फलटण महिला डॉक्टर प्रकरणात हे 7 महत्त्वाचे प्रश्न : तक्रारींकडे दुर्लक्ष ते निंबाळकरांवरील आरोप

फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणात कोणते 5 प्रश्न उपस्थित होत आहेत?

फोटो स्रोत, UGC

    • Author, टीम बीबीसी मराठी

साताऱ्याच्या फलटणमधील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. तळहातावरच लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या महिलेनं एका पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले होते.

या महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली. तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचं तसेच आणखी एका व्यक्तीचं नाव लिहिलं आहे.

त्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला, तर दुसऱ्या व्यक्तीने आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला असल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं केला आहे.

ज्या दोन व्यक्तींची नावे या पीडित महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यापैकी प्रशांत बनकर या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर दुसऱ्या आरोपीने स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

1. नातेवाईकांच्या आरोपांनुसार तक्रारींकडे दुर्लक्ष झाले का?

या महिला डॉक्टरने आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत वारंवार लिखित आणि रितसर तक्रारी केल्या होत्या. तरीही तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, अशी माहिती तिच्या काकांनी तसेच भावानेही माध्यमांशी बोलताना दिली आहे.

या महिला डॉक्टरने 19 जून 2025 रोजी फलटणच्या पोलीस उपअधीक्षकांना रितसर पत्र लिहून तक्रार केली होती.

या पत्रामध्ये या महिलेने लिहिलं की, "पेशंट (आरोपी) फीट नसतानाही तो फीट आहे, असा रिपोर्ट द्या, असा वारंवार दबाव माझ्यावर टाकतात आणि अपशब्दही वापरतात. यासंदर्भात मी पोलीस निरिक्षक यांना फोनद्वारे माहिती दिली असतान त्यांनी 'त्यामध्ये माझा काही संबंध नाही' असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली," असाही आरोप तिने या तक्रारीमध्ये केला होता.

या तक्रारीची कोणतीच दखल न घेतली गेल्याने महिला डॉक्टरने 13 ऑगस्ट रोजी माहिती अधिकारांतर्गत आरटीआयदेखील दाखल केला होता.

आपल्या तक्रारीचं पुढे काय झालं, याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न या आरटीआयद्वारे महिला डॉक्टरने केला होता. पण त्या आरटीआयलाही काही उत्तर प्राप्त झालं नसल्याचं या महिलेच्या भावाने सांगितलं आहे.

त्यानंतर आणखी एका पत्रात या महिलेने पुन्हा सविस्तर वर्णन करत आपल्या तक्रारी मांडल्या होत्या.

या महिला डॉक्टरवर चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स बनवण्यासाठी राजकीय तसेच पोलिसांकडूनही प्रचंड दबाव असायचा, अशी माहिती तिच्या भावाने दिली आहे.

तिला अशा खोट्या रिपोर्ट्ससाठी माजी खासदाराच्या पीएंकडूनही फोन यायचा, असाही आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमधील एका कार्यक्रमात

फोटो स्रोत, Facebook/ Ranjeetsingh Hinduraoji Naik Nimbalkar

फोटो कॅप्शन, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमधील एका कार्यक्रमात

महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या आतेभावानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'खासदारांच्या पीए'चा उल्लेख केला.

ते म्हणाले की, "माझी मामेबहीण मागच्या दोन वर्षांपासून फलटण येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती. मागच्या वर्षभरापासून खोटे किंवा चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता.

x/@sachin_inc

फोटो स्रोत, x/@sachin_inc

जूनमध्ये तिने डीवायएसपींकडे तक्रार दिली होती. पण उत्तर मिळालं नाही. त्यांनी चौकशी करून सांगतो, असं सांगितल्याचं तिनं पत्रात म्हटलंय. पत्रावर खासदार आणि त्यांचे दोन पीए एवढा उल्लेख आहे. नावं मात्र त्यांची नाहीत."

महिला डॉक्टरचं पत्रात आणि नंतर तिच्या नातेवाईकांनी 'खासदार आणि त्यांच्या दोन पीएं'चा उल्लेख केल्यानंतर या सर्व प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली.

2. विरोधकांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरील आरोप कोणते?

फलटणच्या या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले. विरोधकांनी त्यांचे नाव घेऊन आरोप केले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2025च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत नाईक निंबाळकर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी काही प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

  • एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?
  • ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?
  • महिला डॉक्टचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?
  • हे खासदार महोदय नेमके कोण? या महिला डॉक्टरला बीड वरून हिणवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?
  • 'पारदर्शक' आणि 'गतिमान' शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?
  • चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?
  • या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?

असे प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारले आहेत.

या उल्लेखानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले होते, "आमच्या दैनंदिन प्रवासात अनेक लोकांना फोन करतो. पण चॅट किंवा कुठल्या तक्रारीत असं तिनं कुठेच म्हटलं नाहीय की, रणजित निंबाळकरांनी फोन केला. माहिती दिली, इतकंच तिनं लिहिलंय. तिची तक्रार केवळ पोलिसांविषयी होती."

अंबादास दानवे यांच्या ट्वीटमधील पत्र

फोटो स्रोत, X/@iambadasdanve

फोटो कॅप्शन, अंबादास दानवे यांच्या ट्वीटमधील पत्र

अंबादास दानवे आपल्या एका ट्वीटमधील माहितीमध्ये म्हणतात,

  • मल्हारी अशोक चन्ने (42) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला.. असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक 21 ते 31 यावर हे स्पष्ट नमूद केले आहे.
  • याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी 'आपण बीडचे असल्याने आरोपीला 'फिट' देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे' असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे.
  • दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे.
  • महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे! आता एवढं दिल्यावर तापास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पी आय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल..

3. सुषमा अंधारेंनी केलेले आरोप किती गंभीर?

यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जयश्री अगवणे यांच्याबरोबर पुण्यामध्ये 27 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी आरोपींच्या फिटनेसबाबत माजी खासदार नाईक निंबाळकरांनी दबाव आणल्याचा आरोप केला. तसेच ऊस मुकादमांविरोधात निंबाळकरांनी गुन्हे दाखल केल्याचंही त्यांनी म्हटलं.

सुषमा अंधारे

फोटो स्रोत, Facebook/Sushma Andhare

फोटो कॅप्शन, सुषमा अंधारे

हे हॉटेल कोणाचे आहे हे तपासले पाहिजे, असं सांगत सुषमा अंधारे यांनी पत्रकारपरिषदेत एक फोटो दाखवला. 'त्यात जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि या हॉटेलच्या मालकाचा समावेश होता. आता नगराध्यक्षपदाचा भाजपाचा संभाव्य चेहरा असेल', असं त्या म्हणाल्या.

'या मुलीला हॉटेलवर का बोलावण्यात आलं होतं? हे हस्ताक्षर तिचं नाही असं तिच्या बहिणीचं म्हणणं आहे, मग हे तिच्या हातावर कोणी लिहिलं? तिची हत्या झाली की आत्महत्या?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

4. मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीनचिट दिली? त्याचा काय परिणाम होऊ शकतो?

यासर्व घडामोडीत आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्येच केलेल्या एका वक्तव्यानं,

फलटणमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रम झाला आणि त्यात बोलताना त्यांनी रणजित निंबाळकरांना एकप्रकारे क्लीनचिट देऊन टाकली.

3. तपासाआधी मुख्यमंत्र्यांची रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लीनचिट?

फोटो स्रोत, facebook/Ranjeetsingh Hinduraoji Naik Nimbalkar

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या ठिकाणी मी येऊ नये, अशा प्रकारचा प्रयत्नही झाला. कधी कधी काही गोष्टी दुर्दैवीही असतात. परवा आमच्या एका लहान बहिणीचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली.

आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटकही केली. त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

अलिकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं, असा अत्यंत निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्या घुसवण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहित आहे, एवढीशी तरी शंका असती, तर प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो.

अशा बाबतीत मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही, जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहे, तिथे मी कुठलीही तडजोड करत नाही. पण त्याचवेळी अशाप्रकारे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायचं कुणी प्रयत्न करत असेल, तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

स्वतः मुख्यमंत्र्यांनीच असं म्हटल्यामुळे याबाबत नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारे जाहीर वक्तव्य केल्यामुळे तपासावर दबाव येऊ शकतो अशी चर्चा आहे.

यावर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कशाच्या आधारावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीनचिट दिली? असा प्रश्न उपस्थित केला.

ते दोषी असते तर मी सोडलं नसतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, पण त्यांनी कोणाकोणाला असं सोडलंय याची मालिकाच मी सुरू करणार आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

पोलिसांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची याप्रकरणात चौकशी झाल्याचं जाहीर झालेलं नाही.

5. पोलिसांचं म्हणणं काय?

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "या तपासामध्ये दोघांनाही अटक झाली आहे. एकाला पुण्यातून अटक झाली, तर दुसऱ्याला पळून जाण्याचा पर्याय नव्हता तो हजर झाला. काल आम्हाला पीएम नोटस मिळाले, डीव्हीआर यावरुन ही आत्महत्या आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.

तसेच तिच्या हातावर असलेला मजकूर हा माहितीचा प्राथमिक स्रोत आहे. दोन्ही आरोपींशी तिचे चॅटिंग आणि इतर संबंध होते. शारीरिक, मानसिक छळ, बलात्कार याबद्दल काही पुरावे आमच्याकडे आहेत, मात्र तपास सुरू असल्यामुळे ते आता जाहीर करता येत नाहीत. तिनं हातावर लिहिलेल्या मजकुरासंदर्भातील पुरावे काही प्रमाणात आमच्याकडे आहेत."

पोलीस अधीक्षक तुषार दोशी.
फोटो कॅप्शन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी.

ते पुढे म्हणाले, "संबंधित महिलेची पोलिसांबद्दल एकच तक्रार दाखल झाली होती. आमचीही तिच्याविरोधात तक्रार होती. जी तक्रार महिलेनं केली होती, ग्रामीण पोलीस स्थानकात एकपानी तक्रार केली होती. त्यात पोलीस आरोपीला कधीही घेऊन येतात. अनफिट आरोपीला फिट करावं असा आग्रह करतात, असा त्यात आरोप होता."

ते पुढं म्हणाले, "याला मेडिकल रिपोर्ट म्हणत नाहीत. 'अनफिटला फिट करणे' या कथनाला पुराव्यादृष्ट्या काही मूल्य नाही, याच्यात प्रक्रियेचा भाग आहे. अटक झाल्यावर तत्काळ तपासणी होणं कायद्यानुसार अपेक्षित आहे. डॉक्टरनं ती करणं अपेक्षित आहे. त्यातून सूट नाही.

रात्री आरोपी आल्यावर ती महिला उशीर करते, तपासणी करायची नाही असा आरोप पोलिसांनी केला होता. यात कोणत्याही प्रकारे मेडिकल रिपोर्ट बदलण्याची तक्रार नव्हती. पीएम नोट्स बदलणे, पुरावा बदलणे अशी कोणतीही तक्रार नव्हती. ज्यांच्यावर आरोप होते त्यांनी त्यावर त्यांनी उत्तरं दिली आहेत. यात कोणतीही विभागीय चौकशी वगैरेचा संदर्भ नव्हता." असंही त्यांनी सांगितलं.

हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा असं सांगण्यात आलं होतं. तरीही ते प्रकरण थांबलं नाही. तत्कालीन पीआय आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी झाली. तेव्हा तिने चौकशीत काही आरोप केले. तेव्हाही ते सामोपचाराने सोडवावं असा निर्णय देण्यात आला.

सहकार्यानं हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तिला बदली करून घेण्याचंही सुचवण्यात आलं आहे. तरीही तिनं दोनवेळा 'फलटण ग्रामीण'चीच निवड केली होती. यानंतर (ऑगस्टमधील सामंजस्याच्या निर्णयानंतर) पोलिसांतर्फे आणि तिच्यातर्फे कोणतीही तक्रार राहिलेली नव्हती."

माजी खासदारांवर सुषमा अंधारे यांच्याद्वारे होणाऱ्या आरोपाबाबत तुषार दोशी म्हणाले, " राजकीय आरोप-प्रत्यारोप याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. एका महिलेने दुर्देवाने आत्महत्या केली आहे, तिनं हातावर दोन नावं लिहून ठेवली आहेत. त्यानुसार तपास सुरू आहे. त्यापलिकडे यात कोणताही संबंध नाही.

277 जणांवर एफआयआर नोंदले गेले वगैरे त्याचा काही संबंध नाही. ज्यांनी पीएम रिपोर्टबद्दल तक्रार केली आहे, त्याचाही पोलिसांशी संबंध नाही. त्याबद्दल आरोपपत्र दाखल झालं आहे. त्यात धनश्री पाटील आणि आताच्या आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांनी गळफासाने मृत्यू असं स्पष्ट लिहिलं होतं.

आत्महत्या केली आणि त्यासाठी सासरच्या लोकांनी प्रवृत्त केलं आणि त्याचं आरोपपत्र दाखल झालं. आता तिचे कुटुंबीय तो खून होता असं म्हणत आहेत. तपासातल्या तथ्यानुसारच निर्णय होईल.

पीएम रिपोर्टमध्ये मृत्यू अपघाती आहे का, आत्महत्या आहे का हे दिलं जात नाही. त्यात मृत्यूचं कारण दिलेलं असतं. तो कसा झाला हे पोलिसांचा तपास ठरवतो."

6. डॉक्टरच्या चारित्र्याबाबत चर्चा कशी सुरू झाली?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याचा तपास सुरू असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी सीडीआरची तपासणी केली त्यात काही बाबी पुढे आल्या आहेत. तसेच सीडीआर आणि फॉरेन्सिक तपास अजून सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.

फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत घटनेच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आवश्यक दिशा व उपाययोजना ठरविण्यात आल्या.

बैठकीदरम्यान डॉक्टर समुदायातील सुरक्षित कार्यपरिसर, मानसिक आरोग्य, तसेच महिला डॉक्टरांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

फोटो स्रोत, X/@ChakankarSpeaks

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "या घटनेच्या तपासात आणखीही काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी काढलेल्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDRs) नुसार, आत्महत्या नोटमध्ये नमूद केलेल्या गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याशी संबंधित डॉक्टरांचे काही संवाद आढळून आले आहेत.

जानेवारी ते मार्च दरम्यान गोपाल बदने यांच्यासोबत संवाद झाल्याचे दिसते, तर प्रशांत बनकर यांच्यासोबत घटनेच्या दिवशीही संवाद होता.

"ज्या दिवशी घटना घडली तो लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. त्या दिवशी या डॉक्टर प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या. तेव्हा फोटो नीट आले नाहीत अशा कारणावरुन त्या दोघांत वाद झाला आणि त्याचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं."

 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

फोटो स्रोत, X/@ChakankarSpeaks

"तेव्हा त्या घरातून निघून एका मंदिरात गेल्या, तेव्हा बनकर यांच्या वडिलांनी आपण संध्याकाळी सणाच्या दिवशी इथं थांबणं योग्य नाही असं सांगितलं आणि समजूत काढून पुन्हा एकदा घरी नेलं. मात्र तरिही त्यानंतर लॉजवर राहायला गेल्या."

'मग रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केले. मी आत्महत्या करेन असाही फोटो पाठवून आरोप केला. त्याला याआधीही तू आत्महत्या करण्याचे मेसेज केले आहेस असं उत्तर बनकरने दिलं आहे'', अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

या डॉक्टरच्या नावाचा उल्लेख करुन तिच्याबद्दल विधानं करणं, तिच्या चारित्र्याबद्दल सुचक वक्तव्यं होणं असे प्रकार गेल्या दोन दिवसांत सुरू झाले आहेत.

यावर सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

वर्षा देशपांडे म्हणाल्या, "तिच्या चारित्र्याची चर्चा थांबवा, तिच्या कुटुंबाला होणारा त्रास थांबवा. तिच्यावर अन्याय होत होता, तिनं प्रशानातल्या दबावाची तक्रार केली म्हणून तिला त्रास होत होता.

न्यायाधीशांनीही याप्रकारे अशी विधानं होत असतील ती बरोबर नाही अशी समज दिली पाहिजे. हे न्यायासनासमोर गेला पाहिजे."

वर्षा देशपांडे
फोटो कॅप्शन, ॲड. वर्षा देशपांडे

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना ॲड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, "ज्यावेळेस पोलिसांशी संबंधित घटना घडते तेव्हा कोर्टात सिद्ध करताना आरोपी विभागाची फार मदत लागते. त्यासंदर्भातले सर्व पुरावे, साक्षी कोर्टात सिद्ध करावे लागतात तेव्हा आरोपी विभागाची फार मदत लागते. मात्र अनेकदा असं होतं की अनेक अधिकारी फितूर होऊन मॅनेज केलं जातं असा आमचा अनुभव आहे."

"महिलेनं काहीतरी चुकीचं करायला नकार दिला, प्रशासकीय दबावाला ती बळी पडत नाहीये म्हणून तीन महिने तिच्यावर दबाव आणला जात होता.

त्याला बळी न पडता तिनं स्वतःच्या हस्ताक्षरात व्यवस्थेला जाब विचारणारी खरमरीत पत्रं लिहिली आहेत. असं असताना तातडीनं प्रशासनाकडून जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळाला नाही.

विशाखा समितीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशाखा समिती महिला आयोगानुसार राजकीय आहेत. त्या व्यवस्थेला क्लीनचिट देतात. इथं या समितीनं कामकाज केलंय की नाही हे पण समजलेलं नाही."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

त्या पुढे म्हणाल्या, "बलात्कारासंदर्भात वर्मा आयोगानं अनेक सुचना केल्या आहेत. समजा जरी मालक आणि नोकर यांच्यात सहमतीने संबंध प्रस्थापित झाले असले तरी ज्या टप्प्याला ती तक्रार करते तेव्हा तो बलात्कार समजला पाहिजे असं त्यात स्पष्ट म्हटलं आहे.

त्यामुळे आपण क्षणभर गृहित धरलं तरी की काही गोष्टी सहमतीनं होत होत्या आणि त्या तिनं शेवटच्या टप्प्यात लिहून ठेवल्या. तरीही हे तिच्याच बाजूने उभं राहातं."

"कोणीतरी एक व्यक्ती अशाप्रकारे आयुष्य संपवतंय आणि आपण तिच्या चारित्र्याबद्दल अशाप्रकारे बोलतोय हे चीड आणणारं आहे. ती जीव देतेय, ती आनंदात जगू शकली असती. तिनं कसं जगावं हे तिच्या वैयक्तीक खासगी जीवनाचा भाग आहे.

त्यावर चर्चा करणंही गुन्हा आहे. ज्याप्रकारे प्रशासनातले लोक, तथाकथित मंडळाच्या अधिकारी त्यावर चर्चा करत आहेत आणि तपास कुठल्या बाजूने नेणार हे सांगत आहेत हे चीड आणणारं आणि कायद्याच्या विरोधात आहे."

"धाडसानं तक्रार करणाऱ्या महिलेलाही तुम्ही न्याय देत नसाल आणि तिला आत्महत्या करावी लागते तरीही तुम्ही तिच्याच चारित्र्याची चर्चा करता. लोक याला आत्महत्या म्हणतात, मी याला हत्या म्हणते.

यात सगळंच संशयास्पद आहे. गावात खोली असून ती हॉटेलवर गेली हे सगळंच संशयास्पद आहे. हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचा आणि गुन्हे मॅनेज करणारं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याचा ती बळी आहे."

7. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रतिक्रियेतून काय दिसतं?

विरोधकांनी त्यातही सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः उत्तर दिलेले नाही. 27 ऑक्टोबर रोजी त्यांच्या वकिलांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत एक ते दोन दिवसात स्वतः निंबाळकर बोलतील असं सांगण्यात आलं.

या पत्रकारपरिषदेत निंबाळकर यांची बाजू त्यांचे वकील धीरज घाडगे यांनी मांडली.

धीरज घाडगे म्हणाले, "आम्ही प्रत्येक आरोपाचं खंडन केलं आहे. लेखी माफी मागायला सांगितलं आहे अन्यथा 50 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी.

ज्या माध्यमांसमोर त्यांनी बेताल वक्तव्य केलंय त्यांच्यासमोरच त्यांनी माफी मागावी. आम्ही सुषमा अंधारे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या जयश्री दिगंबर अगवणे यांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे."

फलटणमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Facebook/Ranjeetsingh Hinduraoji Naik Nimbalkar

फोटो कॅप्शन, फलटणमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यापुढे घाडगे म्हणाले, "निंबाळकर यांनी ऊस मुकादमांविरोधात 277 एफआयआर दाखल केले हे खोटं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पोलीस फलटण ऊस मुकादमाविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही असं पत्रच दिलं आहे.

एकही गुन्हा ऊस मुकादमाविरोधात रणजित नाईक निंबाळकरांनी दाखल केलेला नाही. तरीही सुषमा अंधारे यांनी खोटा आरोप केला आहे."

ते पुढं सांगतात, "ऊस मुकादमांना उचलून आणणं, मारहाण करणं, पोलिसांकडून अनफिट असतानाही फिट असल्याचं पत्र घेण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी डॉक्टरांवर दबाव आणला असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. मात्र असा एकही प्रसंग कधीच घडलेला नाही."

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातर्फे बोलताना धीरज घाडगे

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातर्फे बोलताना धीरज घाडगे

"गुन्हा दाखल झाल्यावर, अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झाल्यावर संबंधिताला मॅजिस्ट्रेटसमोर उभं केलं जातं. तेव्हा त्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेट पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? असा प्रश्न विचारतात. तेव्हा आरोपीला पुरेपूर संधी असते.

आज अखेर पोलिसांनी किंवा रणजित निंबाळकरांनी अशी मारहाण केल्याचं सांगितलेलं नाही. पोलीस कस्टडी रिमांड संपल्यावरही संधी मिळते तेव्हाही कोणी तक्रार दाखल केलेली नाही.

त्याचप्रमाणे जामिनानंतर खासगी वैद्यकीय तपासणी करुन आरोप करण्याचे प्रयत्न होतात. त्याप्रकारे आजही रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर असा गुन्हा दाखल केलेला नाही. 277 गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा नाईक निंबाळकरांनी दाखल केलेला नाही."

"सुषमा अंधारे ज्यांच्यासोबत जयश्री अगवणेंबरोबर बसल्या होत्या त्यांच्यावर मोकाचा आरोप आहे, फलटण पोलीस ठाण्यावर हल्ला करुन पोलीस ठाण्याचं नुकसान केलं. तिथल्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त केल्यामुळे त्यांच्यावर 353 आणि 307 खाली गुन्हा दाखल केला आहे."

त्या मयत डॉक्टरबद्दल सहानुभूती दाखवायला आल्या की, राजकारण करायला आल्या, असा प्रश्नही घाडगे यांनी उपस्थित केला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ते म्हणाले, "त्या संबंधित व्यक्तीच्या घरी गेल्या की, पुण्यात बसून चुकीच्या व्यक्तीच्या साथीने खोट्या कागदपत्रांद्वारे आरोप केले."

नंदकुमार ननावरे यांनी नाईक निंबाळकरांच्या त्रासामुळे आत्महत्या केली असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.

त्यावर धीरज घाडगे म्हणाले, "धनंजय ननावरे या त्यांच्या बंधुंनी आपल्या भावाच्या मृत्यूशी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध नाही. केवळ नामसाधर्म्य आहे, असं सत्र न्यायालयातच सांगितलं आहे.

ही व्यक्ती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नसून दुसरी रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे. असे 21 रणजित निंबाळकर नावाचे लोक फलटणमध्ये आहेत. हे सुषमा अंधारे जाणिवपूर्वक विसरल्या."

तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी कोट्यवधी रुपये उचलून बँका बुडवल्या असं अंधारे म्हणतात.

पण निंबाळकरांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. सुषमा अंधारे यांनी या बँकांची नावं जाहीर करावीत, असं आवाहन धीरज घाडगे यांनी दिले.

घाडगे म्हणाले, " सुषमा अंधारे यांनी मयत भगिनीच्या घरी जाऊन सहानुभुती व्यक्त करायला हवी, पोलीस अधिकाऱ्यांकडे तपासासाठी अर्ज करायला हवा होता, जनहित याचिका दाखल करायला हवी होती नातेवाईकांना घेऊन सीआयडी, सीबीआयकडे देण्यात यावा यासाठी याचिका दाखल करायला हवी होती.

केवळ रणजित नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी केलेल्या आरोप सिद्ध करुन दाखवावा किंवा खोटी वक्तव्यं केल्याबद्दल माफी मागावी."

फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणात कोणते 5 प्रश्न उपस्थित होत आहेत?

फोटो स्रोत, UGC/Getty images

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)