पुरात अडकल्यास स्वत:चा बचाव कसा कराल? 'हे' सोपे उपाय वाचवतील तुमचा जीव

गेल्या काही वर्षांमध्ये पूर आल्याच्या बातम्या जगाच्या सर्वच भागातून मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. या पुरांमध्ये मोठी जीवितहानी होते, मालमत्तेचं नुकसान होतं. मात्र, पूरस्थितीत अडकल्यावर काय करायचं याची अनेकांना कोणतीही माहिती नसते.

पूर येण्यामागची कारणं, पूर येण्यापूर्वी घेण्याची काळजी, पुरात सापडल्यावर काय करायचं आणि पूर ओसरल्यावर काय करायचं, याबद्दल महत्त्वाची माहिती देणारा लेख :

अलीकडच्या काळात जगभरातच पुरांचं प्रमाण वाढलं आहे. फक्त 2023 मध्येच जगभरात 164 पूर आले होते. त्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

पृथ्वीवर अनेक प्रकारची नैसर्गिक संकटं येत असतात. पूर हे त्यातील वारंवार येणारं संकट आहे. पुरामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस होतो.

'नासा'च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्येच जगभरात सर्वत्र 164 पूर आले होते. यामध्ये उत्तर लिबियातील पुराचाही समावेश आहे. या पुरात 10 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते किंवा बेपत्ता झाले होते.

यंदाच्या वर्षी अनेक देशांना पूरस्थितीला तोंड द्यावं लागलं. मध्य युरोपातील आणि उत्तर आणि पश्चिम आफ्रिकेत अलीकडेच पूर आले होते.

पुरांचे अनेक प्रकार असतात. मात्र, यातील विशिष्ट प्रकारचा पूर सर्वात धोकादायक असतो. तो म्हणजे अचानक येणारा पूर किंवा फ्लॅश फ्लड्स. यामध्ये काही मिनिटांतच किंवा काही तासांमध्येच पाण्याची पातळी वेगानं वाढते.

अतिवृष्टीमुळे या प्रकारचे पूर येतात आणि घरं, इमारती उदध्वस्त करण्याएवढे ते शक्तिशाली असतात. दुष्काळ आणि नंतर होणारी अतिवृष्टी यासारखी हवामानाशी निगडीत प्रतिकूल परिस्थिती हवामान बदलाच्या परिणामांमुळे आणखी बिघडते आणि त्यातून अचानक पूर (फ्लॅश फ्लड्स) येतात.

2021 मध्ये अमेरिकेतील वैज्ञानिकांनी 'नेचर' या प्रसिद्ध नियतकालिकामध्ये एक अभ्यास प्रकाशित केला.

यात त्यांनी म्हटलं होतं की, पुराचा धोका असणाऱ्या भागात आपल्यापैकी अधिकाधिक लोक राहत आहेत. यामागचं कारण म्हणजे हवामान बदलाचा पृथ्वीवरील हवामानावर होत असलेला विपरित परिणाम.

अतिवृष्टी, वाढत जाणारी समुद्रपातळी आणि अतिशय भयानक, मोठ्या स्वरुपाची चक्रीवादळं यामागे हवामान बदलाचा प्रभाव हे कारण आहे.

अचानक येणाऱ्या पुरापासून (फ्लॅश फ्लड) तुम्ही स्वत:चा बचाव कसा करू शकता? काही सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पुराच्या पाण्यात अडकल्यावर अंमलात आणल्यास तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचा जीव वाचण्याची शक्यता वाढू शकते.

पाहा, ऐका, बोला आणि शिका

जगातील अधिकाधिक लोक पुराचा धोका असलेल्या भागात राहत असल्याचा इशारा वैज्ञानिक देत आहेत. ब्राझीलमधील पोर्तो अलेग्री या शहराचा मध्यवर्ती भाग हे त्याचंच उदाहरण आहे.

पुरापासून बचाव करण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात राहत आहात की नाही हे जाणून घेणं. म्हणजेच पूर येण्याआधीच त्याबाबत सावध होणं.

हवामानविषयक स्थानिक इशारे किंवा अंदाजांकडे लक्ष ठेवा. विशेषकरून हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीबद्दल देण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या.

पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असलेल्या भागात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या कुटुंबाला आणि पाळीव प्राण्यांना तिथून सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्याची योजना आधीच तयार ठेवा.

यामुळे औषधं, स्वच्छ पाणी, मोबाइल फोनचा चार्जर आणि वॉटरप्रूफ कपडे किंवा रेनकोट यांसारख्या गोष्टींनी सुसज्ज असलेलं आपत्कालीन किंवा 'इमर्जन्सी किट' तुम्हाला तयार ठेवता येईल. पूरस्थितीत सापडल्यावर हे किट अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

या प्रकारचं किट कसं तयार करायचं किंवा यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा, याबाबत 'रेड क्रॉड' सारख्या संस्था माहिती पुरवतात.

याशिवाय तुमच्या शेजाऱ्यांना देखील पुराच्या धोक्याबद्दल माहिती द्या. विशेषकरून तुमच्या आजूबाजूला जर वृद्ध किंवा शारीरिक मर्यादा असणारे लोक राहत असतील तर त्यांना याची माहिती द्या. म्हणजे ते देखील सतर्क राहतील.

तुमच्या घराचा बचाव कसा कराल?

पूरस्थितीत अंमलात आणावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा सूचना यामुळे तुमच्या घराचा पुराच्या पाण्यापासून बचाव होईल याची कोणतीही खात्री नसते. बँकॉकमधील घराच्या बाबतीत ते दिसून आलं.

पहिलं पाऊल म्हणजे घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या नीट बंद करा, कड्या किंवा लॉक व्यवस्थित लावून घ्या. असं करताना तिथून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग उपलब्ध असल्याची खातरजमा करून घ्या.

असं केल्यानं तुमच्या घरात शिरणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर बाथरुम, टॉयलेटमधील ड्रेनेज किंवा सांडपाण्याची व्यवस्था ब्लॉक करण्यासाठी वाळूच्या पिशव्या वापरणंही योग्य ठरतं.

या बातम्याही वाचा:

समजा तुम्ही पुरात अडकलात तर काय?

पुराचं पाणी साठलेल्या रस्त्यांवरून चालणं धोकादायक असतं. मात्र प्रत्येकवेळेस ते टाळता येत नाही.

तुम्ही जर घराबाहेर असाल आणि रस्त्यावर पाणी साचताना दिसलं किंवा पाण्याचा लोंढा येताना दिसला तर उंचावरील भागात जाण्याचा प्रयत्न करा.

पूरग्रस्त भागातून पायी चालणं किंवा वाहन चालवणं टाळा. तज्ज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती किंवा अगदी कारसारख्या वाहनाला वाहून नेण्यासाठी अर्धा मीटरपेक्षा कमी पातळीचं वाहतं पाणी पुरेसं ठरतं. कारण पाण्यामध्ये प्रचंड शक्ती असते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), पुरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 75 टक्के मृत्यू बुडाल्यामुळे होतात.

याशिवाय पुराच्या पाण्याबरोबर अनेक गोष्टी वाहून नेल्या जातात. यातील बऱ्याच गोष्टी धोकादायक असू शकतात. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना गंभीर स्वरुपाच्या जखमा होऊ शकतात.

यामध्ये वीजेच्या तारांचा देखील समावेश असतो. या तारांमुळे वीजेचा धक्का लागू शकतो आणि त्यामुळे मृत्यू होण्याचाही धोका असतो.

रस्त्यांवर अनेकदा 'मॅनहोल' म्हणजेच गटारी किंवा सांडपाण्याच्या व्यवस्थेशी संबंधित मोठे खड्डे असतात. एरवी अनेकदा त्यावर झाकणं असतात. मात्र, काहीवेळा अशी झाकणं नसतात किंवा पुराच्या पाण्यामुळे ती वाहून गेलेली असतात.

या मॅनहोलमधून पाणी थेट गटारीत किंवा नाल्यात जात असतं. परिणामी अशा रस्त्यांवरून चालताना लोक कित्येक मीटर खोल नाल्यांमध्ये पडू शकतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

पूरस्थिती निर्माण होत असताना तुम्ही जर घरातच असाल तर घराच्या वीज पुरवठ्याशी संबंधित मुख्य स्वीच बंद करून घरातील वीजप्रवाह खंडीत करा. यामुळे घरात शॉर्ट सर्किट होण्याचा आणि वीजेचा धक्का लागण्याचा धोका टाळता येईल.

घरातील पाण्याचा पुरवठा म्हणजे विविध नळ, गॅस पाईप लाईनचा कॉक किंवा गॅस सिलिंडरचा कॉक बंद करा. जर शक्य असेल तर घरातील फर्निचर आणि विद्युत उपकरणं वरच्या मजल्यावर, छतावर किंवा उंच ठिकाणी हलवा. जर घरातील पाण्याची पातळी वाढत असेल तर घराबाहेर पडा.

पूर ओसरल्यानंतर काय करायचं?

हवामान बदलाच्या परिणामामुळे किंवा त्याच्याशी संबंधित घटनांच्या प्रभावामुळे अतीवृष्टी होते आणि त्यातून पूर येण्याचा धोका वाढतो. लिबियातील डेरना इथं देखील असंच झालं.

पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर किंवा पूर ओसरल्यावर घरी परतण्याआधी स्थानिक प्रशासनाशी बोलून आवश्यक माहिती घ्या.

पूर आल्यानंतर जसे अनेक धोके असतात, तसेच पूर ओसरल्यानंतर देखील काही धोके मागे राहतात. पुराच्या पाण्याबरोबर त्या परिसरात अनेक गोष्टी वाहून आलेल्या असतात.

यात वीजेच्या तारा, माती किंवा मलबा, सापांसारखे विषारी जीव किंवा इतर धोकादायक प्राणी यांचाही समावेश असतो.

पुराच्या पाण्याबरोबर सांडपाणी, तेल किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारे असंख्य पदार्थ वाहून आलेले असतात. ते पुराच्या पाण्याबरोबर त्या सर्व परिसरात पसरलेले असतात.

त्यामुळे पूर ओसरल्यानंतर देखील त्या परिसरात जाताना पुरेशी खबरदारी घेणं आवश्यक असतं.

प्रत्येक भूभाग, परिसर, ठिकाण यानुसार पूरस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठीच्या सूचना, उपाययोजना वेगवेगळ्या असू शकतात, इथं ही गोष्ट लक्षात घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.

अनेकदा एका ठिकाणची उपाययोजना दुसऱ्या ठिकाणी लागू होईलच किंवा त्याचा तसा फायदा होईलच असं नसतं.

त्यामुळे तुम्ही ज्या परिसरात, ठिकाणी राहत असाल तेथील स्थानिक प्रशासनाकडून नेहमीच आवश्यक की माहिती घ्या. यामुळे तुम्हाला तेथील परिस्थितीचं योग्य आकलन होईल आणि योग्य ती उपाययोजना करत पावलं टाकता येतील.

'प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर' अशा आशयाचा एक वाकप्रचार आहे, म्हणजेच एखादी गोष्ट घडल्यावर त्यावर उपाय करण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय करणं केव्हाही योग्य.

त्यालाच अनुसरून पूरस्थितीचा विचार आणि त्यासाठीची तयारी आधीच केल्यास नंतर होणारी जीवितहानी किंवा इतर हानी टाळता येते किंवा कमी करता येते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)