जेफ्री एपस्टीन : शेकडो मुलींचे लैंगिक शोषण करणारा धनाढ्य, ज्याने म्हटलेलं- 'मी फक्त नियम मोडणारा गुन्हेगार'

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मिशेल एका अरुंद जिन्यावरून चालली होती. बाजूच्या भिंतीवर नग्न मुलींचे फोटो होते. पायऱ्या संपल्यावर ती एका प्रशस्त बेडरुममध्ये पोहोचली. तिथले दिवे मंद होते. खोली थंड होती. खोलीत एक मसाजचं टेबल आणि टाइमर होता.

थोड्या वेळाने एक करड्या केसांचा माणूस आला, त्याने केवळ एक टॉवेल गुंडाळला होता. तो त्या मसाज टेबलवर झोपला. मिशेलला त्याने मसाज करायला सांगितलं. त्यानंतरच्या अर्ध्या तासात जे काही घडलं ते 16 वर्षांच्या मिशेलसाठी हादरवणारं होतं.

पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली. अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तिची ओळख होती - जेन डो.

पोलिसांचा तपास पुढे सरकत गेला तशा अनेक जेन डो समोर आल्या. जेन डो 2, जेन डो 3, जेन डो 4…आणि अगदी जेन डो 102, जेन डो 103.

मुलींची नावं बदलत होती, पण बाकी तपशील बरेचसे सारखे आणि एकच समान दुवा- तोच करड्या केसांचा माणूस - जेफ्री एपस्टीन.

कोर्टनी वाइल्डचं आयुष्य सर्वसामान्य शाळकरी मुलींसारखंच होतं. ती लेक वर्थ मिडल स्कूलच्या स्क्वॅडची चीअरलीडर होती, ट्रम्पेट बँडमध्ये होती आणि एक हुशार विद्यार्थिनी होती.

जेफ्री एपस्टीनला भेटल्यानंतर ती स्ट्रीपर, ड्रग्सच्या आहारी गेलेली, व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणारी मुलगी होती.

वयाच्या 14व्या वर्षी ती एपस्टीनला भेटली. त्यानंतर ती तिच्याच वयाच्या शाळकरी मुली एपस्टीनला पुरवायची. 16 वर्षांची होईपर्यंत तिने जवळपास 50-60 मुली पुरवल्या होत्या.

ही दोन उदाहरणं झाली. जेफ्री एपस्टीनच्या शोषणाला बळी पडलेल्या अशा अनेक जणी होत्या.

"मी लैंगिक अत्याचार करणारा नाही, मी फक्त नियम मोडणारा 'गुन्हेगार' आहे," जेफ्री एपस्टीनने 2011 मध्ये 'न्यूयॉर्क पोस्ट'शी बोलताना म्हटलं होतं.

"जसं एखादा माणूस खून करतो आणि दुसरा केवळ बागेल (एक खाद्यपदार्थ) चोरतो, या दोन्हीत फरक आहे."

जेफ्री एपस्टीन मात्र स्वतःला दोषी मानत नव्हता.

अर्थात, एपस्टीन स्वतःला काय समजत होता, यामुळे न्यायव्यवस्थेला फरक पडला नाही.

जेफ्री एपस्टीनचा 10 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला तेव्हा तो सेक्स ट्रॅफिकिंगच्या खटल्यात जामीन न मिळाल्यामुळे न्यूयॉर्कच्या तुरुंगात होता.

साधारण एक दशकाआधी एका अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसायासाठी पैसे घेतल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. लैंगिक गुन्हेगार म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलींचा लैंगिक संबंधांसाठी वापर केल्याचा आणि त्यासाठी एक 'नेटवर्क' चालवल्याचा आरोप होता.

नेटफ्लिक्सवरच्या 'फिल्दी रिच' या डॉक्युसीरिजमध्ये एपस्टीनच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेकींनी समोर येऊन त्यांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. 'मायमी हेराल्ड'ने याविषयी सविस्तर वृत्तमालिका केली.

माध्यमातूनही या सगळ्या प्रकरणाचे तपशील वेळोवेळी समोर येत गेले आणि जग हादरलं.

कारण अमेरिकेतील एका धनाढ्य व्यक्तीने अल्पवयीन मुलीचं केलेलं लैंगिक शोषण यापेक्षाही अधिक गुंतागुंतीची ही गोष्ट होती. एपस्टीनचा वावर ज्या वर्तुळात होत होता, त्यामध्ये राजकारणापासून अर्थकारणापर्यंत, खेळापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत तो भारी माणूस असल्याचं म्हटलं होतं. ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू यांचंही नाव त्याच्याशी जोडलं गेलं. काही दिवसांपूर्वीच याच कारणासाठी त्यांच्याकडून राजघराण्याने शाही पदव्या काढून घेतल्या होत्या....एपस्टीनच्या 'पॉवरफुल' मित्रमंडळींची नावं अनेक आहेत.

10 ऑगस्ट 2019 ला एपस्टीनचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. पण त्यानंतरही हे नाव चर्चेत राहिलं....गेल्या काही दिवसांपासून एपस्टीन फाइल्स केवळ अमेरिकेच्याच नाही तर जगातील अनेक देशांच्या राजकारणात चर्चेचा आणि सर्वसामान्यांमध्ये कुतुहलाचा विषय बनला आहे.

एपस्टीन फाईल्स खुल्या करण्यात याव्यात या बाबतच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या विधेयकानुसार अमेरिकेच्या न्यायविभागाला 30 दिवसांच्या आत एपस्टीन चौकशीसंदर्भातील माहिती खुली करायची होती...ही 30 दिवसांची मुदत संपतीये 19 डिसेंबरला.

अद्याप जाहीर न झालेल्या दस्तऐवजांत काय आहे ते माहीत नाही. तरीही, मागच्या काही वर्षांत हजारो पानांच्या दस्तऐवजांचे काही भाग सार्वजनिक रित्या उघड झाले . ज्यामुळे एपस्टीन आणि त्याच्या प्रभावशाली मित्र-परिवाराबद्दलची थोडीफार माहिती समोर आली.

3 डिसेंबरला, हाऊस ओव्हरसाइट कमिटीमधील डेमोक्रॅट्सनी जेफ्री एपस्टीनच्या व्हर्जिन आयलँड्सच्या घराचे पूर्वी कधीही न पाहण्यात न आलेले फोटो प्रसिद्ध केले. त्यात अनेक बेडरूम तसेच भिंतीवर वेगवेगळे मुखवटे लावलेली खोली दिसून येते.

आता 19 डिसेंबरला एपस्टीन फाईल्समधून नेमकी कोणाकोणाची गुपितं उघड होणार, याकडे जगाचं लक्ष आहे.

अगदी आपल्याकडे पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही एपस्टीन फाईल्स खुल्या झाल्या तर मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं विधान काही दिवसांपूर्वीच केलं.

एपस्टीन फाइल्स नेमक्या आहेत तरी काय हे जाणून घेण्याआधी मुळात मृत्यूनंतरही ज्याचं भूत अनेकांच्या मानगुटीवर बसलं आहे, तो जेफ्री एपस्टीन कोण होता, सर्वसामान्य कुटुंब ते जगातील अति धनाढ्य व्यक्ती हा त्याचा प्रवास कसा झाला, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा रॅकेटच कसं तयार केलं?

'माझा एपस्टीनवर विश्वास आहे'

2002 साली व्हॅनिटी फेअर हे मासिक जेफ्री एपस्टिनवर एक दीर्घ लेख लिहिणार होतं. पत्रकार विकी वॉर्ड त्यावर काम करत होत्या.

मात्र लेखाचं काम करत असतानाच त्यांना दोन बहिणींबद्दल माहिती मिळाली, ज्यांचं लैंगिक शोषण एपस्टीन आणि त्याची मैत्रीण गिलीन मॅक्सवेलने केल्याचा त्यांचा आरोप होता.

याबद्दल एपस्टीनला माहिती मिळाली. त्याने व्हॅनिटी फेअरच्या ऑफिसला भेट दिली.

मार्च 2003 मध्ये एपस्टीनवरचा लेख 'द टॅलेंटेड मिस्टर एपस्टीन' या नावाने प्रसिद्ध झाला. त्यात त्याची आलिशान राहणी आणि प्रचंड संपत्ती याबद्दल छापलं गेलं होतं, पण लैंगिक शोषणाच्या आरोपांचा उल्लेख नव्हता.

हे बदलण्यासाठी एपस्टीनने दबाव आणल्याचा आरोप वार्ड यांनी केला होता.

संपादकांनी एपस्टीनशी बोलल्यानंतर शोषणाचे आरोप वगळले आणि 'माझा एपस्टीनवर विश्वास आहे' असं वार्ड यांनी म्हटलं होतं.

मात्र, व्हॅनिटी फेअरचे तत्कालिन संपादक ग्रेडन कार्टर यांनी हे आरोप फेटाळले. वार्ड यांच्या आरोपांना पाठबळ देणारे पुरेसे पुरावे नव्हते. त्यामुळेच मासिकाच्या कायदेशीर आणि संपादकीय मूल्यांच्या चौकटीत हा लेख बसत नव्हता असं त्यांनी म्हटलं होतं.

'फिल्दी रिच' या डॉक्युसीरिजमध्ये दोन्ही बाजूंची मतं दाखविण्यात आली आहेत.

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचेही आरोप झाले होते.

आपल्याबद्दलचा लेख कसा छापला जावा, यात हस्तक्षेप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करण्याएवढा एपस्टीन प्रभावी कसा बनला? एका शाळेतला शिक्षक अमेरिकेतला अतिधनाढ्य व्यक्ती बनला कसा?

गणिताचा शिक्षक ते धनाढ्य फायनान्सर

न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला आणि वाढलेला एपस्टीनने 1970 च्या दशकात शहरातील खासगी डाल्टन स्कूलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकवलं.

तो स्वतः भौतिकशास्त्राचा अभ्यास करत होता, पण आपली पदवी पूर्ण केली नव्हती.

त्याने स्वतः आपण कूपर युनियन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचं सांगितलं होतं, पण पदवी पूर्ण न केल्याचंही मान्य केलं होत.

आता पदवीही पूर्ण न करता त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली कशी हेही एक गूढ होतं...

पण त्याच्या एका विद्यार्थ्याचे वडील त्याच्या गणितातल्या कौशल्याने प्रभावित झाले आणि त्यांनी त्याचा वॉल स्ट्रीटच्या इन्व्हेस्टमेंट बँक बेअर स्टर्न्समधील एका वरिष्ठ भागीदाराशी संपर्क साधून दिला.

मायकेल टेननबॉम, बेअर स्टर्न्समधले माजी एक्झिक्युटिव्ह आणि लेखक यांनी एपस्टीनबद्दल नेटफ्लिक्सच्या डॉक्युसीरिजमध्ये बोलताना म्हटलं की, तो कामात हुशार होता. पण एकदा आमच्या एचआर डिपार्टमेंटकडून मला सांगण्यात आलं की एपस्टीनने त्याच्या पदवीबद्दल चुकीची माहिती दिली आहे. मी एका खोटारड्या व्यक्तीला कामावर घेतलं होतं आणि तो एस ग्रीनबर्गच्या (बेअर स्टर्न्सचे त्यावेळेचे सीईओ) मुलीलाच डेट करत होता. मी त्याला जाब विचारला. पण एपस्टीन उत्तम सेल्समन होता. त्याने मला पटवून दिलं आणि मीसुद्धा त्याचं करिअर खराब का करावं हा विचार करून दुसरी संधी दिली. ती माझी चूक होती.

तो अवघ्या चार वर्षांत तिथे भागीदार झाला. 1982 पर्यंत त्याने आपली स्वतःची फर्म 'जे एपस्टीन अँड कंपनी' सुरू केली.

या कंपनीने 1 अब्ज डॉलरहून अधिक (सुमारे 800 मिलियन पाऊंड) मालमत्तेच्या ग्राहकांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन केलं आणि झटपट यश मिळवलं.

एपस्टीन लवकरच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करू लागला. फ्लोरिडामधल्या पाम बीच इथे त्याचा आलिशान बंगला होता. ही सगळी अतिश्रीमंतांची वस्ती. इथे त्याच्या जवळच डोनाल्ड ट्रम्प यांचंही आलिशान घर होतं.

त्याखेरीज न्यूयॉर्कमधलं घर, न्यू मेक्सिको इथलं फार्म हाऊस, खाजगी विमानं, जगातील इतर काही शहरांमधल्या मालमत्ता...एपस्टीनची संपत्ती अचाट होती.

तो आता सेलिब्रिटी, कलाकार आणि राजकारण्यांसोबत वेळ घालवण्यावर भर दिला.

"मी जेफला 15 वर्षांपासून ओळखतो. तो खूप चांगला माणूस आहे," डोनाल्ड ट्रम्प यांनी 2002 मध्ये एपस्टीनच्या प्रोफाइलसाठी न्यूयॉर्क मॅगझिनला सांगितलं होतं.

"त्याच्यासोबत वेळ घालवणं खूप मजेशीर असतं. मला जसं सुंदर महिला आवडतात तसंच त्यालाही आवडतात. विशेष म्हणजे त्यातील बऱ्याच मुली तर खूप तरुण आहेत," असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

"जेफ्रीला लोकांमध्ये राहायला खूप आवडतं, याबद्दल काहीच शंका नाही."

नंतर ट्रम्प यांनी सांगितलं की, एपस्टीनला पहिल्यांदा अटक होण्याच्या काही वर्षांपूर्वीच म्हणजे 2000 च्या सुरुवातीसच दोघांचे संबंध तुटले होते. एपस्टीनबरोबर संबंध असताना काहीही चुकीचं केलं नाही, असं ट्रम्प नेहमीच म्हणत आले आहेत.

"ट्रम्प यांनी अनेक वर्षांपूर्वीच एपस्टीनला आपल्या क्लबमधून बाहेर काढलं होतं, कारण तो त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत चुकीचं वागत होता," असं व्हाइट हाऊसनेही सांगितलं होतं.

ट्रम्प यांच्याशिवायही एपस्टीनचे अनेक प्रसिद्ध आणि हाय-प्रोफाइल मित्र होते. परंतु, याचा अर्थ त्या लोकांनी काही चुकीचं केलं, असं होत नाही.

2002 मध्ये त्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन तसंच अभिनेता केव्हिन स्पेसी आणि ख्रिस टकर यांना खासगी जेट विमानाने आफ्रिकेला नेलं होतं. 2003 मध्ये त्याने त्या काळातील चित्रपट निर्माता हार्वी वाइनस्टीनसोबत न्यूयॉर्क मॅगझिन खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्याच वर्षी त्याने हार्वर्ड विद्यापीठाला 30 दशलक्ष डॉलर (सुमारे 23 मिलियन पाऊंड) देणगीही दिली.

ब्रिटनचे राजकारणी पीटर मँडेलसन यांच्यासोबतही त्याची मैत्री होती. मँडेलसन यांनी नंतर या मैत्रीचा आपल्याला पश्चाताप झाला असं सांगितलं. या मैत्रीमुळेच 2025 मध्ये त्यांना अमेरिकेतील राजदूतपद गमवावं लागलं.

मिस स्वीडन या सौंदर्यस्पर्धेची विजेती इव्हा अँडरसन ड्युबिन तसंच प्रकाशक रॉबर्ट मॅक्सवेल यांची मुलगी गिलीन मॅक्सवेल सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र,

गिलीन मॅक्सवेल हिला एपस्टीनच्याच प्रकरणात अल्पवयीन मुलींना सेक्ससाठी प्रशिक्षण देणं आणि त्यांची तस्करी करण्याच्या आरोपावरून या गिलीन मॅक्सवेलला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

गिलीन मॅक्सवेल कोण होती, तिचा एपस्टीनशी कसा संबंध आला याबद्दल तुम्ही सविस्तर इथे वाचू शकता.

टिफनी अँड कंपनीच्या माजी सीईओ रोझा मॉन्कटन यांनी 2003 मधील 'व्हॅनिटी फेअर'च्या लेखात एपस्टीन हा 'अत्यंत गूढ' आणि एखाद्या हिमनगासारखा होता,' असं म्हटलं होतं.

"आपल्याला वाटतं आपण त्याला ओळखतो, पण जसं कांद्याची एक एक साल काढतो, तसं त्याच्याबद्दल काहीतरी वेगळंच समोर येत जातं. जसा दिसतो तो तसा मुळीच नाही," असं त्यांनी म्हटलं होतं.

'शिक्षा आणि कबुलीजबाबाचा करार'

2005 साली अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या एका 14-वर्षीय मुलीच्या पालकांनी एपस्टीनवर आरोप केला की त्याने त्यांच्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय. पोलिसांनी जेव्हा एपस्टीनच्या घराची झडती घेतली तेव्हा घरभर त्या मुलीचे फोटो सापडले.

मायमी हेराल्ड या तिथल्या वर्तमानपत्राने बातमी दिली की एपस्टीन कित्येक वर्षांपासून अल्पवयीन मुलींचं शोषण करत होता.

"प्रश्न फक्त एका मुलीचा नव्हता की बुवा तिने आरोप केलेत आणि एपस्टीनने खोडून काढले. अशा 50 हून जास्त मुली समोर आल्या होत्या, आणि सगळ्यांचं कहाणी एकच होती," पाम बीचचे पोलीस प्रमुख मायकल रायटर यांनी पोलिसांना सांगितलं.

स्तंभलेखक मायकल वुल्फ यांनी न्यूयॉर्क मॅगझिनशी बोलताना म्हटलं होतं, "मुलींविषयी त्याने कधी लपवून ठेवलं नाही. त्याच्यावर आरोप झाले तेव्हा एकदा माझ्याशी बोलताना तो म्हणाला होता... काय करू, मला आवडतात लहान मुली. मी त्याला म्हणालो, तुला तरुण महिला म्हणायचं आहे का?"

पण एपस्टीनवर रीतसर खटला चालला नाही. 2007 साली सरकारी वकिलांनी त्याला प्ली डीलवर सही करायला लावली ज्यामुळे त्याला जन्मठेपेच्या शिक्षेऐवजी फक्त 18 महिन्यांची कैद झाली. यातही त्याला आठवड्यातून 6 दिवस 12 तास ऑफिसात जायची परवानी असायची. त्याला 13 महिन्यांनंतर सोडून दिलं.

तेव्हा वर्तमानपत्रांनी आरोप केला की, सरकारी वकील अलेक्झांडर अकोस्टा यांनी एपस्टीनचे गुन्हे लपवायला मदत केली. त्याची एफबीआयकडून चौकशी होऊ दिली नाही. या प्रकरणी आणखी कोणकोण बडी धेंड गुंतलेली होती ते कधी समोर आलं नाही.

अकोस्टा यांना या प्रकरणी 2019 साली राजीनामा द्यावा लागला पण ते म्हणत राहिले की त्यांच्यामुळे एपस्टीनला थोडीफार का होईना शिक्षा झाली, नाहीतर तो मोकाट सुटला.

एपस्टीनची संपत्ती मात्र जप्त झाली नाही.

2008 पासून, एपस्टीनची नोंद न्यूयॉर्क लैंगिक गुन्हेगाराच्या नोंदणीत स्तर तीन म्हणून करण्यात आली. या नोंदीचा अर्थ असा होता की, तो पुन्हा गुन्हा करू शकतो असं मानलं जातं आणि ही नोंद आयुष्यभर राहते.

पण एपस्टीनने दोषी ठरल्यानंतरही आपली मालमत्ता आणि संपत्ती कायम ठेवली.

डिसेंबर 2010 मध्ये ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे तिसरे पुत्र अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर हे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एपस्टीनसोबत दिसले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

नोव्हेंबर 2019 मध्ये बीबीसीच्या मुलाखतीत, अँड्र्यू यांनी सांगितलं की, ते 1999 पासून एपस्टीनला ओळखत होते आणि 2010 मध्ये न्यूयॉर्कला जाऊन त्यांनी त्यांचं मैत्रीचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांनी म्हटलं की, त्यावेळी त्याच्या घरी राहिल्याबद्दल मला खंत वाटते.

पण अँड्र्यू यांनी आधी कबूल केल्यापेक्षा ते एपस्टीनबरोबर जास्त वेळ संपर्कात राहिले होते, 2011 मधील ई-मेलनुसार काही वर्षांनंतर हे समोर आले. या सगळ्या वादानंतर, 2025 मध्ये अँड्र्यू यांच्या शाही पदव्या काढून घेण्यात आल्या.

एपस्टीनविरोधात तक्रार करणारी व्हर्जिनिया रॉबर्ट्स. ही नंतर व्हर्जिनिया गिफ्रे म्हणून ओळखली गेली. 2000 च्या सुरुवातीस ती 17 वर्षांची असताना तिला अँड्र्यूसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला होता.

अँड्र्यू यांनी तिच्यासोबतचे लैंगिक संबंध ठामपणे नाकारले आणि लंडनमध्ये त्यांनी एकत्रित फोटो काढल्याचे आठवत नसल्याचं म्हटलं होतं. परंतु, 2022 मध्ये, अँड्र्यू यांनी गिफ्रेला लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला खटला मिटवण्यासाठी लाखो रुपये दिल्याचं वृत्त होतं.

आता पुन्हा एपस्टीनच्या खटल्याकडे वळू...पॅरिसहून आपल्या खासगी विमानाने परतल्यानंतर एपस्टीनला 6 जुलै 2019 रोजी न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली.

सरकारी वकिलांना त्याचा न्यूयॉर्कमधील बंगलाही जप्त करायचा होता. कारण त्या ठिकाणी त्याने काही गुन्हे केले होते.

एपस्टीनने नेहमीच त्याच्यावर केलेले आरोप फेटाळले, आपण दोषी नसल्याची कबुली त्याने दिली.

न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्यानंतर, त्याला न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन करेक्शनल सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. जुलैमध्ये त्याला थोड्या काळासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, कारण त्याच्या मानेला जखमा झाल्या होत्या. परंतु तुरुंग अधिकारी किंवा त्याच्या वकिलांनी त्यावेळी यावर अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही.

31 जुलै 2019 रोजी न्यायालयात शेवटच्या वेळी हजर झाल्यावर स्पष्ट झालं की, तो एक वर्ष तुरुंगात राहणार आहे आणि त्याचा खटला किमान 2020 च्या उन्हाळ्यापर्यंत तरी सुरू होणार नाही.

खटला लवकर सुरू होणं महत्त्वाचं आहे, कारण हे सार्वजनिक हिताचं आहे, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.

परंतु, एपस्टीनला कधीही खटल्याला सामोरं जावं लागलं नाही.

कारण ऑगस्ट 2019 रोजी त्याचा तुरूंगात मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं.

शोषणाचा पिरॅमिड

जेफ्री एपस्टीनविरोधात अनेक पीडित मुलींनी नुकसान भरपाईची मागणी करत दिवाणी खटलेही (civil suits) दाखल केले होते.

ब्रॅड एडवर्ड्स हे त्यांचे अ‍ॅटर्नी म्हणून काम पाहात होते.

त्यांनी म्हटलं की, हे इतकी वर्षं अशाप्रकारे एखादी गोष्ट चालू राहणं हे अविश्वसनीय होतं. हे एखाद्या पिरॅमिडसारखं होतं. एखादी मुलगी चुकून-माकून घरात आली आणि तिचं शोषण झालं असं ते नव्हतं. सगळं अतिशय योजनाबद्ध पद्धतीने झालं हे आम्हाला कोर्टात सिद्ध करायचं होतं.

गिलीन मॅक्सवेल ही रिक्रूटर (मुलींना भरती करून घेणारी) होती. तिच्याशिवाय अजूनही काही जणी होत्या. आम्ही त्यातल्या एका अल्पवयीन मुलीला विचारलं. तू कशी पोहोचलीस इथे. तिनं एकीचं नाव सांगितलं. तिला विचारल्यावर अजून एकीचे. तिने तिसरीचं. अनेकींनी 5 ते 6 दुसऱ्या मुलींना आणलं होतं. हे सगळं एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पसरलं होतं, त्यांनी सांगितलं होतं.

एडवर्ड्सने एपस्टीनचे वर्णन एक 'गूढ व्यक्तिमत्त्व' म्हणून केलं, जो दोन स्वतंत्र आयुष्यं जगत होता—एका आयुष्यात तो दररोज महिलांवर आणि मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता, तर दुसऱ्या आयुष्यात तो राजकारणी, राजघराण्याचे सदस्य आणि उद्योग, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील दिग्गजांशी उठबस करत होता.

'मॅक्सवेलचा खटला'

एपस्टीनच्या मृत्यूनंतर, त्याची माजी मैत्रीण गिलीन मॅक्सवेल चर्चेत आली.

तिला जुलै 2020 मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर इथल्या तिच्या निर्जन घरातून अटक करण्यात आली, कारण तिने एपस्टीनला अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात मदत केली, त्यासाठी मुलींची निवड व त्यांना तयार केल्याचा आरोप होता.

डिसेंबर 2021 मध्ये, न्यूयॉर्क सिटीतील ज्युरींनी तिला सहा आरोपांपैकी पाचमध्ये दोषी ठरवले, त्यात सर्वात गंभीर आरोप म्हणजे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक तस्करीचा होता. तिला 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या मॅक्सवेलने एपस्टीनची अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली मित्रांशी ओळख करून दिली, ज्यात बिल क्लिंटन आणि अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर यांचा समावेश होता.

मित्रांच्या म्हणण्यानुसार, मॅक्सवेल आणि एपस्टीन यांच्यातील प्रेमसंबंध फक्त काही वर्षे टिकले असले तरीही ती त्याच्यासोबत खूप दिवस काम करत होती.

न्यायालयीन दस्तऐवजांनुसार, पाम बीचमधील एपस्टीनच्या बंगल्यातील माजी कर्मचारी मॅक्सवेलला घराचा व्यवस्थापक म्हणत होते. ती कर्मचार्‍यांवर नजर ठेवायची, आर्थिक व्यवहार सांभाळायची आणि सामाजिक कार्यक्रमांचे समन्वयही करायची.

2003 मध्ये 'व्हॅनिटी फेअर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रोफाइलमध्ये, एपस्टीनने सांगितलं होतं की, मॅक्सवेल त्याची पगारी कर्मचारी नाही, तर ती त्याची 'सर्वोत्तम मैत्रीण' आहे.

खटल्यात, सरकारी वकिलांनी आरोप केला की, मॅक्सवेलने एपस्टीनसाठी तरूण मुली शोधल्या, त्यांच्या शोषणाला मदत केली. पण एपस्टीनच्या मृत्यूनंतर तिच्या वकिलांनी दावा केला की, त्याच्या गुन्ह्यांसाठी तिला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे.

दोषी ठरल्यानंतर, मॅक्सवेलने पश्चात्ताप व्यक्त केला आणि 'जेफ्री एपस्टीनला भेटणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती', असं म्हटलं.

तिने पुढे म्हटलं की, "पण आजचा दिवस शेवटी एपस्टीनबद्दल नाही. हा दिवस माझ्या शिक्षेचा आहे आणि पीडितांना फक्त माझ्याशी न्यायालयात बोलण्याची संधी आहे. तुम्ही जो त्रास अनुभवला त्याबद्दल मला खेद आहे. मी दोषी ठरून आणि मला कडक तुरुंगवासाची शिक्षा मिळाल्यास तुम्हाला समाधान मिळेल, अशी आशा आहे."

मॅक्सवेलच्या वकिलांनी निकालाविरुद्ध अपील केलं. तिच्यावर या प्रकरणातील भूमिकेसाठी कधीच खटला दाखल होऊ नये किंवा दोषी ठरवले जाऊ नये, असा युक्तिवाद केला. परंतु, शेवटी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तिच्या वकिलांचे हे अपील फेटाळलं.

वर्षानुवर्षे चाललेलं अनेक मुलींच्या शोषणाचं हे प्रकरण...एकीकडे एक धनाढ्य व्यक्ती आणि दुसरीकडे अल्पवयीन मुली. यातील बहुतांश मुलींची पार्श्वभूमी ही सारखीच होती...कोणी आर्थिकदृष्ट्या त्रस्त होतं, कोणाला कौटुंबिक समस्या होत्या, कोणाला मानसिक. त्यांच्या याच गोष्टीचा कदाचित फायदा घेत त्यांचं शोषण करण्यात आलं असावं. त्यातल्या अनेक जणी आपल्यावरच्या अत्याचाराची दाद मागण्यासाठी पुढे आल्या...एपस्टीन फाइल्समधून कोणाची काय गुपितं समोर येतील, कोणाच्या सत्तेला धक्का लागेल, कोणाचा राजकीय फायदा होईल याच्या चर्चा होतीलच, पण या मुलींवर कोवळ्या वयात झालेल्या मानसिक आघाताचं काय...या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसेल...

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)