You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भूमी पेडणेकरची 'या' त्वचारोगाशी झुंज; काय आहे हा रोग आणि त्यावर उपाय काय?
- Author, अवतार सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने अलीकडेच स्कीन कंडीशन एक्झिमा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे.
भूमी पेडणेकरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमधून याबाबतची माहिती दिली आहे. तिने सांगितलं की, तिला एक्झिमाचा त्रास आहे आणि तो फारच वेदनादायी असतो.
तिने लिहिलंय की, "जेव्हा केव्हा मी प्रवास करते, अथवा माझं खाणं-पिणं ठिक नसतं वा मी तणावात असते, असं कोणतंही कारण असो, माझा एक्झिमा वाढतो."
पुढे तिने लिहिलंय की, "यामुळे (एक्झिमामुळे) फार त्रास होतो. कारण, त्यामुळे फार वेदना होतात तसेच अस्वस्थता निर्माण होते. मी लवकरच याबाबत आणखी संवाद साधेन."
एक्झिमा काय असतो? त्याची लक्षणं काय आहेत? आणि तो कशाप्रकारे बरा केला जाऊ शकतो? याची माहिती घेऊयात.
यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हीसनुसार (एनएचएस), एक्झिमा एक स्कीन कंडीशन आहे. म्हणजेच, ती त्वचेची अशी एक अवस्था आहे, ज्यामध्ये त्वचा कोरडी होते आणि त्यावर खाज यायला लागते.
स्कीन एक्स्पर्ट डॉ. अंजू सिंगला यांचं असं म्हणणं आहे की, एक्झिमा अनेक प्रकारचा असतो आणि तो अनुवंशिक कारणांमुळे वा व्हिटामिनच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकतो.
पटियाला जिल्ह्याचे माजी सिव्हील सर्जन तसेच त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. हरीश मल्होत्रा यांचं असं म्हणणं आहे की, एक्झिमामध्ये त्वचा रूक्ष होऊ शकते आणि रक्तदेखील येऊ शकतं.
त्यांचं असंही म्हणणं आहे की, हा रोग अनुवंशिक कारणांमुळे वा शरीरातील एखाद्या कमतरतेमुळेही होऊ शकतो. ते असंही सांगतात की, एक्झिमा हा कपडे, चप्पल वा दुसऱ्या एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यामुळेही होऊ शकतो.
युकेतील एनएचएसनुसार, एक्झिमा अनेक प्रकारचा असतो. जसे की, एटोपिक एक्झिमा, व्हेरिकोज् एक्झिमा, डिस्कॉईड एक्झिमा आणि कॉन्टॅक्ट एक्झिमा.
एटोपिक एक्झिमा: एटोपिक एक्झिमा (एटोपिक डर्मटायटिस) एक कॉमन स्कीन कंडीशन आहे. यामुळे, खाज येणं, त्वचा रूक्ष होणं, त्वचा फुटणं अशा गोष्टी होतात. हा रोग वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो. मात्र, लहान मुलांमध्ये तो सर्वसामान्य आहे. हा रोग पूर्णपणे बरा केला जाऊ शकत नाही. मात्र, या रोगाची लक्षणं औषधांच्या माध्यमातून नियंत्रणात आणता येतात.
व्हेरिकोज् एक्झिमा: व्हेरिकोज् एक्झिमालाच ग्रॅव्हिटेशनल वा स्टॅसिस एक्झिमादेखील म्हटलं जातं. हा अधिकतर पायाच्या खालील भागामध्ये होतो. त्वचेचा हा रोग अधिक काळापर्यंत राहतो.
या त्वचारोगातही त्वचेला रूक्षपणा येतो, त्वचेवर पापुद्रे येतात, सूज येते आणि खाजही सुटते. यामध्ये त्वचेचा रंगही बदलू शकतो.
हा त्वचारोग व्हेरिकोज् व्हेईन्स झालेल्या लोकांना सामान्यत: होतो. व्हेरिकोज् व्हेईन्स या फुगलेल्या, वळणदार नसा असतात. त्या सामान्यत: निळ्या वा जांभळ्या रंगाच्या असतात आणि त्या पायांवर येतात.
डिस्कॉइड एक्झिमा: डिस्कॉइड एक्झिमामध्ये गोल अथवा अंडाकारात त्वचा फुटते. सूज येते आणि खाजही येते. हा त्वचारोगही दीर्घकाळ टिकतो.
कॉन्टॅक्ट एक्झिमा: कॉन्टॅक्ट डर्मटायटिस हा एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्याने होतो. यामध्येही त्वचेला खाज येणं, त्वचा रूक्ष होणं, तिच्यावर त्यावर फोड येणं तसेच भेगा पडणं, अशा गोष्टी होतात.
एनएचएसनुसार, एक्झिमाची लक्षणं कोणत्याही वयात दिसू शकतात. मात्र, सामान्यत: ही लक्षणं नवजात आणि लहान मुलांमध्ये सुरू होतात. ही लक्षणं वाढत्या वयासोबत बरी होत जातात.
सहसा, या आजारात अशीही वेळ काही वेळा येते जेव्हा ही लक्षणं आणखी वाईट होत जातात (ज्याला फ्लेअर-अप म्हणतात) आणि काही वेळा अशीही वेळ येते की, ही लक्षणं बरीही होतात.
या लक्षणांमध्ये खाज सुटणं, कोरडेपणा येणं, त्वचेला भेगा पडणं, त्वचेवर कवच तयार होणं, त्वचा लाल, पांढरी, जांभळी किंवा तपकिरी रंगाची होणं, यांचा समावेश होतो.
यासोबतच एक्झिमाच्या लक्षणांमध्ये फोड येणं किंवा रक्तस्त्राव होणं, यांचा देखील समावेश होतो.
डॉ. अजू सिंगला यांचं म्हणणं आहे की, एक्झिमाचा उपचार त्याच्या प्रकारावर अवलंबून असतो.
"रुग्णाला गरजेनुसार स्टिरॉइड्स दिले जातात. परंतु त्यासोबतच सतत मॉइश्चरायझेशन देखील केलं जातं. हा उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीरात कोणतीही कमतरता आढळल्यास ती पूर्ण करणे देखील महत्त्वाचं आहे," असं डॉ. सिंगला सांगतात,
डॉ. हरीश मल्होत्रा म्हणतात की, एक्झिमाची व्याप्ती खूप विस्तृत आहे.
डॉ. मल्होत्रा यांच्यामते, "एकदा हा आजार झाला की, त्यावर उपचार करणं फार गरजेचं आहे. तसेच, तिथून पुढेही त्याचं मूळ कारण ओळखणं आणि त्यापासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. रुग्णाला या आजारासोबत इतर कोणतेही गंभीर आजार नाहीत ना, याची खात्री करणंदेखील महत्त्वाचं आहे."
भूमी पेडणेकरने आपल्या सिने-कारकिर्दीची सुरुवात 'दम लगा के हईशा' या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. आयुष्मान खुरानासोबत तिने केलेला हा चित्रपट 2015 मध्ये आला होता. या चित्रपटासाठी तिने आपलं वजन प्रचंड वाढवलं होतं.
याशिवाय, तिने 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'शुभ मंगल सावधान', 'लस्ट स्टोरीज्', 'सोनचिडिया', 'सांड की आँख', 'भीड', 'भक्षक' यासहित इतरही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अलीकडेच ती नेटफ्लिक्सवरील 'द रॉयल्स'मध्येही दिसली आहे.
भूमी पेडणेकरने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, तिचे चित्रपट सामाजिक समस्या, नैतिकता असलेली पत्रकारिता आणि लैंगिक हिंसाचार या गोष्टींवर भाष्य करणारे आहेत.
त्याच मुलाखतीत तिने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल सांगितलं होतं.
ती म्हणाली होती की, "गेल्या 10 वर्षांसाठी मी खूप आभारी आहे. मी दररोज सकाळी या भावनेने उठते की मी चित्रपटाच्या सेटवर जात आहे आणि ही एक भावना माझ्यासाठी सर्वकाही आहे. ही फक्त सुरुवात आहे, मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)