मुंबई, ठाणे आणि पुणे विभागासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट, शाळांना सुटी जाहीर

भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 25 सप्टेंबर रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि 26 सप्टेंबर रोजी पालघर, नाशिक, पुणे, मुंबई विभागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना 26 सप्टेंबर 2024 रोजी सुटी जाहीर केली होती.

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे आणि पुण्यातील शाळांना देखील 26 सप्टेंबर रोजी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील अधिकारी आणि यंत्रणांना सज्ज राहण्यात सांगितलं आहे.

मुंबईमध्ये 25 सप्टेंबरच्या संध्याकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली होती.

घाटकोपर स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं. लोकल गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. तसेच मध्य रेल्वेच्या भांडुप ते कुर्ला रेल्वे ट्रॅकवरसुद्धा पाणी साचलं होतं.

घाटकोपर स्थानकात मेट्रो आणि मेन लाईन वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी रेल अलर्ट

पुण्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा 26 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या पुणे आणि परिसरातील सर्व धरणे भरलेली असून, धरणक्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

तसेच नदी पात्रातील वाढ होणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांनी नदीकाठच्या झोपड्या, वस्त्या व परिसरात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही पुणे प्रशासनाने दिल्या आहेत.

व्यक्ती, साहित्य, वाहने, जनावरे, टपऱ्या, दुकाने इत्यादी तात्काळ हलविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी इतर संबंधित विभागाच्या मदतीने पर्जन्याच्या अनुषंगाने वेळोवेळी गावनिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, असेही निर्देश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.