बांगलादेशात पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या मुकुटाची चोरी, भारतानं काय प्रतिक्रिया दिली?

बांगलादेशातील एक मंदिरात चोरी झाली आणि पूजेच्या मंडपावर हल्ला झाला. या घटनांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्यानं या घटना दुर्दैवी, दु:खद असल्याचं म्हटलं आहे.

त्याचबरोबर भारतानं बांगलादेश सरकारला आवाहन केलं आहे की सर्व हिंदू आणि अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेची खातरजमा करण्यात यावी.

यादरम्यान बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) अचानक ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. त्यांची ही भेट रविवारी (13 ऑक्टोबर) होणार होती.

मोहम्मद युनूस बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार आहेत. त्यांच्या एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावरील खात्यावरून सांगण्यात आलं की, "मोहम्मद युनूस यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) दुर्गा पूजा या बांगलादेशातील सर्वांत मोठ्या हिंदू उत्सवाच्या शुभ प्रसंगी हिंदू समुदायाला शुभेच्छा देण्यासाठी, ढाकेश्वरी या जुन्या ढाक्यातील सर्वात पवित्र मंदिराला भेट दिली."

बीडी न्यूज 24 या बांगलादेशच्या स्थानिक प्रसार माध्यमानं दिलेल्या माहितीनुसार, महानगर सर्बोजनिन पूजा समिती आणि बांगलादेश पूजा उद्जापोन परिषदच्या नेत्यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता मंदिरात युनूस यांचं स्वागत केलं.

तर ढाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजा उत्सवाशी निगडीत जवळपास 35 अप्रिय घटनांसंदर्भात 17 जणांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यांबरोबरच बांगलादेशातील यशोरेश्वरी काली मंदिरात चोरी होण्याची घटना देखील समोर आली आहे. या मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुकुट भेट दिला होता. त्या मुकुटाची चोरी झाली आहे.

2021 मध्ये पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी हा मुकुट या मंदिराला भेट दिला होता.

बांगलादेशात सध्या दुर्गा पूजा उत्सव साजरा केला जातो आहे. रविवारी हा उत्सव संपणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणाबाबत शनिवारी (12 ऑक्टोबर) एक वक्तव्य दिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, "ढाक्यातील तांतीबाजारमध्ये पूजा मंडपावर हल्ला होण्याच्या आणि सतखीरामध्ये प्रसिद्ध यशोरेश्वरी काली मंदिरात चोरी होण्याच्या घटनांवर आम्ही गंभीर स्वरुपाची चिंता व्यक्त केली आहे."

परराष्ट्र मंत्रालयानं या घटनांबाबत चिंता व्यक्त करत म्हटलं आहे की "या घटना दु:खद आहेत. मंदिर आणि देवतांना अपवित्र करण्याचा आणि त्यांचं नुकसान करण्याचा एक शिस्तबद्ध पॅटर्न आहे. या प्रकारच्या घटना मागील अनेक दिवसांपासून घडताना दिसत आहेत."

"आम्ही बांगलादेश सरकारला आवाहन करतो की त्यांनी हिंदू आणि सर्वच अल्पसंख्याक आणि त्यांच्या पवित्र धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. विशेषकरून धार्मिक उत्सवांच्या वेळी काळजी घेतली जावी."

याआधी परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती.

ढाक्यातील भारतीय उच्चायुक्त म्हणाले होते, "2021 मध्ये पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याच्या वेळेस यशोरेश्वरी काली मंदिराला (सतखिरा) भेट म्हणून देण्यात आलेल्या मुकुटाची चोरी झाल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत."

"आम्ही या घटनेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत आहोत आणि बांगलादेश सरकारला या चोरीचा तपास करण्याची, मुकुट हस्तगत करण्याची आणि गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचं आवाहन करतो," असं

पोलिसांनी काय कारवाई केली?

पीटीआय या वृत्तसंस्थेनं बांगलादेश पोलिसांचा संदर्भ म्हटलं आहे की बांगलादेशात या महिन्यात दुर्गा पूजा उत्सवाशी संबंधित जवळपास 35 अप्रिय घटना घडल्याचं समोर आलं आहे.

याबाबतीत जवळपास एक डझन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 17 लोकांना अटक केली आहे.

ढाका ट्रिब्युन या बांगलादेशातील वृत्तपत्रानं पोलिस महासंचालक (आयजीपी) मोहम्मद मोइनुल इस्लाम यांचा संदर्भ देत म्हटलं आहे की, "एक ऑक्टोबरपासून आतापर्यंत देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या दुर्गा पूजा उत्सवाशी संबंधित 35 अप्रिय घटना घडल्या आहेत. याबाबतीत 11 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत."

ढाका ट्रिब्युन या वृत्तपत्रानं पोलीस महासंचालकांचा संदर्भ देऊन म्हटलं आहे की, "24 सामान्य गुन्हे (जीडी) नोंदवण्यात आले आहेत तर 17 जणांना अटक करण्यात आली आहे."

पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरूवात बुधवारी महाषष्ठीनं झाली होती. या उत्सवाची सांगता रविवारी (13 ऑक्टोबर) देवी दुर्गेच्या विसर्जनानं होणार आहे.

पोलीस महासंचालकांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ढाक्यातील बनानी पूजा मंडपाला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितलं की देशभरात 32 हजारांहून अधिक मंडपांमध्ये दुर्गा पूजा उत्सव साजरा केला जातो आहे.

यशोरेश्वरी मंदिरात मुकुट चोरीची घटना झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी ही भेट दिली आहे.

पोलीस महासंचालक इस्लाम यांनी या प्रकरणाबाबत आश्वासन दिलं आहे की या घटनांना जबाबदार असणाऱ्या लोकांचं रेकॉर्ड पोलिसांकडे आहे.

ते म्हणाले, "या घटनांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. दुर्गा पूजा उत्सवाच्या काळात कोणीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा द्वेषाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या घटनांमध्ये सहभागी झाल्यास अशांविरोधात आम्ही कडक कारवाई करू."

या बातम्याही वाचा:

बांगलादेशात कुठे घडल्या घटना?

ढाक्यात घडलेल्या घटनांव्यतिरिक्त बांगलादेशातील इतर भागांमध्ये देखील या प्रकारच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.

याआधी गुरुवारी ढाक्यापासून जवळपास 250 किलोमीटर आग्नेय दिशेला असणाऱ्या चितगावमध्ये एक घटना घटली.

बीडी न्यूज24 डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, चितगावच्या जत्रा मोहन सेन हॉलमध्ये दुर्गा पूजा मंडपाच्या व्यासपीठावर अर्धा डझन लोक इस्लामी क्रांतीचं आवाहन करत एक गाणं गायले. यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला, संताप निर्माण झाला.

द बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्रात या प्रकरणाबाबत म्हटलं आहे की, "चितगाव मेट्रोपॉलिटन पोलिसांनी शुक्रवारी इस्लामी क्रांतीचं आवाहन करत गीत गायल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली आहे."

या घटनेच्या संदर्भात पूजा समितीचे संयुक्त सरचिटणीस सजल दत्ता यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चितगावमध्ये पूजा परिषदेचे सरचिटणीस हिलोल सेन उज्जल यांनी द डेली स्टारला सांगितलं की या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायाला धक्का बसला आहे. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे असंतोष आणि तणाव आणखी वाढला.

यशोरेश्वरी मंदिरातील मुकुटाची चोरी कशी झाली?

यशोरेश्वरी मंदिरातून मुकुटाची चोरी होत असतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीनं दाखवलं की मंदिरात कोणीही नसताना, पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला एक तरुण मंदिरात शिरला. त्याने मुकुटाचा सोन्याचा भाग काढला आणि तो खिश्यात घालून निघून गेला.

याआधी शुक्रवारी बांगलादेश पोलिसांनी सांगितलं की सोन्याच्या मुकुटाची चोरी होण्याच्या प्रकरणात त्यांनी एक व्यक्तीची ओळख पटवली आहे. मुकुट परत मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते कृष्ण मुखर्जी म्हणाले, "ही चोरीची एक सर्वसाधारण घटना असू शकते किंवा हा एक विचारपूर्वक करण्यात आलेला कट देखील असू शकतो. या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात यावा आणि त्यात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."

बांगलादेश सरकारची काय भूमिका आहे?

दरम्यान, बांगलादेश संगबाद संघ (बीएसएस) या सरकारी वृत्तसंस्थेनं सांगितलं की बांगलादेशचे तिन्ही सेनाप्रमुख - भूदल प्रमुख जनरल वाकर-उज-जमा, नौदल प्रमुख अॅडमिरल एम नजमुल हसन आणि हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल हसन महमूद खान यांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ढाक्यातील रमना काली मंदिराला भेट दिली.

युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ महमूद सजीब भुइया यांनी देखील शुक्रवारी (11 ऑक्टोबर) खुलना येथील गल्लामारी हरिचंद टॅगोर मंदिर आणि बागमारा गोविंदा मंदिरात दुर्गा पूजा मंडपात हिंदूंची भेट घेतली. तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या.

मागील महिन्याच्या सुरूवातीला इस्लामी गटांनी दिलेल्या धमक्या लक्षात घेऊन, बांगलादेशच्या हंगामी सरकारमधील धार्मिक बाबींचे सल्लागार एएफएम खालिद हुसैन यांनी हिंदू सण, उत्सवांच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा धार्मिक स्थळांवर, पूजेच्या ठिकाणांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल अशी चेतावणी दिली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.