गुड्डू मुस्लीम कोण आहे? अतीक अहमदचा भाऊ अशरफने त्याचं नाव मृत्यूपूर्वी का घेतलं?

फोटो स्रोत, ANI
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज मध्ये माजी खासदार अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री तीन हल्लेखोरांनी पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या झाडून हत्या केली.
अतीक अहमद आणि त्यांच्या भावाला पोलिस सुरक्षेत वैद्यकीय तपासणीसाठी केल्विन रुग्णालयात घेऊन जात असताना हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे.
दोघांच्या हत्येच्या दोनच दिवस आधी अतिक अहमदचा मुलगा असद याचा झाशी इथं पोलिस चकमकीत मृत्यू झाला. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र गुलाम मोहम्मदही यामध्ये मारला गेला.
गोळ्या झाडण्याच्या काही सेकंद आधी अतिक अहमद यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांचा भाऊ अशरफने कॅमेऱ्यासमोर गुड्डू मुस्लिम नामक एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं, इतक्यात हल्लेखोरांपैकी एकाने अतिक अहमदवर गोळ्या झाडल्या.
अतिक खाली पडले आणि काही क्षणातच अशरफ अहमदवरही गोळ्या झाडण्यात आल्या.
बमबाज नावाने ओळखला जातो गुड्डू मुस्लिम
अश्रफ अहमदने ज्या गुड्डू मुस्लिमचं नाव घेतलं होतं, तो व्यक्ती बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट असल्याचं मानलं जातं.
या गुड्डू मुस्लिमने उत्तरप्रदेशातील बड्या बड्या माफिया टोळ्यांसाठी काम केल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर त्याने अतिक अहमदसाठी काम केल्याचं सांगितलं जातं.
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी गुड्डू मुस्लीमने लुटमार करत गुन्हेगारीच्या जगतात प्रवेश केला. पुढे मोठंमोठ्या गँगस्टरच्या पंखाखाली आल्यानंतर गुड्डूने बॉम्ब बनवायला सुरुवात केली.
पुढे जाऊन तो इतका प्रसिद्ध झाला की, उत्तरप्रदेशातील प्रत्येक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणात गुड्डूचं नाव हमखास येऊ लागलं.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार प्रभात वर्मा यांच्या मते, गुड्डू मुस्लिमने प्रकाश शुक्ला, मुख्तार अन्सारी, धनंजय सिंग आणि अभय सिंग यांच्यासारख्या कित्येक कथित माफियांसाठी जवळपास 20 वर्ष काम केलंय.

फोटो स्रोत, TWITTER
पण हल्ली गुड्डू मुस्लिम अतिक अहमदचा राईट हॅण्ड म्हणून काम करू लागला होता. लखनऊ पीटर गोम्स हत्याकांडातही गुड्डूचं नाव पुढं आलं होतं.
फेब्रुवारी महिन्यात उमेश पालच्या हत्येनंतर समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुड्डू मुस्लिम बॉम्ब फेकताना दिसला होता.
उमेश पाल हत्याकांडात अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा सहकारी गुलाम आरोपी होते. या हत्याकांडात त्यांच्या सोबत गुड्डू मुस्लिमही सहभागी असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून गुड्डू मुस्लिम फरार आहे. पोलिसांनी गुड्डू मुस्लिमवर 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.
100 हून अधिक गुन्हे दाखल...
दुसरीकडे अतिक अहमद विरोधात बरेच खटले सुरू होते. त्यांना साबरमती जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. एमपीएमएलए न्यायालयात त्यांच्याविरोधात असणाऱ्या 50 हून अधिक खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू होती.
गुन्हेगारीच्या जगतातून बाहेर पडून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नेत्यांपैकी एक नेता म्हणून अतिक अहमद यांचं नाव घेतलं जातं. उत्तरप्रदेशच्या राजकारणातही त्यांची बाहुबली प्रतिमा कायम होती. शिवाय त्यांचं नाव या ना त्या कारणाने चर्चेत असायचं.

फोटो स्रोत, TWITTER
पण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता, त्यांच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
प्रयागराजच्या फिर्यादी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1996 पासून अतीक अहमद यांच्या विरोधात जवळपास 50 खटले प्रलंबित आहेत.
फिर्यादी पक्षाचं म्हणणं आहे की, अतिक आणि त्यांचा भाऊ अशरफ यांच्या वकिलाने 12 प्रकरणांमध्ये अर्ज दाखल केले होते, त्यामुळे या प्रकरणात आरोप निश्चिती झालेली नाही.
बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येमागे अतिक अहमद मुख्य आरोपी होते. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

फोटो स्रोत, ani
प्रयागराज येथील एमपीएमएलए कोर्टाने 28 मार्च रोजी अतीक अहमद यांना 2006 मध्ये उमेश पालचं अपहरण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
राजू पाल हत्याकांडात उमेश पाल हे सुरुवातीचे साक्षीदार होते. पण पुढे या हत्याकांडाचा तपास सीबीआयच्या हाती आला आणि त्यांनी उमेश पाल यांची साक्ष गृहीत धरली नाही. पुढे 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
अशरफ अहमदची गुन्हेगारी पार्श्वभूमी
अशरफ अहमद उर्फ खालिद आझमीवर 1992 मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज अखेर त्याच्यावर 52 गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आदी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.
फेब्रुवारी महिन्यात उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी अशरफला आरोपी बनवण्यात आलं. उमेश पालच्या हत्येपूर्वी 2006 मध्ये त्यांचं अपहरणही झालं होतं.

फोटो स्रोत, PRABHAT VERMA AND PUJA PAL
विशेष म्हणजे, उमेश पालच्या अपहरण प्रकरणात अशरफची निर्दोष सुटका झाली होती. या प्रकरणात अतिक आणि इतर दोघांना दोषी ठरवण्यात आलं होतं तर 6 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
बसपाचे आमदार राजू पाल यांची 2005 मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या हत्येप्रकरणीही अशरफ आरोपी होता. आणि या प्रकरणी लखनऊच्या सीबीआय कोर्टात केस सुरू होती.
अशरफला बरेली येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तर खटल्याच्या सुनावणीसाठी प्रयागराजला आणलं जात होतं.
बीबीसी हिंदीचे सहयोगी पत्रकार प्रभात वर्मा यांनी काही तज्ञांचा हवाला देत सांगितलं की, अतिक अहमद यांच्या अनेक प्रकरणांमध्ये अशरफ अहमद योजना आखत असे.

फोटो स्रोत, ani
अतिक अहमद यांच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या आबिद प्रधानचा ड्रायव्हर सुरजीत आणि अलकमा यांची 25 सप्टेंबर 2015 रोजी मारियाडीह गावात हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणात अनेकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभात वर्मा सांगतात की, पण नंतर कळलं की ज्या लोकांना हत्या केली म्हणून अटक करण्यात आली त्या लोकांचा यात सहभागच नव्हता. तर या हत्येमागे अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांचा हात होता.
2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाने फुलपूर मतदारसंघातून अतिक अहमद यांना तिकीट दिलं. ते या निवडणुकीत जिंकले आणि खासदार झाले. पुढे अलाहाबाद पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाली आणि त्यासाठी पोटनिवडणूक लागल्या.
या पोटनिवडणुकीत सपाने अतिक यांचा धाकटा भाऊ अशरफला तिकीट दिलं, तर बसपाने राजू पाल यांना उमेदवारी दिली.
यावेळी बसपाचे उमेदवार राजू पाल यांनी अतिक अहमद यांच्या भावाचा म्हणजेच अशरफ अहमदचा पराभव केला.
पहिल्यांदाच आमदार झालेल्या राजू पाल यांची काही महिन्यातच म्हणजे 25 जानेवारी 2005 रोजी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत देवी पाल आणि संदीप यादव यांचाही मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
या हत्याकांडात तत्कालीन खासदार अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांचं कनेक्शन समोर आलं होतं.
नुकत्याच घडलेल्या उमेश पाल खून प्रकरणातही अशरफ मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जातंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिक अहमद यांनी उमेश पालच्या हत्येची जबाबदारी भाऊ अशरफवर सोपवली होती.
आणि एवढंच नाही तर तीनदा प्रयत्न करूनही उमेश पाल वाचले. शेवटी चौथ्या प्रयत्नात उमेश पालचा बळी गेल्याचं जाणकार सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








