You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी ब्रिटनची शाही मेजवानी, किंग चार्ल्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली?
- Author, शॉन कॉफलन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. विंडसर कॅसल येथे त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वांत मोठा 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
यावेळी ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी ट्रम्प यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शाही मेजवानीप्रसंगी भाषण केलं.
डोनाल्ड ट्रम्प हे 'जगातील कठीण आणि गुंतागुंतीचे संघर्ष सोडवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहेत', असं चार्ल्स म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेनं युक्रेनला 'हुकूमशाहीविरुद्धच्या लढाईत' पाठिंबा द्यावा, असं आवाहनही केलं.
उत्तरादाखल अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिका-ब्रिटनच्या विशेष नात्याचं कौतुक केलं आणि 'विशेष हा शब्दसुद्धा या नात्याची खरी किंमत सांगू शकत नाही', असं म्हटलं.
विंडसर कॅसलमध्ये 160 पाहुण्यांसाठी भव्य शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केलेल्या भाषणात किंग चार्ल्स यांनी दोन्ही देशांतील मजबूत संबंध आणि सांस्कृतिक, व्यापारी व लष्करी संबंध टिकवण्याच्या गरजेवर भर दिला.
"आपल्या लोकांनी आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मूल्यांसाठी एकत्र लढा दिला आहे आणि त्यासाठी बलिदानही दिलं आहे," असं किंग चार्ल्स यांनी सांगितलं.
या दौऱ्यात किंग चार्ल्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह राणी कॅमिला आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरिन, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प विविध कार्यक्रमात हजर राहतील.
यानंतरचा कार्यक्रम राजदरबारी सोहळ्यापासून राजकीय चर्चांकडे आणि पत्रकार परिषदेकडे जाईल. ट्रम्प हे पंतप्रधान किअर स्टार्मर यांची त्यांच्या कंट्री हाऊस चेकर्स येथे भेट घेतील.
बुधवारी (17 सप्टेंबर) झालेलं शाही भोजन हा संपूर्ण दिवस चाललेल्या सोहळ्याचा शेवट होता. विंडसरमध्ये राजा, राणी आणि वरिष्ठ राजघराण्याच्या सदस्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं.
अध्यक्ष ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प भव्य रथातून किल्ल्याच्या सुंदर प्रांगणात उतरले. त्यानंतर त्यांनी उत्तम प्रकारे सजवलेल्या लॉनवर सैन्याच्या तुकडीची पाहणी केली.
अमेरिकन पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी वेल्सचे राजकुमार आणि राजकुमारीही उपस्थित होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत 'मैत्रीपूर्ण' अशी खासगी भेट घेतली.
शाही भोजनावेळी केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी राजपुत्र विल्यम यांचं कौतुक करताना म्हटलं की, ते भविष्यात 'अविश्वसनीय यश' मिळवतील. तसेच कॅथरीन यांच्याबद्दल ते म्हणाले की, त्या 'तेजस्वी, निरोगी आणि अतिशय सुंदर' आहेत.
'काय जागा आहे, अप्रतिम'
ट्रम्प यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या राजकीय भेटीत राजा आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यातील चांगले संबंध दिसून आले. समारंभातील परेड पाहताना दोघांमध्ये काही मैत्रीपूर्ण क्षणही दिसून आले.
किंग चार्ल्स यांनी गमतीने ट्रम्प यांना परेडमध्ये उभ्या असलेल्या एका सैनिकाच्या तलवारीपासून सावध राहा असं सांगत असल्याचं दिसलं.
सेंट जॉर्ज चॅपल पाहताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खूप उत्सुक दिसले, ते म्हणाले, 'काय जागा आहे, अप्रतिम!' तसेच अमेरिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित राजघराण्याच्या संग्रहातील ऐतिहासिक कागदपत्रे पाहून ते स्तिमित झाले.
ट्रम्प हे दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे अनेक वर्षांपासून प्रशंसक राहिले आहेत. त्यांनी विंडसरमधील त्यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी अधिकृत भेटवस्तूंची देवाणघेवाणही झाली. त्यामध्ये पाहुणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या शपथविधीच्या दिवशी बकिंगहॅम पॅलेसवर फडकवलेला ध्वज भेट देण्यात आला.
शाही मेजवानी आणि गुंतवणुकीचे करार
राजकीय भेटी म्हणजे 'सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी'चा एक प्रकार आहे. यात राजघराण्याचं आदरातिथ्य वापरून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांशी संबंध मजबूत केले जातात आणि त्यात अमेरिका सर्वात महत्त्वाची मानली जाते.
यामध्ये व्यावसायिक संबंधांचाही समावेश आहे. शाही मेजवानीला सेलिब्रिटींपेक्षा जास्त तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. यात अॅपलचे टीम कुक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी ओपनएआयचे सॅम ऑल्टमन यांचा समावेश होता.
राजकीय भेटीच्या दरम्यान अमेरिकेकडून ब्रिटनमध्ये 150 अब्ज पाउंडची गुंतवणूक जाहीर करण्यात आली. त्यात मायक्रोसॉफ्टकडून 22 अब्ज पाउंडचा समावेश आहे.
माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक शाही मेजवानीला उपस्थित होते. ते पंतप्रधानांचे सल्लागार मॉर्गन मॅकस्विनींच्या शेजारी बसले होते. पाहुण्यांना मुख्य जेवण म्हणून नॉरफॉक ऑर्गॅनिक चिकन देण्यात आलं.
ब्रिटन आणि अमेरिकेच्या भागीदारीचे महत्त्व सांगण्यासोबतच किंग चार्ल्स यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं. त्यांनी म्हटलं, "आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी निसर्गाच्या अद्भुततेचं आणि सौंदर्याचं रक्षण आणि पुनर्स्थापना करण्याची ही मौल्यवान संधी आहे."
भव्य सोहळा
शाही मेजवानीने दिवसाचा शेवट झाला. ट्रम्प यांच्या स्वागतात कुठलीही कमतरता राहू नये या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि समारंभाच्या भव्यतेने सर्वांनाच थक्क केलं.
सैन्य, रॉयल नेव्ही आणि आरएएफमधील 1300 जवानांच्या सहभागासह, हे ब्रिटनमधील राजकीय भेटीसाठी आयोजित केलेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं 'गार्ड ऑफ ऑनर' होतं.
राजकीय भेटीसाठी नेहमीपेक्षा खूप मोठी लष्करी तुकडी लावण्यामागे ब्रिटन सरकारचा संदेश होता की, अमेरिकेनं नाटोशी आपली बांधिलकी टिकवून ठेवावी आणि युक्रेनला पाठिंबा द्यावा.
पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांनी ट्रम्प यांच्यासोबत विंडसरवर रेड अॅरोजचे विमान प्रदर्शन पाहिलं. परंतु, एफ-35 लढाऊ विमानांचं नियोजित प्रदर्शन वाईट हवामानामुळे रद्द करावं लागलं.
राजघराण्याचा हा भव्य सोहळा राष्ट्राध्यक्षांसाठी आकर्षक ठरला. त्यांनी या राजकीय भेटीचं वर्णन 'माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक' असं केलं.
ट्रम्प-किंग चार्ल्स भेटीविरोधात आंदोलन
दरम्यान, अलीकडील इतर राजकीय भेटींपेक्षा वेगळेपण यावेळी असं होतं की, सार्वजनिकरीत्या काहीही पाहायला मिळालं नाही. सर्व कार्यक्रम विंडसर कॅसलच्या भिंतीमागे किंवा पंतप्रधानांच्या कंट्री हाऊस 'चेकर्स' येथे झाले.
लंडनमध्ये या भेटीविरोधात आंदोलनं झाली, पण विंडसरमध्येही ट्रम्प विरोधी घोषणा झाल्या, ज्या अमेरिकन पाहुण्यांच्या नजरेपासून दूर होत्या.
आंदोलकांमध्ये राजेशाहीविरोधी गट रिपब्लिकचा समावेश होता.
त्याचे मुख्य कार्यकारी, ग्रॅहम स्मिथ म्हणाले, "चार्ल्स असो किंवा ट्रम्प, या लोकांपासून देशाला वाचवण्याची आणि आपल्या लोकशाहीचं रक्षण करण्याची वेळ आली आहे. हे लोक आपल्या लोकशाही हक्कांना धोक्यात आणू शकतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)