'माहेरवाशीण' म्हणत कासवांच्या शेकडो पिल्लांना वाचवणाऱ्या कोकणातल्या गावाची गोष्ट

फोटो स्रोत, Nitin Nagarkar
- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवर वसलेलं वेळास हे छोटंसं गाव आज देशभरात 'कासवांचं गाव' म्हणून प्रसिद्ध झालं आहे. ऑलिव्ह रिडले जातीच्या सागरी कासवांच्या संरक्षणासाठी गावकऱ्यांनी गेल्या 22 वर्षांपासून अविरत मेहनत घेतली आहे.
या प्रयत्नांमुळे वेळासचा 'कासव महोत्सव' आता केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनला आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक कासवांच्या पिल्लांना समुद्रात जाताना पाहण्यासाठी या गावात येतात, आणि हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरतो.
पण, खरं तर वेळासमधील कासव संरक्षणाची मोहीम एका अपघातानेच सुरू झाली होती.
2002 साली सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे सदस्य पांढऱ्या पोटाच्या सागरी गरूडाचा अभ्यास करण्यासाठी वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते.
त्यावेळी त्यांना कासवांच्या अंड्यांची टरफलं दिसली. चौकशी केल्यावर त्यांना धक्कादायक वास्तव समजलं की, स्थानिक लोक कासवांची अंडी चोरून खातात, शेजाऱ्यांना वाटतात, विकतात किंवा अगदी गुरांनाही खायला देतात.
ही बाब सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांना अस्वस्थ करणारी वाटली. त्यांनी याला थांबवण्यासाठी आणि कासवांचं संरक्षण करण्यासाठी एक मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar
भाऊ काटदरे यांनी सांगितलं की, "मारुती चित्तमपल्ली आणि प्रकाश गोळे यांच्या सल्ल्याने 90 च्या दशकात आम्ही कोकण किनारपट्टीवर कासवांची घरटी शोधण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं. पण त्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही.
पुढे 2002 मध्ये आम्हाला इथल्या किनाऱ्यावर 30-35 खड्डे सापडले. त्यात कासवांच्या अंड्यांची टरफलंही दिसली.
यानंतर आम्ही स्थानिकांशी बोललो आणि समजलं की, इथल्या समुद्रकिनाऱ्यावर कासवं अंडी देताता पण काही स्थानिक लोक ती गायब करतात. हे थांबवण्यासाठी आम्ही 2003 पासून वेळास गावात कासव संरक्षण मोहीम सुरू केली."
पण कासवांचं संरक्षण करणं हे काही सोपं काम नव्हतं. अंडी चोरणारे स्थानिक लोक, कोल्हे आणि कुत्रे यांच्याटासून त्यांचं बचाव करणं गरजेचं होतं.

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मादी कासवं अंडी घालण्यासाठी कोकणच्या किनाऱ्यावर येतात.
भरतीच्या रेषेपलीकडे दीड फुट खोल खड्डा खणून त्यात 80-150 अंडी मादी घालते. स्थानिक कासव मित्र ही अंडी काळजीपूर्वक भरतीच्या वरच्या बाजूला बांधलेल्या हॅचरीत हलवतात.
हॅचरीत नैसर्गिक पद्धतीनेच अंड्यांचं संरक्षण केलं जातं. त्यामुळं पिलांना बाहेर येण्यास कोणताही अडथळा येत नाही. 50-55 दिवसांनंतर ही पिल्लं बाहेर येतात आणि कासव मित्र त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडतात.
कोकण किनारपट्टी भागात कासवांच्या पिल्लांना दिवसातून दोनदा समुद्रात सोडलं जात. एकदा सकाळच्या सत्रात आणि पुन्हा एकदा संध्याकाळी.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar
कासव अभ्यासक मोहन उपाध्याय सांगतात की, "एक हजार पिल्लांपैकी जेमतेम एकच पिल्लू मोठं होतं. हा यशाचा दर खूपच कमी आहे, पण आम्ही हार मानत नाही. प्रत्येक पिल्लाला समुद्रात पोहोचवणं हा आमचा ध्यास आहे."
"गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 16 किनाऱ्यांवर 680 घरटी सापडली होती. यंदा 23 किनाऱ्यांवर 1351 घरटी आढळली आहेत. ही वाढ दर्शवते की, संरक्षणाचे प्रयत्न यशस्वी होत आहेत."

स्थानिकांना संवर्धन आणि संरक्षणाच्या या मोहिमेमध्ये सामावून घेण्यासाठी वेळासमध्ये कासव महोत्सवाची सुरुवात झाली.
2006 सालापासून सुरू झालेला वेळासचा कासव महोत्सव आता राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च-एप्रिलमध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो.
यावेळी पर्यटक कासवांच्या पिल्लांना समुद्राकडे झेपावताना पाहण्यासाठी येतात. ही छोटीशी पिल्लं त्यांच्या नाजूक पावलांनी समुद्राच्या दिशेने जाताना आणि त्यांना पाण्याचा पहिला स्पर्श अनुभवताना पाहणं हा एक सुखद अनुभव आहे.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar
मोहन उपाध्याय म्हणतात की, "लोकांना वाघ पाहण्याची जशी उत्सुकता असते, तशीच इथल्या कासवांच्या पिल्लांना पाहण्याची उत्सुकता असते. काही पर्यटक तर दरवर्षी न विसरता येतात, आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो."
कासव संरक्षणामुळे वेळास गावात समृद्धी आली आहे. पूर्वी 'लॉस्ट वेळास' म्हणून ओळखलं जाणारं हे गाव आता 'किर्तिवान वेळास' म्हणून प्रसिद्ध आहे.

कासव महोत्सवामुळे गावातील पर्यटन वाढलं आहे. होम स्टेची संख्या सहावरून चाळीसच्या वर गेली आहे. स्थानिकांना पर्यटनामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आहेत.
स्थानिक होम स्टे चालक धनश्री काणे म्हणाल्या की, "कासव महोत्सवामुळे पर्यटक येतात. आमच्या व्यवसायाला यामुळे बळ मिळालं आहे. पूर्वी साध्या नकाशावरही न दिसणारं वेळास गाव आज जगाच्या नकाशावर दिसू लागलं आहे ते केवळ कासवांमुळेच."
तसंच, विभा दरीपकर यांच्यासारख्या स्थानिक महिलाही मोहिमेत सहभागी होऊन आपलं योगदान देत आहेत. त्या म्हणतात की, "कासव संरक्षणाने आमच्या गावाला नवी ओळख आणि आत्मसन्मान मिळाला आहे."

फोटो स्रोत, Nitin Nagarkar
गावामध्ये कोणीही रिसॉर्ट बांधणार नाही असा ठरावच ग्रामसभेने करून घेतला आहे. घरामध्येच होम स्टेची सुविधा द्यायची असं, ग्रामस्थांनी ठरवलं आहे. यामुळे गावाचं विद्रुपीकरण होणार नाही असं, लोकांचं म्हणणं आहे.

कासव संरक्षण मोहिमेला काही आव्हानांचा सामनाही करावा लागतो. यातील सर्वात मोठी समस्या आहे कचऱ्याची. प्लास्टिकच्या बाटल्या, खराब झालेल्या मासेमारीच्या जाळ्या आणि इतर कचरा कासवांना त्रासदायक ठरतो.
अंडी घालणाऱ्या मादी कासवांना या कचऱ्यामुळे अडथळे येतात. वेळाससह कोकणातील बहुतांश किनाऱ्यांवर स्वच्छतेची समस्या आहे.
दाभोळ येथील कासव मित्र परेश वाडकर सांगतात की, "कचऱ्यामुळे कासवांना धोका निर्माण होतो. आम्ही स्वच्छता मोहीम राबवतो, पण लोकांनीही याबाबत जागरूक होणं गरजेचं आहे.
अंडी घालायला येणाऱ्या मादा कासव माहेरवाशीण आहे. बाळंतपणासाठी आलेल्या आपल्या घरच्या मुलीची कशी कळजी घेतो. तशीच काळजी या कासवांची घेणं आवश्यक आहे."
या समस्येशी लढण्यासाठी वनविभाग आणि ग्रामपंचायत एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. वेळासचे सरपंच सुनील पाटील म्हणाले, "कासव संरक्षण हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही गावकऱ्यांना स्वच्छतेबाबत जागरूक करत आहोत आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक पर्यटकांकडून ग्रामपंचायत स्वच्छता करही घेत आहे"
वेळासच्या यशस्वी कासव संरक्षण मोहिमेचा 'वेळास पॅटर्न' आता महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर राबवलं जात आहे. गुहागर, आंजर्ले, गावखडी, दाभोळसारख्या इतर गावांनीही या मोहिमेला उत्तम साथ दिली आहे.

फोटो स्रोत, Sahyadri Nisarg Mitra
कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल किरण ठाकूर यांच्या मते, "कासवांचं संरक्षण हे पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही यासाठी जीव ओतून काम करतो.
कासव संरक्षणाचं काम खूप कष्टाचं आहे. पहाटे किनाऱ्यावर जाऊन अंडी शोधणं, ती खड्ड्यातून काळजीपूर्वक बाहेर काढणं, हॅचरीत 50-55 दिवस त्यांचं जतन करणं आणि पिल्लांना समुद्रात सोडणं, यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि जिद्द लागते. कासव मित्र हे काम इमाने-इतबारे करतात."
वेळासच्या या मोहिमेने केवळ कासवांचं संरक्षणच केलं नाही, तर पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक समृद्धीचा एक नवा मार्ग दाखवला आहे.
कासव संरक्षणाने गावाला नवी ओळख मिळाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, आणि गावाचा कायापालट झाला आहे.
वेळासने जो पायंडा पाडला, तो आज देशभरासाठी प्रेरणादायी आहे.
ही छोटीशी कासवं आणि त्यांच्या पिल्लांनी वेळासला एक मोठी मजल मारायला शिकवलं आहे, आणि ही कहाणी प्रत्येकाला पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा देणारी आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











