सेक्स, हत्या आणि सुटकेसमधील दोन मृतदेह, कोण होते हे लोक?

फोटो स्रोत, Albert Alfonso/Flickr
- Author, लेह बूबियर, एमा हॅलेट
- Role, बीबीसी न्यूज, पश्चिम इंग्लंड
योस्टिन मोस्केरा यानं अल्बर्ट अल्फोन्सो आणि पॉल लाँगवर्थ यांची हत्या केल्यामुळे सेक्स, डार्क वेब व्हिडिओ आणि वयस्कांसाठीच्या काँटेन्ट निर्मितीचं एक जग उघड झालं.
मात्र, हे तिघेजण एकमेकांना कसं काय ओळखत होते आणि मोस्केरानं त्यांची हत्या का केली?
(सूचना: या लेखातील माहिती काहीजणांना अस्वस्थ करू शकते. लेखात हिंसाचार आणि लैंगिक बाबींचं वर्णन समाविष्ट आहे.)
अल्बर्ट अल्फोन्सो यांची योस्टिन मोस्केरा आणि पॉल लाँगवर्थ यांच्याबरोबरच्या सेल्फीमुळे हे तिघेजण एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र असल्याचं दिसतं. प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळं होतं.
या तिघांच्या चेहऱ्यावरील हास्यामागे होतं एक गुंतागुंतीचं नातं. ते अतिरेकी सेक्स, दुसऱ्यावरील नियंत्रण आणि आर्थिक व्यवहारावर आधारलेलं होतं. हे सर्व प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या भागीदारीसह अस्तित्वात होतं.
हा फोटो किंवा सेल्फी घेतल्यानंतर चार महिन्यांनी, मोस्केरानं, अल्बर्ट अल्फोन्सो आणि पॉल लाँगवर्थ या दोघांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. 8 जुलै 2024 ला त्यांच्या लंडनमधील फ्लॅटमध्ये मोस्केरानं या दोघांना संपवलं.
या दोघांना मारल्यानंतर मोस्केरानं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे त्यानं एका सूटकेसमध्ये भरले आणि ती सूटकेस घेऊन 116 मैल (186 किमी) पेक्षा अधिक प्रवास केला.
मग त्यानं ब्रिस्टॉलला जाण्यासाठी ड्रायव्हरसह एक व्हॅन भाड्यानं घेतली. त्या ड्रायव्हरनं मोस्केराला ब्रिस्टॉल शहरातील झुलत्या पुलाजवळ सोडलं. तिथेच त्या दोघांच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्याची योजना मोस्केरानं बनवली.

फोटो स्रोत, Albert Alfonso/Flickr
हत्या झालेले अल्बर्ट आणि पॉल कोण होते?
अल्बर्ट 62 वर्षांचे होते तर पॉल 71 वर्षांचे होते. या दोघांनी पूर्वी विवाह केला होता आणि नंतर ते विभक्त झाले होते. तरीदेखील त्यांचे एकमेकांशी जवळचे संबंध होते आणि ते एकत्रच राहिले.
पोलिसांनी या दोघांचं वर्णन, "मोठं कुटुंब, मित्रमंडळ" नसलेले आणि "एकमेकांचे सर्वस्व असलेले आणि एकमेकांचं जग असलेले" असं केलं.
अल्बर्ट स्विमिंग इन्स्ट्रक्टर होते आणि पश्चिम लंडनमधील अॅक्टन इथं मोड क्लब जिममध्ये लाईफगार्ड होण्यासाठी प्रशिक्षण घेत होते.
ते फ्रान्समधील बिडार्टमध्ये वाढले. मग हॉटेलचं व्यवस्थापन करण्यासाठी युकेला जाण्यापूर्वी त्यांनी बियारिट्झमधील हॉटेल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं.
ते आधी 375 केनसिंग्टन हाय स्ट्रीटमध्ये जनरल मॅनेजर होते. ही पश्चिम लंडनमधील एक आलिशान वस्ती असून त्यात अपार्टमेंट्स आणि पेंटहाऊस आहेत.
वूलविच क्राउन कोर्टात वाचण्यात आलेल्या जबाबात, अल्बर्ट यांच्या माजी सहकाऱ्यांनी त्यांचं वर्णन, "मजेशीर, प्रभुत्व किंवा अधिकार गाजवणारा आणि उत्साही-काहीतरी करून दाखवू पाहणारा व्यक्ती"असं केलं.
या इमारतीमध्ये अल्बर्ट यांची पॉलशी भेट झाली होती. पॉल एक कारागीर होते आणि अलीकडेच निवृत्त झाले होते.
दोघांचही पालनपोषण त्यांना दत्तक न घेतलेल्या मात्र त्यांचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबात झालं होतं. त्यामुळे ते एकमेकांशी जोडले गेले. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी नोंदणीकृत विवाह केला.
अर्थात पॉल यांच्या मित्रांनी बीबीसीला सांगितलं की ते "त्यांच्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलत नव्हते" आणि अल्बर्ट त्यांचा भाऊ असल्याचं सांगायचे.
पॉलविषयीचं मित्र-शेजाऱ्यांचं मत
पॉल 'अत्यंत दयाळू' होते असं त्यांचे मित्र आणि शेजारी सांगतात.
74 वर्षांचे केविन डोर, शेफर्ड्स बुश या पश्चिम लंडनमधील उपनगरातील आहेत. ते पॉलसोबत मद्यपान करत असत. ते पॉलला 20 वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होते.

फोटो स्रोत, Albert Alfonso/Flickr
"तो एक चांगला, उमदा, उदार मनाचा माणूस होता," असं केविन म्हणाले.
"तो नेहमीच विनम्र असायचा. तो मित्रांसाठी मद्य आणायचा. मित्रांबरोबर बसून गप्पा मारायचा," असं ते म्हणाले.
जॉर्ज हचिसन हे पॉल यांच्या मित्रांपैकी एक होते. ते देखील पॉलबरोबर मद्यपान करत असत. ते म्हणाले, "तोदेखील मित्रांच्या गटातील एक होता. तो खूप चांगला माणूस होता, त्यानं कधीही कोणालाही त्रास दिला नाही."
अल्बर्टचं लैंगिक आयुष्य आणि मोस्केरा
अल्बर्ट त्यांचं खासगीपण जपत असत, असं सांगितलं जात असलं तरी या प्रकरणाच्या खटल्यातून अतिरेकी सेक्सचं एक जग समोर आलं. त्यासाठी अल्बर्ट वारंवार पैसे मोजत असत. ते त्यात सहभागी होत असत आणि त्यांचे व्हिडिओ ऑनलाइन शेअर करत असत.
हा अल्बर्ट यांच्या आयुष्याच्या एक पैलू होता. त्याच्याशी पॉल यांचा काहीही संबंध नव्हता. अर्थात पॉलला याबद्दल माहित होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं होतं.

फोटो स्रोत, Albert Alfonso/Flickr
कोलंबियाचा नागरिक असलेला मोस्केरा देखील विविध टोपण किंवा खोट्या नावांनी स्वत:च्या अतिरेकी सेक्सचे अनेक व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करत होता.
तो आता 35 वर्षांचा असून मेडेलिनमध्ये राहत होता. त्याला पाच भाऊ आणि एक बहीण होती, जिचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. मोस्केराला दोन अपत्यं देखील आहेत.
अल्बर्ट आणि मोस्केरा यांनी साधारण 2012 मध्ये स्काईपवरून एकमेकांशी बोलण्यास सुरुवात केली. 2017 पर्यंत, अल्बर्ट यांनी सेक्स व्हिडिओंसाठी मोस्केराला पैसे देण्यात सुरुवात केली. कालातंरानं हे व्हिडिओ तीव्र स्वरूपाचे झाले.
अखेर 2023 मध्ये ते एकमेकांना प्रत्यक्षात भेटले. मोस्केरा पहिल्यांदा इंग्लंडला आल्यावर या दोघांची भेट झाली होती.
अल्बर्टचा रस सेक्समध्ये तर मोस्केराचा पैशांमध्ये
मात्र असं दिसतं की अल्बर्टनं त्यांच्या लैंगिक संबंधांचा चुकीचा अंदाज लावला होता.
अल्बर्टसाठी हे संबंध सेक्ससाठी होते. तर मोस्केरासाठी हे संबंध पैशांसाठी होते.
न्यायालयात हे समोर आलं की अल्बर्ट यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य अशा माणसासाठी उघड केलं होतं, ज्याच्याशी त्यांचे संबंध प्रत्यक्षात फक्त व्यवहाराचे होते.
अल्बर्ट यांच्या बँक स्टेटमेंटमधून दिसून आलं की 2 सप्टेंबर 2022 ते 12 जुलै 2024 दरम्यान एक कंपनीकडून त्यांच्या खात्यात 17,500 पौंड जमा झाले होते. ही कंपनी पोर्नोग्राफी वेबसाईट चालवते.
तसंच, मे 2022 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान अल्बर्ट यांनी मोस्केरा याला एकूण 72 ट्रान्झॅक्शनद्वारे 7,735 अमेरिकन डॉलर्स (जवळपास 5,800 पौंड) पाठवले होते.
तर जानेवारी 2024 ते 19 जून 2024 दरम्यान अल्बर्ट यांनी मोस्केराला मनीग्रॅमद्वारे 928 पौंड पाठवले होते. मनीग्रॅम ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे ट्रान्सफर करणारी सेवा पुरवते.
त्याबदल्यात, मोस्केरानं चार वेबसाईटवर पॉर्न कॉन्टेंट पोस्ट केलं होतं. त्यात 100 हून अधिक व्हिडिओ आणि फोटोंचा समावेश होता. हे करताना त्यानं टोपण किंवा बनावट नावं वापरली होती.
ग्राहकांशी सेक्स शोची मागणी केली होती. 30 जून 2022 ते 12 जून 2024 दरम्यान त्यानं 2,682.90 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली.
अल्बर्ट आणि मोस्केरातील विचित्र संबंध
मात्र मोस्केरानं न्यायालयाला सांगितलं की अल्बर्टची हत्या करण्याच्या काही दिवस आधीपर्यंत त्याला हे माहित नव्हतं की अल्बर्ट त्याचे व्हिडिओ ऑनलाइन शेअर करत होता.
मोस्केरानं 2023 मध्ये एका संमती फॉर्मवर सही केली होती. त्यानुसार अल्बर्टला त्याचे फोटो ऑनलाइन अपलोड करता येणार होते आणि मोस्केराला त्याबदल्यात पैसे मिळणार होते. असं असूनही मोस्केरानं अल्बर्ट हे करत असल्याचं माहित नसल्याचं सांगितलं.
ऑक्टोबर 2023 मध्ये मोस्केरा युकेमध्ये आला. तिथे तो अल्बर्टच्या घरी राहिला. मोस्केरानं न्यायालयाला सांगितलं की अल्बर्टनं त्याच्यावर 'दररोज' बलात्कार केला. तसंच त्याला ज्या अतिरेकी लैंगिक कृत्यांसाठी पैसे दिले जात होते, त्यातून त्याला कोणताही आनंद मिळत नव्हता.
ऑक्टोबर 2023 मध्ये मोस्केरानं युकेमध्ये येऊन भेटावं आणि लंडनमधील अल्बर्टच्या फ्लॅटमध्ये राहावं, यासाठी अल्बर्टनं त्याला पैसे दिले.
लंडनमध्ये राहत असताना मोस्केरानं मादाम तुसा संग्रहालय पाहिलं. लंडनमध्ये खुल्या बसमधून प्रवास केला. तसंच थेम्स नदीवर बोटीतून सफर केली.
मग मार्च 2024 मध्ये अल्बर्टनं पॉलला कोलंबियाला नेलं. तिथे ते कार्टाजेना शहरात राहिले. मग मोस्केरानं आपल्या घरी यासाठी अल्बर्टनं त्याला पैसे दिले.
पॉलला मित्रांनी दिला होता इशारा
केविन डोर, हे पॉलबरोबर मद्यपान करणाऱ्या मित्रांपैकी एक आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांनी त्याला तिथे जाण्यासंदर्भात इशारा दिला होता.
"आम्ही सांगितलं होतं की पॉल, ते धोकादायक ठिकाण आहे, तिथे जाऊन वेळ वाया घालवण्याचा मूर्खपणा करून नकोस," असं केविन डोर म्हणाले.
त्याच वर्षी मे महिन्यात मोस्केरानं अल्बर्टसाठी अतिरेकी सेक्सचा आणखी एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर काही आठवड्यातच तो युकेमध्ये आला. तो पुन्हा अल्बर्टच्या खर्चावर त्याच्यासोबत राहिला.
या खेपेला अल्बर्टनं त्याच्या जिममध्ये मोस्केरासाठी गेस्ट मेंबरशिपची व्यवस्था केली. मग अल्बर्टनं त्याच्या कामाच्या पाच खेळाडू असणाऱ्या फुटबॉल टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्याला मोस्केराला सामील करून घेतलं.
अल्बर्टनं मोस्केराचं नाव चार आठवड्यांच्या इंग्रजी भाषेच्या एका कोर्ससाठी नोंदवलं.
मग हे तिघेही जण एका दिवसाच्या सहलीसाठी ब्राइटनला गेले. तिथे ते जेट्टीवर गेले. तिथेच एका झिप-वायरवर मोस्केराचा व्हिडिओ बनवण्यात आला.
झिप-वायर म्हणजे उंचावरच्या ठिकाणी दोन टोकाला लोखंडी दोरखंड बांधलेला असतो आणि लोकांना त्यावर बांधून एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाण्याचा थरार अनुभवता येतो.
मोस्केराकडून दोघांच्या हत्येची योजना आणि अंमलबजावणी
मात्र मोस्केरा लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरण्यापूर्वीच्या काही दिवसांमध्ये आणि त्याच्या लंडनमधील वास्तव्यात, तो अल्बर्ट आणि पॉल यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती घेत होता.
तो चेस्ट फ्रीजर आणि औद्योगिक स्वरुपाचं लिक्विडायझर शोधत होता. तसंच घातक विष आणि आर्सनिकचाही शोध घेत होता.
8 जुलैला पॉल आणि अल्बर्ट यांची हत्या झाली.
पॉलवर हातोड्यानं अनेक वार करण्यात आले. त्यामुळे त्याची कवटी फुटली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका बेडच्या खाली लपवण्यात आला. मग मोस्केरा अल्बर्ट घरी येण्याची वाट पाहत बसला.
रेकॉर्ड करण्यात आलेल्या सेक्सच्या वेळेस, मोस्केरानं अल्बर्टला चाकूनं भोसकलं. त्यात अल्बर्टचा मृत्यू झाला. त्यानंतर मोस्केरा गाणं गात खोलीभर नाचला.
मग मोस्केरानं अल्बर्टच्या कॉम्प्युटरवरून कोलंबियातील त्याच्या बँक खात्यात 4,000 पौंड पाठवण्याचा प्रयत्न केला. तसंच इतरही पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र यात यश न आल्यामुळे, तो जवळच्या कॅशपॉईंटवर गेला आणि तिथून त्यानं अल्बर्टच्या खात्यातून शेकडो पौंड काढले.
काही दिवसांनी मोस्केरानं या दोघांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यांची डोकी त्यानं चेस्ट फ्रीझरमध्ये (कोल्ड स्टोरेज) ठेवली आणि मृतदेहाचे इतर भाग सूटकेसमधून ब्रिस्टॉलला नेले.
न्यायालयानं मोस्केराला ठरवलं दोषी
अल्बर्ट आणि पॉल यांची अनपेक्षित आणि क्रूर हत्या झाल्यामुळे त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला.
केविन डोर म्हणाले की, ज्या प्रकारे ही हत्या झाली त्यामुळे ते अत्यंत व्यथित झाले आहेत.
या प्रकरणात वूलविच क्राउन न्यायालयात खटला चालवण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीनंतर, दुहेरी हत्येसाठी मोस्केराला दोषी ठरवण्यात आलं.
शुक्रवारी, 24 ऑक्टोबरला न्यायालय मोस्केराला शिक्षा सुनावणार आहे.
(फिओना लॅमडिन, अॅडम क्रोदर आणि बेथ क्रूस यांचं अतिरिक्त वार्तांकन.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











