एपस्टीन फाईल्समधून कोणती माहिती समोर आली? जगभरातील कोणत्या दिग्गजांच्या नावांचा उल्लेख

    • Author, ख्रिस्तल हेस
    • Role, बीबीसी

अमेरिकेच्या न्याय विभागाने (यूएस जस्टिस डिपार्टमेंट) जेफ्री एपस्टीनशी संबंधित सुरुवातीच्या कागदपत्रांचा एक भाग सार्वजनिक केला आहे.

जेफ्री एपस्टीनची सर्व कागदपत्रं शुक्रवारपर्यंत (19 डिसेंबर) जाहीर करावीत, असं अमेरिकेच्या काँग्रेसनं कायदा केला होता.

या कागदपत्रांमध्ये फोटो, व्हीडिओ आणि तपासाची माहिती होती. परंतु, न्याय विभागाने ती सगळी कागदपत्रं अंतिम मुदतीपर्यंत जाहीर करणं शक्य नसल्याचं सांगितलं.

या पहिल्या फाईल्समध्ये अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांची नावं आहेत. ज्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर आणि संगीतकार मिक जॅगर व मायकेल जॅक्सन यांचा समावेश आहे.

फाईल्समध्ये नाव असणं किंवा फोटो असणे म्हणजे त्या लोकांनी चुकीचं काम केलं आहे, असं नाही.

अनेकांनी, म्हणजे ज्यांची नावं एपस्टीन फाईल्समध्ये किंवा पूर्वीच्या दस्तऐवजांमध्ये आले आहे, त्यांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं नाकारलं आहे.

'अजूनही लाखो पानं जाहीर झालेली नाहीत'

शुक्रवारी जाहीर केलेल्या फाईल्समध्ये अनेक माहिती रिडॅक्ट (संवेदनशील, गोपनीय किंवा खासगी माहिती जाणीवपूर्वक काढून टाकणं) केलेली होती, ज्यात पोलिसांचे निवेदन, तपास अहवाल आणि फोटो आहेत.

ग्रँड ज्युरी तपासाशी संबंधित एका फाईलमधील 100 हून जास्त पानं पूर्णपणे काळी (ब्लॅक आऊट) केली आहेत.

कायद्यात नमूद केल्याप्रमाणे अधिकार्‍यांना पीडितांची ओळख लपवण्यासाठी किंवा सक्रिय गुन्हेगारी तपासाशी संबंधित माहिती रिडॅक्ट करण्याची परवानगी होती. परंतु, कायद्यानुसार त्यांनी ते रिडॅक्ट का केलं हे सांगणं आवश्यक होतं, आणि ते अजून सांगितलं गेलेलं नाही.

न्याय विभागानुसार, शुक्रवारी जाहीर केलेली हजारो पानं फक्त येणाऱ्या फाईल्सचा केवळ एक भाग आहे.

न्याय विभागाने शुक्रवारी 'लाखो पानं' जाहीर केली आणि येत्या काही आठवड्यांत 'आणखी काही लाखो पानं' जाहीर होण्याची अपेक्षा आहे, असं डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल टॉड ब्लँचे यांनी म्हटलं आहे.

त्यांनी फॉक्स अँड फ्रेंड्सला सांगितलं की, न्याय विभाग प्रत्येक पान काळजीपूर्वक तपासत आहे, जेणेकरून 'प्रत्येक पीडित, त्यांचं नाव, ओळख आणि त्यांची गोष्ट, जी सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, ती पूर्णपणे सुरक्षित राहील'. ही एक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी वेळ लागतो, असा युक्तिवादही त्यांनी केला.

आणखी किती वेळेत उर्वरित कागदपत्रं जाहीर होतील हे अस्पष्ट आहे, आणि दोन्ही पक्षातील कायदे बनवणाऱ्यांनी या बाबतीत निराशा व्यक्त केली आहे.

डेमोक्रॅट्समध्ये काँग्रेसचे रो खन्ना यांच्यासह काही नेत्यांनी न्याय विभागातील सदस्यांविरुद्ध कारवाईची धमकी दिली आहे, ज्यात विलंब झाल्याबद्दल महाभियोग किंवा संभाव्य खटला सुरू करण्याचा समावेश आहे.

खन्ना यांनी रिपब्लिकन काँग्रेसचे थॉमस मॅसी यांच्यासमवेत 'एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी अ‍ॅक्ट'वर मतदान करायला भाग पाडलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीला आपल्या पक्षाला या अ‍ॅक्ट विरोधात मतदान करण्यास सांगत होते.

त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, "न्याय विभागाने लाखो पानांच्या फाईल्स कायद्याप्रमाणे जाहीर केल्या नाहीत." त्यांनी एका व्हीडिओत म्हटलं की, सर्व पर्याय विचारात घेतले जात आहेत आणि ते स्वतः आणि मॅसी यांच्याद्वारे तपासले जात आहेत.

पूल आणि हॉट टबमधील बिल क्लिंटन यांचे फोटो

प्रसिद्ध झालेल्या अनेक फोटोंमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या फोटोंचाही समावेश आहे.

एका फोटोमध्ये ते स्विमिंगपूलमध्ये पोहताना दिसतात. तर दुसऱ्या फोटोत ते हॉट टबमध्ये डोक्याखाली हात ठेवून पाठ टेकवून पडलेले दिसतात.

1990 आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात, एपस्टीनला अटक होण्यापूर्वी, बिल क्लिंटन यांचे एपस्टीनसोबत अनेक वेळा फोटो काढण्यात आले होते.

मात्र, एपस्टीन पीडितांनी क्लिंटन यांच्यावर कोणताही आरोप केलेला नाही, आणि क्लिंटन यांनीही एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांची माहिती आपल्याला नव्हती, असं सांगितले आहे.

या नव्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने हे फोटो अनेक दशकांपूर्वीचे असल्याचे सांगितलं.

"ते 20 वर्षांहून जुने, अस्पष्ट फोटो कितीही जाहीर करू शकतात. पण हा विषय बिल क्लिंटन यांच्याबद्दल नाही. कधीच नव्हता आणि कधी नसेलही," असे एंजल उरेना यांनी सोशल मीडियावर लिहिलं.

"येथे दोन प्रकारचे लोक आहेत. पहिला गट- ज्यांना काहीही माहिती नव्हती आणि एपस्टीनचे गुन्हे उघडकीस येण्यापूर्वीच त्यांनी त्याच्याशी संबंध तोडले. दुसरा गट- ज्यांनी गुन्हे समोर आल्यानंतरही त्याच्याशी संबंध ठेवले. आम्ही पहिल्या गटात येतो. दुसऱ्या गटातील लोकांनी कितीही विलंब केला तरी हे बदलणार नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं.

"प्रत्येकजण, विशेषतः 'मागा' (राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा- 'मेक अमेरिका ग्रेट अगेन') समर्थकांना, स्पष्ट उत्तरं हवी आहेत."

'एपस्टीनने 14 वर्षांच्या मुलीशी ट्रम्प यांची ओळख करून दिल्याचा आरोप'

न्याय विभागाने जाहीर केलेल्याफाईल्समध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख असलेली न्यायालयीन कागदपत्रं देखील आहेत.

या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, एपस्टीनने फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या मार-अ-लागो रिसॉर्टमध्ये 14 वर्षांच्या मुलीची ट्रम्प यांच्याशी ओळख करून दिल्याचा आरोप आहे.

कागदपत्रांनुसार, 1990 च्या दशकातील त्या कथित भेटीत एपस्टीनने ट्रम्प यांना 'कोपराने हलकाच स्पर्श केला' आणि त्या मुलीचा उल्लेख करत "ही चांगली आहे ना?" असं विचारलं.

2020 मध्ये एपस्टीनच्या इस्टेट आणि गिलीन मॅक्सवेल यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात, ट्रम्प यांनी हसत मान हलवून सहमती दर्शवली, असं नमूद केलं आहे.

कागदपत्रांनुसार, 'ते दोघंही हसले' आणि त्या वेळी तिला अस्वस्थ वाटलं, पण "तेव्हा ती इतकी लहान होती की, अस्वस्थ का वाटत आहे? हे तिला समजलंही नाही", असं त्यात म्हटलं आहे.

पीडितेचा आरोप आहे की, एपस्टीनने अनेक वर्षे तिची फसवणूक करून तिला मानसिकरीत्या तयार केलं आणि तिच्यावर अत्याचार केले.

न्यायालयात तिने ट्रम्प यांच्यावर कोणताही आरोप केला नाही, आणि एपस्टीनच्या पीडितांनीही त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

बीबीसीने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे.

शुक्रवारी जाहीर झालेल्या हजारो फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्षांचा फारच कमी उल्लेख आहे. काही फोटो आहेत, पण फाईल्समध्ये त्यांचा समावेश फारच कमी आहे.

ट्रम्प वॉर रूम, राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय अधिकृत एक्स अकाऊंटवरून बिल क्लिंटन यांचे फोटो पोस्ट करत होते. ट्रम्प यांच्या प्रेस सचिवांनीही क्लिंटन यांचे फोटो पुन्हा शेअर करत 'ओ माय!' असं लिहिलं.

मात्र, अजूनही काही पानं जाहीर व्हायची बाकी आहेत.

डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल टॉड ब्लँचे म्हणाले की, 'लाखो' पानांच्या फाईल्स आणखी तपासल्या जात आहेत आणि त्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

एपस्टीनचे आपण अनेक वर्षांपासूनचे मित्र होतो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पूर्वी म्हणाले होते.

परंतु, एपस्टीनला अटक होण्याच्या काही वर्षे आधी साधारण 2004 मध्ये त्यांच्यात वाद झाला. ट्रम्प यांनी नेहमीच एपस्टीनशी संबंधित कोणतंही गैरकृत्य नाकारलं आहे.

जाहीर झालेल्या फाईल्समधील एका फोटोमध्ये अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर पाच जणांच्या मांडीवर झोपलेले दिसतात. त्या पाच जणांचे चेहरे लपवलेले आहेत. फोटोमध्ये एपस्टीनची सहकारी दोषी ठरलेली आणि कट रचण्यामध्ये सामील असलेली गिलीन मॅक्सवेल त्यांच्यामागे उभी दिसते.

अँड्र्यू यांना एपस्टीनसोबतच्या जुन्या मैत्रीमुळे अनेक वर्षांपासून प्रश्न विचारले जात आहेत. परंतु, फोटोत एपस्टीन दिसत नाही.

त्यांनी एपस्टीनशी संबंधित कोणत्याही चुकीच्या गोष्टी केल्या नसल्याचं वारंवार सांगितलं आहे.

"त्याला अटक होईल किंवा तो दोषी ठरेल असं त्याचं कोणतंही वर्तन मी पाहिलेलं नाही किंवा अनुभवलेलं नाही", असं त्यांनी यापूर्वी म्हटलेलं आहे.

मायकेल जॅक्सन, डायना रॉस, ख्रिस टकर आणि मिक जॅगर

नव्याने प्रसिद्ध झालेल्या फाईल्समध्ये सर्वाधिक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या नावांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

एपस्टीन फायनान्स, मनोरंजन, राजकारण आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेक लोकांशी जोडलेला होता. न्याय विभागाने जाहीर केलेल्या काही फोटोंमध्ये तो मायकेल जॅक्सन, मिक जॅगर आणि डायना रॉस यांसारख्या सेलिब्रिटींबरोबर दिसतो.

हे फोटो कुठे, कधी घेतले गेले किंवा कोणत्या प्रसंगाचे आहेत, हे स्पष्ट नाही. हेही अस्पष्ट आहे की, एपस्टीनचे या सर्व लोकांशी संबंध होते की, तो त्या कार्यक्रमांना उपस्थित होता. आधी जाहीर केलेल्या एपस्टीन इस्टेटमधील फोटोंमध्ये असेही फोटो होते जे त्याने काढलेले नव्हते किंवा तिथे तो उपस्थित नव्हता.

नव्याने प्रसिद्ध केलेल्या फाईल्समधील एका फोटोत एपस्टीन मायकेल जॅक्सनसोबत दिसतो. पॉप आयडॉलने सूट घातलेला आहे, तर एपस्टीन झिप-अप हुडीमध्ये दिसतो.

आणखी एका फोटोत मायकेल जॅक्सन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि डायना रॉस यांच्यासोबत दिसतो. ते एका छोट्या जागेत उभे आहेत आणि इतर अनेक लोकांचे चेहरे लपवलेले आहेत.

हजारो फाईल्समधील आणखी एका फोटोमध्ये रोलिंग स्टोन्सचा दिग्गज मिक जॅगर क्लिंटन आणि एका महिलेसोबत फोटोसाठी उभा आहे. यात त्या महिलेचा चेहरा लपवलेला आहे. सर्वजण कॉकटेल पोशाखात दिसत आहेत.

काही फोटोंमध्ये अभिनेता ख्रिस टकर दिसतो. एका फोटोमध्ये तो डायनिंग टेबलवर क्लिंटन यांच्याबरोबर बसलेला आणि फोटोसाठी पोज देताना दिसतो आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो विमानतळावर एपस्टीनची दोषी सहकारी गिलीन मॅक्सवेलसोबत दिसतो.

बीबीसीने मिक जॅगर, ख्रिस टकर आणि डायना रॉस यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला आहे.

क्लिंटन यांनी आधीच एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांविषयी माहिती नसल्याचं म्हटलं होतं, आणि त्यांच्या प्रवक्त्याने शुक्रवारी हे फोटो अनेक दशकांपूर्वीचे असल्याचे सांगितलं.

"हे बिल क्लिंटन यांच्याबद्दल नाही. कधीच नव्हतं आणि कधी नसेलही," असं प्रवक्त्याने सांगितलं.

'घर पेटवून देण्याची धमकी'

एपस्टीनविरुद्ध तक्रार करणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी एक मारिया फार्मर, त्या फाईल्समध्ये आहेत. त्या कलाकार आहेत आणि एपस्टीनसाठी पूर्वी काम करत होत्या. एपस्टीनने त्यांच्या 12 आणि 16 वर्षांच्या बहिणींचे फोटो चोरल्याचे त्यांनी 1996 मध्ये एफबीआयला सांगितलं होतं.

एपस्टीनने ते फोटो खरेदीदारांना विकले आणि जर त्यांनी हे कुणाला सांगितलं तर तो त्यांचं घर पेटवून देईल अशी धमकी दिली होती, असं तक्रारीत सांगितलं. फाईल्समध्ये त्यांचं नाव रिडॅक्ट केलेलं आहे, पण फार्मर यांनी हे खरं असल्याचं म्हटलं आहे.

एपस्टीनने त्यांना स्विमिंग पुलातील लहान मुलींचे फोटो काढण्यास सांगितलं होतं, असं त्यांनी अहवालात सांगितलं.

अहवालात म्हटलं आहे की, "जर त्यांनी फोटोबाबत कुणाला सांगितलं, तर तो त्यांचं घर जाळून टाकेल, अशी एपस्टीन आता (रिडॅक्टेड) त्यांना धमकी देत आहे."

जवळपास 30 वर्षांनंतर 'मला न्याय मिळाल्यासारखं वाटत आहे,' असं फार्मर म्हणाल्या.

एपस्टीन फाईल्समधून आतापर्यंत काय समोर आलं?

न्याय विभागाने (डिर्पाटमेंट ऑफ जस्टिस) जाहीर केलेल्या कागदपत्रांचा अनेक तास अभ्यास केल्यानंतर आत्तापर्यंत समोर आलेली माहिती.

  • जाहीर केलेल्या माहितीपैकी बराचसा भाग आधीच समोर आलेला आहे, आणि उरलेली अनेक कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर रिडॅक्ट (संवेदनशील, गोपनीय किंवा खासगी माहिती जाणीवपूर्वक काढून टाकणं) केली आहेत.
  • अमेरिकेचे डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लँचे यांनी सांगितलं की, एपस्टीन प्रकरणातील 1200 हून अधिक पीडित किंवा त्यांच्या नातेवाइकांची ओळख पटू शकते अशी माहिती ओळखून ती जाहीर करण्यात आलेली नाही.
  • जाहीर केलेल्या फोटोंमध्ये एपस्टीनच्या घरांचे आतील भाग, त्याचे परदेश दौरे आणि काही सेलिब्रेटी दिसतात. या फोटोंमध्ये अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर, मिक जॅगर, मायकेल जॅक्सन, डायना रॉस आणि पीटर मँडेलसन यांचा समावेश आहे. मात्र, केवळ फोटोमध्ये दिसल्यामुळे त्यांनी काही चुकीचं किंवा गैरकृत्य केलं आहे, असा अर्थ होत नाही.
  • या फोटोंमध्ये बिल क्लिंटन हेही स्विमिंग पूल आणि हॉट टबमध्ये दिसतात. त्यामुळे एपस्टीनसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, क्लिंटन यांनी एपस्टीन प्रकरणात कोणताही गैरप्रकार केल्याचा आरोप फेटाळला आहे. 'या भयानक गुन्ह्यांबाबत मला काहीही माहिती नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
  • या कागदपत्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ फारच कमी आहे. 1990 आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात ते एपस्टीनचे मित्र होते, पण नंतर त्यांच्यात मतभेद झाले. ट्रम्प यांनी एपस्टीन प्रकरणात कोणतंही गैरवर्तन केल्याचं नाकारलं आहे.
  • डेमोक्रॅट्सचे म्हणणे आहे की, ही कागदपत्रं पूर्णपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे कायद्याचं उल्लंघन झालं आहे. एपस्टीनच्या 'पीडितांच्या न्यायापेक्षा अध्यक्ष ट्रम्प यांचं संरक्षण करण्याचा पॅटर्न' सुरू असल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.
  • रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी म्हणाले की, "ही कागदपत्रं जाहीर करण्याची प्रक्रिया कायद्याच्या भावना आणि नियम-दोन्हींचं गंभीर उल्लंघन करते."
  • दरम्यान, ट्रम्प प्रशासन हे "आतापर्यंतचे सर्वात पारदर्शक प्रशासन" आहे, असं व्हाइट हाऊसने म्हटलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.