IND vs ENG : टीम इंडियानं इंग्लंडला 100 रन्सनी हरवलं; रोहित, शमी आणि बुमरानं असा मिळवून दिला विजय

टीम इंडिया

फोटो स्रोत, Getty Images

रोहित शर्माची झुंजार फलंदाजी तसंच मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडला 100 रन्सनी हरवलं.

लखनऊमध्ये अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर इंग्लंडला विजयासाठी 230 रन्सचं माफक लक्ष्य होतं. पण इंग्लंडची अख्खी टीम 129 रन्समध्येच आटोपली.

लखनऊमध्ये भारताकडून 87 रन्सची खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला, पण भारताच्या विजयात शमी आणि बुमरानंही महत्त्वाचं योगदान दिलं.

त्या दोघांनी भेदक मारा करून इंग्लंडच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं आणि मग विजयावर शिक्कामोर्तबही केलं.

भारताचा यंदाच्या विश्वचषकातला हा सलग सहावा विजय असून टीम इंडियानं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलंय. तर इंग्लंडची टीम तळाशी असून त्यांचं स्पर्धेतलं आव्हान आता संपल्यात जमा आहे.

Points Table

टीम इंडियानं याआधीचे पाच विजय हे धावांचा पाठलाग करताना मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात धावसंख्येचं रक्षण करताना भारताचा हा पहिलाच विजय आहे.

या स्पर्धेतल्या इतर सामन्यांप्रमाणे याही विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली.

शमीची कमाल, बुमराची धमाल

बुमरानं पाचव्या ओव्हरमध्ये राऊंड द विकेट गोलंदाजी करताना 16 धावांवर खेळणाऱ्या दाविद मालनचा त्रिफाळा उडवला आणि भारताला पहिलं यश मिळवून दिलं.

त्यानं पुढच्याच बॉलवर अनुभवी ज्यो रूटला बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला.

shami

फोटो स्रोत, Getty Images

मोहम्मद शमीनं आठव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बेन स्टोक्सला शून्यावर बाद केलं. मग दहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शमीनं जॉनी बेअरस्टोचा अवघ्या 14 रन्सवर त्रिफळा उडवला.

शमीची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी तर हुकली, पण त्यानं इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं.

कुलदीप यादवनं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला 10 धावांवर बाद केलं. तर मोहम्मद शमीनं मग मोईन अलीला 15 रन्सवर के एल राहुलकरवी झेलबाद केलं.

रविंद्र जाडेजानं भारताला सातवं यश मिळवून दिलं. ख्रिस वोक्सचा त्याला पुढं येऊन षटकार लगावण्याचा प्रयत्न फसला.

कुलदीप यादवनं लियाम लिव्हिंगस्टोनला 27 धावांवर बाद केलं. इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांपैकी लिव्हिंगस्टोननं सर्वाधिक धावा केल्या.

bumrah

अवघ्या 98 रन्समध्ये इंग्लंडनं आठ विकेट्स गमावल्या.

मग मोहम्मद शमीनं आदिल रशिदला बोल्ड केलं तर बुमरानं मार्क वूडचा त्रिफळा उडवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रोहितनं ओलांडला 18,000 रन्सचा टप्पा

या सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली होती. शुबमन, विराट आणि श्रेयस स्वस्तात माघारी परतले, पण रोहितनं दुसऱ्या बाजूनं संघर्ष सुरू ठेवला.

रोहितनं 101 बॉल्समध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह 87 रन्सची खेळी केली आणि के एल राहुलसह 91 रन्सची भागीदारीही रचली.

रोहित

रोहितनं या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

ही कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी ही कामगिरी बजावली होती.

यंदा विश्वचषकात भारताच्या पहिल्याच सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावांची बरसात होताना दिसली.

त्यानं अफगाणिस्तानविरुद् 131 रन्सची खेळी केली होती. तर पाकिस्तानविरुद्ध त्यानं 86 रन्स करत भारताच्या विजयाला हातभार लावला.

त्यानंतर रोहितनं बांगलादेशविरुद्ध 48 रन्स तर न्यूझीलंडविरुद्धच्या 46 धावा केल्या होत्या.

‘सूर्या’चं अर्धशतक हुकलं

विश्वचषकातील दुसराच सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनं जबाबदारीनं खेळ केला. त्याचं अर्धशतक मात्र फक्त 1 धावांनी हुकलं. सूर्यकुमार 47 बॉलमध्ये 49 धावा काढून बाद झाला.

सूर्यकुमार 47 व्या ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांनी किल्ला लढवला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागिदारी करत पूर्ण ओव्हर खेळून काढल्या.

surya

दुपारी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं.

शुबमन गिल 9 धावांवर असताना चौथ्या ओव्हरमध्ये ख्रिस वोक्सनं त्याचा त्रिफाळा उडवला, तेव्हा भारताचा स्कोर होता एक बाद 26.

मग 27 धावांवरच टीम इंडियानं दुसरी विकेट गमावली. डेव्हिड वायलीनं विराटला शून्यावरच बाद केलं.

यावर्षी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला.

गिल आणि विराट झटपट बाद झाल्यानं श्रेयस अय्यरला मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यानं यावेळी सपशेल निराशा केली.

40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. भारताला 50 रन्सचा टप्पा गाठण्यासाठी 15 व्या ओव्हरची वाट पाहावी लागली.

Rahul

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, के एल राहुल

पण रोहित आणि सूर्यकुमारच्या खेळींमुळे भारताला 229 ची धावसंख्या उभारता आली. केएल राहुलनंही 39 रन्सची खेळी करून टीमच्या विजयाला हातभार लावला.

बुमरानं 16 तर कुलदीपनंही 9 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांची ही फलंदाजी टीम मॅनेजमेंटसाठी दिलासा देणारी बाब आहे.

इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत फक्त इंग्लंडनं टीम इंडियाला पराभूत केलं होतं. तर ऑस्ट्रेलियात 2022 साली झालेल्या टी20 विश्वकचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडनंच टीम इंडियाला 10 विकेट्स राखून हरवलं होतं.

या दोन्ही पराभवांची परतफेड टीम इंडियानं लखनऊमध्ये केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)