कोकण किनाऱ्यापासून 5 हजार किलोमीटरचा प्रवास करत 'या' कासवाने संशोधकांना जिंंकून दिलं

फोटो स्रोत, Mangrove Foundation
- Author, आरती कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोकणच्या किनाऱ्यावर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवलेलं ऑलिव्ह रिडले कासव आता बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. या ‘बागेश्री’ कासविणीने 7 महिन्यांत तब्बल 5 हजार किमीचा पल्ला गाठला आहे!
‘बागेश्री’ ही कासवीण फेब्रुवारी 2022 मध्ये अंडी घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या किनाऱ्यावर आली होती. त्यावेळी तिला सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आला आणि आता तिच्या समुद्रातल्या प्रवासाचं ट्रॅकिंग सुरू आहे.
बागेश्रीला सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून लगेच सोडण्यात आलं. त्यानंतर तिने अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ ते अगदी कन्याकुमारीच्या किनाऱ्यालगत प्रवास केला आणि मग जुलै महिन्यात ती श्रीलंकेला जाऊन पोहोचली.

फोटो स्रोत, Mangrove Foundation
श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत हिंदी महासागरात ती बरेच दिवस होती आणि मग तिने बंगालच्या उपसागराचा मार्ग घेतला. बागेश्री आता पुन्हा बंगालच्या उपसागरातून श्रीलंकेकडे वळली आहे.
‘बागेश्री’ चा जन्म गुहागरचा?
‘बागेश्री’ जर बंगालच्या उपसागरात जाऊ शकते तर ती तिथेच अंडी का घालत नाही? ती पूर्वेकडून एवढ्या लांब पश्चिम किनाऱ्यावर, गुहागरला अंडी घालण्यासाठी का आली असावी?
‘याचा अर्थ बागेश्रीचा जन्म गुहागरच्या किनाऱ्यावर झाला असावा!’ कासवांचा अभ्यास करणारे
डॉ. सुरेशकुमार बागेश्रीबद्दलचं हे रहस्य सांगतात तेव्हा खरंच अचंबित व्हायला होतं.
ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म ज्या किनाऱ्यावर होतो त्या किनाऱ्याची नोंद त्यांच्या मेंदूमध्ये घेतली जाते. किनाऱ्यावरून समुद्रात जाताना त्या किनाऱ्याचा ठसा त्यांच्या मेंदूमध्ये इनप्रिंट होतो. जेव्हा ती मोठी होतात तेव्हाही ती त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात, अशीही संशोधकांची धारणा आहे. म्हणूनच बागेश्री आणि गुहा पुढच्या हंगामात गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येऊ शकतात, असा संशोधकांचा अंदाज आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचा पहिला प्रयोग
‘बागेश्री’सारख्या अशा सात ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आला आहे. असा प्रयोग भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पहिल्यांदाच करण्यात आला आणि महाराष्ट्राची ही कासव संवर्धनाची चळवळ जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली.
मॅनग्रोव्ह सेल आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे हा प्रकल्प हाती घेतला आहे.

फोटो स्रोत, Dinyar Hathikhanwala
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. आर. सुरेशकुमार हे या कासवांच्या प्रवासाचा अभ्यास करतायत. ते सांगतात, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रजननासाठी येणाऱ्या ऑलिव रिडले कासवांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही दोन टप्प्यात कासवांना सॅटेलाइट टॅगिंग केलं.
पहिल्या टप्प्यात पाच कासवांना हे टॅगिंग करण्यात आलं होतं. पण काही तांत्रिक कारणांमुळे या कासवांचे सिग्नल एकेक करत बंद झाले. दुसऱ्या टप्प्यात मात्र या प्रयोगाला चांगलं यश आलं.
बागेश्री आणि गुहा या दोन्ही कासविणींकडून त्यांच्या समुद्रातल्या प्रवासाचे सिग्नल उत्तम प्रकारे मिळत आहेत. बागेश्रीने श्रीलंकेपर्यंतचा पल्ला गाठला आहे तर गुहा कर्नाटकच्या किनाऱ्यालगत फिरते आहे.
असं केलं सॅटेलाइट टॅगिंग
‘बागेश्री’ फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आली.
किनाऱ्यावर खड्डा खणून तिने सुमारे 150 अंडी घातली. अंडी घालून, खड्डा बुजवून ती पुन्हा समुद्रात जायला निघाली तेव्हा तिला किनाऱ्यावरच थांबवून घेण्यात आलं आणि सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आला.
समुद्रात सोडतानाच तिचं नामकरण झालं आणि नाव ठेवलं ‘बागेश्री’.
‘वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे डाॅ. सुरेशकुमार सांगतात, "याआधी पश्चिम किनाऱ्यावर टॅगिंग केलेली पाच कासवं अरबी समुद्रातच फिरत होती. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावरची आणि पश्चिम किनाऱ्यावरची कासवांची वसाहत वेगवेगळी असावी, असं मला वाटलं होतं. पण बागेश्री तर अरबी समुद्रातून आधी हिंदी महासागर आणि नंतर बंगालच्या उपसागरात गेली. म्हणजे या दोन्ही वसाहती एकमेकांमध्ये मिसळत असाव्यात, असा निष्कर्ष काढता येतो."
कासवं सिग्नल कसा देतात?
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या संख्येनं अंडी घालण्यासाठी येतात. इथे गहिरमाथा, ऋषिकुल्या या किनाऱ्यांवर विणीच्या हंगामात म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यांत या कासवांचा मेळाच भरतो. याला म्हणतात, ‘अॅरिबाडा’. हा स्पॅनिश शब्द आहे. ‘अॅरिबाडा’ म्हणजे मोठ्या संख्येने होणारं आगमन.
डॉ. सुरेशकुमार यांनी ओडिशाच्या किनाऱ्यावर याआधी 65 ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून त्यांच्या प्रवासाचा आणि वर्तनाचा अभ्यास केला होता. त्यामुळे सॅटेलाइट टॅगिंगमधला त्यांचा अनुभव दांडगा आहे.

फोटो स्रोत, Mangrove Foundation
कासवांना लावलेला हा ट्रान्समीटर दोन प्रकारे काम करतो. हे कासव समुद्रात कुठे-कुठे जातं याची माहिती तो देतोच. शिवाय हे कासव किती खोलीपर्यंत गेलं आहे याचीही माहिती मिळते.
समुद्री कासवं पाण्याखाली असताना श्वास घेऊ शकत नाहीत. श्वास घेण्यासाठी त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर यावंच लागतं. कासव जेव्हा श्वास घेण्यासाठी वर येतं तेव्हा त्याला लावलेला ट्रान्समीटर सिग्नल देऊ शकतो. या सिग्नलचा प्रवास जसजसा पुढे जातो तसतसा कासवाच्या प्रवासाचा मार्ग कळू शकतो.
नरांना टॅगिंग का नाही ?
ऑलिव्ह रिडले कासवं फक्त अंडी घालण्यासाठी काही तास किनाऱ्यावर येतात. उरलेला सगळा काळ ती समुद्रातच असतात. त्यातही प्रजननाच्या निमित्ताने फक्त या कासवांच्या माद्याच किनाऱ्यावर येतात. एरव्ही नर आणि मादी कासवांचं जोड्या जुळणं, त्यांचं मेटिंग हे सगळं समुद्रातच होतं. म्हणूनच कासवांचा अभ्यास करण्यासाठी किनाऱ्यावर आलेल्या माद्यांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावणं हाच एक व्यवहार्य पर्याय आहे.
कासवांना ट्रान्समीटरचा त्रास होतो का?
कासवांना असा ट्रान्समीटर लावल्याने त्यांना काही त्रास होत नाही का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे. त्यावर डाॅ. सुरेशकुमार यांचं प्रामाणिक उत्तर आहे, "हो. अशा ट्रान्समीटरचा कासवांना त्रास होऊ शकतो. पण हा ट्रान्समीटर जास्तीत जास्त हलका असेल अशी खबरदारी आम्ही घेतो. हा ट्रान्समीटर त्यांच्या एकूण वजनाच्या 5 टक्केही नसतो. शिवाय ट्रान्समीटर त्यांच्या पाठीवर बसवताना आम्ही जो गोंद वापरतो त्याला इतर जलचर चिकटू नये यासाठी एक वेगळं लेपन करावं लागतं."
ते म्हणतात, "असे ट्रान्समीटर लावले तरी कासवांच्या वर्तनात कोणताच फरक दिसत नाही. शिवाय त्यांच्या मेटिंगमध्येही अडचणी येत नाहीत, असं आमचं निरीक्षण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
‘ऑलिव्ह रिडले कासवांचा सखोल अभ्यास करायचा असेल तर काही कासवांबद्दल असे शास्त्रीय प्रयोग आपल्याला करावेच लागतील. आपण वाघ किंवा बिबट्यांना त्यांचा माग काढण्यासाठी रेडिओ काॅलर लावतो किंवा स्थलांतरी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावतो तसंच आहे हे.’
समुद्रातलं कासवांचं स्थान
ऑलिव्ह रिडले कासवं ही भारतीय वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असे प्रयोग करण्यासाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी अनुभवी वन्यजीव तज्ज्ञांनाच परवानगी दिली जाते. त्यामुळे असे प्रयोग कासवांसाठी अपायकारक होत नाहीत.
कोकण किनाऱ्यावर झालेल्या या ऐतिहासिक प्रयोगामुळे समुद्री कासवं आणि त्यांची सागरी परिसंस्था याबद्दल मोलाची माहिती हाती येते आहे. जंगलाच्या दृष्टीने जसं वाघांचं संवर्धन महत्त्वाचं आहे तसंच समुद्राच्या पर्यावरणामध्ये कासवं महत्त्वाची आहेत.
समुद्री कासवांबद्दलचे गैरसमज
मॅनग्रोव्ह सेलचे संशोधक मानस मांजरेकर सांगतात, "समुद्री कासवं किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. त्यामुळे ती उभयचर असावीत, असा आपला समज असतो. पण ही कासवं सरिसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या कुळातली आहेत.
कासव मंदगतीने चालतं, असंही आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळे ही कासवं इतका मोठा पल्ला कसा गाठू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण समुद्री कासवं अतिशय वेगवान असतात. ती महासागरही पार करू शकतात हे आता सिद्धच झालं आहे."
लेदरबॅक टर्टल : सर्वात मोठं समुद्री कासव
भारताच्या किनाऱ्यांवर पाच प्रकारची समुद्री कासवं अंडी घालण्यासाठी येतात. ऑलिव रिडले, ग्रीन टर्टल, लेदरबॅक टर्टल, हाॅक्सबिल आणि लाॅगरहेड टर्टल. यातलं लेदरबॅक टर्टल हे जगातलं सर्वात मोठं समुद्री कासव आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रालगतच्या समुद्रात लेदरबॅक आणि ग्रीन टर्टल ही कासवंही आढळतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर तर ग्रीन टर्टल म्हणजे हिरव्या कासवाच्या प्रजननाची नोंदही झाली आहे.
कोकणातली कासवांची चळवळ
रत्नागिरी जिल्ह्यातला वेळासचा किनारा म्हणजे कासवांची पंढरीच आहे. इथे सुमारे 20 वर्षांपूर्वी कासवांच्या संवर्धनाची चळवळ सुरू झाली. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेचे भाऊ काटदरे आणि राम मोने यांच्या पुढाकारामुळे कोकणात कासवांबद्दल जागृती झाली.
ऑलिव्ह रिडले कासवं पश्चिम किनाऱ्यावर प्रजननासाठी येतात याबद्दल स्थानिकांना फार कमी माहिती होती. काही गावांमध्ये अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांची शिकार होत होती, कासवांची अंडी चोरीला जात होती. पण ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ ने कोकणातल्या किनाऱ्यांवर कासवांबद्दल जागृती निर्माण केली, त्यांच्या घरट्यांचं संरक्षण करण्यासाठी हॅचरी तयार केल्या. गावकऱ्यांना या कामामध्ये सहभागी करून घेतलं आणि कासवांची पिल्लं सुखरूप समुद्रात सोडण्याची मोहीमच सुरू केली. आतापर्यंत कोकणच्या किनाऱ्यावर लाखो कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं आहे.
कासवांचा ‘ट्रेल’
वेळासचे मोहन उपाध्ये हे याच चळवळीतले बिनीचे शिलेदार आहेत. ते आता मॅनग्रोव्ह सेलच्या माध्यमातून कासवांच्या संवर्धनाचं काम करतात.
ते सांगतात, ऑलिव्ह रिडले कासवं रात्रीच्या वेळी, पहाटे किंवा कधीकधी शांत दुपारी किनाऱ्यावर येतात. ही कासवीण समुद्रातून येते तेव्हा किनाऱ्यावर तिच्या येण्याचा मार्ग म्हणजे ‘ट्रेल’ उमटतो. या ‘ट्रेल’ वरून तिचं घरटं शोधता येतं.

फोटो स्रोत, Getty Images
मोहन उपाध्ये यांच्याकडे याबद्दलची अतिशय रंजक माहिती आहे. ते म्हणतात, "साधारण पौर्णिमा किंवा अमावस्येच्या आसपास कासविणी किनाऱ्यावर येतात. तेव्हा भरती असते आणि कासवीण भरतीरेषेच्या पलीकडे घरटं करते. भरतीच्या पाण्यामुळे आपलं घरटं वाहून जाणार नाही, याची खबरदारी ती घेते!
त्यामुळे जेव्हा सॅटेलाइट टॅगिंग करायचं ठरलं तेव्हा आम्ही आधीच्या अनुभवावरून कासवांच्या किनाऱ्यावर येण्याच्या वेळांचा अंदाज बांधला."
असं केलं सॅटेलाइट टॅगिंग
मॅनग्रोव्ह सेलच्या कार्यकर्त्यांनी आणि दक्ष गावकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातल्या काही विशिष्ट तारखांना समुद्रावर गस्त घातली. त्यांचा अंदाज खरा ठरला. रात्रीच्या वेळी एक कासवीण किनाऱ्यावर आली. डाॅ. सुरेशकुमार यांच्यासोबत मॅनग्रोव्ह सेलचं मोठं पथक तैनात होतं. कासविणीने अंडी घालून खड्डा बुजवला. ती पुन्हा सुमद्रात जायच्या तयारीत होती तेव्हा तिला सुरक्षितरित्या पकडलं आणि पाण्याच्या टाकीत ठेवलं. मग ती स्थिरस्थावर झाली तेव्हा तिला ट्रान्समीटर बसवला आणि मग समुद्रात सोडण्यात आलं. त्यापाठोपाठ ‘गुहा’ या कासविणीलाही असंच टॅगिंग करण्यात आलं.
घरट्यातून पिल्लांचा जन्म
या कासविणींनी घातलेली अंडी घरट्यातून काढून हॅचरीमध्ये आणली जातात. किनाऱ्यावर कासवीण जिथे अंडी घालते त्या ठिकाणी गस्त घालणं कठीण असतं म्हणून ही अंडी हॅचरीमध्ये खड्ड्यात पुरुन ठेवतात. हॅचरीला तारांचं कुंपण असतं. त्यामुळे घरट्यांचं संरक्षण होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कासवांच्या घरट्यातून 40 ते 45 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. या पिल्लांना किनाऱ्यावर आणून ठेवलं की बरोब्बर ती समुद्राच्या दिशेने जातात. समुद्रात जाताना त्या किनाऱ्याची ‘मेमरी’ त्यांच्या मेंदूत साठवली जाते!
कासवांची अंडी घरट्यात असताना तिथलं जे तापमान असतं त्यावरून पिल्लांचं लिंग ठरतं. वातावरण थंड असेल तर नरांचा जन्म होतो आणि उष्णता असेल तर माद्यांचा जन्म होतो. म्हणजेच वातावरण समतोल असेल तर कासवांचं नर-मादी गुणोत्तर संतुलित राहतं.
हवामान बदल आणि कासवांचं प्रजनन
हवामान बदलाच्या या युगात किनाऱ्यांचं तापमान वाढत चाललं आहे. त्यामुळे अशा बदलत्या तापमानाचा कासवांच्या प्रजननावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं डॉ. सुरेशकुमार यांना वाटतं. वाढत्या तापमानासोबतच समुद्राची पातळी वाढते आहे. त्यामुळे रुंद आणि सपाट किनारे कमी होत चालले आहेत.
कासवांना प्रजननासाठी वाळूच्या सपाट किनाऱ्यांची आवश्यकता असते. समुद्रातून किनाऱ्यावर येण्याच्या त्यांच्या मार्गात अडथळे आले तर त्यांना सुरक्षितरित्या किनाऱ्यावर येता येत नाही. म्हणूनच कासवांच्या प्रजननाचे किनारे आणि तिथली परिसंस्था जपणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं डॉ. सुरेशकुमार यांचं म्हणणं आहे.
हजारातलं एक पिल्लू जगतं!
किनाऱ्यावर कासवं जेवढी अंडी देतात त्यात हजारातलं एक पिल्लू जगतं.
ही पिल्लं किनाऱ्यावरून समुद्रात जाताना शिकारी पक्षी, कोल्हे, कुत्रे यांच्या तावडीत सापडतात. शिवाय समुद्रात गेल्यानंतर पुन्हा भक्षक आहेतच. त्यामुळेच कासवं इतक्या मोठ्या प्रमाणात अंडी देतात.

फोटो स्रोत, Getty Images
ऑलिव्ह रिडले कासवांचं सरासरी आयुर्मान सुमारे 55 वर्षं इतकं आहे. ही कासवं समुद्रातले जेली फिशसारखे छोटे जलचर आणि कुजलेले मृत मासेही खातात. त्यामुळे ती समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम करतात, असं म्हटलं जातं.
या कासवांना समुद्रात कोण खातं? तर शार्कसारखे मोठे शिकारी मासे. पण या कासवांना आणखी एक मोठा धोका आहे. तो म्हणजे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून मरण्याचा!
मच्छिमारी जाळ्यांचा सापळा
कोकण आणि ओडिशाच्या पूर्व किनाऱ्यावर कासवांचं मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून किंवा मच्छिमारी जहाजांची धडक लागून मरण्य़ाचं प्रमाण वाढलं आहे.
पावसाळ्यात अनेक कासवं अशा प्रकारे जखमी होऊन लाटांवर भरकटत किनाऱ्यावर येतात. अशी कासवं जाळ्यात अडकलेली असताना लगेच लक्षात आलं तर त्यांची सुटका करता येते.
मॅनग्रोव्ह सेलसारख्या संस्थांनी म्हणूनच याबद्दल मच्छिमारांमध्ये जागृती निर्माण केली आहे. मच्छिमारांनी जाळ्यात अडकलेल्या कासवाची सुटका केली तर त्यांना सरकारतर्फे मोठी मदत दिली जाते.
कोकणातले मच्छिमार बांधव तर कासवाला देव मानतात. त्यामुळे तेही आता कासवांच्या संवर्धनासाठी पुढे आले आहेत.
प्लॅस्टिक प्रदूषणाचा परिणाम
सागरी कासवांना समुद्रात आणखी मोठा धोका आहे. तो म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषणाचा. ऑलिव्ह रिडले कासवं जेली फिशसारखे मासे खातात. समुद्रात तरंगणारं प्लॅस्टिक बऱ्याच वेळा त्यांना त्यांचं भक्ष्य वाटतं. अशा वेळी हे प्लॅस्टिक त्यांच्या पोटात जाण्याचा धोका असतो.
मध्यंतरी कासवाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या कासवाच्या नॉस्ट्रीलमध्ये म्हणजे नाकात दोन स्ट्रॉ अडकले होते. या कासवाला पकडून सर्जरी करून ते काढावे लागले! कासवांच्या नाकातोंडात, शरीरात जर असं प्लॅस्टिक गेलं तर ते कोण आणि कसं काढणार हा मोठा प्रश्न आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कासव संवर्धन आणि सागरी पर्यावरणामध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणूनच या प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा देतायत. त्याचवेळी त्यांनी कासवांसाठी किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीमही हाती घेतली आहे.
मुंबईच्या किनाऱ्यावर घडली जादू
मुंबईचे पर्यावरणवादी कार्यकर्ते अफरोज शाह यांनी वर्सोवाचा किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात अनेक मुंबईकरांनी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं...वर्सोवाचा किनारा आरशासारखा पारदर्शी झाला.
एवढंच नव्हे तर या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना सोडून या मोहिमेचं सेलिब्रेशनही करण्यात आलं!
निसर्गाला त्याचा त्याचा अवकाश मिळाला की कशी जादू घडते हेच यावरून सिद्ध झालं.
मुंबईपासून ते अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत... भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले कासवांच्या निमित्ताने सागर संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे आणि त्यात शेकडो तरुण, समुद्रकिनाऱ्यांवर राहणारे गावकरी, मच्छिमार सहभागी झाले आहेत.
किनाऱ्यावर प्रजननासाठी येणारं कासव निर्धोकपणे समुद्रात जावं, कासवांची जास्तीत जास्त पिल्लं समुद्रात जावीत यासाठी हे सगळेजण झटतायत.
‘कासव आमच्या घरचंच’
"किनाऱ्यावर आलेलं कासव आपल्या गावातलंच आहे, आपल्या घरचंच आहे, अशी आमची भावना आहे", असं गुहागरच्या अनुराधा दामले सांगतात तेव्हा कासव आणि कोकणवासियांच्या नात्याची खात्री पटते. याच कासवाने आपल्याला जगाच्या नकाशावर नेलं याचाही त्यांना सार्थ अभिमान आहे.

फोटो स्रोत, Getty Images
“सावकाशपणे आणि धीराने काम करत राहिलं तर आपण आपल्या कामात यशस्वी होतो हे या कासवानेच आम्हाला शिकवलं”, असं वेळासचे मोहन उपाध्ये सांगतात. याच शिकवणीतून त्यांच्यासारखे असंख्य कार्यकर्ते सागरी कासवांना जपण्यासाठी झोकून देऊन काम करत आहेत. त्यांना आता सरकारचं आणि लोकांचं मोठं पाठबळ मिळालं आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून निसर्गप्रेमी पर्यटक खास कासवांची पिल्लं पाहण्यासाठी गुहागर, वेळास, वायंगणी अशा किनाऱ्यांवर येऊ लागले आहेत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावकऱ्यांना रोजगाराचीही संधी निर्माण झाली आहे हेही मोहन उपाध्ये आवर्जून सांगतात.
कासव जिंकलं शर्यत...
ससा आणि कासवाच्या शर्यतीत नेहमीच कासव जिंकतं. पण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या या सागरी संवर्धनाच्या शर्यतीत कासव एकटंच जिंकलेलं नाही.
गेल्या वीस वर्षांत कोकण किनाऱ्यावरच्या झपाटलेल्या कार्यकर्त्यांना, धडपडणाऱ्या गावकऱ्यांना आणि त्याची गुपितं शोधणाऱ्या संशोधकांना कासवाने ही अत्यंत कठीण अशी शर्यत जिंकून दिली आहे!
(आरती कुलकर्णी या पर्यावरण पत्रकार आहेत. कासवांच्या या प्रयोगाबद्दल त्यांनी 'अँटिनावालं कासव' हा लघुपट केला आहे.)
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








