‘ट्रान्सजेंडर फक्त सेक्सच करू शकतात, त्यांच्याकडे वकील होण्याची योग्यता नाही,’ मला ऐकवण्यात आलं होतं

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

केरळ आणि तमिळनाडूमध्ये वकिली करणाऱ्या दोन ट्रान्सजेंडर वकिलांनी त्यांचे अनुभव सांगताना सुशिक्षित लोकांमध्येही 'ट्रान्सफोबिया' (ट्रान्सजेंडरांबाबत पूर्वग्रह आणि भेदभाव) आढळत असल्याचं मत मांडलं.

तमिळनाडूच्या मदुराईतील विजी आणि केरळच्या कोच्चीतील पद्मालक्ष्मी यांनी सुशिक्षित लोकही त्यांच्याबरोबर गैरवर्तन करतात, असं याबाबत बोलताना सांगितलं.

अनेकदा लोक त्यांची खिल्ली उडवतात.

विजी मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठात तर लक्ष्मी केरळ हायकोर्टात वकिली करतात.

विजी तमिळनाडू आणि लक्ष्मी केरळच्या पहिल्या ट्रान्सजेंटर वकील आहेत, ज्या हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहेत.

आंध्र प्रदेशातून शिक्षण का घ्यावं लागलं?

26 वर्षं वय असलेल्या पद्मालक्ष्मी यांनी यावर्षी मार्च महिन्यात वकिली पेशामध्ये काम सुरू केलं.

"मी देखील मानव आहे, ट्रान्सजेंडरही मानवच असतात. आम्ही उपकार करा असं म्हणत नाही. केवळ समानतेची मागणी करत आहोत," असं त्या म्हणाल्या.

भौतिकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर लक्ष्मी यांनी एर्नाकुलम लॉ कॉलेजमधून शिक्षण घेतलं.

तर 38 वर्षांच्या विजी म्हणाल्या की, "मला आंध्रप्रदेशात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं, कारण तमिळनाडूच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं अत्यंत कठिण होतं. मला कोणीही प्रवेश द्यायला तयार नव्हतं.

प्रवेशासाठी नकार देण्यासाठी काहीतरी कारण ते शोधायचे. त्यात माझ्या बाबतीत वयाचाही एक मुद्दा होता. मी जवळपास 30 वर्षांची असताना प्रवेशासाठी प्रयत्न केले. पण प्रवेशासाठी कटऑफ वय 26 वर्षं होतं."

आज विजी यांचा वकिलीतील सहा वर्षांचा अनुभव आहे.

वकिली व्यवसायात उतरल्यानंतर या क्षेत्रातील वरिष्ठ त्यांच्याबरोबर चांगलं वर्तन करतील अशी त्यांना अपेक्षा होती.

विजी यांच्या मते त्या सुशिक्षित तर होत्याच, पण त्यांना कायद्याबाबतही चांगलं ज्ञान होतं.

साधारणपणे भारतात ज्युनियर वकील शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतात. पण विजी आणि लक्ष्मी यांना सुरुवातीला आलेल्या अनुभवांनी त्यांना धक्काच बसला.

एका वकिलाबरोबर काम करणाऱ्या विजी म्हणाल्या की, "जे लोक आम्हाला ओळखतात ते इतरांना आमची नावं सुचवतात, पण इतर लोक आमच्याकडं हीन भावनेनं पाहतात."

मन दुखावणारा अनुभव

विजी यांच्या उलट लक्ष्मी यांना आलेल्या अनुभवामुळं त्यांचं मन चांगलंच दुखावलं गेलं. समाजात ट्रान्सफोबिया आहे, यावर त्यांचा विश्वास बसला.

विजी यांना तुम्ही या व्यवसायात का आल्या? कायद्याचं शिक्षण घेऊन काय करणार? असे प्रश्न विचारण्यात आले.

"बहुतांश सिनियर प्रामाणिक नाहीत. ते माझ्यापासून दूर राहण्यासाठी मला पुढच्या महिन्यात सांगू असं वारंवार म्हणायचे. सुदैवानं मी बार काऊन्सिलचे अध्यक्ष प्रभाकरण यांच्या ज्युनियरच्या रुपात काम करू लागले," असं त्या म्हणाल्या.

दुसरीकडं लक्ष्मी यांनाही बरंच काही ऐकावं लागलं. "असं म्हणतात की ट्रान्सजेंडर फक्त सेक्सच करू शकतात. त्यांच्याकडे वकील बनण्याची योग्य पात्रता नाही," असं त्यांना ऐकवण्यात आलं.

लक्ष्मी म्हणाल्या,"एका वकिलांना माझ्या शारीरिक रचनेबाबत जाणून घेण्याची अधिक उत्सुकता होती. तर एका वकिलांनी माझ्याबरोबरचा अनुभव वाईट असल्याचं म्हटलं."

पण लक्ष्मी यांनी त्यांच्या लॉ कॉलेजच्या प्राध्यापक मारियाना आणि त्यांचे वकील पती अनिल कुमार यांच्याकडून धडा घेतला.

कुटुंबाचं वर्तन कसं होतं?

विजी आणि लक्ष्मी यांचे कुटुंबीय पाल्यांची वेगळी ओळख स्वीकारण्याच्या बाबतील इतर ट्रान्सजेंडर कुटुंबांच्या तुलनेत खूप पुढं होते.

"माझे आई वडील म्हणाले की, तू आमची मुलगी आहेस. समाज तुला खूप अपमानास्पद टोमणे मारेल, पण अशा नकारात्मक बाबींकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त करिअरवर लक्ष केंद्रीत कर. नाहीतर त्याचा भविष्यावर परिणाम होईल," असं लक्ष्मी म्हणाल्या.

आई-वडीलांच्या या सूचनेनंतरही पद्मालक्ष्मी यांच्याबरोबर जेव्हा एका सरकारी वकिलानं न्यायालयाच्या कक्षात अपमानास्पद शब्दांचा वापर केला, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं.

"मी माझ्या अशिलाची बाजू मांडू शकेल, असं एखादं प्रकरण न्यायालयासमोर आणणार का, हे विचारण्यासाठी मी त्यांच्याशी संपर्क केला होता," असं त्या म्हणाल्या.

"ते फक्त एक वकील किंवा सर्वसामान्य व्यक्ती नाहीत. ते राज्याचा आवाज आहेत. त्यांनी वक्तव्य करताना जबाबदारीनं करायला हवी. मी मुख्य न्यायाधीश, त्या न्यायालयाचे अध्यक्ष असलेले न्यायाधीश आणि केरळच्या कायदेमंत्र्यांना याबाबत लेखी तक्रार केली आहे. एक महिना त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणार आहे. त्यानंतर मी पुढं काय करायचं, ते ठरवेलं," असं लक्ष्मी म्हणाल्या.

"दुसऱ्या एका सरकारी वकिलांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असं लिहिलं की, मी अर्धवट डॉक्टर आहे. ती पोस्ट पाहून माझ्या काही अशिलांनी माझ्याकडून केसेस काढून घेतल्या. त्यामुळं माझं आर्थिक नुकसान झालं," असं त्या म्हणाल्या.

काही जणांनी मदतही केली

लक्ष्मी म्हणाल्या की, "असेही काही वकील आहेत जे मला बोलावून आपलं म्हणणं कसं मांडायचं ते सांगतात. तसं केल्याबद्दल मी त्यांचा फार आदर करते. यावरून काही काळजी घेणारे लोकही आहेत, हे लक्षात येतं."

दुसरीकडं विजी यांना काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडे जाऊन मदत मागावी लागली.

त्या म्हणाल्या, "मी गुन्हेगारी प्रकरणं अधिक पाहते. मी चांगला खटला लढते हे लोकांमध्ये पसरलं. त्यामुळं लोकांनी मला संपर्क करायला सुरुवात केली. मी सुरुवातीला विवाहाशी संबंधिक प्रकरणं पाहायचे."

लक्ष्मी यांनी युक्तीवाद केलेल्या पहिल्या प्रकरणात दिलासा मिळवून दिला. ते एक अॅसिड अॅटॅक पीडितेचं प्रकरण होतं. भारताचे पहिले ट्रान्सजेंडर आई-वडील जहाद आणि जिया यांची बाजू त्या मांडत होत्या.

तर एका प्रकरणात दाम्पत्याचं म्हणणं होतं की, त्यांच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात आई कोण आणि वडील कोण याऐवजी केवळ आई-वडिलांच्या नावाचा उल्लेख होता.

"ट्रान्स-पॅरेंटिंगमध्ये गर्भाशय असलेला एक ट्रान्समॅन मुल जन्माला घालू शकतं," असं लक्ष्मी म्हणाल्या.

त्या एका निराधार व्यक्तीच्या आरोग्याच्या अधिकाराशी संबंधित एक प्रकरण लढत आहेत.

उत्पन्नाच्या प्रश्नानावर त्या म्हणाल्या की, "मला अटकपूर्व जामीन आणि गुन्हेगारी प्रकरणांमधून कमाई मिळते."

इतर ट्रान्सजेंटर प्रमाणेच लक्ष्मीदेखील किशोरवयामध्ये त्याच्या लैंगिकतेबाबत संभ्रमात होत्या.

"पण मला नंतर लक्षात आलं की, मी एक महिला आहे आणि मलाही या जगात जगण्याचा अधिकार आहे. मी माझ्या इच्छेनुसार जगण्याचा निर्णय घेतला. माझे वडील आणि आई यांनीही मला साथ दिली. ते दोघं माझ्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहेत," असं त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)