You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टीनएजर असताना तिचं अपहरण झालं, 51 हजार रुपयांना विकलं गेलं आणि नवऱ्यानेच छळ केला...
चीनच्या एका कोर्टाने महिलेच्या मानवी तस्करीच्या प्रकरणात सहा लोकांना अटक केली आहे. गेल्या वर्षी ही महिला साखळीला बांधलेली सापडली होती.
या खटल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. यामुळे वधू तस्करीचं एक संपूर्ण रॅकेट उघडकीला आलं होतं.
या महिलेच्या नवऱ्याला नऊ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याच्यावर अत्याचार, शिव्यागाळी आणि ओलीस ठेवण्याचा आरोप आहे. या प्रकरणी आणखी पाच जणांना 8 ते 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
अनेकांनी या शिक्षेबाबत संताप व्यक्त केला. ही शिक्षा अतिशय कमी असल्याचं लोकांचं म्हणणं आहे आणि अनेक बदल होणं अपेक्षित आहे असं लोकांचं मत आहे.
शिआहुमै असं या स्त्रीचं नाव आहे. तिची व्यथा जानेवारी 2022 मध्ये लोकांसमोर आली. एका चायनीज व्लॉगरला एका झोपडीसमोर जमिनीवर पडलेली दिसली. झुझू नावाच्या एका खेड्यात तिचं घर आहे. या घराजवळ ही झोपडी होती. तिच्या गळ्याभोवती लोखंडाची साखळी होती.
या व्लॉगरचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात त्याने मानवी तस्करीला वाचा फोडली. शिआहुमैचं वय 40 आहे. तिला आठ मुलं आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे.
या प्रकरणाने चीनच्या जनतेचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी या महिलेला न्याय मिळावा म्हणून ऑनलाईन चळवळ सुरू केली.
सर्वात आधी स्थानिक प्रशासनाने तस्करीचे आरोप खोडून काढलेय. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं लग्न झालं आहे. त्यांच्याकडे तसं प्रमाणपत्र आहे आणि त्यांच्या लग्नात काही अडचणी आहेत असं म्हणत प्रशासनाने या प्रकरणापासून फारकत घेण्याचा प्रयत्न केला.
शिआहुमैला स्किझोफ्रेनिया झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला कोंडून ठेवलं असा बचावही प्रशासनाने केला. तिच्या नवऱ्याचं नाव डाँग झिमिन आहे.
अशा वक्तव्यांमुळे जनतेत आणखी संतापाचं वातावरण तयार झालं. या महिलेकडे आणि तस्करी झालेल्या पीडितांकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोप लोकांनी करण्यास सुरुवात केली.
लोकांचा राग आणखीच वाढायला लागला आणि मग पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. तसंच मुलं आणि स्त्रियांच्या तस्करीच्या प्रकरणांचा तपास करण्यास सुरुवात केली.
जेव्हा ही केस उभी राहिली तेव्हा या प्रकरणातले अनेक कंगोरे बाहेर आले.
शिआहुमै पौगंडावस्थेत असताना तिच्या घरून 1998 साली अपहरण करण्यात आलं. तिला एका शेतकऱ्याला दोनघाई भागात 600 डॉलरला विकण्यात आलं.
एका वर्षानंतर तिला आणखी काही तस्कऱ्यांना विकण्यात आलं. एका कपलने तिला डाँगच्या वडिलांना तिला विकलं.
जेव्हा ती डाँगकडे आली तेव्हा ती उत्तम स्थितीत होती. ती लोकांशी बोलू शकत होती आणि स्वत:ची काळजी घेऊ शकत होती.
कोर्टाने डाँगला बायकोला मारहाण करण्याच्या आणि तिचा छळ करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं. त्याने शिआहुमैला जबरदस्तीने गरोदर केलं. 1999 ते 2020 या काळात त्यांना आठ मुलं झाली.
तिसऱ्या बाळंतपणानंतर तिचा स्किझोफ्रेनिया आणखी वाढला. त्यामुळे डाँग आणखी छळवादी झाला. असं झुझू येथील कोर्टाने सांगितलं.
2017 मध्ये त्याने तिला घराबाहेर काढलं आणि तिच्या घराच्या बाहेर एका झोपडीत ठेवलं. त्याने तिला कपड्याच्या दोरीने आणि साखळीने बांधून ठेवलं. त्या झोपडीत पाणी, वीज, उजेड काही नव्हतं. अनेकदा तिला काहीही खायला द्यायचे नाहीत.
न्या. याओ हुई म्हणाले की डाँगने कधीच त्याच्या बायकोला आजारी असताना डॉक्टरकडे नेलं नाही. तिची स्थिती माहिती असताना तिला गरोदर केलं.
गेल्या आठवड्यात या प्रकरणी शिक्षा झाल्यावर सोशल मीडियावर या बातमीची प्रचंड चर्चा झाली.
अनेक युझर्सने या शिक्षेवर नापसंती व्यक्त केली. “एखाद्याचं आयुष्य उद्धवस्त केल्याची इतकीच शिक्षा?” असं एका युझरने लिहिलं.
काही जणांनी सांगितलं की तस्करीसाठी शिक्षा 10 वर्षंच असते.
काही कार्यकर्त्यांनी या कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगितलं अशा कमी शिक्षांमुळे वधूंची अशी तस्करी करणाऱ्यांना काही वाटत नाही असं त्यांचं मत आहे.
“शिक्षेत बदल करा, ही शिक्षा काहीच नाही.” असं एका युझरने ऑनलाईन चर्चेत म्हटलं.
काही जणांनी शिआहुमैच्या सध्याच्या स्थितीबद्दल विचारलं. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हाच तिला या खेड्यातून बाहेर काढलं आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचं चीनच्या प्रसारमाध्यमांनी म्हटलं
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)