स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड - SIF म्हणजे काय? तो म्युच्युअल फंडपेक्षा नेमका कसा वेगळा ठरतो?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आज बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. छोटे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडची निवड करतात, तर उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे (PMS) जातात.

पण या दोघांमध्ये काही गुंतवणूकदार असे आहेत ज्यांच्याकडे चांगलं भांडवल आहे आणि त्यांच्यात म्युच्युअल फंडपेक्षा जास्त जोखीम घेण्याची क्षमता सुद्धा आहे.

त्यांच्यासाठी सेबीनं एक पर्याय उपलब्ध करून दिलाय आणि तो आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF).

सेबीनं एसआयएफला 27 फेब्रुवारी 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे म्युच्युअल फंडांच्या आत एक नवीन श्रेणी म्हणून मंजूरी दिली होती. 1 एप्रिल 2025 पासून त्याची अंमलबजावणी झाली.

म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्यातील अंतर कमी करण्याच्या हेतूनं हा वेगळा आणि नवीन गुंतवणूक पर्याय गुंतवणूकदारांसमोर आणण्यात आला आहे.

पण स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) हा म्युच्युअल फंडपेक्षा नेमका कसा वेगळा ठरतो? त्यात गुंतवणूक कोण करू शकतं? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? जाणून घेऊयात.

स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) म्हणजे काय?

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) माहितीनुसार, एसआयएफ हा एक गुंतवणूक फंड आहे, जो म्युच्युअल फंडप्रमाणे काम करतो, परंतु त्यात किमान 10 लाख रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं असते. ही रक्कम म्युच्युअल फंडपेक्षा जास्त आहे. मात्र, पीएमएस आणि एआयएफपेक्षा कमी आहे.

म्हणजे म्युच्युअल फंडाच्या बहुतेक योजनांमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते, तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसद्वारे (PMS) गुंतवणूक करण्यासाठी किमान 50 लाख रुपये असणं गरजेचं आहे, तर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडसाठी (AIF) 1 कोटी रुपये आवश्यक असतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एसआयएफ मध्ये किमान 10 लाख रुपयांची गुंतवणूक करणं गरजेची असते.

स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडची 10 लाख रुपयांपासून गुंतवणूक करण्याची अट अशा गुंतवणूकदारांसाठी पर्याय आहे ज्यांची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता किंवा इच्छा नसते. परंतु त्यांना म्युच्युअल फंडाच्या पलीकडं जाऊन काहीतरी गुंतवणूक करायची असते.

हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी तयार केलेला आहे, ज्यांना त्यांच्या निधीवर अधिक नियंत्रण हवं आहे, ज्यांना शेअर बाजारात अधिक स्वातंत्र्य, उच्च-परतावा आणि मोठ्या संधी हव्या आहेत. हा एक असा गुंतवणूक फंड आहे जो सर्व प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकतो.

SIF सेबी द्वारे नियंत्रित केलं जातं

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे नियंत्रित केलं जातं आणि सेबी-नोंदणीकृत अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे (AMC) त्याचं व्यवस्थापन केलं जातं.

अशा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीला असा मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) नियुक्त करावा लागतो, ज्याला 5,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असेल.

तसेच, एक फंड मॅनेजर नियुक्त करावा लागतो, ज्याला किमान तीन वर्ष 500 कोटी रुपयांच्या निधीचं व्यवस्थापन करण्याचा अनुभव असेल.

सेबीच्या नियमांनुसार, किमान तीन वर्षांपासून कार्यरत असलेला आणि गेल्या तीन वर्षांत त्याची मालमत्ता 10,000 कोटी रुपयांची (एयूएम) असलेला नोंदणीकृत कोणताही म्युच्युअल फंड एसएफआयची नोंदणी करू शकतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सेबी-नोंदणीकृत अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) द्वारे त्याचं व्यवस्थापन केलं जातं.

सेबीनं एसआयएफ अंतर्गत यात तीन मुख्य धोरणांना मान्यता दिली आहे, जसे की इक्विटी-ओरिएंटेड, डेट-ओरिएंटेड आणि हायब्रिड फंड. यात इक्विटीमध्ये 3, डेटमध्ये 2 आणि हायब्रीडमध्ये 2 अशा एकूण 7 वेगवेगळ्या गुंतवणूक धोरणांचा समावेश आहे.

गुंतवणूकदार त्यांच्या जोखमी घेण्याच्या क्षमतेवर आधारित धोरण निवडू शकतात. काही धोरणं कमी जोखीम आणि मध्यम परतावा देतात, तर काही मोठी जोखीम आणि मोठा परतावा देतात.

तर जी 10 लाख रूपयांची किमान रक्कम आहे ती गुंतवणूकदार प्रत्येक धोरणासाठी नाही, तर त्याच अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील सर्व एसआयएफ धोरणांमध्ये गुंतवू शकतात.

SIF मध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?

ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पुरेसं भांडवल आहे, असे उच्च उत्पन्न असलेले गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. ज्यांना शेअर बाजारातील गुंतागुंत चांगल्या प्रकारे समजते.

नवीन गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय तसा फारसा अनुकूल नाही. कारण यात जोखीम मोठी असते. त्यामुळे मोठी जोखीम हाताळू शकणारे लोक यात गुंतवणूक करू शकतात.

मोठ्या प्रमाणात भांडवल असलेले आणि चांगला नफा देणाऱ्या संधींचा शोध घेत असलेले गुंतवणूकदार, संस्थात्मक गुंतवणूकदार, व्यावसायिक गुंतवणूकदार.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्यातील अंतर कमी करण्याच्या हेतूनं स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) गुंतवणूकदारांसमोर आणण्यात आला आहे.

सेबीच्या मते, मागील 2 वर्षांपासून तुमचं प्रत्येकी वार्षिक उत्पन्न 2 कोटी रूपये असेल किंवा प्राथमिक निवासस्थान वगळून 7.5 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती तुमच्याकडे असेल, तर तुम्ही गुंतवणूकदार म्हणून पात्र ठरता.

जोखीम कशी समजेल?

म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच, SIF च्या गुंतवणूक धोरणांशी संबंधित संभाव्य जोखीम 'रिस्क-बँड' म्हणून ओळखली जाते.

सर्वात कमी जोखीम म्हणजे रिस्क-बँड 1 ते सर्वात जास्त जोखीम म्हणजे रिस्क-बँड 5, असे जोखीम किती कमी किंवा किती जास्त आहे हे दाखवणारे पाच प्रकारचे रिस्क-बँड यात असतात.

यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक कोणत्या रिस्क बँडच्या अंतर्गत येते याची माहिती वेळोवेळी मिळत राहते.

SIF मध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?

स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड ऑफर करणारी सेबी-नोंदणीकृत अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) निवडा. सर्व अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMC) स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड ऑफर करण्यास पात्र नाहीत, हे लक्षात ठेवा.

सेबीच्या नियमानुसार आपली पात्रता तपासा, कारण इथे किमान 10 लाख रूपये गुंतवावे लागतात.

आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि दीर्घकालीन लक्ष्यांवर आधारित योग्य धोरण निवडा.

गुंतवणूक केल्यानंतर एसआयएफ त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक अहवाल सादर करतात, त्यासंदर्भातील माहिती ठेवत जा.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि दीर्घकालीन लक्ष्यांवर आधारित योग्य धोरण निवडा.

स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्यानं, ते म्युच्युअल फंडांच्या तुलनेत जास्त जोखीम घेतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या जोखमीची क्षमता नीट समजून घ्या.

एसआयएफ अनेकदा रिअल इस्टेट किंवा पायाभूत सुविधांसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणूक कधी काढू शकता हे नीट समजून घ्या.

( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.