मधुमेहामुळे जाणारी दृष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेने वाचू शकेल का?

    • Author, क्रिस्टिन रो
    • Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर

कृत्रिम बुद्धीमत्तेचा वैद्यकीय संशोधन आणि उपचारावर कसा परिणाम होतो याचा शोध घेणाऱ्या सहा लेखांच्या मालिकेचा हा दुसरा भाग.

टेरी क्वीन यांना मधुमेहाचं निदान झालं तेव्हा ते त्यांच्या विशीतच होते. इतक्या लहान वयापासूनच तपासण्या, औषधं मागे लागणार या उद्वेगाने त्यांनी मधुमेहाचा स्वीकार करणंही नाकारलं.

कधीतरी आपल्याला पाय कापावा लागणार याची खूप भीती त्यांच्या मनात होती. पण मधुमेहामुळे होणारी दुसरी गुंतागुंतीची स्थिती म्हणजे दृष्टी कमी होणं, त्याकडे त्यांनी कधी लक्षच दिलं नव्हतं. "माझी दृष्टी जाईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं," क्वीन सांगतात. इंग्लंडच्या उत्तरेकडे असलेल्या वेस्ट योर्कशायरमध्ये ते राहतात.

एकदा आपल्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी डायबेटिक रेटिनोपथीचं निदान केलं. डोळ्यांच्या रेटीना या भागातल्या रक्तवाहिन्यांना रक्तातली साखर सतत वाढलेली असल्याने नुकसान पोहोचतं तेव्हा हा आजार होतो. त्यावर उपचार म्हणून लेझर तंत्रज्ञान आणि काही इंजेक्शन्स घ्यावी लागणार होती.

पण डोळ्याला झालेली इजा भरून काढण्यासाठी पुरेसे उपचार उपलब्ध नव्हते. पुढे त्यांची दृष्टी इतकी कमी झाली की, रस्त्यातून चालत जाताना ते अचानक दिव्याच्या खांबाला धडकल्याने त्यांच्या खांद्यालाही दुखापत झाली. हळूहळू त्यांना स्वतःच्या मुलाचा चेहरा धुसर दिसू लागला. शेवटी त्यांना गाडी चालवणंही सोडून द्यावं लागलं.

"मला फार वाईट वाटलं. माणसाची सावली काहीही न करता फक्त मागे मागे चालते. तसं मला वाटत होतं," ते सांगतात.

गाईड डॉग्स फॉर ब्लाइंड असोशिएशन या संस्थेने त्यांना स्पेन्सर नावाच्या काळ्या रंगाच्या एका लॅब्रेडॉर कुत्र्याशी ओळख करून दिली. तोच त्यांचा आधार झाला. "त्याने माझा जीव वाचवला," क्वीन सांगतात. अंध व्यक्तींना असा कुत्रा उपलब्ध करून देण्यासाठी आता ते स्वतः निधी जमवण्याचं काम करतात.

इंग्लंडमध्ये नॅशनल हेल्थ सिस्टिमकडून मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी वर्षातून एक किंवा दोन वेळा डोळे तपासणीचं शिबीर आयोजित होत असतं.

अमेरिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे टाइप 2 प्रकारचा मधुमेह असलेल्या प्रत्येक प्रौढाने वर्षातून एकदा अशा तपासण्या करायला हव्यात. पण बहुतेक वेळा ते पाळलं जात नाही.

तपासण्या केल्यानं दृष्टी पूर्णपणे जाणं टाळता येऊ शकतं, सोमासा चन्ना सांगतात. त्या अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठात रेटीना तज्ज्ञ आहेत.

तपासण्यांची किंमत, संवादाचा अभाव आणि सेवा मिळण्यात सहजता नसणं अशा अडचणी अमेरिकेत येतात. तपासण्यांपर्यंत पोहोचणं रुग्णांसाठी सहज व्हायला हवं, असं डॉ. चन्ना यांना वाटतं.

डायबेटिक रेटिनोपथीच्या तपासणीत आरोग्य कर्मचारी डोळ्यांच्या आतल्या भिंतीचा म्हणजे फुंडूसचा एक फोटो काढतात.

सध्या त्या फोटोचा अर्थ कर्मचाऱ्यांना लावावा लागतो. "त्याने परत परत तेच काम करत बसावं लागतं," डॉ. चन्ना सांगतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेनं ही प्रक्रिया जलद होऊ शकते आणि तपासणीची किंमत कमी होऊ शकते असं काही तज्ज्ञ सांगतात.

डायबेटिक रेटिनोपथीचा विकास टप्प्याटप्प्यानं होत असतो. त्यामुळे त्याची प्रक्रिया ओळखण्याचं प्रशिक्षण कृत्रिम बुद्धीमत्तेला देता येऊ शकतं.

नेत्र तज्ज्ञांकडे जायची गरज आहे की नाही याचाही निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकते किंवा माणसांना फोटोंचं विश्लेषण करायला मदतही करू शकते.

असं एक तंत्रज्ञान पोर्तुगालमधल्या रेटमार्कर या कंपनीने बनवलं आहे.

हे तंत्रज्ञान संशयास्पद फुंडूसचे फोटो ओळखतं आणि काही समस्या असू शकते असे फोटो मानवी तज्ज्ञांना पाठवले जातात.

"साधारणपणे आम्ही हे साधन फक्त आधारासाठी वापरतो. मानवी तज्ज्ञांना हे तंत्रज्ञान माहिती पुरवतं आणि त्यावरून निर्णय घेतला जातो," जाओ डिआगो रामोस हे रेटमार्करचे प्रमुख सांगत होते.

या नव्या तंत्रज्ञानाची माणसांना भीती वाटत असल्याने त्यावर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही, असं त्यांना वाटतं.

स्वतंत्रपणे केलेल्या काही अभ्यासातून रेटमार्कर किंवा आयनुकचे आयआर्ट ही साधनं विश्वसनीय आहेत. त्यात पुरेशी संवेदनशीलता आणि विशिष्टता आहे असं समोर आलं आहे.

तंत्रज्ञानाच्या भाषेत आजाराचं निदान करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीला संवेदनशीलता म्हटलं जातं आणि आजार नसेल तर ते ओळखण्याला विशिष्टता म्हटलं जातं.

संवेदनशीलता जास्त असेल तर आजार नसतानाही आहे असं खोटं निदान केलं जाऊ शकतं. त्यानं रुग्णाच्या मनात काळजी निर्माण होते आणि गरज नसताना तज्ज्ञांकडे फेऱ्या माराव्या लागल्यानं खर्चही वाढतो. फोटोचा दर्जा कमी असेल, तरीही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधनं असं खोटं निदान करतात.

डायबेटिक रेटिनोथेरेपीचं निदान करण्यासाठी गुगलनंही असं एक कृत्रिम बुद्धिमत्तेचं साधन बनवलं आहे. त्याच्या कमरता शोधण्याचं काम गुगल हेल्थचे संशोधक करत आहेत.

या साधनाची प्रत्यक्ष चाचणी थायलंडमध्ये करण्यात आली. तेव्हा संशोधन केंद्रात काल्पनिक परिस्थितींपेक्षा वेगळ्या पद्धतीनं हे साधन काम करत असल्याचं लक्षात आलं.

त्यातली एक समस्या म्हणजे त्याच्या अल्गोरिदमला फुंडूसचा अतिशय अचूक फोटो लागतो. अनेकदा कॅमेराच्या लेन्सवर धूळ असेल, उजेड कमी-जास्त असेल किंवा कॅमेरा हाताळणाऱ्यांचं प्रशिक्षण कमी - जास्त झालं असेल तर असे अचूक फोटो येत नाहीत.

चांगली माहिती आणि वेगवेगळ्या लोकांकडून अभिप्राय घेऊन ही साधनं आणखी चांगली करता येतील.

पण आपल्या या साधनावर गुगलला पुरेपूर विश्वास आहे. थायलंड आणि भारतातल्या काही कंपन्यांना हे साधन वापरायला देणार असल्याचंही त्यांनी ऑक्टोबर महिन्यात जाहीर केलं होतं. थायलंड सरकारच्या आरोग्य विभागासोबत या साधनाची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही गुगलने सांगितलं होतं.

कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाची किंमत हा फार महत्त्वाचा पैलू असतो.

रेटमार्कर वापरून केलेल्या एका चाचणीला जवळपास 5 पाऊंड इतका खर्च येऊ शकतो, असं रामोस यांनी सांगितलं. एका दिवसांत किती चाचण्या होतात आणि चाचणी करण्याची जागा कोणती यावरून ही किंमत मागे-पुढे होऊ शकते. अमेरिकेत वैद्यकीय सेवांची किंमत साधारणपणे थोडी जास्तच लावली जाते.

सिंगापूरमध्ये डॅनियल एस डब्लू टिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डायबेटिक रेटिनोथेरपीची चाचणी करणाऱ्या तीन साधनांचा तुलनात्मक अभ्यास केला.

मानवी तज्ज्ञांना चाचणी करायला लावणारं साधन सगळ्यात जास्त महाग होतंं. पण पूर्णपणे मशीनकडून काम करून घेणारं साधनही स्वस्त नव्हतं. त्यात खोटं निदान होण्याचा धोका सर्वाधिक होता.

सगळ्यात स्वस्त साधनात मानवी तज्ज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असा दोन्हीचा वापर केलेला. पहिली चाळणी ही कृत्रिम बुद्धिमत्तेकडून लावली जात होती. त्यानंतर मानवी तज्ज्ञ तपासत होते.

सिंगापूरच्या आरोग्य सेवांंच्या आयटी मंचावर आता या संकरित साधनाचा समावेश करण्यात आलाय. 2025 पासून ते सगळीकडे वापरलं जाईल.

डायबेटिक रेटिनोथेरपी करण्यासाठी एक चांगली आणि सुस्थापित व्यवस्था सिंगापूरमध्ये आधीच असल्याने त्यांना पैसे वाचवणं शक्य आहे असं प्राध्यापक टिंग सांगत होते.

आरोग्यावर काम करणारी गैर सरकारी संस्था पाथमध्ये बिलाल मतीन प्रमुख कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी म्हणून काम करतात.

दृष्टी वाचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं हे इंग्लंडसारख्या श्रीमंत आणि चीनसारख्या मध्यम अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांना सहज परवडतं, असं ते म्हणतात. पण इतर अनेक देशातलं चित्र तसं दिसत नाही.

"कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता निदान करणं शक्य आहे की नाही असा प्रश्न विचारण्याऐवजी त्याचा वापर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य आहे की नाही असा प्रश्न विचारायला हवा. काही मोजक्या विशेषाधिकार असलेल्या लोकांपुरतं हे मर्यादीत राहू नये यासाठी ते किती चांगलं काम करतं यापेक्षा त्याबद्दल आणखी बरीच माहिती घेणं गरजेचं आहे,"असं मत ते व्यक्त करतात.

तर डॉ. चन्ना अमेरिकेतल्या आरोग्य सेवांमधल्या असमान वितरणाकडे बोट दाखवतात. या तंत्रज्ञानाने ही दरी भरून निघेल, अशी आशा त्यांना वाटते. "डोळ्यांची काळजी घेण्याबाबत फारशी माहिती नाही आणि सेवाही नाहीत अशा ठिकाणापर्यंत आपण हे तंत्रज्ञान नेलं पाहिजे," त्या म्हणतात.

वृद्ध लोकांनी आणि डोळ्यांच्या समस्या असणाऱ्यांनी नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. मधुमेहामुळं होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांकडे लक्ष देताना डोळ्यांच्या इतर आजारांकडे दुर्लक्ष व्हायला नको, असं त्यांना वाटतं. मायोपिया आणि ग्लुकोमा यासारख्या आजारांचं निदान करणं कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी अजूनही फार अवघड आहे.

अशी आव्हानं समोर असल्यामुळंच हे तंत्रज्ञान फार रोमांचित करतं, असं डॉ. चन्ना सांगतात.

"मधुमेह असलेल्या आपल्या सगळ्या रुग्णांच्या डोळ्यांची वेळेत चाचणी होताना पाहणं मला फार आवडेल. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या पाहता हा उपाय फार महत्त्वाचा असेल," त्या म्हणाल्या.

या नव्या तंत्रज्ञानानं योर्कशायरमध्ये राहणाऱ्या क्वीन यांच्याही मनात आशेचा किरण निर्माण केला आहे.

त्यांच्या आजाराचं निदान करण्यासाठी असं काही कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान उपलब्ध असलं असतं, तर "मी ते दोन्ही हातांनी घट्ट धरूनच ठेवलं असतं," असं ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)