सणांमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारल्यामुळे मेंदूवर तत्काळ कोणते परिणाम होतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेसिका ब्रॅडली
सणासुदीच्या जेवणाचा विषय आला की आपल्यापैकी बरेचजण डाएट वगैरे बाजूला ठेवतात आणि जेवणावर आडवा हात मारतात. साधारणतः कोणत्याही सणाच्या वेळेस पोटभर किंवा जरा जास्तच जेवण केलं जातं.
मात्र अशाप्रकारे सणाच्या वेळी दणकून जेवल्याचा आपल्या शरीर आणि मेंदूवर काय परिणाम होतो?
अन्नामुळे आपल्या मेंदूला अनेक महत्त्वाची कार्य करण्यास मदत होते. यात आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता यांचा समावेश आहे. संतुलित, योग्य प्रमाणात घेतलेला आहार आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील मोठा आधार देऊ शकतो.
मात्र दिवाळी, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा, ईद, ख्रिसमस किंवा एखाद्या सणाच्या दिवशी मेजवानीवर मोठा ताव मारल्यामुळे आपल्या मेंदूवर तात्काळ कोणते परिणाम होतात?
आपण जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त खातो तेव्हा काय होतं?
आपण जेव्हा खात असतो, तेव्हा आपल्या शरीरातील विविध संकेत एकत्र येऊन आपलं पोट भरल्याचा संदेश आपल्या मेंदूला देतात. यात आपल्या आतड्यांमधून स्त्रवणारे हार्मोन्स आणि मेटाबोलाईट्स (ऊर्जा निर्माण करण्यासाठी अन्नाचं विघटन करणारे रेणू) यांचा समावेश असतो.
हे हार्मोन आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवण्यासाठीही सिग्नल देतात. इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. या संपूर्ण प्रक्रियेला 'सटायटी कॅस्केड' म्हणजे जेवणाच्या 'तृप्तीच्या भावनेचा पॅटर्न' असं म्हणतात.
"हे सिग्नल आपल्या आतड्यांच्या वेगवेगळ्या भागांमधून येतात. ते किंचित वेगवेगळ्या वेळेत काम करतात," असं टोनी गोल्डस्टोन म्हणतात. ते इम्पिरियल कॉलेज लंडनमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि कन्सल्टंट एंडोक्रिनोजॉसिस्ट (हार्मोनशी संबंधित विकारांचे डॉक्टर) आहेत.
आतडे आणि स्वादुपिंडामधून स्त्रवणाऱ्या हार्मोन्सचा हा पॅटर्न आणि त्यातून मेंदूला सिग्नल पाठवलं जाणं याचादेखील भरपेट जेवल्यानंतर आपल्याला येणाऱ्या सुस्तीशी संबंध असू शकतो. या सुस्तीला 'पोस्टप्रँडियल सोम्नोलेन्स' म्हणजे जेवणानंतर येणारी सुस्ती असं म्हणतात.
मात्र ही क्रिया नेमकी कशी होते याचं आकलन अद्याप चांगल्या प्रकारे झालेलं नाही, असं ॲरॉन हेंगिस्ट म्हणतात. ते अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थमध्ये पोस्टडॉक्टरल व्हिजिटिंग फेलो आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
व्यापक प्रमाणात असं मानलं जातं की ही भावना मेंदूकडून रक्त पोटाकडे प्रवाहित झाल्यामुळे निर्माण होते. या भावनेला 'फूड कोमा' असं टोपणनाव आहे. मात्र संशोधनातून असं दिसून आलं आहे की दणकून जेवल्यानंतर रक्ताचा प्रवाह किंवा रक्ताभिसरण प्रत्यक्षात कमी होत नाही.
मात्र जेवल्यानंतर येणाऱ्या सुस्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे, अस हेंगिस्ट म्हणतात.
"आतड्यांमधील हार्मोनचा प्रतिसाद हे एकप्रकारचं हार्मोन्सच्या प्रतिसादाचं मिश्रण असतं. मेंदूच्या कोणत्या केंद्रावर कोणत्या विशिष्ट हार्मोनमुळे झोप येऊ शकते, हे आपल्याला माहिती नाही," असं ते म्हणतात.
गरजेपेक्षा जास्त खाणं हानिकारक असतं का?
कधीतरी खूप जास्त खाण्याचा आपल्या चयापचयावर आश्चर्यकारकरित्या फार कमी परिणाम होतो, असं हेंगिस्ट म्हणतात.
2020 मध्ये, त्यांनी एक अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले. यामध्ये लोकांनी पोट भरल्यानंतरदेखील आवश्यकतेपेक्षा अधिक खाल्लं तर काय होतं यावर अभ्यास करण्यात आला होता.
या अभ्यासात चौदा निरोगी पुरुष (खूप हिंमतीनं) सहभागी झाले होते. यात त्यांना एकाचवेळी भरपूर पिझ्झा खायचा होता. एकदा त्यांना पोट भरेपर्यंत म्हणजे सहजपणे पोट भरल्यासारखं वाटतं, तितकं अन्न खाण्यास सांगण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसऱ्या वेळेस त्यांना जितकं खाता येईल तितकं खाण्यास सांगितलं होतं. 'जितकं खाता येईल तितकं खा' या प्रयोगात त्यांनी दुप्पट पिझ्झा खाल्ला होता.
त्यांच्या जेवणानंतर चार तास त्यांच्या शरीरात स्त्रवणारे हार्मोन, भूक, त्यांची मन:स्थिती आणि चयापचयाची क्रिया यात होणारे बदल मोजण्यात आले.
संशोधकांना आढळलं की जास्त खाऊनदेखील त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य जेवणानंतरच्या पातळीपेक्षा अधिक नव्हती. तसंच त्यांच्या रक्तात चरबीचं प्रमाणदेखील जास्त नव्हतं.
हेंगिस्ट म्हणाले, "हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो की दुप्पट प्रमाणात ऊर्जेचं सेवन करून देखील त्यांच्या शरीरानं रक्तातील साखरेचं नियमन अतिशय चांगल्या प्रकारे केलं होतं."
"आम्हाला आढळलं की हे साध्य करण्यासाठी शरीर खूप मेहनत घेत होतं. यासाठी शरीर जास्त प्रमाणात इन्सुलिन आणि आतड्यातील हार्मोन्स स्त्रवत होतं. हे हार्मोन्स इन्सुलिन स्त्रवण्यास आणि आपल्याला पोट भरल्याचा सिग्नल देण्यास मदत करतात."
ते म्हणतात की या अभ्यासातून दिसून येतं की खाण्याच्या बाबतीत कधीतरी केलेला अतिरेक तुमच्या अपेक्षेइतका हानिकारक नसतो.
मात्र हा अभ्यास फक्त तरुण निरोगी पुरुषांवरच करण्यात आला होता. त्यामुळे महिला आणि लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या लोकांचा अभ्यास केल्याशिवाय या संशोधनाचे निष्कर्ष सामान्य लोकांवर लागू केले जाऊ शकत नाहीत, असं हेंगिस्ट म्हणतात.
आपण अधिक प्रमाणात का खातो?
एकाचवेळी खूप जास्त पिझ्झा खाल्ल्यामुळे कदाचित lत्काळ स्वरुपात हानी होणार नाही.
मात्र काही संशोधनातून असं दिसून आलं आहे की, अनेक तास किंवा एक दिवसभर मेजवानी केल्यामुळे चयापचयाची क्रिया विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आपल्या शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे आपल्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
2021 मध्ये अती प्रमाणात खाण्यावर एक दीर्घकाळ अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून हेंगिस्ट यांच्या पिझ्झा अभ्यासापेक्षा पूर्णपणे वेगळे निष्कर्ष समोर आले. या अभ्यासाचं शीर्षक 'द टेलगेट स्टडी' असं होतं.
अमेरिकेत खेळाच्या सामन्यांपूर्वी पार्ट्यांचं आयोजन करण्याची पंरपरा आहे. या पार्ट्यांमध्ये भरपूर खाल्लं जातं आणि मद्यपान केलं जातं. यावरूनच या अभ्यासाला हे नाव देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांनी याच परंपरेची पुनरुक्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 18 अधिक वजन असलेल्या, मात्र निरोगी पुरुषांना मद्य दिलं. तसंच खाण्यास अतिशय चरबीयुक्त पदार्थ, गोड पदार्थ दिले. यात बर्गर, चिप्स आणि केकचा समावेश होता.
त्यांना हे सर्व दुपारभर खाण्यास सांगण्यात आलं. या लोकांनी त्या पाच तासात सरासरी 5,087 कॅलरींचं सेवन केलं. त्यानंतर त्यांची रक्तचाचणी आणि यकृताचं स्कॅन करण्यात आलं. त्यातून असं दिसून आलं की, या मेजवानीनंतर बहुताश पुरुषांच्या यकृतामधील चरबीचं प्रमाण वाढलं होतं.
संशोधनातून असं आढळून आलं आहे की, बिगर अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा विकार झाल्यामुळे मेंदूला कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि मेंदूच्या ऊतींमध्ये इन्फ्लेमेशन होतं.
यामुळे कालांतरानं मेंदूच्या आजारांचा धोका वाढू शकतो. बिगर अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा विकार दीर्घकाळ अती चरबीयुक्त आणि अती प्रमाणात साखर असलेल्या आहाराच्या सेवनामुळे होऊ शकतो.
"द 'टेलगेट स्टडी'मधून आढळून आलं की त्या पुरुषांमधील चयापचयाची क्रिया असंतुलित झाली होती. अनेक तास निष्क्रियपणे अन्न आणि मद्याचं सेवन केल्यामुळे ते पचवण्यासाठी त्यांच्या शरीरावर खूपच ताण पडला होता," असं हेंगिस्ट म्हणतात.
एकदाच खूप जेवल्यामुळे परिणाम का होत नाही?
कधीतरी जास्त प्रमाणात खाणं हे फारसं हानिकारक नसतं, हे आपल्याला उक्रांतीच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतं. जेव्हा खाण्याची आवश्यकता असते, तेव्हा आपले आतडे आणि मेंदू एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कशाप्रकारे विकसित झाले आहेत, हे देखील त्यातून लक्षात येऊ शकतं.
गोल्डस्टोन म्हणतात, आपल्याला जेव्हा भूक लागते, तेव्हा आपल्याला खाण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, आपला मूड बदलतो आणि 'भूकेमुळे आपली चिडचिड' होऊ शकते. तसंच आपल्याला अधिक ऊर्जा असलेलं अन्न खाण्याची इच्छा होण्याची जास्त शक्यता असते.
"भुकेमुळे चिडचिड का होते, यामागचं नेमकं काय कारण अस्पष्ट आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या संशोधनातून दिसून येतं की, भूक लागणं ही अतिशय न आवडणारी, त्रासदायक अवस्था आहे. त्यामुळेच कदाचित या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोक अन्न खातात," असं गोल्डस्टोन म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्राण्यांवरील अभ्यासातून समोर आलेले पुरावे अशाच प्रकारचं वर्तन दाखवतात. या अभ्यासामधून अधोरेखित होतं की जेव्हा उंदीर अन्न पाहतात आणि त्यांना अन्नाचा वास येतो, तेव्हा हायपोथॅलॅमसमधील (भूक नियंत्रित करणारा मेंदूचा एक भाग) भूकेशी संबंधित काही संदेश वहन करणारी यंत्रणा शांत होते. हे त्यांनी अगदी खाण्यापूर्वीच होतं.
"भूक लागल्यामुळे ते अन्न शोधू लागले. मात्र एकदा का अन्न मिळालं की तेच वर्तन सुरू ठेवण्याची आवश्यकता नसते," असं गोल्डस्टोन म्हणतात.
ते पुढे म्हणतात की, यातील बहुतांश क्रिया नकळत किंवा मनाच्या सुप्त पातळीवर घडते.
मानवाची उत्क्रांती उपासमारीला तोंड देण्याचे मार्ग शोधण्यासाठी झाली आहे. कारण अन्नाशिवाय आपला मृत्यू होईल. मात्र मानवी इतिहासात अतिरिक्त अन्न कधीच उपलब्ध नव्हते. त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि कमी प्राणघातक असतात. निदान अल्पकाळातपुरते तरी, असं गोल्डस्टोन म्हणतात.
आपण कोणतं अन्न खातो, याने काही फरक पडतो?
उंदीर आणि घुशींवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून येतं की, दीर्घकाळ जास्त कॅलरी असलेल्या अन्नाचं सेवन केल्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्रियेवर परिणाम होऊ शकतो. मात्र मानवाच्या बाबतीत या क्षेत्रात कमी संशोधन झालेलं आहे, असं स्टेफनी कुलमन म्हणतात. त्या जर्मनीतील ट्युबिंगेन विद्यापीठात मेटॅबोलिक न्युरोइमेजिंग विभागाच्या प्रमुख आणि गटप्रमुख आहेत.
मात्र एका अभ्यासातून, आपण अतिशय गोड आणि चरबीयुक्त अन्न अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये काय होतं, याबद्दल काही माहिती मिळते. हा अभ्यास फक्त एक वेळच्या जेवणापुरता मर्यादित नव्हता, तर तो पाच दिवस करण्यात आला.
या अभ्यासातून समोर समोर आलेले निष्कर्ष कमी प्रमाणात, कमी कालावधीत अधिक अन्न खाण्यासंदर्भात लागू केले जाऊ शकतात, असं कुलमन यांना वाटतं.
18 निरोगी पुरुषांनी पाच दिवस त्यांच्या नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त जास्त चरबीयुक्त आणि जास्त गोड अती प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले. (सरासरी, त्यांनी दररोज 1,200 किलोकॅलरी अधिक खाल्ल्या), तर नियंत्रण आहार घेणाऱ्या इतर 11 जणांनी त्यांच्या आहारात कोणताही बदल केला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
या अभ्यासामधील निष्कर्षांमधून असं दिसून आलं की, जास्त प्रमाणात कॅलरी असलेलं अन्न खाल्ल्यामुळे, मेंदू इन्सुलिन देत असलेल्या प्रतिसादामध्ये बदल झाला.
विशेषकरून मेंदूचा असा भाग जो अन्नाच्या दृश्य आणि स्मृतीशी संबंधित प्रक्रियांना मिळणारा प्रतिसाद कमी करण्यास मदत करतो. म्हणजेच इन्सुलिनच्या बाबतीत मेंदू कमी कार्यक्षम झाला.
इन्सुलिनचा प्रतिरोधक असलेला मेंदू भूक आणि अन्नाचं सेवन योग्यरितीनं कमी करत नाही. म्हणजेच आपलं पोट भरल्यानंतर आपण खाणं थांबवलं पाहिजे हे सांगणारे सिग्नल योग्यरितीनं मिळत नाहीत.
कुलमन म्हणतात की, "या अभ्यासातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे शरीराआधी आपल्या मेंदूमध्ये बदल होतात. या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांचं वजन तेवढंच होतं."
"मात्र जेव्हा आम्ही त्यांच्या मेंदूचं निरीक्षण केलं, तेव्हा आम्हाला दिसलं की काही वर्षांपासून लठ्ठ किंवा अधिक वजन असलेल्या व्यक्तीच्या मेंदूशी तो अधिक मिळताजुळता होता," असं त्या म्हणतात.
संशोधनातून असं दिसून आलं आहे की जे लोक लठ्ठ असतात, त्यांच्यामधील हायपोथॅलॅमस आणि मेंदूची रिवार्ड सिस्टम विस्कळीत होऊ शकते.
मेंदूची रिवॉर्ड सिस्टम म्हणजे मेंदूचे विविध भाग आणि सिग्नल यांचं नेटवर्क जे आपल्यामध्ये समाधानाची, आनंदाची भावना निर्माण करतं. जे आपल्या अन्नाच्या सेवनाचं नियमन करतं.
कुलमन म्हणतात की, हा अभ्यास सध्याच्या संशोधनाचा विस्तार करतो. त्यातून आपले आतडे आणि मेंदू यामधील संवाद दिसतो. तसंच जे लोक लठ्ठ आहेत त्यांच्यात ही व्यवस्था वेगळी असते हे दिसतं.
विशेषकरून, जे लोक लठ्ठ असतात, ते जेव्हा आनंदाचा विचार करकतात, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात अन्न घेण्याची जास्त शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
कुलमन यांच्या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना पाच दिवसांनंतर त्यांच्या नेहमीच्या आहारावर परत येण्यास सांगण्यात आलं होतं.
मात्र एक आठवड्यानंतर करण्यात आलेल्या पुढील चाचण्यांमधून दिसून आलं की, त्या लोकांच्या मेंदूमधील स्मरणशक्ती आणि आकलनाशी संबंधित भाग, त्यांनी अधिक कॅलरीचा आहार घेण्यापूर्वी जितका प्रतिसाद देत होते, त्यातुलनेत तो आहार घेतल्यानंतर कमी प्रतिसाद देत होते.
मग, सणाच्या वेळेस आहाराचा अतिरेक करणं योग्य आहे का?
हे सर्वश्रुत आहे की दीर्घकाळ गोड पदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाणं आपल्या मेंदूसाठी चांगलं नसतं. एक वेळ मेजवानी केल्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो यावर कमी संशोधन झालेलं असलं तरीदेखील, सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांमधून दिसतं की, ते आपल्या मेंदूसाठी हानिकारक नसतं.
"आमच्या अभ्यासातून दिसतं की, एकदा जेवणाचा अतिरेक करणं हे तुम्हाला वाटत असेल तितकं हानिकारक नाही. त्यामुळे ख्रिसमसच्या जेवणाचा आनंद घ्या," असं हेंगिस्ट म्हणतात.
ते पुढे म्हणतात की मात्र कधीतरी असा अतिरेक करणं किंवा दणकून खाणं ठीक आहे. मात्र यापेक्षा अधिक वेळेस असं खाल्ल्यास त्याचा तुमच्या शरीरावर ताण येऊ शकतो.
कुलमन यांच्या संशोधनानुसार, अगदी पाच दिवस असं खाल्ल्यामुळे देखील तुमच्या मेंदूवर दीर्घकाळ राहणारे परिणाम होऊ शकतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











