हितेंद्र ठाकूर: ज्या सुरेश दुबेंच्या हत्येचा आरोप भाई ठाकूरवर होता, त्याच्या भावालाच दुबेंच्या सुनेनं हरवलं

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

वसई आणि नालासोपारा हे दोन मतदारसंघ मतदानाच्या आदल्या दिवशी चर्चेत राहिले. कारण, इथं पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर झाला. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या नेत्यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिल्याचं सांगून खळबळ उडवून दिली होती.

तावडेंवर आरोप करणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर हितेंद्र ठाकूर यांचा राजकारणात पहिल्यांदाच पराभव झाला.

हितेंद्र ठाकूर यांचा पराभव स्नेहा पंडित दुबेंनी केला. स्नेहा पंडित यांचे सासरे सुरेश दुबे यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ जयेश उर्फ भाई ठाकूर यांच्यावर होता.

सासऱ्यांच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा पराभव केल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

भाई ठाकूर यांची या हत्या प्रकरणातून TADA अंतर्गत चालल्या खटल्यात 2023 मध्ये पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती.

यानिमित्तानं स्नेहा दुबे यांचे सासरे सुरेश दुबे यांचं हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हे हत्या प्रकरण नेमकं काय होतं? यामध्ये भाई ठाकूर कसा अडकला होता? हेच पाहुयात.

नालासोपारा रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार

दिवस होता 9 ऑक्टोबर, साल होतं 1989, वेळ होती सकाळी 10.30 वाजताची आणि ठिकाण होतं नालासोपारा रेल्वे स्थानक.

याचठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत वृत्तपत्र वाचत बिल्डर सुरेश दुबे बसले होते. तिथे रिव्हॉल्वर घेऊन काही लोक आले आणि गोळ्या झाडून ऐन वर्दळीत बिल्डर सुरेश दुबेंची हत्या केली.

या स्थानकावर अनेकजण होते. पण, मारणाऱ्याची दहशत इतकी होती की कोणी याबद्दल बोलायला तयार नव्हतं. कारण, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या भाई ठाकूरची दहशत वसई-विरार भागात होती. हाजी मस्तान आणि दाऊदबोसत भाई ठाकूरचं नाव घेतलं जात होतं.

नव्वदच्या दशकात वसई-विरार हा विरळ भाग होता. पण, मुंबईसोबत हा भाग देखील झपाट्यानं विकसित होऊ लागला. बेकायदा जमिनी बळकावणे, त्यावर बांधकाम करून ते विकणे, त्यासाठी खून-मारामाऱ्या हे सुरू झालं. भूखंडावर बांधकाम करून ते विक्री करण्याच्या व्यवसायात सुरेश दुबे यांचं कुटुंबही होतं.

सुरेश दुबे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधून आपल्या चार भावांसोबत नालासोपारा भागात राहायला आले. त्यांनी इथेच दुबे इस्टेट नावानं इमारत बांधली आणि हे चारही भाऊ तिथेच स्थायिक झाले.

सुरेश दुबे यांचा एक भाऊ डॉक्टर होता. त्यांनी घरीच नर्सिंग होम उघडलं होतं. एक भाऊ बांधकाम साहित्याचा व्यवसाय करायचा, तर एक हॉटेल व्यवसाय बघायचा. तर श्याम सुंदर दुबे आणि सुरेश दुबे दोघे जण इमारती बांधकाम आणि विक्रीचा व्यवसाय करत होते.

याच भागात पत्रकारिता केलेले युवराज मोहिते सांगतात, सुरेश दुबे हे व्यावसायिक होते. जमिनी घ्यायच्या, त्या विकसित करायच्या, इमारती बांधायच्या आणि त्या विकायच्या असा त्यांचा व्यवसाय होता.

तर दुसरीकडे भाई ठाकूरची दहशत होती. त्या काळात जमिनी बळकावणं, हडपणे, बेकायदेशीर बांधकाम करणं यांचं पेव फुटलं होतं.

सुरेश दुबेही हे असेच विकासक होते. पण, त्यांची हत्या का झाली होती?

सुरेश दुबे यांची हत्या का झाली होती?

सुप्रीम कोर्टाच्या 2000 सालच्या एका आदेशात नमूद माहितीनुसार, दुबे बंधूंनी आचोळे गावाजवळचा एक भूखंड खरेदी करायचं ठरवलं. पण, भाई ठाकूरला ती जमीन हवी होती आणि बळजबरीनं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.

ही जमीन आपल्याला हस्तांतरीत करावी यासाठी भाई ठाकूरने प्रयत्न केले. त्यासाठीच सुरेश दुबे यांना भाई ठाकूरने विरार इथल्या कार्यालयात बोलावलं. यावेळी त्या जमिनीबाबत चर्चा झाली आणि विरारमध्ये व्यवसाय करायचा असेल तर हफ्ता द्यायला लागेल असं बजावण्यात आलं.

भाई ठाकूरकडून धमक्या मिळाल्यानंतर दुबेंनी घरातून बाहेर पडणं बंद केलं. 8 ऑक्टोबर 1989 रोजी देखील जमिनीचं हस्तांतरण केलं नाहीतर भाई ठाकूर तुला संपवेल अशी धमकी दुबेंना आली होती. त्यानंतर सुरेश दुबे यांनी गावी गोरखपूरला जाऊन राहावं असं त्यांच्या भावांनी सूचवलं.

याच काळात सुरेश दुबेंचा एक नातेवाईक त्यांच्या घरी येऊन राहत होता. तो 9 ऑक्टोबरला विले पार्ले इथं एका कामासाठी जाणार होता. सुरेश देखील गोरखपूरला जाण्याचं तिकीट काढण्यासाठी नातेवाईकासोबत घराबाहेर पडले.

दोघांनीही 10.15 वाजण्याच्या सुमारास घर सोडलं. दोन ते तीन मिनिटात ते नालासोपारा रेल्वे स्थानकावर पोहोचले. प्लॅटफॉर्मवर खूप सारे प्रवाशीही होते. चर्चगेटकडे जाणाऱ्या ट्रेन उशिरा धावत असल्यानं सुरेश वृत्तपत्र घ्यायला गेले. त्यांनी वृत्तपत्र घेऊन वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाई हे बूट पॉलिश करत होते.

इतक्यात तिथं हातात रिव्हॉलव्हर घेऊन काही लोक आले आणि त्यांनी सुरेश दुबे यांच्या दिशेनं गोळीबार केला. यात सुरेश दुबे गंभीर जखमी आणि प्लॅटफॉर्मर कोसळले. मारेकरी त्यांच्या जवळ गेला आणि आणखी एक गोळी झाडली. यामध्ये सुरेश दुबेंचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर दुबेंना ओळखणाऱ्यांनी त्यांच्या घरी मृत्यूची माहिती दिली. सुरेश यांचे भाऊ श्यामसुंदर दुबे आले आणि त्यांचा मृतदेह घरी घेऊन गेले.

कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये फिर्यादी पक्षाने असे म्हटले होते की या घटनेची पोलिसांतही इतकी दहशत होती की त्यावेळचे वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी दुबेंच्या घरी जाऊन तक्रारी भाई ठाकूरचं नाव समोर येऊ देऊ नका असं सांगितलं होतं. त्यानंतरही दुबे यांनी तक्रार दिली. आरोपींना अटक करून जामीन देण्यात आला.

दरम्यानच्या काळात आरोपी फरार झाल्यानं सत्र न्यायालयात हे प्रकरण चालू शकलं नाही. त्यानंतर 1992 मध्ये सुराडकर नावाचे डीआयजी आले आणि हे प्रकरण पुन्हा सुरू झालं. पोलीस उपायुक्त देशमुख यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली. यामध्ये सुरेश दुबे यांच्या हत्येसाठी भाई ठाकूर आणि माणिक पाटील यांची गँग असल्याचं समोर आलं.

भाई ठाकूरसोबत इतर गुन्हेगार TADA अंतर्गत तुरुंगात गेले. त्यांच्यावर खटला चालला पण, पुराव्याअभावी गेल्या वर्षी 2023 ला भाई ठाकूरसह इतर आरोपींची TADA मधून निर्दोष मुक्तता झाली.

ही देशातली शेवटची TADA ची केस होती. कारण, भाई ठाकूरवर 1992 मध्ये TADA लागला आणि 1995 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला.

ठाकूर कुटुंब राजकारणात उतरलं

दरम्यान, 1990 च्या दशकात भाई ठाकूरचा भाऊ हितेंद्र ठाकूर राजकारणात उतरले. ते 1990 ला काँग्रेसकडून वसई-विरार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. 1990 नंतर हितेंद्र ठाकूर चारवेळा आमदार झाले.

2009 ला हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांच्या बहुजन विकास आघाडीकडून नारायण मानकर यांनी निवडणूक लढवली होती.

त्यावेळी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा विजयही झाला होता. त्यानंतर पुन्हा हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले आणि त्यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या.

वसई विरार त्या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर पण हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा आहे. पण, 2024 च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला.

हितेंद्र ठाकूर यांचा भाऊ भाई ठाकूरला ज्या हत्या प्रकरणात टाडाअंतर्गत अटक झाली होती त्या सुरेश दुबे यांच्या सून स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा या निवडणुकीत पराभव केला.

स्नेहा दुबे या सुरेश दुबे यांचा भाऊ श्यामसुंदर दुबे यांच्या सून असून श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची मुलगी आहे. स्नेहा दुबे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली असून त्यांनी 3 हजार मतांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.