'धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वकाही होते'; पतीच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी आणि पती धर्मेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी गुरुवारी (27 नोव्हेंबर) त्यांचे दिवंगत पती धर्मेंद्र यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी गुरुवारी (27 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी (24 नोव्हेंबर) वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी दिलेली ही पहिलीच सार्वजनिक प्रतिक्रिया आहे.

इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे की, "धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वकाही होते. अहाना आणि ईशाचे प्रेमळ बाबा, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी हे सारं काही ते होते. त्यांच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे."

त्यांनी सांगितलं की, आपल्या साधेपणाने आणि मनमोकळ्या स्वभावानं त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मनं जिंकली होती. सर्वांसाठी असलेलं त्यांचं प्रेम नेहमीच दिसून येत असे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

हेमा मालिनी यांनी लिहिलंय की, "इतकी लोकप्रियता आणि प्रतिभा असून देखील त्यांच्यात उदारता होती. त्यामुळेच सर्वच स्तरातील लोकांसाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते."

त्या म्हणाल्या, "माझ्या वैयक्तिक नुकसानाचं वर्णन करणं कठीण आहे. जी पोकळी निर्माण झाली आहे ती आयुष्यभर माझ्यासोबत राहील. इतक्या वर्षांच्या सहवासानंतर मी फक्त आठवणींद्वारे त्या खास क्षणांना पुन्हा जगू शकेन."

व्हीडिओ कॅप्शन, धर्मेंद्र यांचं निधन, स्मशानभूमीबाहेर चाहत्यांची गर्दी

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी, 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर होती आणि त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तिथे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांच्या निधनानंतर, सोमवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

या दरम्यान त्यांच्या अत्यंत जवळचेच लोक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

निकटवर्तीयांच्या उपस्थितीत देण्यात आला मुखाग्नी

बीबीसी न्यूज हिंदीला मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यावर सोमवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या सर्व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीबाहेर मोठी गर्दी होती.

फोटो स्रोत, रवि जैन/बीबीसी

फोटो कॅप्शन, मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीबाहेर मोठी गर्दी होती.

अंत्यसंस्कारानंतर, हेमा मालिनी आणि ईशा देओल एकाच गाडीतून बाहेर आल्या.

यादरम्यान, हेमा मालिनी गाडीच्या आतूनच हात जोडताना दिसल्या.

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरूख खान, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, गोविंदा, आमिर खान, लेखक सलीम खान, संजय दत्त, अनिल कपूर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, गायक मीका सिंह यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, "धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्व होते. ते एक असाधारण असे अभिनेता होते, ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक खोली आणि आकर्षकता आणली.

त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडल्या. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि आपलेपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते. या दुःखाच्या वेळी, माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती."

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सोशल मीडिया साइट 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलंय की, "ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्रजी यांचं निधन भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान आहे. सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या त्यांनी त्यांच्या दशकांच्या शानदार कारकिर्दीत अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या."

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटलंय की, "एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, "महान अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे आणि भारतीय कला जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे."

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, "1960 च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. 'शोले'मध्ये त्यांनी साकारलेला 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे."

चित्रपट निर्माता करण जौहरने अभिनेता धर्मेंद्र यांना इन्स्टाग्रामवर आदराजंली वाहिली आहे.

त्यानं म्हटलंय की, "हा एका युगाचा अंत आहे."

पुढे त्याने म्हटलंय की, "आज आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. ही जागा कुणीही कधीही भरून काढू शकणार नाही. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो धर्मेंद्रजी. आम्हाला तुमची खूप आठवण येईल."

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की, "ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं."

श्वास घेण्यामध्ये येत होती अडचण

धर्मेंद्र यांना जवळपास तीन आठवड्यांपूर्वी श्वास घेण्यामध्ये अडचण येत होती, तसेच त्यांना निमोनिया झाल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं.

यापूर्वी, मंगळवारी (11 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या 'निधना'संबंधी माध्यमांमध्ये पसरलेल्या खोट्या बातम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

धर्मेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

ईशा देओलने इन्स्टाग्रामवर लिहिलं होतं की, "प्रसार माध्यमं घाईघाईत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. पप्पांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार."

धर्मेंद्र यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांनी 'एक्स'वर लिहिलं, "जे सुरू आहे, त्याला माफी केली जाऊ शकत नाही! उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरं होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या चुकीच्या, खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात?"

त्यांनी पुढे लिहिलं, "हे अत्यंत अपमानास्पद आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा."

धर्मेंद्र यांचे करियर

धर्मेंद्र यांना अभिनयाची पहिली संधी 'बंदिनी' या चित्रपटात मिळाली. मात्र, बंदिनी चित्रपट पूर्ण होण्यास वेळ लागला. या दरम्यान संघर्षाच्या काळात अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटात भूमिका दिली.

धर्मेंद्र यांना 1966 मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर' या चित्रपटानं खऱ्या अर्थानं सोलो हिरो म्हणून ओळख दिली.

धर्मेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

धर्मेंद्र यांचे अनुपमा आणि सत्यकाम हे चित्रपटही चर्चेत राहिले. नंतर धर्मेंद्र यांचे 'हकीकत', 'दिल ने फिर याद किया', 'ममता', 'मेरे हमदम मेरे दोस्त' यासारखे चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांच्या अभिनयाला आणखी पैलू पाडले.

1970 च्या दशकात धर्मेंद्र यांनी ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी असे व्यावसायिक सिनेमे केले. या काळात धर्मेंद्र यांचे जीवन मृत्यू, सीता और गीता, चरस, ब्लॅकमेल, चुपके चुपके हे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट आले.

1975 साली शोले प्रदर्शित झाला. या चित्रपटातील वीरूच्या भूमिकेनं तर धर्मेंद्र यांची वेगळीच ओळख निर्माण झाली. तोपर्यंत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)