ललित पाटील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी कोणते राजकीय खुलासे होणार?

ललित पाटील

फोटो स्रोत, PUNE POLICE

फोटो कॅप्शन, ललित पाटील

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीला घेऊन जाताना त्याने दावा केला की, "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं."

इतकंच नाही, तर "यामागे कोणाकोणाचा हात आहे ते सांगेन," असंही ललित पाटील म्हणाला.

ललित पाटीलच्या या दाव्यावर बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यातून एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार आहेत.”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन ड्रग्जची साखळी तोडली पाहिजे असं आम्ही यंत्रणांना सांगितलं आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांना नाशिकमधल्या कारखान्याची माहिती मिळाली. त्याच्यावर त्यांनी धाड टाकली.

“वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. निश्चितपणे त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी मी लगेच तुम्हाला सांगू शकत नाही. योग्य वेळी मी सांगेन. पण यातून एक मोठं नेक्सस आम्ही बाहेर काढणार आहोत.”

त्यामुळे ललित पाटीलच्या निमित्ताने नेमकी कोणती राजकीय गणितं रंगणार आणि काय खुलासे होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटकेत असलेला ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयामधून ड्रग्जची तस्करी करत असल्याचा उलगडा झाला आणि या पुणे पोलिसांना त्याचा ताबा मिळायच्या आधीच 2 ऑक्टोबरला तो रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

ललित पाटील फरार झाल्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, "ललित पाटील कसा बेपत्ता झाला आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला याची माहिती आमच्याकडे आहे. ती योग्य वेळी जाहीर करू."

या प्रकरणी ससूनमध्ये भेट द्यायला गेलेले पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांचा वरदहस्त असल्याचा दावा केला.

10 ऑक्टोबरला माध्यमांशी बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतलं.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "आरोग्य आणि गृह खातं कशातच गंभीर नाही हे दिसत आहे. ससूनमध्ये दाखल झालेल्या ललित पाटील संबंधात नाना पटोले यांनी नाशिकमध्ये काही मुद्दे मांडले ते विचार करण्यासारखे आहेत.

"ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी कोणत्या आमदारांनी फोन केले ते तपासणे आवश्यक आहे. ते फोन कॅाल दादा भुसेंचे होते का, दादा भुसेंचे कॉल रेकॅार्ड का चेक केलं जात नाही?”

यानंतर 13 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अंधारे आणि रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणात अजून दोन मंत्री, काही आमदार आणि भाजपच्या लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं. या सगळ्यांच्या दुबईमध्ये पार्ट्या झाल्याचाही दावा त्यांनी केला. या प्रकरणी संबंधितांची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी त्यांनी केली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

ललित पाटीलवर गिरिश महाजन यांचाही वरदहस्त असू शकतो, असा दावा देखील अंधारेनी केला.

अंधारेंच्या आरोपाला प्रत्युतर देताना गिरीश महाजन म्हणाले की, काही लोकांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल.

आता याच आरोपांच्या फैरीत भर पडत अंधारे यांनी या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला आहे.

अंधारे म्हणाल्या, "एकट्या ललित पाटीलने हे करणे शक्य आहे का? एकटे ससून रुग्णालयाचे प्रशासन हे करू शकत नाही. पोलिसही अशी रिस्क घेणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी करत आहे. या प्रकरणी मंत्र्यांसह सहभागी असणाऱ्या सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी अशी मागणी आहे.”

सुषमा अंधारे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, सुषमा अंधारे

सेना-काँग्रेसकडून सातत्याने आरोपांच्या फैरी झडत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणी पोलिस अधिकारी आणि ससूनचे डीन आणि इतर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पण यावर भाष्य करणं टाळलं.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हे मोठे प्रकरण असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली.

"ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलला पकडण्यात आले होते. मात्र एका नेत्याचा फोन आल्याने त्याला सोडून देण्यात आले," असा दावा रोहित पवार यांनी केला.

सत्ताधारी मंत्र्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. या आरोपांविषयी आणि ललित पाटीलने केलेल्या दाव्याविषयी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, "मला अंधारे यांचे वक्तव्य ऐकून हसू आले. एकदा दादा भुसेंचं नाव घेतलं. मग आणखी कोणाचे. आता एक्साईज मंत्री देसाईंचं नाव घेतलं. मी कायदेशीर सल्ला घेणार आहे.

"माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळावी म्हणून त्या अशी वक्तव्यं करत आहेत. पण या प्रकरणात माझा काही संबंध असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन.”

दादा भुसे

फोटो स्रोत, FACEBOOK/DADAJI BHUSE

फोटो कॅप्शन, दादा भुसे

नार्कोटेस्टसाठी माझी तयारी - दादा भुसे

तर दादा भुसे म्हणाले, "सुषमा अंधारेंनी मागणी केलेल्या चौकशीला सामोरे जायची आपली तयारी आहे. नार्को टेस्ट करा. असल्या आरोपांना मी भीक घालत नाही. चौकशीमध्ये काय ते समोर येईलच. असल्या कोणत्याही प्रकरणात संबंध आला तर राजकारण सोडण्याची माझी तयारी आहे. अंधारेंची आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्याचीही नार्को टेस्ट केली गेली पाहिजे.”

दरम्यान, याविषयी बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही क्राईम कंट्रोल कॅान्फरन्समध्ये ड्रग्ज नेक्सस तोडला पाहीजे हे स्पष्ट केलंं होतं. त्याच दरम्यान मुंंबई पोलिसांना या कारखान्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी धाड टाकली. ललित पाटील आता हातात आला आहे. त्यातून मोठं नेक्सस बाहेर येईल."

फडणवीस पुढे म्हणाले, "काही गोष्टी ज्या मला ब्रिफ झाल्या त्या लगेच तुम्हांला सांगू शकत नाही. योग्य वेळी सांगेन. पण मोठा नेक्सस बाहेर येईल. अनेक बोलणाऱ्यांची तोंडे बंद होईल. कोणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई करू."

राजकीय आरोप-प्रत्यापोरांमागे कारण काय?

ललित पाटीलवर होणाऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या मागे ललित पाटीलची अल्पावधीमध्ये बदललेली लाईफस्टाईल आणि तो नाशिकमध्ये असताना त्याचा राजकारण्यांसोबत असलेला वावर ही कारणे असल्याचं सांगितलं जातं.

या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ललित पाटीलचा दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांच्यासोबतचा आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. यात ललित पाटीलला उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असल्याचं दिसत आहे.

मूळचा नाशिकचा असणारा ललित पाटील पहिल्यांदा पोलिसांना सापडला तो चाकणच्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात. तब्बल 20 किलो एमडी ड्रग्जची तस्करी होत असताना पोलिसांनी आरोपींनी पकडलं आणि त्यात ललित पाटील देखील अटक झाला.

10 पर्यंतही शिक्षण पूर्ण न केलेल्या ललित पाटीलची मूळची आर्थिक पार्श्वभूमी देखील श्रीमंतीची नाही. पण अचानक त्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये इतका बदल झाला की तो कायम हाय एंड गाड्या वापरताना दिसत असल्याचं पोलिस तपासात नमूद करण्यात आलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ससूनमध्ये ललित पाटीलने ससून रुग्णालयात गेल्यावर दोन आयफोन मिळवले होते. पोलिसांच्या मते, यातल्या एका फोनची किंमत 1.1 लाख रुपये आहे. याचाच वापर करुन तो हे रॅकेट चालवत होता.

हे अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्याने रऊफ रहिम शेखला (वय 19) हाताशी धरले होते. शेखच्या माध्यमातून ससूनमधून तो अंमली पदार्थ पुरवायचा. या शेखकडेच हे पदार्थ पोहोचवण्यासाठी मंडल ते घेऊन जात होता.

हा प्रकार उघड झाल्यानंतर पाटील, राऊफ आणि मंडल विरोधात पुण्यातल्या बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये कलम 306/2023 आणि एनडीपीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 1 तारखेला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तारखेला शस्त्रक्रिया करायची असल्याने ललित पाटील रुग्णालयातच मुक्कामी होता.

शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी एक्स रे काढण्यासाठी त्याला 1 पोलिस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर घेऊन आला आणि त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन पाटील तिथून फरार झाला. ससूनमधून बाहेर येत त्याने रिक्षा पकडल्याचे त्याला आणलेल्या पोलिसाने जबाबात म्हटले आहे.

आज (18 ऑक्टोबर) ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याने आपण पळून गेलो नव्हतो, तर पळून जायला लावले होते, असा दावा केला आहे. इतकंच नाही तर यामागे कोण आहे याचे खुलासेही करणार असल्याचे त्याने म्हणले आहे.

मुंबई पोलिसांनी मात्र या प्रकरणारत काही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे सापडले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे यानिमित्ताने होणाऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चौकशी केली जाणार का हा सवाल विचारला जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)