You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कालमेगी चक्रीवादळानंतर फिलीपिन्सवर फू-वाँग चक्रीवादळ धडकणार, लाखो जणांनी घेतला सुरक्षित ठिकाणी आश्रय
- Author, कॅथरिन आर्मस्ट्राँग आणि आंद्रे ऱ्होडन-पॉल आणि लूलू लुओ
- Role, बीबीसी न्यूज
चक्रीवादळामुळे फिलीपिन्ससमोर मोठं संकट निर्माण केलं आहे.
फिलीपिन्समध्ये फू-वाँग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून रविवारी (9 नोव्हेंबर) संध्याकाळी 9 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
फिलीपिन्सच्या हवामान विभागानुसार, जवळपास 185 किमी/तास (115 मैल प्रति तास) वेगानं वारे आणि 230 किमी/तास (143 मैल प्रति तास) वेगानं वादळी वारे वाहत असल्यामुळे या वादळाचं रूपांतर टायफूनवरून सुपर टायफूनमध्ये झालं आहे.
फिलीपिन्सच्या पूर्वेकडील बिकॉल प्रदेशाला रविवारी (9 नोव्हेंबर) सकाळी या वादळाचा पहिला थेट फटका बसला. लुझॉन या भागात फिलीपिन्समधील बहुतांश लोकसंख्या राहते. या भागाला रविवारी (9 नोव्हेंबर) रात्री वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
फिलीपिन्सच्या हवामान विभागानं इशारा दिला आहे की हे वादळ देशाच्या वायव्येला असणाऱ्या लुझॉन प्रदेशाकडे सरकत असताना "3 मीटर (10 फूट) हून अधिक उंच भयानक आणि जीवघेण्या लाटांचा मोठा धोका आहे."
शाळा बंद, उड्डाणं रद्द, जोरदार वाऱ्यांना सुरूवात
फू-वाँग (स्थानिक पातळीवर याला उवान म्हणतात) हे चक्रीवादळ येत आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या कालेमगी या वादळानं मोठ्या प्रमाणात विनाश केला आणि त्यात जवळपास 200 लोक मृत्युमुखी पडले.
खबरदारी म्हणून सोमवारी (10 नोव्हेंबर) अनेक शाळा बंद असणार आहेत किंवा ऑनलाईन स्वरुपात वर्ग घेतले जाणार आहेत. तसंच जवळपास 300 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
फिलीपिन्सच्या बेलर आणि कॅसिगुरान जिल्ह्यांदरम्यान कोणत्यातरी भागात फू-वाँग हे वादळ जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र लुझॉनवर धडकत असताना त्याचा जोर टायफून श्रेणीतीलच राहण्याची शक्यता आहे.
लुझॉनच्या काही भागात 200 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अगदी मनिला शहराच्या परिसरातदेखील 100-200 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची आणि भूस्खलन होण्याची शक्यता आहे.
फिलीपिन्सच्या पूर्व किनाऱ्यावर आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांना सुरूवात झाली आहे, असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यानं शनिवारी (8 नोव्हेंबर) संध्याकाळी सांगितलं.
या वादळाचा फिलीपिन्सच्या बऱ्याच भागाला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र तरीदेखील ज्या भागावर हे वादळ थेट धडकणार आहे, त्या भागांबद्दल विशेष चिंता व्यक्त केली जाते आहे. यात पूर्वेकडील बिकॉल प्रदेशातील कॅटांडुआनेस या बेटाचा समावेश आहे. रविवारी (9 नोव्हेंबर) सकाळी तिथे हवामान अत्यंत खराब होतं.
मोठ्या संख्येनं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
वादळ आणि मुसळधार पावसामुळे असलेला धोका लक्षात घेऊन या भागातील तसंच सखल आणि किनारपट्टीच्या भागातील लोकांना रविवारी (9 नोव्हेंबर) सकाळपर्यंत उंचावरील भागात जाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
फिलीपिन्सच्या पूर्व लुझॉनमधील ऑरोरा प्रदेशात बीबीसी न्यूज हगुनॉय या एका 21 वर्षांच्या तरुणाशी बोललं. तो साबांगमधील किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेलपैकी एका हॉटेलमध्ये काम करतो.
हगुनॉय म्हणाला, गेल्या काही दिवसांत या भागात पोलीस वारंवार आले आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची खातरजमा पोलीस करत होते. रविवारी (9 नोव्हेंबर) सकाळी सर्व हॉटेल पूर्ण रिकामी झाली होती.
समुद्राच्या भरतीचं पाणी वेगानं वाढत असताना हगुनॉय म्हणाला, हॉटेलच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी त्याला जितका वेळ तिथं राहणं शक्य असेल तितका वेळ तो तिथे राहील आणि त्यानंतर सुरक्षेसाठी मोटरसायकलवर घरी जाईल.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलचे दरवाजे बंद केले होते आणि वादळी वाऱ्यांमुळे खिडकीच्या काचा फुटू नसेत यासाठी खिडक्या दोरीनं घट्ट बांधल्या होत्या.
200 हून अधिक जण फिलीपिन्समधील मध्य ऑरोरा भागात असणाऱ्या एका क्रीडा संकुलातील निवाऱ्यात पोहोचले आहेत. अनेक पालकांसोबत त्यांची लहान मुलंदेखील आहेत.
हैयान चक्रीवादळानं केला होता मोठा विनाश
टायफून हैयान हे वादळ 2013 मध्ये फिलीपिन्सवर धडकलं होतं. त्यावेळेस या वादळानं मोठा विनाश केला होता. त्यात 6,000 हून अधिकजण मारले गेले होते. या लहान मुलांना त्याची कल्पनाही नसेल.
फू-वाँग वादळापूर्वी यावर्षी फिलीपिन्समध्ये कालमेगी वादळ आलं होतं. ते यावर्षातील सर्वात भयंकर वादळांपैकी एक होतं. त्यानंतर आता फूग-वाँग वादळ येत असल्यामुळे बचाव कार्यामध्ये देखील अडथळे निर्माण झाले असून, त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागलं आहे.
मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून चिखल-मातीचा जणूकाही पूरच आला. तो निवासी भागांमध्ये साचला. अचानक आलेल्या जोरदार पुरामुळे काही गरीब लोकवस्त्या नष्ट झाल्या.
आधीच्या वादळामुळे फिलीपिन्समध्ये किमान 204 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिकजण अजूनही बेपत्ता आहेत.
व्हिएतनाममध्ये देखील वादळाचा तडाखा बसला असून तिथे पाचजणांचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे तिथे झाडं उन्मळून पडली, घरांचे छप्पर उडाले आणि मोठ्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
सरकारी यंत्रणा सज्ज, नागरिकांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न
कालमेगी वादळानंतर झालेल्या विनाशानंतर आणि आता येऊ घातलेल्या नव्या वादळाच्या तयारीसाठी फिलीपिनो सरकारनं याला नैसर्गिक आपत्ती जाहीर केलं आहे.
त्यामुळे सरकारी यंत्रणांना आपत्कालीन निधी मिळवता येणार आहे. तसंच अत्यावश्यक वस्तू आणि सेवा गरजवंतांपर्यंत अधिक वेगानं पोहोचवता येणार आहेत.
कालमेगी वादळामुळे झालेल्या विद्ध्वंसामुळे फिलीपिन्समधील काही लोकांना आता येऊ घातलेल्या नव्या वादळाबद्दल अधिक चिंता वाटते आहे.
"अलीकडेच आलेल्या वादळामुळे आमच्या भागात पूर आले होते. त्यामुळे आता येत असलेल्या वादळापूर्वी आम्ही सुरक्षित स्थळी जाण्याचं ठरवलं. आता मला फक्त माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं आहे," असं नॉर्लिटो दुगन एएफपी या वृत्तसंस्थेला म्हणाले.
लुझॉन प्रदेशातील सोरसोगोन या शहरातील एका चर्चमध्ये काहीजणांनी आश्रय घेतला आहे. नॉर्लिटो हे त्यापैकी एक आहेत.
मॅक्सिन दुगन या आणखी एक रहिवासी म्हणाल्या, "माझ्या घराजवळच्या लाटा आता प्रचंड झाल्या आहेत. त्यामुळे मी इथे आले आहे."
चक्रीवादळांना सतत तोंड देणारा फिलीपिन्स
फिलीपिन्स हा पॅसिफिक महासागरातील उष्णकटिबंधीय प्रदेशातील देश आहे. जगात चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांपैकी तो एक आहे.
फिलीपिन्समध्ये दरवर्षी जवळपास 20 उष्णकटिबंधीय चक्रीवादळं येतात. त्यातील निम्मी वादळं थेट या देशावर धडकतात आणि विध्वंस करतात.
जगभरातील चक्रीवादळं, टायफून आणि वादळांच्या वाढत्या संख्येमागे हवामान बदल आहे, असं मानलं जात नाही.
मात्र हवामान बदलामुळे महासागरातील वाढलेलं तापमान आणि वातावरणातील वाढलेलं तापमान यांचा संयुक्त परिणाम होतो आहे. त्यामध्ये चक्रीवादळांचा परिणाम आणखी तीव्र होण्याची क्षमता आहे.
याचा परिणाम होत, वाऱ्याचा वेग वाढू शकतो किंवा वादळी वारे वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो आणि किनारपट्टीवर पूर येण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.