You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदर्यासाठी चेहऱ्यावर माशांच्या स्पर्मचं इंजेक्शन घेऊन, खरंच फायदा होतो का?
- Author, रूथ क्लेग
- Role, हेल्थ अँड वेलबीइंग रिपोर्टर
पत्रकार म्हणून मी अनेक वर्षे काम करते आहे. मात्र माझ्या आजवरच्या कारकीर्दीत मी असा कधीच विचार केला नव्हता की मी एखाद्याला विचारेन की ट्राउट माशाचे शुक्राणूचं (स्पर्म) इंजेक्शन चेहऱ्यावर घेतल्यावर कसं वाटतं आहे.
आणि तरीदेखील मी ते करते आहे.
ॲबी वार्न्स, दक्षिण मँचेस्टरमधील एका छोट्याशा ॲस्थेटिक्स क्लिनिकमध्ये एका मोठ्या काळ्या पॅड लावलेल्या खुर्चीवर झोपलेल्या आहेत.
एक छोटी कॅन्युला (ट्यूब) त्यांच्या गालात हळूवारपणे घातली जाते, तेव्हा त्यांचा चेहरा वेदनेनं आक्रसून जातो.
त्यांच्या तोंडातून वेदना दर्शवणारे शब्द आपसूकच बाहेर निघू लागतात.
इथे स्पष्ट केलं पाहिजे की ॲबी या 29 वर्षांच्या महिला आहेत. त्या थेट ट्राउट माशाच्या शुक्राणूंचा शुद्ध डोस घेत नाहियेत. त्यांच्या चेहऱ्याच्या खालच्या भागात डीएनएचे अतिशय छोटे भाग इंजेक्ट करण्यात येत आहेत. त्यांना पॉलीन्युक्लिओटाइड्स म्हणतात. ते ट्राउट किंवा सॅमन माशांच्या शुक्राणूंमधून काढण्यात आले आहेत.
माशाच्या डीएनएतील प्रोटीनचा उपयोग
पण का? कारण गमतीची गोष्ट म्हणजे, आपला म्हणजे मानवाचा डीएनए माशाच्या डीएनएसारखाच आहे.
त्यामुळे अशी आशा आहे की ॲबी यांचं शरीर हे माशांच्या डीएनएचे छोटे भाग किंवा धागे स्वीकारेलच. त्याचबरोबर, त्यांच्या त्वचेच्या पेशींना सक्रिय होण्यास चालना मिळेल.
त्यातून कोलेजन आणि इलास्टिनचं अधिक प्रमाणात तयार होईल. हे दोन प्रोटीन असतात. आपल्या त्वचेच्या रचनेतील एकसंधपणा, अखंडपणा राखण्यासाठी हे दोन्ही प्रोटीन महत्त्वाचे असतात.
हे उपचार घेण्यामागे ॲबी यांचा उद्देश आहे की, त्यांची त्वचा ताजी टवटवीत व्हावी, ती निरोगी राहावी आणि त्यांना अनेक वर्षांपासून असलेल्या मुरुमांचा त्रास कमी व्हावा. तसंच त्या मुरुमांमुळे त्यांच्या त्वचेवर पडलेले डाग आणि लालसरपणा कमी करणं.
"मला या समस्या दूर करायच्या आहेत," असं त्या म्हणतात.
पॉलीन्युक्लिओटाइड्स हे त्वचेची निगा राखण्यासंदर्भातील पुढील मोठा 'चमत्कार' असल्याचं बोललं जातं आहे.
अनेक सेलिब्रिटींनी 'सॅमन माशांच्या शुक्राणूंचं इंजेक्शन' घेतल्याचं स्पष्टपणे सांगितल्यानंतर हे पॉलीन्युक्लिओटाइड्स वेगानं लोकप्रिय होत आहेत.
वेगानं लोकप्रिय होत असलेले पॉलीन्युक्लिओटाइड्स
यावर्षाच्या सुरूवातीला, चार्ली एक्ससीएक्स यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांच्या 90 लाख फॉलोअर्सना सांगितलं की 'आता फिलर्सचा काळ संपला आहे'.
त्यांनी सांगितलं की त्या आता पॉलीन्युक्लिओटाइड्सकडे वळल्या आहेत. ते 'खोलवर देण्यात आलेल्या जीवनसत्वांसारखे' आहेत.
वृत्तांनुसार, किम आणि क्लो कार्देशियनदेखील या उपचाराच्या मोठ्या चाहत्या आहेत.
जेव्हा त्यांना 'जिमी किमेल लाईव्ह' या कार्यक्रमाच्या अलीकडच्या भागात त्यांच्या स्किनकेअरबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा जेनिफर ॲनिस्टनने उत्तर दिलं, "माझी त्वचा सॅमन माशांसारखी सुंदर, तजेलदार नाही का?"
त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात शंका असतानाही, पॉलीन्युक्लिओटाइड्स त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धतीत बदल घडवत आहेत का?
"आपण बेंजामिन बटन क्षण अनुभवत आहोत," असं सुझान मॅन्सफिल्ड मला म्हणाल्या. त्या डर्माफोकस या ॲस्थेटिक्स कंपनीत काम करतात.
वर ज्या क्षणाचे वर्णन केले आहे, त्याचा संदर्भ 2008 मध्ये आलेल्या 'द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन' या चित्रपटातील आहे.
या चित्रपटात असं दाखवलं आहे की बेंजामिन ( ब्रॅड पीट) हा जन्म घेतो तेव्हा त्याची त्वचा आणि हाडं ही वृद्ध व्यक्तीसारखी असतात. जसं वय वाढतं तसं त्या व्यक्तीचं शरीर, त्वचा तरुणपणाकडे जाते आणि शेवटी लहान बाळाप्रमाणे त्याची त्वचा होते.
ही काल्पनिक कथा आहे. अशी गोष्ट प्रत्यक्षात होण्याची अर्थातच शक्यता खूपच कमी आहे पण तसं झालं तर ते अस्वस्थ करणारं ठरू शकतं असं मॅन्सफिल्ड यांना वाटतं.
मॅन्सफिल्ड म्हणतात की त्वचेची निगा राखणं, त्वचेचं वय वाढण्यापासून रोखणं यासंदर्भात पॉलीन्युक्लिओटाइड्सचं इंजेक्शन देणं ही एक महत्त्वाची उपचार पद्धती बनली आहे.
संशोधन आणि क्लिनिकल चाचण्यांचा एक छोटासा पण वाढत चाललेला समूह असं सूचवतो की, पॉलीन्युक्लिओटाइड्सचं इंजेक्शन त्वचेत दिल्यामुळे त्वचा पुन्हा तजेलदार, तुकतुकीत आणि निरोगी होऊ शकते. त्यामुळे त्वचा फक्त निरोगीच होत नाही, तर त्वचेवरील बारीक रेषा, सुरकत्या आणि चट्टेदेखील कमी होण्याची शक्यता असते.
"ॲस्थेटिक्स उद्योगात त्याचा वापर करून आपण तेच करत आहोत, जे आपलं शरीर आधीच करत असतं. त्याच गोष्टी आपण वाढवतो. म्हणून ते इतकं विशेष आहे," असं मॅन्सफिल्ड म्हणतात.
मात्र हे उपचार खूप महागडेदेखील आहेत.
आनंदी ॲबी
पॉलीन्युक्लिओटाइड्सच्या इंजेक्शनच्या एका सत्रासाठी 200 पौंड ते 500 पौंडादरम्यानचा खर्च येऊ शकतो. साधारणपणे काही आठवड्यांमध्ये असे तीन इंजेक्शन घेण्याची शिफारस केली जाते.
त्यानंतर क्लिनिक तुम्हाला सल्ला देतात की लूक कायम राखण्यासाठी दर सहा ते नऊ महिन्यांनी हे उपचार टॉप अप करावेत, म्हणजे पुन्हा इंजेक्शन घ्यावेत.
क्लिनिकमध्ये परत आल्यावर, ॲबी यांच्यावरील उपचार जवळपास पूर्ण झाले आहेत.
"फक्त एकच भाग शिल्लक राहिला आहे," असं हेलेना डंक, ॲबी यांना धीर देत म्हणतात. त्या स्कीन एचडी या क्लिनिकच्या मालक असून सौंदर्यशास्त्रातील उपचारांच्या प्रशिक्षित नर्स (ॲस्थेटिक नर्स प्रॅक्टिशनर) आहेत.
त्या म्हणतात की गेल्या 18 महिन्यांमध्ये पॉलीन्युक्लिओटाइड्सच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.
"माझ्या निम्म्या रुग्णांना खरोखरंच खूप मोठा फरक जाणवतो. त्यांची त्वचा अधिक तजेलदार, निरोगी आणि तरुण झाल्यासारखी वाटते आहे. तर उर्वरित निम्म्या रुग्णांना इतका मोठा बदल जाणवत नाही. मात्र त्यांची त्वचा अधिक घट्ट आणि ताजीतवाणी वाटते आहे," असं हेलेना डंक म्हणतात.
ॲबी यांनी त्यांच्या तीन कोर्सच्या उपचारांचा भाग म्हणून क्लिनिकमध्ये त्यांच्या डोळ्यांखाली आधीच हे इंजेक्शन घेतलं आहे. त्याच्या परिणामांवर त्या खरोखरंच खूश आहेत.
त्यांना पॉलीन्युक्लिओटाइड्सचे अनेक अतिशय छोटे इंजेक्शन देण्यात आले. ती एक 'अतिशय वेदनादायक प्रक्रिया' होती. मात्र त्या म्हणतात की त्यामुळे त्यांच्या डोळ्यांखाली असणारी काही काळी वर्तुळं (डार्क सर्कल) कमी झाली आहेत.
नव्या उपचार पद्धतीवर अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता
अधिकाधिक अभ्यासांमधून ही एक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धत मानली जाते आहे. मात्र तरीदेखील अजूनही ती तुलनेनं नवीन उपचार पद्धत आहे. काही तज्ज्ञ इशारा देतात की त्यासंदर्भात असणाऱ्या वैज्ञानिक पुराव्यांपेक्षा त्याविषयी अधिक दावे केले जात आहेत आणि प्रचार केला जातो आहे.
डॉ. जॉन पॅग्लिआरो ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील एक कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोगतज्ज्ञ आहेत.
डॉ. जॉन म्हणतात की आपल्या शरीरात न्युक्लिओटाइड्सची महत्त्वाची भूमिका असते. ते आपल्या डीएनएची बांधणी करणारे घटक आहेत. ही बाब आपल्याला माहीत असली तरी ते प्रश्न उपस्थित करतात की 'सॅमन माशाचा डीएनए लहान तुकड्यांमध्ये कापून' तो आपल्या चेहऱ्यामध्ये इंजेक्ट केल्यानं तो आपल्या स्वत:च्या न्युक्लिओटाइड्सप्रमाणेच काम करेल का?
ते पुढे म्हणतात, "आमच्याकडे भक्कम डेटा नाही. एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून, मी त्याचा वापर सुरू करण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि परिणामकारता दाखवणारे किमान काही वर्षांचे मोठे, विश्वासार्ह अभ्यास पाहू इच्छितो. आपण अजून त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो नाही."
पॉलीन्युक्लिओटाइड्सचे दुष्परिणाम
शार्लोट बिक्ली पॉलीन्युक्लिओटाइड्सच्या विश्वातील त्यांच्या प्रवेशाचं वर्णन 'सॅमन-गेट' असं करतात.
31 वर्षांच्या शार्लोट बिक्ली न्यूयॉर्कच्या आहेत. गेल्या वर्षी त्यांनी 'लग्नापूर्वीची तयारी' म्हणून हे उपचार घेतले होते. त्यांचं लग्न होण्याच्या थोडेच दिवस आधी त्यांनी हे उपचार घेतले होते.
मात्र उपचारानंतर शार्लोट यांना त्वचेचा संसर्ग, इन्फ्लेमेशनची समस्या उद्भवली. उपचार घेण्याआधी होती त्यापेक्षा डोळ्याखाली अधिक काळी वर्तुळं आली.
"मला जे हवं होतं, त्याच्या अगदी उलट झालं. मी डॉक्टरांवर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी माझ्या शरीरावर जखमांच्या खुणा सोडल्या."
शार्लोट यांना वाटतं की त्यांना डोळ्यांखाली खूप खोलवर इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना उलट्या रिॲक्शनला सामोरं जावं लागलं. या उपचाराचे दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, लालसरपणा येणं, सूज येणं आणि जखमांच्या खुणा उमटणं. मात्र हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात.
काही रुग्णांच्या बाबतीत, त्यांना ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. किंवा जर पॉलीन्युक्लिओटाइड्स जर योग्य प्रकारे इंजेक्ट करण्यात आले नाहीत, तर त्याचे त्वचेवर डाग किंवा चट्टे उमटणं आणि संसर्ग होणं यासारखे दीर्घकालीन धोक असतात.
पॉलीन्युक्लिओटाइड्सचं नियमन होण्याची आवश्यकता
पॉलीन्युक्लिओटाइड्सचा युकेमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. युकेतील मेडिसिन्स हेल्थ अँड रेग्युलेटरी ऑथोरिटी (एमएचआरए) या आरोग्य क्षेत्रातील नियमन करणाऱ्या संस्थेत त्यांची वैद्यकीय उपकरणं म्हणून नोंदणी झालेली आहे. मात्र औषधांप्रमाणे त्यांचं नियमन केलं जात नाही.
युकेमध्ये ज्याप्रमाणे एमएचआरए ही नियमन करणारी संस्था आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ही संस्था आहे. पॉलीन्युक्लिओटाइड्सला एफडीएनं मान्यता दिलेली नाही.
"मी फक्त विचार करत होते. मी ते उपचार का घेतले? जेव्हा माझ्या चेहऱ्यावर काहीतरी चुकीचं होतं, तेव्हा माझं त्यावर प्रचंड लक्ष केंद्रित होतं," असं शार्लोट म्हणतात.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी वैद्यकीय उपचारांवर हजारोंनी खर्च केले आहेत. मात्र 10 महिने झाल्यावरही त्यांच्या डोळ्याखाली अजूनही काही जखमांच्या खुणा आहेत.
"मी माझ्या चेहऱ्यावर पुन्हा कधीही सॅमन माशाचा डीएनए इंजेक्ट करून घेणार नाही. कधीही नाही," असं शार्लोट म्हणतात.
ॲश्टन कॉलिन्स 'सेव्ह फेस' या संस्थेच्या संचालक आहेत. ही संस्था कॉस्मेटिक उद्योगाचं चांगल्या प्रकारे नियमन व्हावं यासाठी मोहीम चालवते. तसंच युकेमध्ये सरकारी मान्यताप्राप्त क्लिनिकचं रेकॉर्ड ठेवते.
ॲश्टन कॉलिन्स म्हणतात की पॉलीन्युक्लिओटाइड्स जर वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित व्यावसायिकांनी दिले तर ते सामान्यपणे सुरक्षित उपचार मानले जातात. तसंच यात वापरला जाणारा पॉलीन्युक्लिओटाइड्सचा ब्रँड एखाद्या प्रतिष्ठित कंपनीचा असतो.
"मात्र आता आपल्याला दिसतं आहे की बाजारात अशी उत्पादनं येत आहेत, ज्यांची योग्यरीत्या चाचणी झालेली नसते. हीच चिंतेची बाब आहे," असं त्या म्हणतात.
डॉ. सोफी शॉटर ब्रिटिश कॉलेज ऑफ ॲस्थेटिक मेडिसिनच्या अध्यक्ष आहेत. त्या याच्याशी सहमत आहेत.
त्या म्हणतात, "नियमनाचा अभाव असल्यामुळे, योग्यरितीनं चाचणी न केलेली उत्पादनंदेखील कोणीही वापरू शकतो. तीच खरी समस्या आहे."
पॉलीन्युक्लिओटाइड्स नेमके किती प्रभावी?
पॉलीन्युक्लिओटाइड्स प्रभावी आहेत का, याबद्दल त्यांचं काय मत आहे?
"ती माझ्या शेल्फमध्ये, टूलबॉक्समध्ये आहेत. ज्या ग्राहकांना (रुग्णांना) नैसर्गिक स्वरूप हवं आहे आणि ज्यांना दीर्घकालीन परिणाम हवे आहेत, अशांना मी ते नक्कीच देते," असं डॉ. शॉटर म्हणतात.
"पॉलीन्युक्लिओटाइड्स हा काही सर्व गोष्टींवर प्रभावी ठरणारा उपाय नाही. असेच परिणाम इतर अनेक उपचारांद्वारे साधले जाऊ शकतात. तसंच त्यांच्या परिणामकारकतेबाबत अधिक डेटा उपलब्ध आहे," असं त्या म्हणतात.
सर्वांसाठीच उपयुक्त किंवा प्रभावी ठरणारी कोणतीही एकच उपचार पद्धत नाही, असं त्या पुढे म्हणतात.
"आपल्या सर्वांचं शरीर वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. त्याविषयीचा अंदाज नेहमीच लावता येत नाही," असं डॉ. शॉटर म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)