ताबा, 3700 कैद्यांचं पलायन आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

फोटो स्रोत, Getty Images
रविवारी (3 मार्च) सशस्त्र गुंडांनी हैतीमध्ये पोर्ट-उ- प्रिन्स तुरुंगाचा ताबा घेतला. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे आमि तब्बल 3700 कैदी पळून गेले आहेत.
पंतप्रधान एरियल हेन्री यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे कृत्य केल्याचं या गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. गँग्सचा हिंसाचार वर्षांनुवर्षं हैतीत सुरू आहे.
सरकारने एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार राजधानीतील एक आणि क्रॉईक्स देस बुक्वेट्स या ठिकाणच्या तुरुंगावर या वीकेंडला हल्ला करण्यात आला आहे.
हे कृत्य म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि ते रात्री संचारबंदी लागू करत आहे, असं त्यात म्हटलं आहे.
हैती प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इतर पोलीस ठाण्यांवर हल्ला करण्यात आला, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष विचलित झालं.
या तुरुंगफोडीच्या वेळी गँगच्या काही सदस्यांना अटक करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष जोवोनेल मॉईस यांच्या हत्येत या गुंडांचा सहभाग होता.
पंतप्रधान नैरोबीला सैन्य पाठवायचं की नाही याची चर्चा करायला गेले तेव्हापासून हा हिंसाचार सुरू झाला आहे.
गँगचा प्रमुख ता जिमी चेरिझिर उर्फ बार्बेक्यूने या हल्ल्यांची घोषणा केली. पंतप्रधानांना पदावरून हटवणं हा या हल्ल्याचा उद्देश होता.
“शहरातील आणि राजधानीतील सर्व सशस्त्र गट आम्ही एक आहोत,” असं एक माजी पोलीस अधिकारी म्हणाले.
या तुरुंगातील अनेक हत्याकांडात त्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

फोटो स्रोत, Reuters
हैतीच्या पोलीस युनियनने सैन्याला राजधानीतील मुख्य तुरुंगाचा ताबा घेण्यास सांगितलं होतं. मात्र, शनिवारी (2 मार्च) तुरुंगावर हल्ला करण्यात आला.
रविवारी तुरुंगाची दारं उघडी होती आणि तिथे अधिकाऱ्यांचं कोणतंही चिन्हं नव्हतं असं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. तीन कैदी पळून जाण्याच्या प्रयत्नात मारले गेले असंही या वृत्तात सांगितलं आहे.
AFP या वृत्तसंस्थेसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराने तुरुंगाला भेट दिली तेव्हा त्याने 10 मृतदेह पाहिले. त्यापैकी काही मृतदेहांवर गोळ्या झाडल्याच्या खुणा होत्या.
तुरुंगातल्या एका स्वयंसेवकाने रॉयटर्सला सांगितलं की 99 कैद्यांनी तुरुंगात राहण्याचाच निर्णय घेतला कारण गोळीबारात जीव जाण्याची त्यांना भीती वाटत होती. त्यात माजी कोलंबियन सैनिकांचा समावेश होता. त्यांच्यावर राष्ट्रपती मॉईस यांच्या खुनाचा आरोप होता.
अमेरिकन दुतावासाने लवकरात लवकर हैती सोडण्याचं आवाहन केलं आहे. फ्रान्स दुतावासावनेही व्हिसा सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैती मध्ये अनेक वर्षं गँगवार सुरू आहे. 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हत्येनंतर हा हिंसाचार आणखीच उफाळून आला आहे. तेव्हापासून तिथे निवडणुका झालेल्या नाहीत. 2016 पासून तिथे निवडणुका झालेल्या नाहीत.
जानेवारीत संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार हैती येथील गँगवॉरमध्ये 8400 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यात अपहरण, हत्या, जीवघेणे हल्ले यांचा समावेश आहे. 2022 पेक्षा हा दुप्पट आकडा आहे.
या रक्तपातामुळे अनेक रुग्णालयं बंद झाली.
राजकीय पोकळी, त्यात धक्कादायक पातळीवरचे हल्ले यामुळे सरकारविरुद्ध अनेक आंदोलनं झाली. त्यामुळे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.











